Sahitya Sammelan : उत्सव बहु थोर! | पुढारी

Sahitya Sammelan : उत्सव बहु थोर!

वंदना अत्रे

समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवे रूपही घ्यावे लागते. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की. नाशिक येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या (Sahitya Sammelan) निमित्ताने…

नाशिक शहरात साहित्य संमेलनाची गजबज सुरू झाली आहे. मंडप उभारणीची लगबग, जेवणाच्या मेनूच्या याद्यांवर फिरणारा शेवटचा हात, बाहेरगावातून येणार्‍या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी, ग्रंथदिंडीच्या पालखीची सजावट आणि वेळोवेळी सुरू असलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकांमधील चर्चा-वाद-रुसवे-फुगवे… या सर्वांनी आता वेग पकडला आहे. आणखी चारच दिवसांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकमधील देखण्या ‘नॉलेज सिटी’मध्ये तीन डिसेंबरला 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Sahitya Sammelan) उद्घाटनाच्या तुतार्‍या वाजतील. रंगमंचावर संमेलन गीत वाजत असताना 16 वर्षांपूर्वी जानेवारीच्या ऐन थंडीत म. वि. प्र. समाजाच्या प्रांगणात भरलेल्या 78 व्या संमेलनाची नक्कीच या शहराला आठवण येईल.

आठवतील आपल्या अकाली निधनाने चुटपुट लावून गेलेले 78 व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. वसंत पवार, उद्घाटन समारंभात कार्याध्यक्ष या नात्याने उपस्थित रसिकांशी जिवाभावाचा हृद्य वडीलधारा संवाद साधणारे विनायकदादा आणि कार्यवाह किशोर पाठकसुद्धा. सुन्न व्हावे अशी बरीच पडझड या शहरानेही गेल्या वर्ष-दोन वर्षात बघितली.

दूरवर प्रकाशाचा ठिपकासुद्धा दिसू नये, अशा गुदमरून टाकणार्‍या अंधारलेल्या काळात टिकून राहण्याचे प्रयत्न केले. आता हे सगळे काही भूतकाळात जमा करणारा आणि सगळ्या गावाला आनंदाचे रंगीबेरंगी तोरण बांधणारा मंगल प्रसंग उंबर्‍यावर उभा असताना, प्रसन्न मुखाने वेशीवर जात येणार्‍या पाहुण्यांची गळाभेट घ्यायला हवी. गालाला काळी तीट लावून इडापिडा टळो आणि कार्य सुखाने पार पडो म्हणून सगळ्या शहराने एकत्र येत प्रार्थनाही करायला हवी. टीकेची आणि प्रश्नाची पिंक टाकणार्‍या काही विघ्नसंतोषी तोंडांकडे दुर्लक्ष करूनच पुढे जायला हवे. तरच ही बुद्धीची आणि वाणीची शुभ्रवस्त्रा देवता प्रसन्न होण्याची शक्यता अधिक…! तिच्या आशीर्वादांची सध्या सगळ्या जगाला नितांत गरज आहे. (Sahitya Sammelan)

लक्ष्मीच्या उपासनेची मोठी धांदल जेव्हापासून सगळ्या जगात सुरू झाली आहे आणि माणसाचे विवेक-अविवेकाचे अवधान सुटू लागले आहे; तेव्हापासून माणसांच्या त्या धांदलीकडे, त्यातील व्यवहारांकडे तटस्थ-शांतपणे बघत सरस्वती मागे सरत गेली. वर्षभरात अशा एखाद्याच निमित्ताने ती पूजेच्या अंगणात येते तेव्हा खरे म्हणजे पूजेच्या त्या तीन दिवसांत ती काय सांगू बघतेय… आपल्यासाठी प्रार्थनेचे कोणते चार मंत्र हातात ठेवते आहे, ते जीवाचा कान करून ऐकायला हवे आहे आणि कानात साठवून ठेवायला हवे आहे..!

