अरबी समुद्र का तापतोय? | पुढारी

अरबी समुद्र का तापतोय?

डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हवामान बदलाचा फटका बसेल, याचे कारण अरबी समुद्राचे तापमान वेगाने वाढत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनमध्ये चक्रीवादळाची वारंवारता, तीव्रता आणि अतिवृष्टीच्या घटनांत वाढ होत आहे. समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याचाही मोठा धोका पश्चिम किनारपट्टीला आहे.

काही दिवसांपूर्वी चेन्नई शहाराला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यावर्षी नवी दिल्लीसह उत्तर भारतातील बर्‍याच भागात पुराने अक्षरशः थैमान घातले होते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई दरवर्षी मान्सूनमध्ये पुराचा सामना करते. पश्चिम किनारपट्टीवरील दुर्मीळ चक्रीवादळं आता सातत्याने घोंगावू लागली आहेत, त्यामुळे किनारपट्टी असुरक्षित बनू लागली आहे. या सगळ्या घटनांचा हवामान बदलाशी याचा काय संबंध आहे? 2050 ला खरोखर मुंबई समुद्राखाली जाईल का? अशा काही प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
हवामान बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. याचा शहरी भागात येणार्‍या पुरांवर काय परिणाम होईल, हे शास्त्रीय द़ृष्टिकोनातून लक्षात घेतले पाहिजे. मुंबईसारख्या महानगरांत दरवर्षी पूर येत असतो, ही स्थिती भविष्यात कशी असेल यावर खोलात जाऊन विचार केला पाहिजे.

अरबी समुद्र हा दिवसेंदिवस अधिक उष्ण होत आहे. त्यातून मुंबई परिसरातील हवेतील ओलावा वाढतो आहे. त्यामुळे पाऊस जास्त होईल, अतिवृष्टींच्या घटनांत वाढ होईल आणि पुराची तीव्रता वाढत जाईल. मान्सूनचा पॅटर्न बदलला असल्याचे आपण पाहत आहोत आणि त्यातून अतिवृष्टीच्या घटनांत वाढ झालेली आहे. याचा मुंबईसारख्या शहरी भागातील सांडपाणी निचर्‍यावर मोठा ताण येत असून, त्यातून अचानक येणार्‍या पुरांच्या घटनांत चिंताजनक वाढ झालेली आहे. समुद्राच्या पातळीतही वाढ होत असल्याने, मुंबईसारख्या शहरात पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होतात आणि पूरस्थिती अधिकच बिकट होते.

2050 पर्यंत मुंबई बुडालेली असेल, असे काही ठिकाणी म्हटले जाते; पण समुद्राच्या पातळीत जी वाढ होत आहे, ते लक्षात घेता, तसे होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पूर दीर्घकाळ राहतील आणि पुराचे पाणी जास्त जागा व्यापेल. मुंबईची निर्मितीच ‘पाण्या’वर झाली आहे, त्यामुळे मुंबईचा काही भाग नेहमीच समुद्राच्या पातळीच्या खाली असतो. एकीकडे समुद्राची पातळी वाढत आहे. अशा स्थितीत मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी येणे मोठ्या संकटाला आमंत्रण ठरेल. याला आपण
र्उेािेीपव ऋश्रेेवी म्हणतो. मुंबईतील बराचसा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता अशा पुरांमुळे निर्माण होईल.

त्यामुळे हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवर काय उपाययोजना केल्या जातात, यावर मुंबईचं भवितव्य अवलंबून असेल. पण भारतातील विविध शहरी भागात, मुंबईसारख्या शहरी भागात भेडसावत असलेल्या पूरस्थितीला फक्त हवामान बदल जबाबदार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. याला विविध घटक कारणीभूत ठरत आहेत. नियोजनशून्य विकास, काँक्रिटीकरण, आणि जमिनीचा वापर यामुळे नद्या गुदमरत आहेत. पूर्वी पाण्याचा नैसर्गिक निचरा व्हायचा, ती व्यवस्था नष्ट होत चालेली आहे. जल व्यवस्थेवर अतिक्रमण होत आहे. काँक्रिटीकरण आणि इतर प्रकारच्या बांधकामांमुळे पृष्ठभागातून पाणी जमिनीत झिरपत नाही. घनकचर्‍याचे नीट व्यवस्थापन केले जात नाही, त्यामुळे ड्रेनेज, इतर जलस्रोत तुंबतात आणि त्यातून सांडपाणी व्यवस्थेची वहनक्षमता घटते.

