उत्‍सव : बुरा ना मानो… | पुढारी

उत्‍सव : बुरा ना मानो...

अरुणा सरनाईक

होळी आपल्याला पुन्हा तरूण करते. मनातले गिले शिकवे या होळीच्या निमित्ताने दूर होत असतात. या दिवशी सगळं काही माफ असतं. कारण होळीची स्लोगनच मुळी ‘बुरा ना मानो होली है!’ अशी असते. आज (दि. 24 मार्च) होळी. त्यानिमित्ताने…

भारतीय लोकसंस्कृतीमध्ये काही सणच मुळी असे असतात, ज्यांच्यात काही वेगळीच मस्ती असते. काही दिलखेचकपणा असतो. काही जीवात उठवणारी जीवघेणी, पण हवीशी वाटणारी मधुर कसक असते. हवेतला बदल त्याच्या येण्याची चाहूल देत असते. सगळा निसर्ग बदलत असतो. नित्यनेमाने ऋतुमानानुसार स्वत:बदल घडवित असतो. रोजचा होणारा बदल निरखायला आपल्याला वेळ नसतो, हे खरंय! पण आपल्या सोयीचे, आवडीचे बदल आपल्याही नकळत आपण निरखून त्याची दखल घेत असतो. एवढ्यातच हवेतला गारवा जाणवायला लागलाय. संध्याकाळ रम्य आणि विविधरंगी होऊ लागलीय. ऑफिसमधून घरी जाताना दिसणार्‍या मावळतीच्या आकाशी केशरी रंग प्रामुख्यानं नजरेत भरतोय.

रस्त्यावर पिवळी पानं वार्‍यावर गिरक्या घेत थिरकताना दिसताहेत. जागोजागी केशरी रंगाचा पळस फुलू लागलाय. दिवसभर हवेत उष्मा जाणवतो आहे. सकाळ मात्र कधी सरत्या हिवाळ्याची आठवण करून देत आहे. अंगणभर पिवळ्या पानांची गर्दी होत आहे. परवा माझा भाऊ म्हणाला, सकाळी अंगणातली सारी पिवळी पानं मी हलक्या हातानं गोळा करतो. मला ते काम फार आवडतं. ती पिवळी पानं म्हणजे त्या झाडाच्या भूतकाळातील आठवणी असतात. फार नवीन आणि वेगळी कल्पना होती त्याच्या बोलण्यात.

हे दिवसच मुळी असे हळवे होण्याचे किंवा आपल्याला हळवे करण्याचे असतात असं वाटतं ! आणि त्यातच येतो तो होळीचा सण! आठवणींचा महोत्सव! त्यातच भरीस नुकताच इमरोजच्या ‘जश्न अभी जारी है!’चा मराठी अनुवादावरील लेख वाचण्यात आला. त्यातील कविता वाचल्या. कसल्या जीवघेण्या! कसं त्याचं अमृता प्रितमवर प्रेम! आणि त्याचा आकाशव्यापी आवाका! रंग आणि कविता याचा तो अद्भुतरम्य आविष्कार!

मन तर वेडंच असतं. आपल्या आयुष्यात असं काही घडावं असं वाटायला लावतं. आपण ते पेलू शकणार नाही हे माहीत असतं. आपलं मध्यमवर्गीय मन असे विचार करायला लागतं आणि वातावरण मदीर व्हायला लागतं, तेव्हाच ओळखावं की होळी आली. कारण मनावरचं, शरीरावरचं ओझं उतरवणारा हा सण आहे. रुटीन आयुष्याशी काही काळ फारकत घेऊन मस्तीत जगायला लावणारा हा सण आहे. इतर कोणत्याही सणाला आपण बोंब मारत नाही; पण होळी हा सण खास यासाठी प्रसिद्ध आहे. अगदी ‘बुरा मानो होली है!’ म्हणत वाट्टेल तसा धुडगूस घालता येतो. वर्तमानपत्रातसुद्धा या होळीच्या दिवशी प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीला काहीतरी टायटल दिलेलं असतं. मज्जा असते. वर्षातला हाच एक दिवस असा की, मनावरचं ओझं खांद्यावरही न ठेवता अगदी पायातळी ठेवून त्याच्यावर नाचता येतं. आजकाल दिवस फार ताणाचे असतात. अशा दिवसांत होळी आपल्याला पुन्हा तरुण करते.

