Thane Crime News | पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली शारीरिक अत्याचार, भोंदूबाबांना बेड्या | पुढारी

Thane Crime News | पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली शारीरिक अत्याचार, भोंदूबाबांना बेड्या

नरेंद्र राठोड, ठाणे

सार्‍या राज्यासह ठाणे-पालघर जिल्ह्यात पैशाच्या पावसाने नुसता धुमाकूळ घातलेला आहे. काही भोंदूबाबा आम्ही पैशाचा पाऊस पाडून देतो असा प्रचार करत आहेत आणि त्यातून महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि नरबळी असे गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. या भोंदूबाबांच्या नादी अनेक मंडळी लागली आहेत. त्यात ग्रामीण भागातल्या अशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त असले तरी अनेक सुशिक्षित लोकं देखील या ढोंगी बाबांच्या जाळ्यात अडकली आहेत… (Thane Crime News

संबंधित बातम्या 

ठाण्यात पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या टोळीस गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. करोडो रुपये मिळतील असे आमिष दाखवून या टोळीने आपल्या जाळ्यात तब्बल 17 मुलींना ओढले होते व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. पैशाचा पाऊस पाडून देतांना मांत्रिक बाबाच्या अंगात जीन येतो व त्यास विधीस बसलेल्या मुलीसोबत संभोग करण्याची इच्छा होते, असे ही टोळी मुलींना पटवून देत होती.

ठाण्यातील राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली होती की, पैशाचा पाऊस पाडून देतो अशी भूलथाप मारून महिला व मुलींचे लैंगिक शोषण करणारी एक टोळी सक्रिय आहे. या टोळीतील भोंदूबाबांनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या विधीमध्ये सहभागी झाले तर करोडो रुपये मिळतील, असे आमिष दाखवून आपले लैंगिक शोषण केले आहे, असा आरोप या मुलीने आपल्या तक्रारीत केला होता.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखा युनिट एककडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात असलम शम्मीउल्ला खान (वय 54, राबोडी, ठाणे), सलीम जखरुद्दीन शेख (45, राबोडी, ठाणे) या दोघांना 17 फेब्रुवारी 2024 रोजी अटक केली. तर या गुन्ह्यातला मुख्य मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसूफ बाबा (61, मुंबई) यास पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून या टोळीने अनेक महिला व मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे स्पष्ट झाले.

तसेच या टोळीत आणखी सदस्य सक्रिय असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तौसिफ शेख (30), शबाना शेख (45), शबीर शेख (53) या तिघांना राबोडीतून तर हितेंद्र शेट्टे (56, लालबाग, मुंबई) यास गजाआड केले. या टोळीतील मुख्य सूत्रधारांना अटक केल्यानंतर पोलिस तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

पैशाचा पाऊस पाडतो, असे सांगून ही टोळी गरीब व गरजू मुली व महिलांना हेरत असे. त्यानंतर या मुलींना मोबाईलमध्ये चित्रित केलेला एक व्हिडीओ दाखवत होते. ज्यात एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून तिच्या शेजारी पैशांचा ढिगारा लागलेला आहे असे दाखवण्यात आले होते. व्हिडीओ दाखवून ही टोळी मुलींना करोडो रुपये मिळतील, असे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यानंतर ही भोंदूबाबा मंडळी पूजाविधीस बसलेल्या मुलीसोबत शारीरिक अत्याचार करायचे. ही टोळी राज्यभरात सक्रिय असून त्यांनी अशाच प्रकारे अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. दरम्यान, पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक व शोषण झाल्याच्या अनेक घटना ठाणे व पालघर जिल्ह्यात यापूर्वी देखील समोर आल्या आहेत.

अंधश्रद्धेचा बाजार मांडून शोषण

पैशाचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या भोंदूबाबास मागे डोंबिवलीमध्ये अटक करण्यात आली होती. अशीच घटना ठाण्यातील मानपाडा परिसरात देखील समोर आली होती. एका भोंदू बाबाने ठाण्यातील मानपाडा येथे राहणार्‍या 38 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी भोंदूबाबाच्या विरोधात फसवणुकीचा, बलात्काराचा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत त्यास बेड्या ठोकल्या होत्या.

दोन वर्षांपूर्वी भिवंडी कब्रस्तान येथील दुहेरी हत्याकांड हे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आघोरी प्रकारातून झाल्याचे उघड होते. असाच एक प्रकार फेब्रुवारी 2018 साली ठाण्यात समोर आला होता. जादूची भीती घालून भोंदू बाबाने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना ठाण्यातील राबोडीत उघडकीस आली होती. असे अनेक प्रकार ठाणे व पालघर जिल्ह्यात समोर आले आहेत. (Thane Crime News)

Back to top button