नियोजन खरीप बाजरीचे | पुढारी

नियोजन खरीप बाजरीचे

भारतात अन्नधान्याच्या बाबतीत बाजरी पिकाचा भात, गहू आणि ज्वारी खालोखाल चौथा क्रमांक लागतो. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात बाजरीची उत्पाकदता कमी आहे. याचे कारण हे पीक प्रामुख्याने हलक्या आणि भरड जमिनीत घेणे, पावसाची अनिश्चितता, हेक्टरी रोपांची कमी संख्या, शिफारशीत खतांच्या मात्रेचा अभाव तसेच कीड आणि रोग नियंत्रणाचा अभाव हे होय. सुधारित तंत्राचा वापर केल्यास या पिकाचे भरघोस उत्पादन मिळू शकते.

पेरणीअगोदर जमिनीची लोखंडी नांगराने 15 से. मी. पर्यंत खोल नांगरट करावी आणि जमीन उन्हाळ्यात तापू द्यावी. जमीन चांगली तापल्यानंतर, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभशीत करावी. पूर्वी घेतलेेल्या पिकाची धसकटे, काडी-कचरा, हरळी, कुंदा वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी 5 टन शेणखत किंवा 2.5 टन गांडूळ खत शेतात पसरवून टाकावे, म्हणजे कुळवणी बरोबर ते जमिनीत समप्रमणात मिसळले जाते बाजरी पिकास उष्ण आणि कोरडे हवामान मानवते.

या पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने ते कोरडवाहूतही चांगले येते. बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिनीचा सामू हा 6.2 ते 7.7 असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.

पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब पिकासाठी योग्य तर्‍हेने उपयोग करून घेण्यासाठी कमी आणि अनियमित पाऊस पडणार्‍या प्रदेशात अतिशय हलक्या आणि हलक्या ते मध्यम उताराच्या जमिनीवर किंवा समपातळीवर नसलेल्या जमिनीवर बाजरीचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी थेंब थेंब संचय पद्धत (सरी-वरंबा पद्धत) अत्यंत उपयुक्त आहे. या पद्धतीत मृगाचा पाऊस पडण्यापूर्वी जमिनीच्या खोलीप्रमाणे 4 ते 6 इंच (10 ते 15 से. मी.) खोलीच्या 45 से.मी. अंतरावर उताराच्या आडव्या दिशेने सर्‍या तयार करून ठेवाव्यात. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब आणि थेंब सर्‍यामध्ये संचित करता येतो.

बाजरीची पेरणी 15 जुलै या दरम्यान केल्यास उत्पादन अधिक मिळते. खरीप हंगामात पर्जन्यवृष्टी उशिरा झाल्यास पेरणी 30 जुलैपर्यंत करण्यास हरकत नाही. बाजरी पिकाची पेरणी साधारणत: 30 जुलैपर्यंत केल्यास उत्पादनात सरासरी 10 टक्के घट येण्याची शक्यता असते.

बाजरीच्या सुधारित आणि संकरित वाणांची जमिनीच्या मगदुराप्रमाणे, नैसर्गिक हवामान आणि पाऊस यांचा एकत्रित विचार करून निवड करावी. हलक्या जमिनीत आणि कमी आणि अनियमित पावसाच्या क्षेत्रात सुधारित वाणांची लागवड करावी. मध्यम जमिनीत आणि समाधानकारक पर्जन्यमान विभागात संकरित वाण जास्त उत्पादन देऊ शकतात.

– विलास कदम

Back to top button