बियाणे खरेदी करताय? तर ‘खूणचिठ्ठी’बद्दल समजून घ्या | पुढारी

बियाणे खरेदी करताय? तर 'खूणचिठ्ठी'बद्दल समजून घ्या

खूणचिठ्ठी

शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी घाई केल्यास आणि पुरेसे बियाणे बाजारात उपलब्ध नसल्यास शेतकर्‍यांना शुद्ध बियाणे मिळवताना फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांनी शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा त्यांच्याशी संलग्न असणारी संशोधन केंद्र यांचेकडे बियाणे उपलब्ध असेल तर तेथूनच खरेदी करावी. तसेच बियाणे महामंडळाचे किंवा इतर कंपन्यांचे बियाणे खरेदी करावयाचे असल्यास ते मान्यताप्राप्त कृषी सेवा केंद्रामधूनच खरेदी करावे. बियाणे खरेदी करताना त्याच्या पिशवीवर खूणचिठ्ठी लावलेली असते.

बियाण्याच्या पिशवीला प्रमाणीकरण यंत्राने बियाण्याच्या गुणवत्तेविषयी माहिती असणारी ही खूणचिठ्ठी असते; परंतु बियाणे बॉक्समध्ये उपलब्ध असल्यास त्यावरच बियाण्याची माहिती छापलेली असते. यावरील माहिती अत्यंत उपयोगी असल्यामुळे शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना हा टॅग आणि त्यावरील माहिती बियाणे खरेदी करताना तपासून घ्यावी.

खूणचिठ्ठी : काय असते टॅगवर?

1) बियाणे कोणत्या पिकाचे आणि जातीचे आहे.
2) बियाण्याची उगवण क्षमता, ती तपासल्याची तारीख.
3) बियाणे वापरण्याची अंतिम तारीख
4) बियाणे कोणत्या प्रकारचे किंवा स्टेजचे आहे
5) टॅग क्रमांक, साठा क्रमांक म्हणजे लॉट नंबर
6) बियाण्याची अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता, बिजोत्पादक यांची माहिती
7) बियाणे मोहोरबंद
8) यासोबत टॅगवर बिजोत्पादक, बीज प्रमाणीकरण अधिकारी यांचा सही शिक्का दिलेला असतो.
– शैलेश धारकर

Back to top button