Dudhsagar Waterfall Crowd : ‘दूधसागर’ला तरुणांची इतकी गर्दी का होतेय? | पुढारी

Dudhsagar Waterfall Crowd : 'दूधसागर'ला तरुणांची इतकी गर्दी का होतेय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क –
दूधसागरला हजारोंच्या संख्येने पोहोचलेले पर्यटक, ट्रेकर यांचा काल रविवारी दि. १७ रोजी चांगलाच हिरमोड झाला. (Dudhsagar Waterfall Crowd) शनिवार, रविवार असे सुट्टीचे दिवस असल्याने अगदी पहाटेपासूनच कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ लागली. तर साऊथवरून येणारे बहुसंख्य पर्यटक कोलेममधून दूधसागर धबधब्याजवळ चालत येत होते. ही संख्या जवळपास दोन हजारांहून अधिक असावी. देशभरातील लोक दूधसागर धबधबा पाहण्याच्या इच्छेने येथे दाखल होत असतात. मात्र, मुळातच याठिकाणी जाण्यास बंदी असल्याने रेल्वे पोलिसांसह, वनकर्मचाऱ्यांनी पर्यटक, ट्रेकर्सना अडवले. त्यांना परत माघारी जाण्याची सूचना केली. यामध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. यावेळी हजारोंच्या संख्येने तरूण रेल्वे रूळावर थांबून राहिले. पण, दूधसागर धबधब्याला तरुणांची इतकी मोठी गर्दी का होतेय? (Dudhsagar Waterfall Crowd)

निसर्गाचा अनोखा चमत्कार

निसर्गाच्या कुशीत लपून बसलेला दूधसागर धबधबा या ठिकाणापर्यंत पोहोचणं, एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. असेच एक ठिकाण म्हणजे दुधासारखा अखंड वाहणारा, चमचमत्या ताऱ्यांप्रमाणे जल वाहून नेणारा आणि खळाळत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारा धबधबा म्हणजे ‘दूधसागर.’ याचा अर्थ स्पष्ट आहे. दूधसागर म्हणजेच दुधाचा धबधबा असं म्हणता येईल. हा धबधबा मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात आहे. हे ठिकाण अद्भूत, भव्य आणि निसर्गाची ओढ लावणारं आहे.

दूधसागर धबधबा-

दूधसागर हा भारतातील पाचवा सर्वात उंच धबधबा आहे जो १०२० फूट उंचीवरून कोसळतो. गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर हा धबधबा आहे. येथे जाण्यासाठी ज‍वळचे दोन रस्ते आहेत. एक गोव्याहून आणि दुसरा कर्नाटकाहून. दूध सागर धबधबा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर मांडवी नदीवर स्थित आहे. हा धबधबा जगातील २२७ व्या क्रमांकाचा सर्वात सुंदर धबधबा आहे. विदेशी पर्यटकांनाही या धबधब्याची भूरळ आहे.

चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे काही भागाचे शूटिंग दूधसागर येथे झाले होते

बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग –

चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील एका भागाचे शूटिंग याच धबधब्यावर झाले आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर काही दृश्ये या धबधब्यावर चित्रीत करण्यात आली होती. उन्हाळ्यात हा धबधबा कोरडा पडतो. मात्र इतरवेळी हा धबाधबा पाहायला जाणे, हे पर्यटकांचे स्वप्न असते.

रेल्वेमधून नक्की जा!

निजामुद्दीन एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस या रेल्वे दूधसागरहून मार्गक्रमण करतात. तुम्हाला या धबधब्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात जाता येत नसले तरी दक्षिण भारताकडे जाणाऱ्या या रेल्वेमधून तुम्ही प्रवास करत हा धबधबा पाहू शकता. रेल्वेमधून हा धबधबा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरेल.

