Butterfly Congregation : फुलपाखरांचे ‘स्थलांतर’ एक़ चित्ताकर्षक प्रवास… | पुढारी

Butterfly Congregation : फुलपाखरांचे 'स्थलांतर' एक़ चित्ताकर्षक प्रवास...

फुलपाखरांच्या अभ्यासासाठी वरचेवर जंगलात जाणे होत असते, फुलपाखरांच्या विविधतापूर्ण (Butterfly Congregation) प्रजाती त्यांच्या विविध अवस्था जसे अंडी, अळी, कोश व फुलपाखरू यांचे निरीक्षण वर्षभर सुरु असते. असचं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घनदाट जंगलात फुलपाखरांच्या शोधात फिरत असता एका ओढ्यात बरीच फुलपाखरे एकाच ठिकाणी भिरभिरताना दिसली. लगेच गाडी थांबवून ओढ्यात शिरलो आणि समोरील नजारा पाहून अवाकच झालो. तेथे अक्षरशः शेकडो फुलपाखरे भिरभिरत होती आणि हजारो फुलपाखरे झाडा-झुडपांवर लगडली होती. ओढ्यात पाणी नव्हते पण ओलसरपणा होता. जस-जसे ओढ्यात आत जात गेलो तस-तसे फुलपाखरांचे थवेच्या थवे हवेत उडु लागले. ओढ्या काठची झाडे फुलपाखरांनी अक्षरशः ओथंबलेली होती. या मध्‍ये डार्क ब्ल्यु टायगर या प्रजातींच्या फुलपाखरांची संख्या अधिक होती. आमची चाहुल लागेल तशी हजारो फुलपाखरे हवेत झेपावत होती आणि ओढ्या काठाला जरा आतमधे जाऊन पुन्हा झाडांवर बसत होती. फारच चित्ताकर्षक दृश्य होते ते !!!

फुलपाखरांचे congregations पश्चिम घाटात व पूर्व घाटात आढळते

 फुलपाखरांच्या एकत्र जमण्याला ‘congregation’ असे म्हटले जाते. निंम्फालीड या फॅमिलीतील फुलपाखरे दरवर्षी पावसाळ्यानंतर दाट जंगलातील अश्या ओलसर जागी एकत्र येतात. या मधे ब्लू टायगर, ग्लासी टायगर, प्लेन टायगर, स्राईप्ड टायगर, काॅमन क्रो, डबल बॅन्डेड क्रो या निंम्फालीड (brush footed) या फॅमिलीतील Danainae या उप फॅमिलीतील फुलपाखरांचा समावेश असतो. या फुलपाखरांचे असे congregations पश्चिम घाटात व पूर्व घाटात आढळून आले आहेत. (Butterfly Congregation)

साधारणतः पावसाळा संपत आला की हे चालू होते ते मार्च-एप्रिल अखेरपर्यंत होत असते. याचा नेमका कालावधी, कोणत्या भागात कधी होतो हे आज तरी सांगता येत नाही. ही फुलपाखरे दाट जंगलातील एखाद्या दमट व ओलसर जागेत, शक्यतो ओढ्यात हळूहळू जमु लागतात. लवकरच त्यांची संख्या हजारों लाखोंत जाते. तेथे ते जवळपास आठवडाभर थांबून असतात. या कालावधीत ते मकरंद म्हणजेच त्यांचे खाद्य घेताना दिसतात. लवकरच ते तेथून निघून जातात. ही घटना घडण्याची अनेक कारणे वर्तवण्यात आली आहेत, त्यापैकी एक म्हणजे स्थलांतर.

या congregations चा थेट संबंध फुलपाखरांच्या स्थलांतराशी जोडण्यात येतो. ज्या प्रमाणात दक्षिण अमेरिका ते उत्तर अमेरिका व परत असा स्थलांतर करणाऱ्या मोनार्च फुलपाखरांच्या congregations आणि स्थलांतराचा अभ्यास झाला आहे, तेवढा अभ्यास अजून भारतातील या निंम्फालीड फुलपाखरांच्या बाबतीत झालेला नाही. उत्तर-दक्षिण अमेरिका दरम्यान होत असलेल्या फुलपाखरांच्या स्थलांतर आणि congregations मध्ये फक्त मोनार्च या एकाच प्रजातीचा समावेश असतो. तर उष्णकटिबंधीय भारतीय द्वीपकल्पात होत असलेल्या या घटनेत फुलपाखरांच्या अनेक प्रजाती सामील असतात.

