कृषितंत्र : हरितगृहात जरबेरा लावताना… | पुढारी

कृषितंत्र : हरितगृहात जरबेरा लावताना...

जरबेरा हे विविध रंगांत आणि आकारांत उपलब्ध असलेले आकर्षक फूल आहे. परकीय बाजारात आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये या फुलांना चांगली मागणी आहे. वेगवेगळ्या फूल प्रदर्शनात आणि फुलदाणीतील मांडणीत जरबेराची फुले चित्त वेधून घेतात.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी जरबेराची लागवड हरितगृहामध्ये सुरू केलेली आहे. इतर फुलांच्या तुलनेत जरबेरा फुलांचा फुलदाणीतील टिकाऊपणा किंवा साठवणक्षमता चांगली असते. मातीविरहित माध्यमात, तसेच हरितगृहसारख्या नियंत्रित वातावरणात जरबेरा लागवड सुरू होऊन नियमित फुलांचे उत्पादन सुरू आहे. परंतु, जरबेरा उत्पादन तंत्राची अजूनही शेतकर्‍यांना फारच गरज आहे. यासाठी उच्च प्रतीच्या फुलांचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती करून घेणे आवश्यक आहे.

जरबेराची अभिवृद्धी बियांपासून व शाखीय पद्धतीने म्हणजे बंगल फुटीने करता येते. बी पेरून रोप तयार करून लागवड करणे हे जरी सोपे व सोयीस्कर असले, तरी या पद्धतीमधील काही दोष नजरेआड करता येणार नाहीत. पहिला दोष म्हणजे फुलांची प्रत इच्छेप्रमाणे मिळत नाही. शिवाय, फुले लागण्यास कालावधी जास्त लागतो. फुले एकसारख्या आकाराची मिळत नाहीत.

व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यासाठी व फुले उच्च प्रतीची आणि सारख्या आकाराची मिळण्यासाठी जरबेरा लागवड करण्यासाठी ऊती संवर्धनानेच तयार केलेली रोपे वापरावीत.

या पिकास मध्यम खोलीची सुपीक जमीन निवडणे आवश्यक आहे. पोयटा मातीच्या, नदीकाठच्या गाळाच्या आणि पाण्याचा उत्तम निचरा होणार्‍या जमिनीत ही फुलझाडे चांगल्या प्रकारे येतात. हरितगृहामध्ये लांब दांड्याची फुले मिळविण्यासाठी झाडांची चांगली वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी गादीवाफे तयार करण्याअगोदर जमीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल उभी-आडवी नांगरून घेणे आवश्यक आहे. तसेच टिलरच्या सहाय्याने ढेकळे फोडून जमीन सपाट करणे. 500 वर्गमीटर आकारमानाच्या हरितगृहामध्ये अंदाजे उत्तम कुजलेले शेणखत 9 ट्रक, बारीक वाळू 3 ट्रक व पोयट्याची माती टाकून सर्व घटक मिसळून जमीन सपाट करून घ्यावी. यामध्ये जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असणे आवश्यक आहे. लागवडीपूर्वी जमीन निर्जंतुक करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीत असलेली कीड, जीवाणू, निमॅटोड वगैरे यांचा नाश पावतो. निर्जंतुक करण्यासाठी बाजारात निरनिराळी रासायनिक द्रव्ये उपलब्ध आहेत. रासायनिक क्रियेत प्रामुख्याने क्लोरोपिक्रीन, फॉरमॅलीन आणि बासामीड यांचा वापर केला जातो.

व्यापारी तत्त्वावर जरबेरा फुलांची लागवड गादी वाफ्यावर करण्यात येते. एका गादी वाफ्यावर फक्त दोन ओळींतच लागवड करावी. लागवड अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. लागवड करण्याच्या आदल्या दिवशी गादीवाफे पूर्ण पाण्याने ओलावून घेणे आवश्यक आहे. वाफसा आल्यानंतर रोपांची लागवड सकाळी अथवा सायंकाळी करावी. रोपांची लागवड अतिखोल अथवा अतिउथळ करू नये. लागवड अतिखोल केल्यास रोपांच्या खोडाशी माती व पाण्याचा स्पर्श होऊन क्राऊनरॉट रोग होऊन रोपे मरण्याचे प्रमाण जास्त होते. त्याउलट रोपांची लागवड अतिउथळ केल्यास रोपांना असलेली मुळे उघडी पडून रोपे मरण्याची शक्यता असते.

महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामान या फूल पिकाला चांगले मानवते. भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी शुद्ध हवा व 12 ते 15 अंश से. तापमान अशा प्रकारचे हवामान या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल समजले जाते. कडक थंडी, धुके, दव तसेच तीव— उन्हाळा या पिकास हानिकारक आहे. हरितगृहामध्ये रात्रीचे कमी तापमान शाखीय वाढ होण्यास फायदेशीर ठरते. रोपे वाढीच्या द़ृष्टीने हरितगृहामध्ये दिवसा 22 ते 26 अंश से. आणि रात्रीचे 18 ते 22 अंश से. तापमान असणे आवश्यक असते. दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असल्यास नुकसान होऊ शकते. जास्त तापमान व सूर्यप्रकाश ठरावीक वेळेपर्यंत असल्यास रोपांची वाढ जलद गतीने होते. परंतु, अतिजास्त तापमानामुळे रोपांमधून बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने व त्या प्रमाणात रोपांचा जमिनीतून पाणी शोषून घेण्याचा वेग कमी असल्याने रोपांची वाढ असमाधानकारक होते. त्यावेळी अतिजास्त सूर्यप्रकाश व तापमानात सनस्क्रीन किंवा जाळीचा वापर करून तीव्रता कमी करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खताचा पुरवठा केल्यास फुलांची प्रत चांगली मिळत असल्याने रोपांची वाढ जोमदार करून घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खते देणे आवश्यक आहे. शाखीय वाढ व उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी जरबेरा या फुलझाडांना नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची गरज असते.

जरबेरा पिकास पाण्याची कमतरता अजिबात सहन होत नाही. विशेषतः अतिउष्णतेमुळे, बाष्पीभवनामुळे रोपांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावते. हे टाळण्यासाठी हरितगृहामध्ये सावलीसाठी आवरण घालावे. त्यामुळे आतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. अशा प्रकारे हरितगृहातील आर्द्रतेचे प्रमाण 80 ते 85 टक्के इतके असावे.

हरितगृहामधील जरबेरा पिकास कर्बवायूचे प्रमाण वाढविल्यास फायदा होतो. सर्वसाधारणपणे कर्बवायूचे प्रमाण 700 पीपीएम इतके असावे. कर्बवायूचे प्रमाण 300 पीपीएमच्या खाली गेल्यास जरबेराची वाढ जवळजवळ बंद होते. त्यामुळे हरितगृहातील कर्बवायूची तीव—ता अधूनमधून तपासणे आवश्यक आहे.

आंतरमशागत – जरुरीप्रमाणे अधूनमधून हलकी खांदणी, वाफ्याची बांधणी, मर झालेल्या फांद्यांची काढणी या बाबीही उत्तम गुणवत्ता आणि उत्पादन मिळविण्यास कारणीभूत असतात. जरबेरा पिकाच्या यशस्वितेमध्ये अनेक प्रकारचे रोग नक्कीच अडथळा आणू शकतात. मूळकूजसारख्या रोगांची सुरुवात मातीतून होत असल्याने माती / माध्यमांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. अनेक प्रकारचे विषाणू, बुरशीजन्य, विषाणूजन्य रोग आणि किडींपासून पिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

फुलांची काढणी आणि साठवण – सर्वसाधारणपणे लागवडीनंतर 7 ते 9 आठवड्यांनी फुले काढणीस तयार होतात. फुलातील बाहेरील पाकळ्यांचे दोन थर उमलल्यानंतर फुलांची काढणी करावी. फुले शक्यतो सकाळी काढावीत. फुलांची काढणी योग्य वेळेपूर्वी केल्यास त्याचा टिकाऊपणा कमी होतो. नवीन लागवडीनंतर पहिले फूल काढताना काळजी घ्यावी, अन्यथा झाडांना इजा होते. नवीन लागवडीतील फुलांचे पॅकिंग करताना लूज करावे. त्याची काढणी चालू असताना फुलांचे दांडे बादलीत असलेल्या पाण्यात बुडवून ठेवावे. काढणी झालेली फुले टवटवीत राहण्यासाठी 100 पीपीएम तीव्रतेचे सोडियम हायपोक्लोराईड द्रावण करावे. दांड्यातील टोकाकडील पाकळ्या काही कारणाने बंद झाल्यास किंवा त्या ठिकाणी रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास पाणी वर पोहोचत नाही आणि त्यामुळे ते सुकते म्हणून अधूनमधून फुलदांड्यांची खालची बाजू थोडीशी छाटणे आवश्यक आहे.

काढणी केलेल्या फुलांचे त्यांच्या जातीनुसार, रंगानुसार, आकारमानानुसार आणि दांडीच्या लांबीनुसार प्रतवारी करून प्रत्येक फुलाला प्लास्टिक पिशवीत (44 सें.मी.) आवरण देऊन 10 फुलांची एक अशा जुड्या बांधून कार्डबोर्डच्या खोक्यात पॅकिंग करावे. कार्डबोर्ड खोक्यावर जात, दांड्यांची लांबी, एकूण फुले, काढणीचा दिनांक यांची नोंद करावी. रिफ्रिजरेटेड वाहनाने बाजारपेठेत फुले विक्रीसाठी पाठवावीत. ज्या फुलांच्या दांड्याची लांबी 50 ते 60 सें.मी. व फुलांचा घेर 10 ते 12 सें. मी. आहे, अशा फुलांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

 मिलिंद सोलापूरकर

Back to top button