आत्मविश्वासाची सुवर्णभरारी | पुढारी

आत्मविश्वासाची सुवर्णभरारी

मिलिंद ढमढेरे

हात घालीन तिथं सोनं, हे नीरज चोप्राच्याबाबत नेहमीच खरे ठरले आहे. ऑलिंपिक व जागतिक स्पर्धांबरोबरच जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग असलेली डायमंड लीग मैदानी स्पर्धा, राष्ट्रकुल, आशियाई, दक्षिण आशियाई व जागतिक कनिष्ठ गट या सर्व स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. ही सुवर्ण पदकांची मालिका राखताना त्याने अनेक विक्रमांचीही नोंद केली आहे.

नीरज याने नुकत्याच बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि पुढील वर्षी होणार्‍या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील आपला प्रवेशही निश्चित केला. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदकापाठोपाठ जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच या स्पर्धेमध्ये दोन पदके जिंकणारादेखील तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी त्याने सन 2022 मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत रुपेरी कामगिरी केली होती. नीरज याच्याकडून प्रेरणा घेत भारताच्या धावपटूंनी पुरुषांच्या चार बाय चारशे मीटर्स रिले शर्यतीत मुख्य फेरी गाठून ऐतिहासिक पराक्रम केला. यादरम्यान त्यांनी आशियाई विक्रमाचीही नोंद केली. पारुल चौधरी हिने तीन हजार मीटर्स स्ट्रीपलचेस शर्यतीत अकराव्या स्थानावर झेप घेतानाच ऑलिंपिक पात्रताही पूर्ण केली. भारतीय अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रासाठी आणखी एक भूषणावह कामगिरी म्हणजे माजी ऑलिंपिकपटू आदिल सुमारीवाला यांची जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड.

हात घालीन तिथं सोनं

‘हात घालीन तिथं सोनं’ हे नीरज याच्याबाबत नेहमीच खरे ठरले आहे. त्याने ऑलिंपिक व जागतिक स्पर्धांबरोबरच जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग असलेली डायमंड लीग मैदानी स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा व जागतिक कनिष्ठ गट स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ही सुवर्ण पदकांची मालिका राखताना त्याने अनेक विक्रमांचीही नोंद केली आहे.

आत्मविश्वास कसा असावा, हे त्याने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी दाखवून दिले होते. या स्पर्धेच्या वेळी त्याने पात्रता फेरीत एकदाच भालाफेक करीत अंतिम फेरी निश्चित केली होती. अंतिम फेरीत आहे त्याने एकदाच भालाफेक करीत सुवर्णपदक निश्चित केले होते. खरं तर त्याची ही स्पर्धा सुरू असताना खराब हवामान, ट्रॅकवरून धावणारे अन्य धावपटू असे कितीतरी अडथळे त्याच्यासमोर होते; मात्र हे अडथळे आपल्या स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे, असे मानून त्याने मी सुवर्णपदक जिंकण्यासाठीच उतरलो आहे, असे मनावर बिंबवून सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळविला होता.

त्याच्या या आत्मविश्वासाचा पुनःप्रत्यय यंदाच्या जागतिक स्पर्धेतही दिसून आला. गतवर्षी त्याचे सुवर्णपदक हुकले होते. त्याच्यापुढे पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम, चेक प्रजासत्ताकचा याकूब वाल्देख, जर्मनीचा जुलियन वेबर या खेळाडूंचे मोठे आव्हान होते. त्यातच त्याला खांद्याची दुखापतही भेडसावत होती. त्यामुळेच पात्रता फेरीत मी एकदाच असा भाला फेकीन की, त्यामुळे माझा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल, असे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत त्याने 88.77 मीटर्स एवढ्या अंतरावर भाला फेकला. त्याने अन्य प्रयत्न केलेही नाहीत. अंतिम फेरीत त्याचा एकदा फाऊल झाला खरा; पण नंतर त्याने 88.77 मीटर्स एवढ्या अंतरावर भाला फेकला. त्याची हीच कामगिरी त्याला सुवर्णपदक जिंकण्यासाठी पुरेशी होती. भारताच्या किशोर कुमार जेना व डी. पी. मनू यांनी अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान घेत याच क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली.

खिलाडूवृत्तीचे दर्शन

पाकिस्तान हा भारताचा कट्टर शत्रू असला तरी मैदानावर आम्ही एकच असतो, हेच नीरज याने दाखवून दिले. स्पर्धा संपल्यानंतर भारताचा तिरंगा ध्वज उंचावताना त्याला असे लक्षात आले की, नदीम याच्याकडे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज नाही. मग त्याने आपल्या तिरंग्यामध्येच नदीम याला सामावून घेत छायाचित्रकारांना अपेक्षित असे छायाचित्र काढण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आपल्याकडे जाज्वल्य देशाभिमान आहे, याचीही झलक नीरज याने दाखवली. एक चाहती तिरंगा ध्वज घेऊन त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी आली तेव्हा त्याने नम्रपणे ध्वजावर स्वाक्षरी करणार नाही, असे सांगत तिच्या जर्सीवर स्वाक्षरी केली. त्याच्या या दोन्हीही अनन्यसाधारण वृत्तीने चाहत्यांची मने जिंकली. नीरज व नदीम या दोन्ही खेळाडूंनी गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये सर्वोच्च यश मिळवीत या क्रीडा प्रकारातील युरोपियन खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे.

