मोबाईल पाण्यात पडलाय…? वाचा स्मार्ट टीप्स  | पुढारी

मोबाईल पाण्यात पडलाय...? वाचा स्मार्ट टीप्स 

टीम पुढारी ऑनलाईन 

होळी, रंगपंचमी जवळ आल्यानं अनेकांचं जोरदार प्लॅनिंग सुरू असेल. सुट्टीच्या दिवशी पाण्यात भिजून मस्त एन्जॉय करायचं. हे प्लॅनिंग करताना  तुमच्या स्किनची, केसांची काळजी कशी घ्यायची याचीही चर्चा आणि त्याबाबतच्या टीप्सची शोधमोहीम इंटरनेटवर सुरू असेल. पण, तुमच्या स्मार्टफोनचं काय? स्मार्टफोन रंगपंचमी  खेळताना पाण्यात पडला तर काय ? याचा विचार केलाय का ? फोन पाण्यात पडला किंवा पाणी फोनवर पडलं तर नुकसान फोनचंच होतं. अशावेळी तुम्ही काय करावं आणि काय नाही याच्या स्मार्ट टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे समजा असे काही झालेच तर तुमचा गोंधळ उडणार नाही आणि फोनचे कमीत कमी नुकसान होईल… 

हे करू नका 

कंपनीशी ‘झूठ मत बोलो’

तुमचा फोन पाण्यात पडला असेल आणि त्याची वॉरंटी असेल तर फोनला लगेच सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. तुमचा फोन पाण्यात पडून खराब झाला आहे हे कंपनीपासून लपवू नका. तरीही जर तुम्ही खोटे बोललात तर सर्व्हिस सेंटरमध्ये फोन दुरूस्तीला गेल्यानंतर लगेचच तुमची चोरी पकडली जाऊ शकते. जर असे झाले तर कंपनी तुम्हाला वॉरंटी देणार नाही. 

हेअरड्रायरचा वापर ‘नको रे बाबा’

फोन भिजल्याने तो सुकवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जातात. फोन पटकन कोरडा व्हावा यासाठी हेअरड्रायरचा वापर केला जातो. हेअर ड्रायर लगेचच गरम होतो. यामुळे तुमच्या स्मार्टफोनचा एखादा पार्ट खराब होऊ शकतो. त्यामुळे घाईत हेअर ड्रायरचा वापर करायला जाऊ नका. तसेच तुमचा फोन उष्ण वस्तूंजवळ (ओव्हन आणि रेडिएटर)  ठेऊ नका. 

तर ‘शॉक लग जायेगा’

फोन भिजलेला असताना त्याला चार्जर जोडू नका. फोन ओला असल्याने शॉर्ट सर्कीट होण्याची भिती असते. मोबाईलमधील कोणातेच बटन दाबू नका. तसेच कोणतीही टोकदार वस्तू मोबाईलमध्ये घालण्याचा प्रयत्न करू नका. 

फोन भिजल्यावर हे करा 

फोन स्विच ऑफ करा 

फोन भिजल्यानंतर सर्वात आधी तो स्वीचऑफ करा. भिजलेला फोन वापरणे धोकादायक ठरू शकते. त्यातील कोणताही पार्ट अधिकच खराब होऊ शकतो. अधिकच खराब झाल्याने तो बंद पडेल. 

कापडाने कोरडा करा 

फोन बंद केल्यानंतर तो सुक्या कापडाने चांगल्या पद्धतीने कोरडा करा. फोनमधील पाणी शोषले जाईल यासाठी टिशू पेपर,टॉवेल यांचा वापर करू शकता. फोनला जोडलेले हेडफोन, केबल, चार्जर काढून टाका. मोबाईलमधील सीम आणि मेमरी कार्डही काढा. यानंतर तुमचा फोन जोरजोरात हालवा. त्यामुळे इतर ठिकाणी साचून राहिलेलं पाणी बाहेर पडेल. 

फोन हवाबंद पिशवीत ठेवा

फोन पाण्यात पडल्यानंतर त्याला कोरडे केल्यानंतर तो एक हवाबंद पिशवीत ठेवा. प्रत्येकालाच ते लगेच शक्य होईल, असे नाही. त्यामुळे तुमचा फोन तांदळाने भरलेल्या पिशवीत ठेवा. २४ ते ४८ तासांसाठी तुमचा मोबाईल तांदळामध्ये घालून ठेवा. 

सुर्यप्रकाशात ठेवा

भिजलेला फोन कोरडा करण्यासाठी चांगला मार्ग म्हणजे तुमचा फोन सुर्यप्रकाशात ठेवणे. मोबाईल उघडून सुर्यप्रकाशात ठेवल्याने तो लवकरात लवकर सुरू होऊ शकतो. 

 

Back to top button