गरज आच्छादनाची | पुढारी

गरज आच्छादनाची

पिकांच्या चांगल्या वाढीसाठी मृद, काष्ठ आणि जिवंत आच्छादन असे प्रकार वापरले जातात. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी फायदा हाते होतो. जमिनीचा मूळ संस्था असलेला भाग कोणत्याही कृत्रिम अथवा नैसर्गिक पदार्थांमुळे झाकून टाकणे म्हणजे आच्छादन होय. आच्छादनाचे तीन प्रकार पडतात. त्यामध्ये मृद (माती) आच्छादन, काष्ठ (पालापाचोळा) आच्छादन आणि जिवंत (गवत आंतर पीक इत्यादी) आच्छादन यांचा समावेश आहे.

आच्छादन करताना पिकाची किंवा झाडाची संपूर्ण पर्ण संभाराखालील माती झाकून थोडीशी जास्त व्यापली जाईल याची काळजी घ्यावी लागते. तसेच आच्छादन हे 3 ते 4 इंचांपेक्षा जास्त जाड नसावे. मुळांवरील माती हवेशीर ठेवण्यासाठी खोडालगतचा भाग झाकून जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकदा आच्छादन केल्यास पीक वाढीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ते कायम ठेवावे. असे केल्याने आच्छादनाखालील मुळे ही आच्छादन निघाल्यामुळे उघडी पडून सुकणार नाहीत. सेंद्रिय पदाथार्र्ंचे आच्छादन केल्यास जमिनीतील सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण वाढते. असे आच्छादन प्राणिजन्य आणि वनस्पतीजन्य पदार्थ मिसळून वापरल्यास चांगला परिणाम होतो. परंतु अत्यंत हळू कुजणारे पदार्थ कमी वापरावेत. कारण, यामुळे असे पदार्थ पिकांना अपायकारक बनण्याची शक्यता असते. सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन वापरताना हे पदार्थ कीड आणि रोगकारक नाहीत ना याची खात्री करावी.

आच्छादनामुळे पिकाला अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामुळे मुळांचा भाग झाकला जाऊन बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी थांबते. त्याचप्रमाणे मातीतील तापमानाचे योग्य नियंत्रण होते. आच्छादनामुळे मातीचा भुसभुशीतपणा वाढून मुळांची चांगली वाढ होते. त्याचबरोबर मातीतील सूक्ष्म जीवांची आणि गांडूळांची संख्या वाढून त्यांची कार्यक्षमताही वाढते. आच्छादनामुळे तणांचा आपोआप बंदोबस्त होतो. सेंद्रिय पदार्थांचा वापर असल्यास चांगल्या खतांची जागेवरच निर्मिती होते. त्याचप्रमाणे पावसाच्या जोरदार मार्‍यापासून जमिनीचे संरक्षण होते.

Back to top button