हळद पीक लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ | पुढारी

हळद पीक लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ

मागील वर्षी महापुराच्या तडाख्यात हळदीचे पीक सापडले. परंतु, महापुरानंतरही चांगले उत्पन्‍न मिळाले. करारानुसार हळदीला दरही चांगला मिळाला. महापुरातही हळद पीक तग धरू शकते, याची खात्री पटल्यानंतर संजय पाटील यांनी बारा एकर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे.

अपेक्षित उत्पन्‍न आणि कच्च्या हळदीला मिळणारा दर यामुळे खोची, भेंडवडे, बुवाचे वठार या भागातील शेतकर्‍यांचा आता हळद लागवडीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे ऊस, सोयाबीन या पारंपरिक नगदी पिकाबरोबरच हळद पिकाने आता शिवारे बहरू लागली आहेत. ऊस लागवडीला काही अंशी पर्याय निर्माण झाल्याचे चित्र परिसरात दिसू लागले आहे.

वारणा नदीमुळे ऊस पट्टा म्हणून ओळख असणारा वारणाकाठ सध्या वेगवेगळ्या पिकांकडे वळू लागला आहे. येथील शेतकरी नगदी पिकाच्या लागवडीतून जास्तीत जास्त उत्पन्‍न घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले जात आहेत. ऊस पिकाबरोबरच विदेशी भाज्या, झेंडू फुले, टोमॅटो, काकडी आदींची लागवड प्रामुख्याने केली जात आहे.

खोची येथील प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांनी एका निर्यातदार कंपनीशी करार करून राजेंद्र–सोनिया जातीच्या हळदीची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली. गेल्यावर्षीच्या महापुरातही हे पीक तग धरून राहिले. तीन एकर हळद लागवडीतून कच्च्या तीस टन हळदीचे उत्पादन मिळाले. यामधून संजय पाटील या शेतकर्‍याला अंदाजे साडेचार लाख रुपये उत्पन्‍न मिळाले.

साधारण नऊ ते दहा महिन्यांत एकरी दीड लाख रुपये असा उतारा मिळाला. कोणतीही प्रक्रिया न करता शेतात उत्पादित झालेली सर्व हळद कंपनीने खरेदी केली. त्यामुळे इतर सर्व त्रास बंद होऊन अपेक्षित उत्पन्‍न मिळाले. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रोत्साहन व समाधान मिळाले. संजय पाटील यांना दिलीप पाटील, अनिल पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह कृषी विभागातील अधिकार्‍यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

– उदय पाटील, खोची

Back to top button