आपल्या भाषेच्या सन्मानासाठी, परिस्थिती वेळोवेळी या भाषेसमोर उभ्या करीत असलेल्या आव्हानांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी मोठ्या कष्टाने आणि अभिमानाने साहित्य संमेलनासारख्या गोष्टीचा घाट घालणारा मराठी माणूस हा जरा वेडाच! गावोगावचे विचारवंत बोलावून, ग्रंथांचे हे एवढे प्रदर्शन भरवून आणि या विचारवंताना ऐकण्या-बघण्यासाठी येणार्‍या, पुस्तकांची खरेदी करणार्‍या रसिकांना मोठ्या हौशीने गोडधोडाचे चार घास आग्रहाने खाऊ घालून, भाषेवरील आपल्या प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करणारा असा भाषाप्रेमी सगळ्या भारतात एखादाच..! त्यामुळेच तर या संमेलनाचे कौतुक आहे. भाषणे ऐकायला मंडपात रसिक दाटीवाटीने बसतात, पुस्तकांच्या प्रदर्शनात गर्दी करतात आणि कार्यक्रम संपल्यावर रात्री उशिरापर्यंत रिकाम्या मंडपात गप्पांचे फड रंगवत बसतात.

रोजचे धकाधकीचे जगणे सुसह्य करण्यासाठी हे सगळे काही गरजेचे असते. समविचारी लोकांना भेटणे, आपल्याला मान्य नसलेले विचारप्रवाह समजून घेणे आणि समाजाचे नेतृत्व करणार्‍या भविष्यवेधी लोकांकडून जगण्याच्या पुढील वाटेचा अंदाज घेणे, असे सगळे काही या अवकाशात घडत असते. (Sahitya Sammelan)

जिथे माणसे प्रत्यक्ष भेटतात, आपल्या आसपास वावरतात, आपल्याशी थेट बोलतात, असा हा जिवंत रसरशीत अवकाश. एरवी अनेक विषयांवर मान्यवरांशी चर्चा, वाद, गप्पा हे सगळे काही आपण रोज पडद्यावर बघत आणि अनुभवत असतोच. इथे ते प्रत्यक्ष घडते, अनुभवता येते म्हणून ते महत्त्वाचे. आणि जेव्हा जगणे काही काळ पूर्ण थांबते, माणसांना एकमेकांपासून दूर राहण्याची सक्ती करते, अशा घुसमटून टाकणार्‍या दिवसांना सामोरे जावे लागल्यावर तर फारच महत्त्वाचे..! या संमेलनाचे अप्रूप आहे ते यासाठी.

या संमेलनाचे आणखी अप्रूप यासाठी की, इथे फक्त साहित्य व्यवहारांचीच चर्चा होत नाही, तर जगण्याला भिडणार्‍या ज्या-ज्या विषयांमध्ये साहित्याची बीजे असतात, त्या प्रत्येक विषयाचे साहित्याशी असलेले नाते इथे तपासून बघता येते. बघितले जाते. सामाजिक-राजकीय जीवनातील साहित्यावर परिणाम करणार्‍या प्रत्येक घटनेची दखल इथे आवर्जून घेतली जाते.

मग ती 75 सालची आणीबाणी असो किंवा अनेक वर्षं चिघळत पडलेला सीमा प्रश्न असो. शेतकरी संघटनेचे आंदोलन असो किंवा उदारीकरणाचे परिणाम असोत. या प्रत्येक प्रश्नावर बोलण्याचे हे व्यासपीठ आहे. नव्हे, त्यावर इथे बोललेच पाहिजे, असा आग्रह इथे धरला जातो. त्यामुळेच संमेलनाच्या व्यासपीठावर उद्योगातील माणसे येतात, अर्थतज्ज्ञ येतात आणि शेतकरीही येतात.

राजकीय नेते तर हक्काने येऊन पुस्तकांशी आपले किती जीवाभावाचे नाते आहे, हे सांगत असतात. जीवनाचे असे समग्र भान देण्याचा असा आग्रह अन्य कोणत्याही कलेच्या व्यासपीठावर फारसा धरला जात नसावा. पण या व्यासपीठाचे हे मोठेपण आणि अनिवार्यता मान्य आहे म्हणूनच त्याच्याकडे चिकित्सक द़ृष्टीनेही बघताना त्यात होणार्‍या नकोशा बदलांकडे बोट दाखवायलाच हवे. दुर्लक्षित राहिलेल्या (की ठेवलेल्या) विषयांच्याबद्दल नक्कीच प्रश्न उपस्थित करायला हवा. (Sahitya Sammelan)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एरवी भोवताली धगधगत असलेल्या सामाजिक प्रश्नांची दखल घेणार्‍या या व्यासपीठाला सध्याची झपाट्याने बदलत असलेली आणि दूषित होत चाललेली सामाजिक परिस्थिती दिसत नसावी, असे यंदाची कार्यक्रम पत्रिका बघताना वाटते.

