काँग्रेस-इंडिया आघाडीचा लोकांच्या संपत्तीवर डोळा! | पुढारी

काँग्रेस-इंडिया आघाडीचा लोकांच्या संपत्तीवर डोळा!

कोलकाता, वृत्तसंस्था : काँग्रेस-इंडिया आघाडी सत्तेत येताच महिला, आदिवासी आणि गरिबांविरुद्ध धोकादायक कायदे आणेल. महिलांचे मंगळसूत्र, आदिवासींचे दागिने आणि प्रत्येकाचीच मालमत्ता काँग्रेस-इंडिया आघाडी तपासेल. काँग्रेसच्या राजपुत्रांनी त्यासाठी एक्स-रे मशिन आणण्याची तयारी चालवली आहे. ते देशभरात एक्स-रे करतील. प्रत्येकाचा पैसा, सोने, चांदी, जमीन तपासतील. संपत्तीवर कब्जा करतील. जो पैसा यातून उभा राहील, त्यातला काही वाटा हे लोक आपल्या व्होट बँकेला देणार आहेत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मालदा (प. बंगाल) येथे झालेल्या प्रचार सभेतून दिला.

काँग्रेसचा हा इरादा तृणमूल काँग्रेसलाही ठाऊक आहे; पण तृणमूल काँग्रेस याबद्दल काही बोलत नाही. काँग्रेस अमेरिकेच्या धर्तीवर भारतातही वारसा कर लागू करण्याच्या तयारीत आहे. देशातील प्रत्येकासाठीच हे भयावह आहे. एखादी व्यक्ती दगावल्यानंतर त्याची संपत्ती त्याच्या आयुष्याचा जोडीदार, मुले, मुली अशा कायदेशीर वारसांमध्ये वाटून दिली जाते. मात्र, अशा परिस्थितीत या
संपत्तीतला एक मोठा वाटाही ताब्यात घेण्याचा काँग्रेसचा विचार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये तुष्टीकरणाची स्पर्धा सुरू आहे. तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये बांगला देशी घुसखोरांना आणून वसविले जात आहे. या अशाच व्होट बँका विकसित करून देशात ठिकठिकाणी कुटुंब कबिल्यांचे पक्ष आपला स्वार्थ साधत आहेत. यांना देशाशी, देशाच्या सुरक्षिततेशी काही देणे-घेणे नाही. आपले नातेवाईक-आपली मुलेबाळे यांचे कल्याण हाच एकमेव कार्यक्रम या मंडळींचा आहे.

बंगालच्या विकासासाठी मी केंद्रातून बंगालच्या तृणमूल सरकारला जो पैसा पाठवतो तो या पक्षाचे नेते, मंत्री मिळून खाऊन टाकतात, असा घणाघाती आरोपही पंतप्रधानांनी केला. काँग्रेससह विरोधकांनी माझ्या या वक्तव्यांवरून कितीही कांगावा केला तरी सत्य हे सत्यच असते. ते बदलत नाही, असेही पंतप्रधानांनी ठणकावून सांगितले. दलितांच्या आरक्षणात कपात करून विशिष्ट वर्गाला आरक्षण देण्याचा घाट काँग्रेसने घातला की नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेच्या मूलभूत तत्त्वांविरोधात आहे की नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

Back to top button