निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी… | पुढारी

निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी...

निर्यातक्षम कांदा उत्पादनाच्या दृष्टीने रोपवाटिका व रोपांची निरोगी वाढ व लागवडीसाठी योग्य रोपे फार महत्त्वाची असतात. कारण, अजून बरेचसे शेतकरी पारंपरिक पद्धतीने रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करतात. त्यामुळे उत्पादनामध्ये फार मोठी घट व नुकसान दिसून येते. ते टाळण्यासाठी आधुनिक पद्धतीने रोपवाटिका तयार करणे महत्त्वाचे आहे.

कांदा रोपे नेहमी गादी वाफ्यावर तयार केल्यास बर्‍याच अंशी समस्या सुटतात. गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. पाण्याचा निचरा चांगला होतो व त्यामुळे रोप कुजणे, मरणे किंवा सडणे हे प्रकार कमी होतात. रोपांच्या गाठी चांगल्या बांधल्या जातात. त्यासाठी गादी वाफे 1 मीटर रुंद व 3 ते 4 मीटर लांबीचे व 15 ते 20 से.मी. उंचीचे वाफे तयार करावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात 2 ते 3 पाटी चांगले कुजलेले शेणखत व सोबत ट्रायकोडर्मा, 50 ग्रॅम सुफला आणि 10 ते 15 ग्रॅम दाणेदार फ्युरॉडॉन मातीत मिसळावे.

वाफ्याच्या रुंदीच्या 8 ते 10 सें.मी. अंतरावर रेघा पाडाव्यात आणि बीजप्रक्रिया केलेले पातळ बी पेरावे व हलक्या हाताने मातीने झाकावे. पाणी देताना त्याचा प्रवाह कमी ठेवावा. वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंडी ठेवावी म्हणजे पाण्याचा जोर कमी होईल आणि बी पाण्याबरोबर वाफेच्या कडेला वाहून जाणार नाही. पहिल्या पाण्यानंतर रोप उगवत असताना हलके पाणी द्यावे.

बियाणे उगवल्यानंतर 15 दिवसांनी दोन ओळींमध्ये हलकीशी खुरपणी करून प्रत्येक वाफ्यात 50 ग्रॅम युरिया व 50 ग्रॅम थायमेट वापरावे. त्यानंतर गरजेनुसार 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. रोपवाटिकेत तण असल्यास खुरपणी करावी आणि त्यासोबत रोपाच्या ओळीतील माती हलवून घ्यावी, म्हणजे रोपांच्या मुळ्यांभोवती हवा खेळती राहील. रोपवाटिकेत ठिबक सिंचनाचा उपयोग करून चांगल्या प्रकारे रोपे तयार करता येतात. बी वाहून जाण्याची भीती राहत नाही. पाणी गरजेनुसार दिले जाते. जमीन भुसभुशीत राहून रोपांची वाढ चांगली होते.

रोपांची वाढ होत असताना त्यावर फुलकिडे व शेंडा जळणे या किडींचा प्रादुर्भाव दिसल्यास 10 लिटर पाण्यात 13 ते 15 मिली मिथिल डिमेटॉन आणि 25 ग्रॅम डयथेन एम 45 ही औषधे 10 मिली स्टीकरसह 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. रांगडा कांद्याची लागवड साधारण ऑगस्टचा शेवटचा ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावयाची असते. रोपांच्या वाढीचा कालावधी 7 ते 8 आठवडे आवश्यक असल्याने रोपवाटिकेची पूर्वतयारी कररून जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बी पेरणे आवश्यक आहे.

– नवनाथ वारे

Back to top button