फायदे वनशेतीचे | पुढारी

फायदे वनशेतीचे

वनशेती ही शेती उत्पादनाच्या अनेक पद्धतींपैकी एक सुधारित पद्धत आहे. ही एक स्वयंंपूर्ण एकात्मिक शाश्‍वत शेतीपद्धत असून, त्यामध्ये झाडे-झुडपे, गवत, जनावरांचे संवर्धन यांचा समावेश करून पर्यावरण आणि आर्थिक बाबी यांची सांगड घातलेली असते. वनशेती प्रामुख्याने कोरडवाहू प्रदेशात हलक्या, उथळ अथवा क्षारयुक्‍त जमिनीची उत्पादकता वाढवण्याचा एक प्रयत्न आहे.

वनशेती पद्धती

1) कृषी वनरोपण : या पद्धतीत झाडे आणि पिके एकत्रितरीत्या घेतली जातात. त्यामध्ये झाडांचा प्रकार आणि जमीन यांचा विचार केला जातो. उदा. उदा. सुबाभूळ+तूर+उडीद या पद्धतीमध्ये सुबाभूळ चारा तसेच सेंद्रिय खतासाठी म्हणून उपयोगी पडते. मोकळ्या जागेत तूर, उडीद पिके घेऊन त्यापासून धान्य उत्पादन मिळते.
2) वनीय कुरण पद्धत : हलक्या आणि उथळ जमिनीत चारा देणारे वृक्ष आणि कुरण उपयोगी गवताची लागवड केलेली असते. चारा देणार्‍या वृक्षांमध्ये अंजन, सुबाभूळ बरोबर मद्रास अंजन, मारवेल, डोंगरी गवत तसेच स्टायलोसारख्या द्विदलवर्गीय गवताचा समावेश केलेला असतो. गवतामुळे जमिनीची धूप थांबविली जाते, सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता वाढते. आच्छादनामुळे ओलावा टिकतो आणि जैवविविधता टिकवली जाते.
3) कृषी वनीय कुरण पद्धत : हलक्या आणि मध्यम प्रकारच्या जमिनीत पिके, वृक्ष आणि पिकांची लागवड केली जाते. यामध्ये वृक्षारोपण पद्धत आणि वनीय कुरण पद्धत यांचे मिश्रण असते. यामध्ये विशेषत: कोरडवाहू प्रदेशात पिके आणि झाडेझुडपे ही पहिल्यांदा काही काळ आणि ठराविक वाढीपर्यंत घेतली जातात. त्यानंतर पिके कमी करून त्या ठिकाणी गवताची लागवड केली जाते. त्यामुळे चारा, गवत, जळाऊ लाकूड इतर कृषी उत्पन्‍न या पद्धतीत मिळते.
4) उद्यान कुरण पद्धत : हलक्या जमिनीत सीताफळ, बोर, आवळा आणि कवठ यासारख्या कोरडवाहू फळझाडांची लागवड करून मधल्या जागेत सुधारित गवतांची लागवड करतात.
5) उद्यान कृषी पद्धत : यामध्ये फळझाडांच्या पिकाबरोबर धान्याची पिके घेतली जातात. कोरडवाहू क्षेत्रात पेरू, सीताफळ, बोर, फालसा, जांभूळ, कवठ यासारखी फळझाडे 5 ते 7 मी. अंतरावर घेतात. उथळ आणि हलक्या तसेच पडीक जमिनीत बोरे, सीताफळ, लिंबू यासारखी फळझाडे घेतली जातात. मोकळ्या जागेत दोन ओळींमध्ये तृणवर्गीय कडधान्ये किंवा तेलबियांची पिके घेतली जातात.
6) कृषी उद्यान कुरण पद्धत : यामध्ये मध्यम प्रतीच्या जमिनीत पिके, फळझाडे आणि सुधारित गवताची लागवड केली जाते.
7) वृक्ष शेती पद्धत : यामध्ये फक्‍त वृक्षांची लागवड केली जाते आणि त्यापासून उत्पादन घेतले जाते. उदा. साग, निलगिरी.

संबंधित बातम्या

वनस्पतीचे फायदे

1) वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यातून पीक उत्पादनाबरोबर वृक्षापासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो आणि त्यामुळे वाढीव उत्पन्‍न मिळविणे शक्य होते.
2) वृक्षामुळे शेतात आर्द्रता टिकवली जाते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होते आणि त्यामुळे जमिनीची जैविक जडणघडण सुधारते.
3) वादळापासून पिकांचे संरक्षण होते. तसेच जमिनीची धूप कमी होते.
4) पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते.
5) हलक्या, मूरमाड, नापीक, पडीक जमिनीत नेहमीच्या पीक पद्धती ऐवजी वनशेती फायद्याची ठरते. तसेच जमिनीचा मगदूर सुधारण्यास मदत होते.
6) वनशेतीमध्ये मशागत, देखभाल यावर खर्च कमी होतो. मजूर कमी लागतात. उलट दीर्घकाळ उत्पन्‍न मिळत राहते.

– प्रसाद पाटील

Back to top button