काही फुलपाखरू अभ्यासक यांचा संबंध हवामानाशी लावतात. कारण हे congregations पावसाळा संपल्यानंतर चालू होतात आणि जवळपास पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत चालतात. काही अभ्यासकांच्या मते हे congregations फुलपाखरांच्या स्थलांतरानंतरच्या हायबरनेशनचा भाग असावा. बरेच अभ्यासक याचा थेट संबंध या फुलपाखरांच्या अळ्यांच्या खाद्य वनस्पतींच्या उपलब्धतेशी लावतात. या फुलपाखरांचा अंडी, अळी आणि कोश हा जीवनक्रम मिल्कविड या गटातील वनस्पतींवर पूर्ण होतो. या निंम्फालीड फॅमिलीतील Danainae उप फॅमिलीतील बहुतांश फुलपाखरे मिल्कविड या दुधी चीक असणाऱ्या वनस्पतीवरच अंडी घालतात. हा चीक विषारी असतो, अंड्यातुन बाहेर आल्यावर अळी या वनस्पतीची पाने अधाशीपणे खाते आणखीन चार-पाच वेळा कात टाकतात. या विषारी चीकामुळे या अळ्या पण विषारी बनतात. तसेच त्यानंतर बननारे कोश व खुद्द फुलपाखरू सुद्धा विषारीच बनते. फुलपाखरांचे बरेच शत्रु जसे सरडे, पाली, पक्षी, अळ्या, कोश तथा फुलपाखरांचे भक्षण करू शकत नाहीत. निसर्गात तग धरून राहण्यासाठी फुलपाखरांनी उत्कांन्त केलेली ही एक क्लुप्ती आहे. यामुळेच ही फुलपाखरे सहसा हळूहळू उडतात. तसेच त्यांचे पंख सुद्धा कणखर असतात.

Butterfly Congregation
Butterfly Congregation

Butterfly Congregation : एकाच दिशेने प्रवास

ही फुलपाखरे आपल्या खाद्य वनस्पतीवर भरपूर अंडी घालतात आणि लवकरच अळ्या या वनस्पतींची सर्व पाने खाऊन फस्त करतात. यामुळे लवकरच तेथील खाद्य वनस्पतींची सर्व पाने संपून जातात आणि फुलपाखरांना अंडी घालण्यास नवीन पानेच शिल्लक रहात नाहीत. या खाद्य वनस्पतींच्या कमतरतेमुळे मग ही फुलपाखरे स्थलांतर करण्यास सुरवात करतात.

काही फुलपाखरू तज्ञांच्या मतानुसार ही फुलपाखरे कमी उंचीच्या ठिकाणावरून जास्त उंचीच्या ठिकाणी व परत असे स्थलांतर करतात. (Altitudinal migration) या congregations चा संबंध स्थलांतराशी लावण्यात आणखीन एक कारण म्हणजे जेव्हा जेव्हा जंगलात अशी हजारो फुलपाखरे जमतात त्या पूर्वी व त्यानंतरच्या काळात जवळपासच्या गावातील लोकांना ही फुलपाखरे एकाच दिशेने प्रवास करताना आढळली आहेत.

जीओ टॅगिंग

हे फुलपाखरांचे congregations नेमके कोणत्या काळात आणि कोठे होईल हे कोणीही ठाम पणे सांगु शकत नाही. कारण सद्या तरी याचा सखोल अभ्यास झालेला नाही. अलिकडे काही संशोधक ही फुलपाखरे पकडून त्यांच्या पंखावर जीओ टॅगिंग करतात आणि सोडून देतात. नंतर अशी टॅग केलेली फुलपाखरे जर कोणा अभ्यासकाला सापडली तर त्यातून काही निष्कर्ष काढता येईल; परंतु ही शक्यता फार धुसर आहे कारण आपल्याकडे असलेली फुलपाखरू अभ्यासकांची वानवा आणखीन अश्या प्रकारचे टॅगिंग हजारों-हजार फुलपाखरांवर करावे लागतील तर थोडेफार माहिती मिळू शकेल. एखाद्या ठिकाणी पकडून टॅगिंग केलेली फुलपाखरे पुढील वर्षी त्याच ठिकाणी पुन्हा सापडतील ही शक्यताच नगण्य आहे. कारण या फुलपाखरांचा जीवनकाळ एक वर्षापेक्षा जास्त नसतो.

केरळ मधील निलगिरी बायोस्पियर रिजर्वमध्ये तर लाखों फुलपाखरे एकत्र गोळा होतात. साधारणतः वरील सर्व बाबींचा विचार करता फुलपाखरांचे congratulations हे खाद्य वनस्पतींची उपलब्धता व ॠतुमान बदल यावर अवलंबित असलेला स्थलांतरापुर्वीची एक पायरी असावी असे वाटते. त्यामुळे ही फुलपाखरे पावसाळ्यानंतर स्थलांतर करत हळुहळु मार्गक्रमण करत असणार. त्यामुळेच त्यांचे नेमके ठिकाण आणि काळ याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही. सर्वसाधारणतः ही फुलपाखरे पावसाळ्यानंतर ईशान्य ते दक्षिण पश्चिम आणि उन्हाळ्यात दक्षिण पश्चिम ते उत्तर पूर्व दिशा असा प्रवास करतात. या congregations च्या एकंदरीत आतापर्यंतच्या नोंदी वरून डिसेंबर महिन्यात याचे प्रमाण आपल्या भागातील पश्चिम घाटातील दाट जंगलातील ओलसर ओढ्यात जास्त आढळून आले आहे.

