नवा स्वतंत्र मार्ग | पुढारी

नवा स्वतंत्र मार्ग

प्रा. डॉ. रूपाली शिंदे

वाउगे घरदार वाउगा संसार। वाउगे शरीर नाशिवंत ॥
एक नाम सार वाउगा पसार। नामचि निर्धार तरती जन ॥

संत चोखामेळा यांच्या शिष्या आणि सहचारिणी संत सोयराबाई यांना घरदार-संसार ‘वाउगा’आहे. अकारण आहे. शरीर, घरदार सारं विनाकारण आहे असा विचार बाई करू लागते, तेव्हा तिला या पलीकडचं अधिक काहीतरी हवं असतं. खरंतर घरदार हेच बाईचं विश्व असा सर्वसाधारण समज! या समजुतीला छेद देण्याचं कार्य ब्रह्मवादिनींनी तसंच बौद्ध धर्मातील विद्वान स्त्रियांनी (भिक्खुणी) केलं. ‘थेरीगाथा’ या बौद्ध ग्रंथामध्ये 73 परमपदप्राप्त विद्वान स्त्रियांनी आपले संन्यस्त झाल्यानंतरचे, ज्ञानप्राप्तीनंतरचे अनुभव व्यक्त केले आहेत.

वयोवृद्ध, ज्येष्ठ स्त्री या अर्थाने ‘थेरी’हा शब्द इथे येतो. गौतम बुद्धांच्या समकाळातच बौद्धांच्या भिक्षूसंघात स्त्रियांचा प्रवेश झाला. महाप्रजापती गौतमीने संन्यास घेऊन भिक्षूसंघातप्रवेश केला. संसारातील दुःखापासून मुक्ती मिळविण्यासाठी संन्यास घेणं आणि भिक्षूसंघात सामील होणं हा एक नवा मार्ग स्त्रियांना सापडला तो गौतमीमुळे. कुटुंबातलं नगण्य स्थान आणि स्त्रीजन्माचा भोगवटा भोगणं ही अटळ गोष्ट.अशा परिस्थितीत स्त्रियांनी संसाराचा त्याग करून भिक्षुणी होणं ही क्रांतिकारक गोष्ट! बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांचा प्रवेश होणं ही बाईचं निर्णयस्वातंत्र्य व्यक्त करणारी घटना म्हणून बघायला हवी.

संबंधित बातम्या

अर्थात त्यामुळे जीवनात नेमका काय फरक पडला? देहविक्रय करणारी विमला ही ‘थेरी’ झाल्यानंतरच्या तिच्या उद्गारातच या प्रश्नाचं उत्तर प्रतिबिंबित होतं. ‘देहाला सजवून मी प्रदर्शन मांडत होते… आता केसाचं मुंडन करून भगवं वस्र नेसून झाडाखाली ध्यान करत बसले असताना मी किती समाधानी आहे!

Back to top button