अनेक बोगदे पार केल्यानंतर ही रेल्वे दूधसागरच्या रेल्वे पुलाजवळ पोहोचते. बोगद्यातून आणि रेल्वे ट्रॅकवरून धबधब्यापर्यंतचा प्रवास एक थ्रीलचं असतो. आयुष्यभर विसरणार नाही, असा हा प्रवास घडतो. खडकांच्या डोंगरांमधून वाहणारा धबधबा पाहून डोळे दिपतात. दूर अंतरावरून येणारे पाण्याचे फवारे ओलेचिंब करून जातात. एकीकडे धबधबा आणि दुसरीकडे ब्रीजवरून जाणारी रेल्वे, यातून घडणारा प्रवास अवर्णनीय असतो. धबधब्याच्या शिरोमणीवर नजर टाकली की, हे पाणी नेमकं येतं तरी कोठून? असा प्रश्न आपसूक मनात येतो.

ट्रेकिंगसाठी थ्रील अनुभव –

बहुसंख्येने ट्रेकर्स दूधसागर ट्रेक करण्यासाठी येत असतात. कॅसलरॉकपासून १२ किलोमीटर व कुलेमपासून ३ किलोमीटरपर्यंत चालत ट्रेकर्स धबधब्याजवळ जातात. तर काही जण रेल्वेतून उतरून जंगल आणि रेल्वे ट्रॅक वरून चालत जात दूधसागर धबधब्यापर्यंतचा १६ किलोमीटर ट्रेक पूर्ण करतात. कोलेम असो वा कॅसल रॉक…ट्रेकर्स रेल्वे ट्रॅकचाच मार्ग निवडतात. रेल्वे रुळावरून इतक्या किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करणे, ट्रेकर्ससाठी थ्रील असते. ट्रेकर्स दूधसागर धबधब्याला भेट देऊन भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यास भेट देतात. आसपासची छोटी-मोठी ठिकाणे जंगलांनी वेढलेली दिसतात, जी पर्यटक, ट्रेकर्स-तरुणांना आकर्षित करणारी आहेत.

file photo

भगवान महावीर अभयारण्य किंवा मोल्लेम राष्ट्रीय उद्यान –

दूधसागर धबधबा भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान यांच्यामध्ये आहे. एका बाजूला डोंगर कपाऱ्यांमधून वाहणारा धबधबा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड घनदाट वने आणि पाने -फुले, औषधी वनस्पतींनी वेढलेली जंगले, स्पाईस गार्डन असा सगळा निसर्गाचा पसारा दूधसागरच्या सभोवताली आहे. धबधब्या भोवती जैवविविधतेने समृद्ध असे भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान आहे, हे पाहण्यासाठी लोक हमखास जातात.

मोल्लेम जंगल

मोल्लेम जंगल हे घनदाट सदाबहार आणि निम्न-सदाबहार वनांनी वेढलेले आहे. हे जंगल विशाल वन्य जीव विविधतेने नटलेले आहे. येथे वाघ, बिबट्या, गवे आणि अन्य २०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आणि आहेत. येथे मायसेना जीनस नावाची प्रकाश देणारी मशरुमची प्रजातीही आढळते. तसेच किंग कोबरा, हंप-नोज्ड पिट वायपर, इंडियन रॉक पायथॉन अशा सापांच्या प्रजाती आढळतात.

कोलेम

तांबडी सुरला मंदिर –

माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी!!” ही बा. भ. बोरकरांनी लिहिलेली कविता येथील निसर्गाला तंतोतंत लागू पडते. तांबडी सुरला येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. अनोख्या शैलीतील या मंदिराची निर्मिती १२ व्या शतकात झाली आहे. हे मंदिर कदंब यादव वंश काळातील वास्तुकला शैलीचे एकमेव स्मारक आहे. तांबडी सुरला मंदिर पणजीपासून ६६ किलोमीटर आहे. तांबडी सुरला जवळ धबधबादेखील आहे. जो तांबडी सुरला मंदिरापासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. तांबडी सुरला मंदिरापर्यंत गाडी जाते.

नेत्रावली धबधबा –

पश्चिम घाटात वाईल्डलाईफ सॅन्चुरी येथील नेत्रावली धबधबा सर्व निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. मान्सूनमध्ये फिरण्यासाठी हे सर्वांत उत्तम स्थळ आहे. येथे बर्ड वॉचिंग आणि स्पॉटिंग वाईल्ड लाईफ पाहू शकता. येथे Mhadei Wildlife Sanctuary सर्वात प्रमुख आहे.

file photo

हेदेखील वाचा-

file photo

Back to top button