शोध सुखाचा! : रेड रिबन | पुढारी

शोध सुखाचा! : रेड रिबन

सुजाता पेंडसे

मागच्या लेखात आपण पाहिले की, बर्‍याच लोकांना आपण सकारात्मक विचार करणारे असूनही आपल्याला पाहिजे तसं किंवा तेवढं यश मिळालेलं नाही, असं वाटत राहतं. ही लेखमाला वाचणार्‍यांनीही यामध्ये दिलेल्या पद्धतीचा वापर करून पाहिला असेल. पण त्यात काहींना यश मिळत का नाही? आमची प्रार्थना यशस्वी का होत नाही? हा प्रश्न पडतो, पडलेला असेल. त्याचे मुख्य कारण म्हणजे तुमची स्वत:ची विचारसरणी. तुमच्या जुन्या धारणा. तुमचा विश्वास. प्रत्येक माणसाच्या मनात काही गोष्टी ठामपणे रुजलेल्या असतात. त्याला आपण बिलीफ सिस्टीम म्हणतो. या बिलीफ सिस्टीमला आव्हान देणारे विचार माणूस सहजपणे स्वीकारत नाही. त्यासाठी शांतपणे प्रयत्न करावे लागतात. विशेषत: नकारात्मक धारणा खोडून तिथे चांगल्या धारणा रुजवणे ही खूप प्रयत्नाने साध्य होणारी गोष्ट आहे. इथे गडबड करून चालत नाही.

इच्छाशक्तीवर जोर देऊन चालत नाही, तर विश्वास ठेवून कृती करणे महत्त्वाचे असते. कारण सुप्त मनात फक्त आपल्याला पटलेल्या गोष्टीच जातात. मग न पटलेल्या पण तुमच्यासाठी योग्य अशा सूचना सुप्त मनाने स्वीकारावे, यासाठी काय करायचं? आर्थिक परिस्थिती वाईट असलेला माणूस ‘मला खूप पैसा मिळत आहे’! ही सूचना चटकन स्वीकारत नाही किंवा नाकारतोच. कारण तिथे त्याची बुद्धी किंवा वस्तुनिष्ठ मन काम करते. तो माणूस मग वेगवेगळ्या शब्दांत याच सूचना देऊन बघतो. मग तर अजिबातच यश मिळत नाही. कारण समजा… तुम्ही एखाद्या टॅक्सीत बसलात आणि टॅक्सीचालकाला एखादे ठिकाण सांगितले. पुन्हा पाच मिनिटांनी आणखी एक-दोन ठिकाणे सांगितली, तर तो टॅक्सीचालक गोंधळून जाईल.

मग तो तिथेच थांबून राहील किंवा तुम्हाला म्हणेल, आधी नक्की ठरवा आणि मग मला सांगा! इथे तो चालक बोलतो. पण आपले सुप्त मन बोलत नाही. ते काहीच करत नाही आणि परिस्थिती आहे तशीच राहते. मग त्या व्यक्तीला अपयश येते, अविश्वास निर्माण होतो आणि प्रयत्नच थांबतात. मग या सगळ्यावरचा उपाय काय? यावरचा उपाय म्हणजे आपण जी स्वयंसूचना देतो ती तीन ‘स’ने युक्त असावी. पहिले ‘स’ म्हणजे स्व. स्व हे या अर्थाने की तुमच्या मानसिक आदेशाची सुरुवात ‘मी’ने असावी. ‘मी हे करू शकतो’, ‘मी स्वत:ला खूप आवडतो’ किंवा ‘मी महिन्याला अमुक कमावतो’. त्यानंतरचा ‘स’ म्हणजे सद्यकाळ. म्हणजे वर्तमान काळ. ‘माझे वजन अमुक किलो आहे’ असे वर्तमान काळातले वाक्य असावे. तिसरा ‘स’ हा सकारात्मकतेशी संबंधित आहे. म्हणजे ‘मी आता कोणावर रागवत नाही’ असे वाक्य उपयोगी नाही. तर ‘मी संयमी आणि प्रेमळ आहे’ ही योग्य सूचना आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या इच्छा आणि कल्पना परस्परविरोधी असतील; तर कल्पनेचा विजय होतो. कारण मनाला, बुद्धीला ते पटलेले नसते. तुमच्या इच्छेचा स्वीकार सुप्त मनाने केलाच पाहिजे म्हणून जबरदस्ती केली तर प्रार्थनेचा, सूचनेचा उलटा परिणाम होतो. मन गोंधळलेले, गांगरलेले असेल तेव्हा कोणताही चांगला विचार सुप्त मनात जात नाही. याला एक उदाहरण घेऊया. परीक्षा जवळ आली की, मुले भरपूर अभ्यासाला लागतात. पहिल्यापासून अभ्यास केलेला नसेल तर ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था झालेली असते. पेपरच्या वेळी तर मनोमन भीतीही वाटत असते की ‘नीट येईल ना लिहिता? न जाणो ऑप्शनला टाकलेलं काही आलं तर काय करायचं?’ असे बरेच विचार असतात. साहजिकच पेपर हातात आला की आधी सर्व प्रश्नांवर नजर टाकली जाते.