विविध सरकारी विभाग, एजन्सी यांच्यात समन्वयाच्या अभावामुळे पूरस्थितीवर मात करण्यासाठी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पूरस्थितीला तोंड कसे द्यावे याबद्दलची जागृती नागरिकांच्या पातळीवर आणि प्रशासनाच्या पातळीवर नसते, त्यामुळे पुरांमुळे होणारे नुकसान वाढते. मुंबईतील पूरस्थितीच्या मागे अशीच बरीच कारणं आहेत.

दरवर्षी आपण मान्सून येण्याची आपण वाट पाहतो आणि तात्पुरती मलमपट्टी करतो. अशा उपाययोजना पुरेशा नाहीत. आपल्याला दीर्घकालीन विचार करून धोरणांची आखणी करावी लागेल आणि वर उल्लेख केलेल्या समस्यांवर उपाय योजावे लागतील. यामध्ये विविध घटकांत परस्पर सहकार्य आवश्यक आहे. सरकारी संस्था, नागरी नियोजन करणारे तज्ज्ञ, आर्किटेक्ट, संशोधक, इंजिनिअर आणि सामाजिक संस्था यांच्या सहभागातून सर्वंकष असे धोरण बनवून शहरी पुरांवर उपाययोजना कराव्या लागतील. सार्वजनिक आणि खासगी संस्थांच्या परस्पर सहकार्यातून निधीची उभारणी करून, कल्पकतेने या समस्येवर मार्ग काढावा लागेल.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हवामान बदलाचा फटका बसेल, याचे कारण अरबी समुद्राचे तापमान वेगाने वाढत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनमध्ये चक्रीवादळाची वारंवारता, तीव्रता आणि अतिवृष्टीच्या घटनांत वाढ होत आहे. समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याचाही मोठा धोका पश्चिम किनारपट्टीला आहे. समुद्राची पातळी वाढल्याने सखल भाग पाण्याखाली जाईल आणि लाखो लोकांना याचा फटका बसेल.

अरबी समुद्र चक्रीवादळांसाठी अधिकाधिक पोषक बनत आहे, असे मी एका लेखात म्हटले होते. अरबी समुद्रात गेल्या काही दशकांत चक्रीवादळांची तीव्रता, वारंवारता आणि चक्रीवादळांचा कालावधी यात वाढ झाल्याचे विविध अभ्यासांतून दिसून आलेले आहे. आपण ज्याला ‘जागतिक तापमान वाढ’ म्हणतो, त्यातील 93 टक्के उष्णता ही समुद्रात जाते. ‘अरबी समुद्र’ ही जी व्यवस्था आहे, त्याचे तापमान वेगाने वाढत आहे. अरबी समुद्र पूर्वी शांत आणि थंड मानला गेला होता; पण या समुद्राचे तापमान आता वाढलेले आहे. सध्या अरबी समुद्राचे तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे. चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी उष्णता आणि ओलावा यांचा सातत्याने पुरवठा व्हावा लागतो. साहजिकच, अरबी समुद्र चक्रीवादळांसाठी अधिकाधिक पोषक बनत चालला आहे.

चक्रीवादळांची फक्त तीव्रता वाढली आहे असे नाही, तर या चक्रीवादळांचा कालवधी 80 टक्क्यांनी वाढलेला आहे. चक्रीवादळाचा कालावधी वाढणे म्हणजेच अधिक कालावधीसाठी किनारपट्टीवरील नागरिकांना या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

(कोल हे Indian Institute of Tropical Meteorology चे संशोधक आणि जागतिक पातळीवरील Intergovernmental Panel on Climate change  साठीचे ते प्रमुख लेखक आहेत.)

    (शब्दांकन : मोहसीन मुल्ला)

Back to top button