कोशिश करने वालो की हार नही होती  | पुढारी

कोशिश करने वालो की हार नही होती 

कोणाचेही आयुष्य  सुरळीत, साधे, सोपे असे नसतेच. प्रत्येकालाच संकटे, अडचणी यांच्याशी कधी ना कधी दोन हात हे करावे लागतातच! 2014 ला  मी एम.एस.डब्ल्यू. करत असताना आम्हाला एक रिसर्च प्रोजेक्ट करायचा होता. कोणताही विषय घेऊन त्यात  साठ  सॅमपल्सचा सर्व स्टॅटिस्टीकल डेटा मांडायचा होता. बरीच वर्षे वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करत आहे, त्यामुळे मी त्यातीलच विषय निवडला होता. 

‘ब्रेस्ट कॅन्सरपीडित महिला रुग्णांच्या शारीरिक व मानसिक समस्यांचा अभ्यास करणे.’नुकताच चार फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर विरोधी दिवस  झाला. त्या अनुषंगाने मला या साठ जणी आठवल्या. यासाठी मी त्यांचे शिक्षण, कौटुंबिक  व आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध, शारीरिक, मानसिक, भावनिक आंदोलने या सगळ्यांवर खूप सारे प्रश्न काढून त्यांची उत्तरे  त्यांच्याकडून भरून घेतली होती व त्यातून मला  जी माहिती मिळाली, त्यातून माझे निष्कर्ष अतिशय अभ्यासपूर्ण व सकारात्मक असेच मिळाले होते. हा सगळा वयोगट हा साधारणत: पस्तीस ते पासष्ट असा होता. त्यातील काही जणींना तर आधी एकदा हा आजार होऊन गेला होता व पन्नाशीपुढे पुन्हा त्याने आपले अस्तित्व दाखवले होते. अशा पण काही निडर स्पर्धक होत्या बरं! या सगळ्या संगतीत कॅन्सर त्यांचा सांगाती होता, तर त्या माझ्या! परिस्थितीने जरी आपल्याला खोल गर्तेत ढकलले तरी त्यावर मात करून आयुष्याची खेळी न खचता सकारात्मकरीत्या कशी जिंकायची हे त्यांनीच मला उदाहरण देऊन दाखवून दिले होते. इतकी वर्षे झाली तरीदेखील या सर्व मनांचा संवाद आजतागायत चालूच आहे. मी कोणाची लेक, बहीण, मैत्रीण तर कधी आईच्या मायेने प्रेम करणारी…  अशा कितीतरी नात्यांचे गोफ विणून मी अगदी वारेमाप  श्रीमंत झाली आहे!

तर असा हा कर्करोग वा कॅन्सर… नुसते नाव ऐकले तरी धास्तावून  जायला होते. रुग्णाच्या मनात खरेतर मन चिंती ते वैरी न चिंती असे विचारांचे काहूर उठते व आयुष्याची अस्थिरता जाणवू लागते. खरे तर तीच परीक्षेची वेळ असते. तुमची आजाराप्रतीची स्वीकारार्हताच तुमच्या उपचारांचा डोलारा सांभाळून घेणार असतो. मी? मला? याचा जितका जास्त विचार तितका बाहेर पडण्यासाठी अडथळे जास्त! ब्रेस्ट, गर्भाशय किंवा इतर काही अवयव काढून मग केमो व कधी  रेडीएशन घ्यावी लागतात. त्यात ब्रेस्ट हा द‍ृश्य स्वरूपातील अवयव काढणे, हा स्त्रियांवर खूप मोठा आघात असतो. केमो दरम्यान केस जाण्यामुळे अजूनच खच्चीकरण होते. पण अशा वेळी  योग्य डॉक्टरांच्या हातात आपले उपचार असणे, कौटुंबिक आधा व सपोर्ट ग्रुप यांची लाखमोलाची मदत असते. आपला आजार कोणत्या स्टेजला समजला, हे पण खूप महत्त्वाचे असते.  

संबंधित बातम्या

आपली बदलती जीवनशैली, बैठे काम, चुकीचा आहार,  व्यसने, मानसिक ताणतणाव, शारीरिक आजार व त्याकडे केलेले दुर्लक्ष, अतिविचार यातले कोणते तरी एक कारण पुरून जाते. पण कधीतरी लहान लेकरांना यातले कोणतेच कारण लागू होत नाही; तेव्हा फक्‍त प्रारब्ध हेच लागू असते.काही ठिकाणी तर इतके तोलून मापून चौकटीतले आयुष्य असते तरी हा आपल्या पुढे दत्त म्हणून उभा ठाकतो. आपल्यामुळे सर्व घर डिस्टर्ब होणार, आर्थिक खर्च अतोनात वाढणार या विचारानेच रुग्ण हात-पाय गाळू लागतो. अशा वेळी कुटुंब सदस्यांनी दिलेला  मायेचा, आधाराचा  हात अगदी स्वामींचा ‘भिऊ नकोस…’  याची जाणीव करून देतो व आपण मिळून सारे जण यातून तुला बाहेर काढणार आहोत, फक्‍त तुझी सकारात्मक जोड मात्र जास्त लागेल. हे सगळ्यांचे टीम वर्क पुढील सर्व अडचणींना पुरून उरते, हे मात्र नक्की!

तर असा हा सर्वाधिक गतीने झपाट्याने वाढणारा आजार एक प्रश्नचिन्ह झाले आहे.2005 ते 2014 मध्ये जगात एकूण 84 कोटी रुग्ण या रोगासंदर्भात योग्य जनजागृती नसताना व वेळेत निदान न झाल्याने मृत्युमुखी पडले, ही अतिशय  दु:खद बाब आहे. उद्याचा  दिवस आपल्या आयुष्यात आहे की नाही, ही धाकधूक असली तरी रात्री झोपताना आपण पहाटेचा गजर लावूनच झोपतो. तीच सकारात्मकता आजार होऊ नये यासाठी घेतली तर फारच उत्तम पर्याय ठरू शकतो. कोणाला कधी काय होईल  हे भविष्य न जाणणेच इष्ट असते. पण, आहे ते आयुष्य योग्य काळजी घेत आनंदात जावे यासाठी प्रयत्न मात्र निश्चितच करावेत. त्यासाठी सततच्या शारीरिक तक्रारी, भूक, झोप, वजन यावर परिणाम, थकवा, कुठेही गाठ, फोड येणे, पाळीच्या तक्रारी यावर लाज, संकोच न बाळगता वेळेत योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणे अतिमहत्त्वाचे असते. योग्य संतुलित आहार, रोजचा योग्य व्यायाम व मन शांत राहील अशी सकारात्मक  धारणा, कोणताही आज होणारा आजार अजून पुढे लांबवायला किंवा झालेला आजार आटोक्यात ठेवण्यास नक्कीच मदत करेल, यात शंकाच नाही!

फक्‍ततुम्ही मात्र तयार व्हा..!  क्योकीं?

‘ये जिंदगी हैं साहब! 

उलझेंगी नही तो सुलझेगी कैसे? और…

बिखरेगी नही तो निखरेगी कैसे?’

Back to top button