युरोपीय-जपानी यान बुधाच्या दिशेने रवाना | पुढारी

युरोपीय-जपानी यान बुधाच्या दिशेने रवाना

टोकिओ :

आपल्या सूर्यमालेतील सूर्याच्या अधिक जवळचा ग्रह म्हणजे ‘बुध’ होय. या ग्रहाच्या दिशेने युरोपीय व जपानी अवकाश यान नुकतेच रवाना झाले. सुमारे सात वर्षांच्या प्रवासानंतर हे यान बुधावर पोहोचणार आहे. 

‘युरोपीय स्पेस एजन्सी’चे (ईएसए) व ‘जपान एअरास्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी’ने (जेएएक्सए) संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, मानवरहित ‘बेपीकोलंबो’ अवकाश यान फ्रेंच गयाना येथून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. इटलीचे महान शास्त्रज्ञ गिसेपे बेपी कोलंबो यांचे नाव बुधावर जाणार्‍या या अवकाश यानाला देण्यात आले आहे. पाच रॉकेटच्या मदतीने शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी यान यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. 

ईएसएचे महासंचालक जॉन वोएर्नर यांनी सांगितले की, ईएसए व जेएक्सएसाठी बेपीकोलंबो हे यान मैलाचा दगडच ठरणार आहे. या यशामुळे भविष्यात यापेक्षाही मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे यान आपला आव्हानात्मक प्रवास पूर्ण करण्याबरोबरच महत्त्वाची माहिती गोळा करणार आहे. 

‘बुध’ हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असल्याने आतापर्यंत काही अवकाश यानेच या ग्रहावर पाठवण्यात आली आहेत. सूर्यापासून हा ग्रह 6 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. तर पृथ्वी आणि बुध यांच्यातील अंतर सुमारे 15 कोटी कि.मी. इतके आहे.

 हा प्रवास बेपी कोलंबोसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.बुध ग्रहाचा दिवसा जो भाग सूर्यासमोर असतो, तेथील तापमान 400 अंश सेल्सिअस इतके असते. तर रात्रीच्या वेळी या ग्रहावरील तापमान 170 अंश सेल्सिअस असते.

Back to top button