अभ्यासक्रमाचा व्यवहारिक द़ृष्टिकोनही पाहण्याची गरज | पुढारी

अभ्यासक्रमाचा व्यवहारिक द़ृष्टिकोनही पाहण्याची गरज

रेवती पुजारी

तांत्रिक आणि अतांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या उत्साही विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेसाठी अभ्यास करण्यापेक्षा ज्ञान कसे वाढेल आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यवहारिक गोेष्टी कशा समजतील यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बारावीनंतर बहुतांशी विद्यार्थी आपल्या आवडत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. त्याचबरोबर आपण अभ्यासाचा अधिकाधिक आनंद घ्यावा आणि आपले ज्ञान वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा असते. केवळ रट्टेबाजीवर भर न देता अभ्यासक्रमाचा व्यवहारिक द़ृष्टिकोनही पाहण्याची गरज आहे.

* विषय समजून घेणे : बहुतांशी विद्यार्थी हे परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत असतात. जेणेकरून परीक्षेत चांगले गुण मिळवता येतील. मात्र, ही बाब पुरेशी नाही. कारण सध्या मार्केट आणि इंडस्ट्रीची गरज पाहता थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला अधिक महत्त्व आले आहे. अभ्यासक्रमाचा व्यवहारिक द़ृष्टिकोनातून विषय समजून घेतला पाहिजे.

* उद्योग ओळखा : आपण ज्या अभ्यासाच्या जोरावर इंडस्ट्रीत प्रवेश करणार आहेात, तेथील बदलाचा कानोसा घेणे क्रमप्राप्त ठरते. जर कॉलेजकडून इंडस्ट्रीशी सातत्याने संवाद होत असेल आणि इंडस्ट्रीतील लोक नियमितपणे कॉलेजमध्ये येत असतील तर ही बाब चांगली आहे. जर असे घडत नसेल तर आपण हाताची घडी घालून स्वस्थ बसणे धोक्याचे ठरू शकते. वेळ मिळेल तेव्हा आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या इंडस्ट्रीतील लोकांच्या गाठी-भेटी घेणे महत्त्वाचे ठरते. इंडस्ट्रीत होणारे वेगाने बदल जाणून घेणे भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरते.

संबंधित बातम्या

* अभ्यासाबरोबर प्रशिक्षणही : तांत्रिक अभ्यासक्रमाला शिकताना शेवटच्या वर्षात इंटरशिपची वाट न पाहता अभ्यासाबरोबरच तिसर्‍या वर्षी स्वत:च इंटरशिप शोधण्याचा प्रयत्न करावा.

सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा उद्योगाशी निगडीत असलेल्या कार्यालयात जाणे, त्यांच्याशी बोलून इंटरशीपबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. जर आपल्याला परवानगी मिळाली नाही तर अन्य ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या संधीचे सोने करायला हवे.

नम्रतेने आणि शिकावू वृत्तीने प्रशिक्षण पूर्ण करण्यावर भर द्यावा. तेथील वरिष्ठ मंडळींनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही प्रक्रिया अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत चालू ठेवली पाहिजे.

या रितीने आपण केवळ उद्योगाच्या बदलत्या गरजांना समजून घेत नाही तर त्यासाठी तयारही होत असतो. जेणेकरून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी भटकंती करावी लागणार नाही. त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसेल. पहिल्याच दिवशी चांगले आऊटपूट देण्यास सक्षम असल्याचे जाणवताच आपल्यामागे नोकरीच्या रांगा लागतील, यात शंका नाही.

Back to top button