Papaya : कीड आणि रोगमुक्त पपईसाठी… | पुढारी

Papaya : कीड आणि रोगमुक्त पपईसाठी...

अलीकडे राज्यात पपईच्या (Papaya) लागवडीखालील क्षेत्र वाढू लागले आहे. बारमाही चांगली मागणी आणि योग्य दर यामुळे पपईची लागवड शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

पपईचे पीक (Papaya) कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी जागेत जास्त उत्पादन मिळवून देते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नागपूर, बुलढाणा, अहमदनगर, वर्धा, अमरावती, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

केवडा (पपया मोझाईक) – (Papaya) या रोगांचा प्रादुर्भाव मावा या कीडीमार्फत होतो. या रोगामुळे पानावर ठिपके दिसतात. पानांच्या देठाची लांबी कमी होते, पानांचा आकार वेडावाकडा होतो आणि झाडाची वाढ खुंटते. शेंड्यावर पानांचा लहानसा गुच्छ तयार होतो. रोगट झाडावर फलधारणा होत नाही आणि झाडावर आलेली फळे गळतात.

संबंधित बातम्या

या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे आढळून आल्यास ती मुळासकट उपटावी आणि जाळून टाकावी. दर पंधरा दिवसांनी 200 मि.ली. डायमेथोएट किंवा मेटॅसिस्टॉक्स ही कीटक नाशके 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावी.

बुंधा सडणे – हा रोग जमिनीतून पसरणार्‍या रोगजंतूमुळे होतो. या रोगांमध्ये पपईचे (Papaya) खोड जमिनीजवळ कुजते, पाने पिवळी पडून सुकतात, गळून पडतात आणि झाड मरते.

हा रोग ओलसर आणि पाण्याचा निचरा न होणार्‍या जमिनीत पसरतो, त्यामुळे झाडाच्या बुंध्याजवळ पाणी साचू देऊ नये. या रोगांची लक्षणे दिसताच बुंध्याजवळ 0.2 टक्के कॉपर ऑक्सीक्लोराइडचे द्रावण 1 लिटर एका झाडास या प्रमाणात घालावे.

करपा : या रोगात प्रथम फळावर आणि झाडाच्या (Papaya) खोडावर फिकट पिवळ्या रंगाचा ठिपका दिसून येतो. नंतर तो भाग मऊ पडतो आणि त्याचा रंग तपकिरी होतो. त्यानंतर मध्यभागी काळा रंग होऊन सभोवताली पिवळ्या रंगाची वलये दिसतात.

हिवाळ्यात दक्षिणेकडील सूर्यकिरणामुळे चटके बसून या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून फळे तपकिरी रंगाच्या कागदाने झाकावी. मॅन्कोझेब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

भुरी : हा रोग पावसाळ्यात आणि दमट, आर्द्र हवामानात आढळून येतो. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने पानावर आणि फळांवर दिसून येतात आणि पाने गळून पडतात. तसेच फुले आणि फळेसुद्धा गळून पडतात.

या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून दर 15 दिवसांनी फवारणी करावी.

– शैलेश धारकर

Back to top button