संगमेश्वर बाजारपेठेत भीषण आग; २ दुकाने जळून खाक, २ कोटीचे नुकसान | पुढारी

संगमेश्वर बाजारपेठेत भीषण आग; २ दुकाने जळून खाक, २ कोटीचे नुकसान

देवरुख; पुढारी वृत्तसेवा संगमेश्वर येथील बाजारपेठेत आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. अन्य दोन दुकानांनाही आगीचा फटका बसला आहे. या आगीत दुकानांचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. आगीच्या ठिकाणची पाहणी सकाळी चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी केली.

येथील बाजारपेठेत असलेल्या प्रशांत बेंडके यांच्या किराणा मालाच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली. याच दुकानाच्या बाजूला असलेल्या भावेश व कांतीलाल पटेल यांच्या शक्ती ट्रेडर्स दुकानालाही आगीने वेढले. बघता-बघता दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. ज्वाळांनी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले. पहाटेच्या सुमारास लागलेली आग जवळपास दोन तासांहून अधिक काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. बघता- बघता ही आग येथे असलेल्या जुन्या दवाखान्याच्या इमारतीपर्य॔त पोहोचली. दवाखान्यालाही या आगीचा फटका बसला. संगमेश्वर मध्ये अग्निशमन बंब नसल्याने शेवटी देवरुख नगर पंचायतीचा बंब मागवण्यात आला. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. आग विझली मात्र तोपर्यंत दोन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी जळून खाक झाली.

किराणा मालाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच ट्रेडर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागलेल्या ठिकाणची पहाणी चिपळूण संगमेश्वर आमदार शेखर निकम यांनी केली.

आग लागलेल्या दुकानांचा पंचनामा संगमेश्वर पोलीस करीत आहेत. आगीत नेमके किती नुकसान झाले. याचा पुर्ण अंदाज पंचनामा पुर्ण झाल्यावर मिळणार आहे. आग विझविण्यासाठी स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र किराणा दुकानातील तेल व ट्रेनिंगमधील रंग व वायर यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.

देवरुख नगरपंचायतीने आणलेल्या बंबाचा पहिला उपयोग संगमेश्वर येथील आग लागलेल्या ठिकाणी करण्यात आला. या बंबाने लागलेली आग विझवली. मात्र बंब पोहोचेपर्यंत दोन्ही दुकाने आगीत खाक झाल्याने निराशा झाली.

हेही वाचा : 

Back to top button