युद्ध : झळा इस्रायल-हमास युद्धाच्या | पुढारी

युद्ध : झळा इस्रायल-हमास युद्धाच्या

संजीव ओक

इस्रायल-हमास संघर्षाची व्याप्ती तीन महिन्यांनंतर वाढताना दिसून येत असून, आता या संघर्षाच्या झळा अपेक्षेप्रमाणेच संपूर्ण जगाला बसायला सुरुवात झाली आहे. अमेरिका, इस्रायल ही मित्र राष्ट्रे यातून कसा मार्ग काढतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा जगभरात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडेल. पुरवठा साखळी विस्कळीत होईल.

आज (सात जानेवारी) हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यास तीन महिने पूर्ण होत आहेत. 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर झालेल्या या हल्ल्यात 1200 इस्रायली ठार झाले, तर शेकडोंचे अपहरण करण्यात आले. हमास दहशतवाद्यांनी चिमुरड्यांचीही अक्षरशः गोळीबारात चाळण केली. महिलांवर अत्याचार केले. म्हणूनच त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इस्रायलने लगेचच गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले चढवले. तसेच हमासचा नायनाट होईपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असे इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांनी जाहीर केले. आजपर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी इस्रायलच्या कारवाईत ठार झाले आहेत. इस्रायलच्या म्हणण्यानुसार सात हजारांपेक्षा अधिक हमासी दहशतवाद्यांना त्यांनी ठार केले आहे. गाझा पट्टीचे प्रशासकीय अधिकार हमासकडे पॅलेस्टिनींनी सोपवले आहेत. म्हणूनच हमासची कोंडी करण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीला लक्ष्य केले. त्यापूर्वी पॅलेस्टिनींनी तेथून निघून जावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, हमासने बंदुकीच्या धाकावर पॅलेस्टिनींना तेथेच राहण्यास भाग पाडले. मृतांमधील पॅलेस्टिनींची संख्या वाढल्याने, स्वाभाविकपणे जगाची सहानुभूती त्यांना मिळणार, हा हमासचा अंदाज. तो दुर्दैवाने आज खरा ठरलेला दिसून येतो.

हमासचा वरिष्ठ म्होरक्या सालेह अल-अरौरी याला मंगळवारी बैरूतमध्ये ड्रोन हल्ल्यात ठार मारण्यात आले. इस्रायलने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे मानले जाते. अरौरी याने हमाससाठी वेस्ट बँकमध्ये अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्या होत्या. लेबनीज राजधानीत तो हिजबुल्लाच्या बालेकिल्ल्यात लपून बसलेला असताना, त्याला ड्रोनने अचूक टिपले. इस्रायलबरोबरच अमेरिकेसाठी तो ‘वॉन्टेड’ दहशतवादी होता. इस्रायल-हमास संघर्षाला तीन महिने पूर्ण होत होण्यापूर्वी इस्रायलने हमासला हा धक्का दिला आहे. इस्रायल 7 ऑक्टोबरनंतर अनेक आघाड्यांवर लढा देत आहे. तांबड्या समुद्रात सुएझ कालव्यातून मालवाहतुकीला लक्ष्य करणार्‍या हुथी दहशतवाद्यांशीही ती लढत आहे. संपूर्ण जगाची काळजी वाढवणारा हा लढा आहे. कोण आहेत हे हुथी बंडखोर? त्यांच्या दहशतवादी कारवायांमुळे जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. हुथी दहशतवादी येमेनमधील सत्तासंघर्षात सक्रिय आहेत.