Butterfly Congregation : फुलपाखरांमधील वेगळेपण

या प्रकारचे congregations दाजीपूर, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, आंबा, आंबोली येथील जंगलात पाहिले आहेत. गोवा येथील तांबडी सुर्ला येथे सुद्धा हा प्रकार बघितला आहे. या घटनांत सुद्धा खुप वेगळेपण आढळले आहे. या congregations मध्‍ये कोणती तरी एखादी फुलपाखराची प्रजात जास्त आढळून येते दाजीपूर येथे मला ग्लासी टायगर या प्रजातीचे फुलपाखराची संख्या जास्त आढळून आली होती. तांबडी सुर्ला येथे स्राईप्ड टायगर यांची जास्त, राधानगरी येथे काॅमन क्रो फुलपाखरे जास्त होती तर चांदोली आणि आंबोलीत ब्ल्यू टायगर ही फुलपाखरे जास्त होती. या फुलपाखरू congratulations प्रमाणेच काही फुलपाखरे विशिष्ट वनस्पतींवर मोठ्या संखेत भिरभिरत असतात. असंख्य फुलपाखरे Mud-pluddling साठी ओलसर जागी एकत्र येतात. परंतु या दोन्ही प्रकारात फक्त नर फुलपाखरेच असे करताना आढळून आले आहेत. प्रजननक्षमता वाढवण्यासाठी व मादी फुलपाखरांना स्वतःकडे आकर्षित करण्याकरिता या फुलपाखरांना अल्कलाईडस् आणि मिनरलस्ची गरज असते आणि ती या फुलपाखरांना Mud-pluddling मधून मिनरलस् आणि वनस्पतींमधून अल्कलाइडस् मिळतात.

Butterfly Congregation

Congregations चा अभ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात काही फुलपाखरू तज्ञांनी केला आहे. त्यांनी यावेळी अनेक फुलपाखरांना प्रत्यक्ष पकडून त्यांच्यावर हलके टॅगस् लावले आणि सोडून दिले. या वेळी त्यांनी केलेल्या अभ्यासात नर आणि मादी या दोघांची पण संख्या जवळपास समान आढळली होती. या congregations मधे नर आणि मादी दोन्ही समील असतात म्हणजेच या congregations ना स्थलांतरापूर्वीचे घटना म्हणता येईल. या अभ्यासात एक फार महत्त्वपूर्ण गोष्ट उघडकीस आली ती म्हणजे ज्या माद्या होत्या त्या sexual diapose मधे होत्या. त्यांची जननेंद्रिय पूर्ण विकसित झालेली नव्हती, म्हणजेच त्यांचे पोट लहान होते, याचा अर्थ ही सर्व फुलपाखरे नुकतीच कोशातून बाहेर आलेली होती आणि स्थलांतरा दरम्यान अधिकचे ओझे त्यांना नको होते.

फुलपाखरांच्या संख्येत होणारी ही घट चिंताजनक

जगभरात Danainae या उप फॅमिलीतील 300 प्रजाती आढळतात पैकी भारतात 27 प्रजाती हिमालय, उत्तर-पूर्वेकडील राज्यांपासून अगदी दक्षिण भारतातील पश्चिम आणि पूर्व घाटात आढळून आल्या आहेत. यातील बहुतांश प्रजाती स्थलांतर करतात. काही तज्ञांच्या मते काही वर्षांपूर्वी अश्या प्रकारचे congregations फार काॅमन होत असत; परंतु अलिकडे हा प्रकार दुर्मिळ होत आहे, दिवसेंदिवस यात सामील होणाऱ्या फुलपाखरांच्या संख्येत आणि प्रजातींत कमालीची घट होत आहे. याला हवामानातील बदल, फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतींची वानवा, चांगल्या समृद्ध जंगलांची दुरावस्था इत्यादी कारणे वर्तवण्यात येतात. फुलपाखरे निसर्गात फार उपयुक्त भूमिका  करतात. अन्न साखळीत त्यांचे स्थान फार महत्त्वपूर्ण आहे. फुलपाखरांचा सरडे, पाली, पक्षी यांच्या खाद्यात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. फुलपाखरे अनेक वनस्पतींच्या परागीभवनाचे महत्त्‍वाचे कार्य करत असतात. फुलपाखरांच्या संख्येत होणारी ही घट फार चिंताजनक आहे याचा दुष्प्रभाव निश्चितच इतर नैसर्गिक घटकांवर होणार आहे. फुलपाखरांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी फारसे प्रयत्न सरकार दप्तरी होताना दिसत नाहीत, अजूनही बरीच फुलपाखरे कायद्याने संरक्षित नाहीत. फुलपाखरांच्या अळ्यांच्या खाद्य वनस्पतींचे संवर्धन व लागवड मोठ्या प्रमाणावर होणे गरजेच आहे. घनदाट जंगल, पाणस्थळ जागा, गवताळ प्रदेश यांचे संरक्षण व्हायला हवे.
भारतात आजकाल खुप ठिकाणी फुलपाखरू उद्यान तयार केले जात आहेत ही एकमात्र जमेची बाजू आहे.

Butterfly Congregation

फारूक म्हेतर : फुलपाखरू, पक्षी, वन्यजीव अभ्यासक, कोल्हापूर 9028816060
farukarise@gmail.com

 

हेही वाचा : 

 

Back to top button