आपलं साहित्य, हिंदी चित्रपट, लोककला एवढंच नाही तर इतिहास, पुराण रामायण, महाभारत यात देखील या सणाचा उल्लेख आहे. त्याच्याशी निगडित अनेक कथा, कविता, नाटक जोडलेले आहेत. निखळ प्रेमाचा, अतिशय रंगीला हा सण! आपल्याकडे जी काही प्रेमाची प्रतीकं प्रसिद्ध आहेत, त्यांच्यासाठी होळीचा सण राग-रुसव्याचा, प्रेमिका-प्रेमीला मनविण्याचा सण ! कृष्ण-राधेच्या रासक्रीडेचा सुंदर सोहळा वर्णन करणारा हा सण! परदेशी साजनाची आतुरतेने वाट बघायला लावणारा हा सण! कदाचित तो दुसर्‍या कोणाच्या प्रेमात तर पडला नसेल, ही भीती मनात उत्पन्न करणारा सण! विरहाची वेदना तीव्र करणारा सण! मधूर रसिया सण !

गावाकडे फुललेला पळस. त्याचा केशरी रंग. तो रंग घरी तयार करतात. त्यासाठी रात्रभर पळसाची फुलं पाण्यात भिजवून ठेवतात. आणि सकाळी तो केशरी फुलांचा रंग तयार होतो आणि त्या रंगानं रंगपंचमी खेळली जाते. पूर्वी नैसर्गिक रंगाचा वापर केला जात असे. गुलाल लावला जात असे. मनातले गिले शिकवे या होळीच्या निमित्तानं दूर होत असतात. नवीन लग्न झालेल्या किंवा नवं बाळ जन्माला आलेलं असेल तर त्याचा शिवशिमगा करीत असत. त्यासाठी केशराचा रंग तयार होत असे. नवविवाहितेला पिवळ्या रंगाची वस्त्रं भेट देत असत. पाच सवाष्णींना घरी बोलावून गुलाल खेळत असत. त्यामागील उद्देश तिचं मन सासरी रमावं हा असावा. आजही होळी अशा प्रकारे साजरी केली जाते. नागपूरकडे या दिवशी अनेक ठिकाणी खास थंडाईवाली भांग बनवून ती पितात. या भांग चढण्यावर फार धमाल होते. हा सगळा रांगडा प्रकार आहे. पण या दिवशी सगळं काही माफ असतं. कारण होळीची स्लोगनच मुळी ‘बुरा ना मानो होली है!’ अशी असते. सर्व काही आनंदासाठीच असतं.

दिवसभराची होळी खेळून संपते! आधीच्या संध्याकाळी जागोजागी होळ्या पेटलेल्या दिवसभरात शांतवलेल्या असतात. आता यावेळी होळीला निरोपाची संध्याकाळ सुरू होते. दिवसभर दंगा केलेली मुलं संध्याकाळी शहाण्या मुलासारखी दुसर्‍या दिवसाच्या शाळेच्या तयारीला लागतात. तसं आपलं मनही पुढच्या दिवसाच्या तयारीला लागतं. आता होळी दूर जाऊ लागते. थेट पुढच्या वर्षी भेटणार म्हणते. मनात कालवाकालव सुरू होते. आपलं आणखी एक वर्ष पुढं सरकणार! राहून गेलेल्या किती होळ्या कोणासोबत खेळायच्या तो हिशेब मनात सुरू होतो. लहानपण, तरुणपणात हातातून निसटलेल्या हातांना रंंग लावायचा किंवा त्यांच्याकडून रंगवून घ्यायचं राहिलेलं आठवायला लागतं! तेव्हाचे पुसट नकळत किंवा कळत झालेले स्पर्श मनाच्या तळातून वरती येत आपल्या गेलेल्या वयाचा आणि राहिलेल्या वयाचा लेखाजोखा मागतात तेव्हा खरंच डोळ्यात आसवं उभी राहतात. दिवसभराचा खोटा खेाटा हसतमुखाचा उसना चेहरा आपल्याला रडवतो!

आकाशात आता पौर्णिमेचा दिमाखदार चंद्र उजळू लागलेला असतो. हलका वारा सुरू होतो. कुठे कुठे शांत झालेल्या होळीतून हा हलका वारा धूर निघायला मदत करतो. वरचा दुधिया रंगाचा चंद्र, निळेभोर किंचित गुलाबी छटा असलेलं आकाश, कबर्‍या रंगाच्या धूमाच्या नर्तन करणार्‍या लवलवत्या रेषा! आणि मनात तशाच विव्हल करणार्‍या गतकाळाच्या आठवणी! मोठी बिकट अवस्था असते मनाची! पण म्हणतात ना, काळासारखं औषध नाही आणि वाट बघण्यासारखी मोठी परीक्षा नाही. मनात इच्छा असेल तर मार्ग तुमच्या समोर असतो. तसाच हा होळीचा सण तुमच्या मनातील ही कुणाच्या तरी भेटीची असोशी जागी ठेवतो ! या होळीला न झालेली भेट पुढच्या होळीला नक्की होईल, असे आश्वासन देत तुमचा निरोप घेतो.

Back to top button