राजधानी सानासह उत्तर येमेनमध्ये त्यांचे राज्य असून, अधिकृत सरकार एडनच्या बाहेर कार्यरत आहे. हुथी हे झायदी शिया आहेत. झयादवाद हा शियाचा एक उपपंथ आहे. शिया बहुसंख्य इराणने हुथींना रसद पुरवण्याचे काम केले आहे. त्याचा प्रादेशिक प्रतिस्पर्धी सुन्नी बहुसंख्य सौदी अरेबिया येमेन सरकारला पाठिंबा देतो. म्हणूनच इराणने हुथींना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. पॅलेस्टिनींना हुथींचे मिळणारे समर्थन हे प्रादेशिक सत्ता संघर्षाचे प्रकटीकरण आहे. हुथी शिया मुस्लिम असून, ते प्रशिक्षित तसेच कमांडो धाटणीचे दल आहे. हेलिकॉप्टरचा वापर करून जहाजावर उतरत ते कसे ताब्यात घेतले आणि येमेनी बंदरात आणले, याचा व्हिडीओच त्यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. जागतिक व्यापार रोखण्यास ते अर्थातच सक्षम आहेत. इस्रायलने गाझा पट्टीतील लष्करी कारवाई थांबवली तर हुथी त्यांचे हल्ले थांबवतील, अशी अट त्यांनी घातली आहे. मात्र, इस्रायलने हमासचा पूर्णपणे नायनाट करेपर्यंत थांबणार नाही, याचा उच्चार वारंवार केला आहे.

तांबड्या समुद्रातील मालवाहतुकीवर होत असलेले हल्ले पाहता प्रमुख मालवाहतूक कंपनी ‘मर्स्क’ने तांबड्या समुद्रातील प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत एडनच्या आखातातून होणारी सर्व वाहतूक थांबवत असल्याचे म्हटले आहे. ‘हांगझोऊ’ या ‘मर्स्क’च्या जहाजावर हल्ला केल्यानंतर हा निर्णय कंपनीने घेतला. 25 डिसेंबर रोजी तांबड्या समुद्रातून वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, तांबड्या समुद्रातील वाहतूक धोक्यात आल्याने, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला असलेल्या केप ऑफ गुड होपमार्गे जहाजे वळवण्यात आली आहेत.

जहाजांचा प्रवासाचा कालावधी जवळपास दुप्पट झाला असून, मालवाहतूक खर्चही वाढला आहे. आशिया आणि युरोपदरम्यान मालवाहतूक करण्यासाठी तांबडा समुद्र हा महत्त्वाचा असून, सुएझ कालव्यातून जागतिक व्यापारापैकी सुमारे 12 टक्के वाहतूक होते. सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीचा तांबडा समुद्र भूमध्य समुद्राला सुएझ कालव्याद्वारे हिंदी महासागराशी जोडतो. 1869 मध्ये सुएझ कालव्याच्या निर्मितीपूर्वी, जहाजांना युरोप आणि आशियादरम्यान प्रवास करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपच्या जवळून जावे लागे. सुएझ कालव्याने हे अंतर कमी करण्याचे महत्त्वाचे काम केले. हुथी दहशतवाद्यांनी गेल्या काही आठवड्यांत शंभरापेक्षा अधिक जहाजांवर हल्ले केले. क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन यांचा त्यासाठी वापर करण्यात आल्याने, तांबड्या समुद्रातील वाहतूक धोक्यात आली आहे. अन्य एक दिग्गज कंपनी ‘हॅपग-लॉयड’ तांबड्या समुद्रातील वाहतूक थांबवत आहे.

भारतालाही याचा थेट फटका बसणार आहे. युरोप-आशिया व्यापार त्यामुळे संकटात सापडला आहे. भारताची 33 टक्के कच्च्या तेलाची आयात सुएझ कालवा आणि तांबड्या समुद्रामार्फत केली जाते. त्याचबरोबर भारत करत असलेली 25 टक्के तेलाची निर्यात याच मार्गाने प्रवास करते. त्याशिवाय जागतिक वाहतूक करणारी अनेक जहाजे भारतीय आहेत. जगभरात 15 लाख खलाशी असून, दीड ते दोन लाख भारतीय या क्षेत्रात कार्यरत आहेत. अमेरिकी नौदलाने केलेल्या कारवाईत काही हुथी दहशतवादी मारले गेले. आता त्याचा बदला घेण्यात येईल, असे हुथीने म्हटले आहे. इस्रायलही गाझा पट्टीतील कारवाई कित्येक महिने सुरू राहील, असे म्हणत असताना, हुथी दहशतवाद्यांनी वेठीला धरलेला तांबडा समुद्र भारत तसेच जगाची काळजी वाढवणारा आहे. येमेनवर नियंत्रण असणार्‍या या दहशतवाद्यांमुळे संपूर्ण जगाचीच वाहतूक संकटात सापडली आहे. भारतातून होणारी आयात तसेच निर्यात त्यामुळे महाग होणार आहे. सुएझ कालव्याला पर्याय म्हणून केप ऑफ गुड होपचा वापर केला जातो. जगभरातील सुमारे 15 टक्के मालवाहतूक तसेच 30 टक्के कंटेनर वाहतूक सुएझ कालव्यातून होते.

