मन की बात : संसार माझा रेखिते… | पुढारी

मन की बात : संसार माझा रेखिते...

आपण कितीही बरोबरीच्या चर्चा केल्या तरीही स्त्रियांना एकूणच सहनशीलता, तडजोड या गोष्टी जास्त चांगल्या जमतात. अर्थात, काही अपवाद हे सगळीकडे असणारच! लहान वयातच भावंडांना समजून घेणे, घासातील घास देणे या गोष्टी तुलनेने  बहिणीच्या जास्त लक्षात येतात. परमेश्‍वराची बहुतेक ती सुंदर कलाकृती असावी असेच वाटते. त्यामुळे मोठे होताना नाती जपणे, बांधून ठेवणे, फुलवणे  हा माझ्या मते तरी एक फेमिनाईन टच असावा..!

ज्यांचा लग्न करायचे हा निर्णय असतो, त्या दोघांचीही आपल्या संसाराची सुंदर स्वप्ने डोळ्यापुढे असतात. ती जोडीने पूर्ण करण्यातील आनंद पण फार वेगळाच असतो. अर्थात, ती सगळीच पूर्ण होतील असेही नसते. पण, जी झाली त्यात आनंद मानून, राहिलेली आहेत त्यासाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करून तडजोडी, माघार, पॅचअप करत आपली आयुष्याची शिकवणी चालूच असते. ज्यांची काहीतरी शिकण्याची मानसिकता असते ते  कायम विद्यार्थी दशेत असतात. तसे असणेच खरे तर आनंददायी असते बरं का!

खरे तर आपले किचन, स्वयंपाक घर, रसोई हे अगदी आपले हक्‍काचे व मनाला जवळ असे माध्यम. ओठातून पोटात शिरावे असे कायमच म्हणतात ते अगदी खरे आहे. आपण आपल्यांसाठी अगदी मनापासून आपले त्रास विसरून जीव ओतून काहीतरी खास, स्पेशल बनवतो ते फक्‍त दोन कौतुकाच्या शब्दांसाठी. कुठे ते भरभरून मिळतात तर कुठे मध्य, तर काही ठिकाणी अगदीच ठणठण गोपाळ असतो. पण, तरी आपल्या या माता-भगिनी  व आजकाल  घराघरांतील आपले मास्टर शेफ अजिबात खचून न जाता आपल्या संसाराचे कारागीर म्हणजे त्यातील भांड्यांकडून जणू काही ना काही शिकत असतात व आपला मार्ग सुकर करत असतात हेच खरे.

संबंधित बातम्या

आपली परात, मोठी पातेली आपल्यात जणू सारे सामावून घेत असतात व आपले मन पण असेच मोठे करून ‘सब को माफ किया जाये’, हेच सांगत असतात. घराघरांत कुरबुरी, वाद, तंटे, भांडणे हे तर होतच असते. भांड्याला भांडे लागले की आवाज हा होणारच. पण, आपल्यातील नाते कसे जपावे, हे दिवसातून जितके वेळा चहा, कॉफी घेतो तितके वेळा आपली कपबशी आपल्याला तेच  सांगत असते. कपाकडून काही चुकले तर बशी मात्र सारे सहजरित्या सांभाळून घेत असते. पण, बरेचदा कपाला तर कधी बशीला त्याची फारशी जाणीव पण नसते. पण तरी त्यांचे  काम आपले चालूच.

गाळणे, चाळणी, झारी आपल्याला जणू योग्य निवडीचे धडे देतात. हवे तेच घ्या, नको तो कचरा बाजूला काढा. विचारांचे पण तसेच हवे. नाहीतर मेंदूत नको त्या अणू-रेणूचे साम्राज्य वाढतच राहील. वेळेचे नियोजन, कमी वेळात जास्त कामे हे आपल्या कुकरच्या शिट्ट्या शिकवतात. अति ओढाताण न करता कामे चटकन हातावेगळी करणे कोई इनसे सिखे!

आपल्या माणसांशी त्यांच्या काही वागण्याकडे काणाडोळा करून सगळ्यात रममाण कसे व्हावे, हे आपला मिक्सर शिकवून जातो. स्वादिष्ट वाटण, चाटण यासाठी थोडा खकाणा तर येणारच की हो!

मोठे संकट आ वासून पुढे ठाकले तरी ते कसे छोटे करावे, हे आपली धारदार विळी, सुरी व किसणी सांगून जाते. हाताला दुखापत न होता गोष्टी कशा छोट्या करून हातावेगळ्या करायच्या ते हेच. स्वतःला फार त्रास, दुखापत न होता सर्व घाव सोसताना सावधगिरीचा इशारा आपले छोटे जवान म्हणजे डाव, चमचे व चिमटा सांगून जातात. आयुष्यात सुव्यवस्थापन, टापटीपता हा जणू त्या घराचा आरसा असतो. भांड्याची मांडणी ती सुबकता दाखवून जाते.

कोणत्याही परिस्थितीत (अगदीच अटीतटीच्या वेळा सोडून) घरातील अन्नपूर्णा आपल्या घरातील अग्नी म्हणजे गॅसच्या ज्वाळेसारखी समभाव पेलणारी असते. ती ज्योत गोलाकार, समप्रमाणातच सगळीकडे पसरून सर्व आबालवृद्ध याची क्षुधा शांती व तृप्तता करत असते. उंबर्‍या बाहेर जाताना कोणीही विन्मुख जाता कामा नये, हेच समाधान लाख मोलाचे  असते.

शुद्ध, आरस पाणी, निर्मळ पाणी जणू अन्नाची व सार्थ विचार मनाची शुद्धताच मोजत असते. गढूळ पाणी व गढूळ विचार हे तन आणि मन दोन्हीला अपायकारकच असतात. म्हणूनच सण, वार, व्रत, वैकल्ये यांना सात्त्विक भावनेतून केलेला स्वयंपाक चव न घेतासुद्धा रुचकर व चवदार असतो हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे! मन का आनंदी असावे  ते केवळ यासाठीच.

या सगळ्या शस्त्र, आयुधांमुळेच तर मनापासून केलेले सुग्रास अन्न अगदी पूर्णब्रह्म होऊन जाते. आपण दसरा, दिवाळीला  आदर म्हणून आयुधांची पूजा करतो तेव्हा यांना नक्‍कीच लक्षात ठेवतो. कारण, मनोमिलन झालेली कोणतीही गोष्ट अवीट चवीचीच असते. मग ते अन्न असो वा भावभावना. नाही का!

शुद्धी दे, बुद्धी दे हे दयाघना

शक्‍ती दे, मुक्‍ती दे आमुच्या मना !

Back to top button