मातीशिवाय धान्योत्पादन, अन्‍न उत्पादनासाठी शोधले नवे तंत्र

मातीशिवाय धान्योत्पादन

वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अन्‍न उत्पादनासाठी नवे तंत्र शोधून काढले आहे. त्यांनी बहुमजली ग्रीन हाऊस तयार केले आहे. निरनिराळ्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात फळे, भाज्या व धान्य उगवता येऊ शकेल. तेदेखील माती आणि कीटकनाशकांशिवाय. व्हर्टिक्रॉप हायड्रोपोनिक सिस्टिमवर आधारित या ग्रीन हाऊसला ‘प्लॅन्ट स्क्रॅपर’ असे नाव दिले गेले आहे.

प्लॅन्ट स्क्रॅपरमध्ये एक बेल्ट लावला असून तो पीक वर-खाली घेऊन जाण्यासाठी मदत करतो. हे ग्रीन हाऊस काचेपासून तयार केले असून इमारतीत फिरताना पिकाला पुरेशा प्रमाणात ऊन मिळावे, हा त्यामागचा उद्देश आहे. विशिष्ट ट्रेमध्ये फळ आणि भाज्यांचे बी टाकून इमारतीच्या सर्वात उंच मजल्यावर ते ठेवतात. पोषक तत्त्वांनी भरलेले पाणी त्यांना दिले जाते. विकासासाठी मातीची गरज पडत नाही. जसजसे पीक वाढू लागते तसा ट्रे खाली येतो. शेवटच्या मजल्यावर म्हणजे सर्वात खाली ट्रे आला तर त्याचा अर्थ होतो उत्पादन खाण्यायोग्य झाले आहे.

मातीशिवाय धान्योत्पादन

प्लॅन्ट स्क्रॅपरचे अनेक फायदे आहेत. हवामानाच्या लहरीपणाचा फटका याला बसणार नाही. तसेच पाण्याचा वापरही कमी होईल. वाढत्या लोकसंख्येला पौष्टिक आहार देता येऊ शकेल. शिवाय तयार झालेले अन्‍न आरोग्यासाठी सुरक्षित असेल, कारण त्यावर कीटकनाशके फवारली जात नाहीत. छोट्या जागेतही धान्य उगवता येते.प्लॅन्ट स्क्रॅपरच्या आत तापमान नियंत्रित करता येऊ शकते. त्यामुळे बाराही महिने पाहिजे ते फळ, भाज्या उगवता येऊ शकते, असा त्यांनी दावा केला आहे. काही देशांमध्ये हायड्रोपोनिक सिस्टिमद्वारे टोमॅटो आणि स्ट्रॉबेरीचे उत्पादन बर्‍याच वर्षांपासून होत आहे. या सिस्टिममध्ये पिकाच्या विकासासाठी पोषक घटकांनी भरपूर असणारे पाणी वापरले जाते. प्लॅन्ट स्क्रॅपर काचेने झाकले असल्यामुळे त्यामध्ये उगणार्‍या पिकांना कीड लागण्याचा धोका जवळपास नसतोच. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर करण्याची गरज पडत नाही.

आज जगभरात खाद्य संकट भेडसावत आहे. 67 टक्के शेतीयोग्य जमिनीचा वापर जनावरांसाठी चारा उगवण्यासाठी होतो. 33 टक्के जमिनीवर धान्य आणि फळभाज्या यांचे उत्पन्‍न घेतले जाते. 40 पेक्षा जास्त देशांत खाद्य संकटाचा सामना करावा लागतो. संयुक्‍त राष्ट्राच्या निष्कर्षानुसार 87 कोटी लोक जगभरात कुपोषणाचे शिकार आहेत. 20 वर्षांच्या आत गहू आणि तांदळाचे भाव दुप्पट होण्याची शंका आहे. तसेच गहू, तांदूळ आणि मक्याच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्लॅन्ट स्क्रॅपर खूप चांगला पर्याय ठरू शकतो.

ब्रिटनमधील पेंगटन या प्राणीसंग्रहालयात जनावरांसाठी स्वस्त किमतीत भाज्या आणि चार्‍याचे उत्पादन करण्यासाठी व्हर्टिक्रॉप हायड्रोपोनिक सिस्टिमचा आधार घेतला जात आहे. स्वीडिश कंपनी यापासूनच प्रेरणा घेऊन प्लॅन्ट स्क्रॅपर बनवत आहे. स्वीडनबरोबरच जपान, चीन, सिंगापूर, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही प्लॅन्ट स्क्रॅपर बनणार आहे. हे अनोखे तंत्रज्ञान प्रचलित झाले तर अन्‍नधान्याचा तुटवडा कमी होण्याची शक्यता आहे.
– सतीश जाधव

Exit mobile version