2021 मध्ये एक कंटेनर सुएझ कालव्यात सहा दिवस अडकून पडला होता, तेव्हा 10 अब्ज डॉलर इतका दैनंदिन व्यापार ठप्प झाला होता. यावरून याचे महत्त्व अधोरेखित होते. म्हणूनच वाहतूक दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. केवळ किमती वाढणार हे संकट नसून, पोहोचण्यासाठी होणारा विलंबही महत्त्वाचा आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची म्हणूनच भीती व्यक्त होत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी गेले संपूर्ण वर्ष प्रमुख अर्थव्यवस्था प्रयत्नात होत्या. मात्र, आता पुन्हा महागाईचा भडका उडण्याची भीती आहे. वाहतूक करणारी जहाजे केप ऑफ गुड होपमार्गे वळविण्यात आली, तर वेळ आणि खर्च दोन्हींमध्ये वाढ होते. तांबडा समुद्र तसेच मेडिटेरियन समुद्र यांना जोडणारा पाण्याचा एक छोटासा पट्टा म्हणजेच ‘सुएझ कालवा’. हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग असून, 193 किलोमीटर लांबीच्या या मानवनिर्मित कालव्यातून दर अर्ध्या तासाला एक जहाज प्रवास करते.

आशिया ते युरोपसाठी सहा हजार सागरी मैलांची भर घालणार्‍या चक्राकार मार्गामुळे प्रवासाचा कालावधी दुपटीने वाढतो. तसेच जहाजे नौकानयनात अधिक वेळ घालवत असल्यामुळे त्यांचा टर्नअराऊंड वेळ कमी होतो. त्यामुळे अधिक जहाजे पाण्यात उतरवावी लागतात. म्हणूनच वाहतूक खर्च दुपटीने महाग होईल, असे मानले जाते. भारत येथून यांत्रिकी वस्तू, कापड, चहा यांची प्रामुख्याने निर्यात करते. कॉफी निर्यातीत युरोपचा वाटा हा 65 टक्क्यांहून अधिक आहे. वाहतूक दर, त्यासाठीचा विमा या खर्चात स्वाभाविकपणे वाढ होणार आहे. कालावधी 15 ते 20 दिवसांनी वाढणार असून, 3200 सागरी मैल वाढवणारा हा प्रवास होईल. गेल्या आठवड्यापासून 10 लाख टन गव्हाचा पुरवठा एका जागेवरच थांबला आहे, अशीही माहिती आहे.

या नव्या भूराजकीय आव्हानामुळे भारत मध्यपूर्व तसेच उत्तर आफ्रिकेची अन्न सुरक्षेची व्यवस्था पाहणारा देश म्हणून उदयास येईल, असेही मानले जाते. हुथी दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर जगभरातील माल वाहतूक कंपन्या काळजीत पडल्या आहेत. अमेरिकेने त्याविरोधात संघटित कृतीची आवश्यकता विषद केली आहे. इंग्लंड, बहरिन, कॅनडा, फ्रान्स, इटली यांच्याबरोबर अमेरिका हुथी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणार आहे. म्हणजेच इस्रायल-हमास संघर्षाची व्याप्ती तीन महिन्यांनंतर वाढताना दिसून येत असून, आता या संघर्षाच्या झळा अपेक्षेप्रमाणेच संपूर्ण जगाला बसायला सुरुवात झाली आहे. अमेरिका, इस्रायल ही मित्र राष्ट्रे यातून कसा मार्ग काढतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा जगभरात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडेल. पुरवठा साखळी विस्कळीत होईल.

Back to top button