टिफीनमध्ये नको फास्ट फूड  | पुढारी | पुढारी

टिफीनमध्ये नको फास्ट फूड  | पुढारी

शाळेत जाणार्‍या मुलांच्या अनेक माता मुलांच्या टीफीनमध्ये फास्ट फूड देतात. तथापि, अशा पदार्थांमुळे शरीर तर बेडौल होतंच, पण अनेक प्रकारच्या आजारांनाही निमंत्रण मिळतं. 

मुलांना डब्यात काय द्यायचं असा प्रश्‍न अनेक आयांना पडतो. मुलाला आवडेल असे पदार्थ शाळेच्या डब्यात देणं त्या पसंत करतात. आजकाल अनेक मुलांमध्ये फास्ट फूडचा वापर करण्याची क्रेझ वाढली आहे आणि याला पालकही तेवढेच जबाबदार आहेत. मुलांना आवडतात म्हणून ते अशा प्रकारचे पदार्थ त्यांना देतात. पण, यामुळे मुलांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. दुसरीकडे अनेक मुलांना घरातील डब्यातून मिळालेल्या पदार्थांपेक्षा कँटीनमध्ये मिळणारे सामोसा, छोला-भटुरा, पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री, केक, सँडवीच, कोल्ड्रींक्स, चिप्स, नूडल्स अशा प्रकारचे पदार्थ पसंत असतात. भाजी-चपाती, पराठे, पुलाव, ताज्या फळांचा ज्यूस असे पदार्थ मुलांना बिलकुल आवडत नाहीत. त्यांना पौष्टिक खाद्यपदार्थ आवडत नाहीत तर त्याऐवजी तेलकट, मसालेदार, चमचमीत पदार्थ त्यांना आवडतात.

खरंतर अशा प्रकारचे खाद्यपदार्थ हे पाश्‍चिमात्त्य संस्कृतीची देणगी आहे. पण आपल्याकडे सध्या त्याचा प्रसार वाढतो आहे. शाळेतच कशाला, मुलं घरातही संतुलित, भोजन घेण्याऐवजी फास्ट फूड घेणंच अधिक पसंत करतात. त्यामुळे त्यांना आवडतं म्हणून टिफीनमध्येही  अशाच प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जातात. असे पदार्थ मुलांसाठीच नाही, तर मोठ्यांसाठीही नुकसानकारकच असतात. अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे मधुमेह, हृदयाशी संबंधित विकार शरीरावर कमी वयातच आक्रमण करतात. फास्ट फूडचा वापर मुलांमध्ये वाढणं, हेच याचं मुख्य कारण आहे. 

संबंधित बातम्या

अनेक विद्यार्थी प्राथमिक शाळेपासूनच फास्ट फूडचा आस्वाद घेऊ लागतात. आपली शिक्षण पद्धती ही त्याला जबाबदार आहे. जीवशास्त्रासारखा विषय शिकवताना शिक्षक विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचं महत्त्व सांगतात आणि दुसरीकडे शाळेच्या आवारातच फास्ट फूडची विक्री सुरू असते. त्यामुळे अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांवर किमान शाळेच्या आवारात तरी बंदी असली पाहिजे, यासाठी पालकांनी आवाज उठवायला हवा. फास्ट फूडच्या वापरामुळे मुलांंमध्ये स्थूलपणा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शाळेत याबाबत जागरुकता निर्माण झाली तर मुलांच्या स्थूलपणावर अंकुश येऊ शकेल.

त्याचप्रमाणे पालकांनीही मुलांना फास्ट फूडचे धोके समजावून सांगितले पाहिजेत. शिक्षकांनीही याबाबत पावलं उचलावीत, यासाठी पालकांनी आग्रह धरला पाहिजे. शिक्षकांनी आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा मुलांच्या टिफीनमध्ये काय आहे, हे तपासून पाहिलं पाहिजे. त्यांच्या डब्यात फास्ट फूड असेल तर त्यांना पौष्टिक आहाराचं महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे. असं केल्यास मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलण्यास मदत होऊ शकेल. त्यासाठी शाळेच्या प्रमुखांनी फास्ट फूडवर बंदी आणण्यासाठी पुढे आलं पाहिजे. पालकांनी त्यांच्याकडे अशी मागणी केल्यास त्यांच्याकडून अशा प्रकारची पावलं उचलली जाऊ शकतात. शाळा प्रमुखांनीच अशा प्रकारचे खाद्यपदार्थ विकण्यास कँटिनवाल्यांना बंदी घातली तर अशा पदार्थांचं प्रमाण निश्‍चित कमी होईल. 

फास्ट फूड हे स्थूलपणाला निमंत्रणच असतं. स्थूलपणा वाढला की शरीरात एक प्रकारचा आळस निर्माण होतो. त्याचप्रमाणे त्यातून अनेक प्रकारचे विकार निर्माण होऊ शकतात. शरीर बेडौल झाल्याने असे विद्यार्थी इतरांच्या चेष्टेचा विषय बनतात. मल्टिनॅशनल कंपन्यांनीच शाळांच्या माध्यमातून फास्ट फूड समाजात संक्रमित केलं आहे. चित्रपट तारे-तारकांपासून लोकप्रिय खेळाडूंपर्यंत अनेकांनी फास्ट फूडच्या जाहिराती केल्या आहेत. त्यामुळे आजच्या मुलांना दही, दूध आवडत नाही. त्याऐवजी कोल्ड्रींक्ससाठी ते नेहमीच तयार असतात. अनेकदा मुलांचे लाड करताना पालक त्यांना अशा पदार्थांच्या सवयी लावतात. पालकांनी मुलांना लहानपणापासूनच पौष्टिक खाद्यपदार्थ खाण्याची सवय लावली तर त्यांना फास्ट फूडचं आकर्षण वाटणार नाही. डबा बंद जंकफूडची सवय मुलांना कशी लागली हा चिंतनाचा विषय आहे. पण, अनेकदा पालकच त्याला जबाबदार असतात. चपात्या करायला नकोत, घाईची वेळ आहे म्हणून अनेक माता आपल्या मुलांना टिफीनमध्ये फास्ट फूड देतात. 

ताज्या फळांचं सेवन करणारी मुलं फार कमी वेळा आजारी पडतात, असं दिसून आलं आहे. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं यामुळे मुलांच्या आरोग्याचं रक्षण होण्यास मदत होते. फास्ट फूडच्या अतिवापरामुळे, कोल्ड्रींक्समुळे हाडं कमजोर होतात, असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपल्या मुलांना टिफीनमध्ये काय द्यायचं, याचा निर्णय मुलांच्या आयांनी घ्यायला हवा. 

Back to top button