त्यातच नेमका ज्याचा अभ्यास झालेलाच नाही, असा प्रश्न समोर आला, तर मन भयंकर अस्वस्थ होते आणि आता काय होणार, हा विचार प्रबळ होऊन येणारी उत्तरेही आठवायची बंद होतात. घाम फुटतो. मार्क कमी पडणार… नापास होणार… असे विचार येऊ लागतात. हे सगळे घडते ते मनातली इच्छा आहे ती सगळं आठवावं आणि कल्पना केलीय ती म्हणजे मार्क कमी पडणार अशी. मग काय, उलटे परिणाम दिसतात. कोणत्याही परिस्थितीत गांगरून न जाता प्रथम मनाला शांत करायचे. दीर्घ श्वसन करून मन श्वासावर केंद्रित करून वर्तमानात आणायचे आणि मग योग्य त्या शब्दांत सूचना द्यायच्या. मनातला प्रतिकार म्हणजे ‘रेड रिबन’ आहे. ‘सरकारी कामे लाल फितीत अडकून पडतात’, असे नेहमी म्हटले जाते. ती रेड रिबन मनातली कामेही अडवून ठेवते. त्यामुळे ती कापून टाकायला लागतेच. प्रार्थनेचे, सूचनेचे उत्तम परिणाम दिसण्यासाठी या तीन गोष्टी करा.

एक म्हणजे मानसिक चित्र किंवा कल्पनाचित्र अत्यंत स्पष्ट असायला हवे. दुसरे म्हणजे ही चित्रमालिका किंवा चित्र मनापासून उत्कटतेने, खरेच आहे, अशी भावना ठेवून पाहायचे. त्यातून पुढे मिळणारा आनंद आताच मिळाला आहे, असे वाटावे, इतकी उत्कटता बाळगा. याबद्दल एक छोटेसे उदाहरण घेऊया. एका मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितले की, परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की ते त्याला हवी ती गाडी घेऊन देतील. त्या भविष्यात मिळणार्‍या गाडीच्या आनंदात मुलगा खूप जोमाने अभ्यास करू लागला. रात्री झोपतानाही त्या गाडीच्या विचारातच तो झोपायचा. उठलं की पुन्हा ती गाडी मिळणार, ही कल्पना त्याला आनंदी बनवायची. अखेर तो दिवस उजाडला. मुलाला चांगले मार्क्स मिळून ती गाडी त्याच्या आयुष्यात आली. हे सगळं घडलं. कारण त्या कल्पनाचित्रात त्याच्या भावनांची उत्कट जोड होती.

तिसरी गोष्ट म्हणजे कल्पनाचित्राची वारंवारिता म्हणजे पुन:पुन्हा हवे ते चित्र पाहणे. पुन्हा पुन्हा मनाला सूचना देऊन मग ती धारणा सत्यामध्ये परिवर्तित होते. मनातल्या निराशा, दु:खी विचारांना सतत बाजूला करत राहायचं. हे अतिशय अवघड कामही सातत्यानं करावं लागतं. याबरोबरच या एकूण प्रयत्नांना नेमकं कधी यश येईल याची चिंता करायची नाही. एखाद्या व्यक्तीच्या योग्य प्रयत्नांना काही दिवसांतच यश मिळेल किंवा एखाद्या व्यक्तीला थोडा उशीर लागेल. पण योग्य परिणाम दिसायचे असतील तर संयम बाळगायलाच हवा. एखादे रोप लावले की दुसर्‍या दिवशी त्याला फुलं येतील, ही अवास्तव अपेक्षा आहे किंवा लवकर फुलं येत नसतील तर कुठेतरी चुकतंय, हे नक्कीच आहे. पुरेसा प्रकाश, पाणी, खत (आणि थोडं प्रेमही) देऊ केलं तर झाडंसुद्धा जोमाने बहरतात, हा निसर्गनियम आहे. तसेच आपले मन, शरीर हे देखील निसर्गाच्या नियमानेच चालते. म्हणून त्याच्या म्हणजे सुप्त मनाच्या कार्यशक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवा.

Back to top button