गवत लागवड ही शेतकर्‍यांसाठी मोठी संधी | पुढारी

गवत लागवड ही शेतकर्‍यांसाठी मोठी संधी

सोलापूर , पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांनी वन विभागाच्यावतीने देण्यात येणार्‍या नव्या गवताची लागवड करावी. त्याचा फायदा जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी होऊ शकते, असे मत निवृत्त वनसंरक्षक सुभाष बडवे यांनी व्यक्त केले आहे.

पंढरपूर वनक्षेत्रामध्ये मौजे कासेगाव वन वसाहत येथील सभागृहामध्ये वन विभाग सोलापूर आयोजित ‘गवत लागवड, कुरण विकास’ या विषयावर सोमवारी कार्यशाळा आयोजित केलेली होती. या कार्यशाळेस सोलापूर वन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुभाष बडवे यांनी ‘गवत लागवड योजना व त्याचे महत्त्व’ याविषयी मार्गदशन केले.

कार्यशाळेसाठी सोलापूर वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, सहा. वनसंरक्षक हाके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये शेडा, मारवेल, डोंगरी, लोखंडी, अंजन धामण, गिनी या गवतांची ओळख करून दिली. गवत बी उपलब्ध नसताना रुट स्लीपपासून रोपवाटिका तयार करण्याचे तंत्र समजावून सांगून शंकांचे निरसन बडवे यांनी केले.

गवत कुरण व्यवस्थापन या दुर्लक्षित विषयाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण वीस कलमी कार्यक्रमामध्ये व राष्ट्रीय वन योजना 1988 मध्ये वृक्ष लागवडीला जास्त महत्त्व दिल्याचे दिसून येते. पवना, मारवेल, डोंगरी, गिन्नी, धामण, दिनानाथ अशा प्रजाती मुरमाड अवर्षण प्रदेशात कमी मेहनतीने घेणे शक्य होते. गवत लागवड केल्यामुळे जमिनीची धूप थांबते व भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.

गवत लागवडीमुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात पशुधनासाठी आवश्यक असा चारा उपलब्ध होतो, अशी माहिती बडवे यांनी दिली. गवत परिसंस्थेमध्ये माळढोक, तणमोर, बहिरा ससाणा, कोल्हा, तरस, काळवीट, चिंकारा, गरूड, तितर, वटवट्या, सरडा, फुलपाखरे हे वन्यप्राणी व बरेचसे किटकदेखील आढळतात. नामशेष होत असलेल्या माळढोकसारख्या इतर माळरानावरील पक्ष्यांच्या सुरक्षितता व संवर्धनासाठी यातून हातभार लागेल तसेच गवताची उत्पादकताही कमी वेळेमध्ये साध्य होत असल्यामुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी, दुग्ध व्यावसासिकांसाठी, स्थलांतरित होणार्‍या भूमिहीन मेंढपाळांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, असे बडवे यांनी म्हटले. सोलापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी ‘गवत लागवड, कुरण विकास’ कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केल्याबद्दल सुभाष बडवे यांचे आभार व्यक्त केले.

 

Back to top button