पर्यावरणाच्या प्रश्नांनी जगभर धारण केलेले अतिउग्र रूप, त्यानं निर्माण केलेली परिस्थिती आणि त्याचे माणसाच्या जगण्यावर होणारे परिणाम, हा आज आपल्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न नाहीय का? धर्म आणि जातीच्या नावाने समाजात निर्माण होत असलेला विद्वेष आणि उभा तुटत चाललेला समाज, याकडे आपण सोईस्कर डोळेझाक करीत नाहीय ना? कोरोनाच्या तडाख्याची झळ सोसत होलपटत असलेली शिक्षण व्यवस्था आणि त्यामुळे सैरभैर झालेली पुढची पिढी यावर कधी बोलणार आपण? या प्रत्येक गोष्टींवर परिसंवाद घेण्याची कदाचित गरज नाही; पण या प्रश्नांचे कोणत्याही अर्थाने प्रतिबिंब या संमेलनावर पडायला नको? एकीकडे पैशाच्या अभावी शिक्षण घेऊ न शकणारी लाखो मुले, ठप्प झालेली हजारो सामाजिक कामे, खिळखिळी झालेली कुटुंबे आणि दुसरीकडे काही कोटी ज्यावर खर्च होणार आणि ज्याच्या निष्पत्तीवर प्रश्नचिन्ह आहे असे संमेलन. एक समाज म्हणून आपण असंवेदनशील होत चाललोय का?

शतकाकडे वाटचाल करीत असलेल्या या सांस्कृतिक परंपरेचे वाढत चाललेले आकारमान आणि त्या पटीने त्यावर होत असलेला डोळे फिरवणारा खर्च, यावर गंभीरपणे आता विचार व्हायलाच हवा. संमेलनाचे मंडप जेव्हा दहा हजार श्रोत्यांना सामावून घेणारे होऊ लागतात, तेव्हा व्यासपीठावर होत असलेल्या चर्चा कोण ऐकतेय? असा प्रश्न पडू लागतो. आपल्या आवडत्या साहित्यिकाला ऐकण्यासाठी, जमल्यास त्याच्याशी दोन शब्द बोलता यावे या इच्छेने अनेक रसिक संमेलनाला हजेरी लावत असतात. दरवर्षी फुगत चाललेल्या रसिकांच्या अलोट गर्दीत या लेखकाचे म्हणणे ऐकता येईल कदाचित.

पण भक्ताने दुरूनच देवाच्या पायाचे दर्शन घ्यावे तसेच काहीसे आहे हे. गंभीर साहित्य चर्चेत रस असणारे रसिक आणि गावात होणार्‍या एका मोठ्या कार्याबद्दल उत्सुकता- कुतूहल म्हणून जत्रेत जातो तसे फिरायला आलेली माणसे, अशा वातावरणात होणार्‍या साहित्य चर्चा खरोखरच साहित्य निर्मितीस हातभार लावणार्‍या होऊ शकतात? ज्या साहित्य संमेलनावर काही कोटींचा खर्च केला जातो, त्यातून नेमके हाती काय लागते? साहित्याचे, रसिकाचे, लेखकाचे काय भले होते? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. याकडे कोणी लक्ष वेधायचे? शासन, महापालिका यांच्याकडून जेव्हा संमेलनाला अनुदान मिळत असते तेव्हा तो पैसा सामान्य माणसाच्या खिशातून जात असतो.

त्याचे जगणे सुकर करणार्‍या काही गोष्टींचा त्यासाठी नकळत बळी जात असतो म्हणून तरी संमेलनाच्या स्वरूपावर विचार करणे व त्यासाठी रेटा निर्माण करणे गरजेचे आहे. छोटी विभागवार संमेलने घेऊन त्यात खरोखर लेखक आणि रसिक या उभयतांचे वैचारिक भरण-पोषण करणारे काही घडावे, असा विचार आता करायला नको का? हे आणि असे अनेक मुद्दे चर्चेला घेत आता तातडीने काही पावले उचलायला हवी आहेत.

समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवे रूपही घ्यावे लागते. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की.

Back to top button