ही स्पर्धा भारतासाठी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठरली, ती म्हणजे पुरुष रिले संघाने केलेली लक्षवेधक कामगिरी. राजेश रमेश, मोहम्मद अजमल, अमोल जेकब व मोहम्मद अनस यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने चार बाय चारशे मीटर्स रिले शर्यतीत दोन मिनिटे व 59.05 सेकंद ही वेळ नोंदवीत आशियाई विक्रम केला. यापूर्वी जपानच्या खेळाडूंनी गतवेळच्या जागतिक स्पर्धेत दोन मिनिटे व 59.51 सेकंद असा आशियाई विक्रम नोंदविला होता. भारतीय संघाने यंदाच्या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत अग्रस्थान मिळवणार्‍या अमेरिकेत खालोखाल स्थान घेत पदकाच्या आशा उंचावल्या होत्या. तथापि, अंतिम फेरीत त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत भारताचा तिसरा खेळाडू धावत असताना त्याला अमेरिकेच्या खेळाडूकडून धक्का देण्यात आला होता. याबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने रीतसर तक्रारही नोंदवली. मात्र भारताची ही तक्रार फेटाळून लावण्यात आली; अन्यथा भारताचे पदक निश्चित होते. एक मात्र नक्की की, भारतीय रिले संघ नजीकच्या काळात जागतिक स्तरावर पदकाचा दावेदार होऊ शकतो, ही काळ्या दगडावरची रेष होय.

भारताचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तीन हजार मीटर्स स्ट्रीपलचेस शर्यतीत त्याने गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. या शर्यतीत राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिलाच बिगर केनियन खेळाडू ठरला होता. दुर्दैवाने अविनाश याला जागतिक स्पर्धेत अपेक्षेइतकी कामगिरी करता आली नाही. त्याला अंतिम फेरी गाठण्यातही अपयश आले. एक मात्र नक्की की, या स्पर्धेतील अनुभव त्याला आगामी असे क्रीडा स्पर्धांसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे.

या अनुभवाच्या जोरावर त्याने आशियाई स्पर्धांमध्ये सोनेरी कामगिरी करावी, हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. याच क्रीडा प्रकारात पारुल चौधरी हिने अंतिम फेरीत मिळवलेले अकरावे स्थानदेखील तिच्याकरिता आणि पर्यायाने भारतासाठी ही अभिमानास्पदच आहे कारण तिने नोंदवलेली नऊ मिनिटे 15.31 सेकंद ही वेळ म्हणजे भारताचा राष्ट्रीय विक्रम आहेच; पण त्याचबरोबर तिने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांसाठी ही पात्रता निश्चित केली. मेरठजवळील एका खेडेगावात जन्मलेल्या या खेळाडूने अतिशय संघर्ष करीत या क्रीडा प्रकारात आतापर्यंत दिमाखदार कामगिरी केली आहे. जागतिक स्पर्धेपूर्वी झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने तीन हजार मीटर्समध्ये सुवर्णपदक, तर पाच हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक अशी दुहेरी कामगिरी केली होती. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

नीरज याच्या कामगिरीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीत भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंनी देशाचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पूर्वीच्या धावपटूंच्या तुलनेत आताच्या खेळाडूंना भरपूर सुविधा आणि सवलती मिळत आहेत. त्यांना नोकर्‍यांद्वारे अर्थार्जनाचीही हमी मिळाली आहे. त्यांनी या सर्व गोष्टींचा फायदा घेत आशियाई क्रीडा स्पर्धा आणि पुढील वर्षी होणार्‍या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांवर नाव कसे कोरता येईल, याचा विचार करीत नीरज याच्या पावलावर पाऊल ठेवीत सर्वोच्च यश मिळवण्याची आवश्यकता आहे.

अ‍ॅथलेटिक्स महासंघावरही मोहर

केवळ भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावर आपल्या कुशल संघटन कौशल्याचा परिपाठ घडवणारे आदिल सुमारीवाला यांची जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्षपदी झालेली निवड ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. माजी ऑलिंपिकपटू आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकणार्‍या या ज्येष्ठ खेळाडूंनी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भारताच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. खेळाडूंच्या गरजा आणि अडचणी समजावून घेत त्यांनी त्यानुसार ठोस पावले उचलली, त्याची पावती म्हणजे नीरज याने टोकियो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक. सुमारीवाला यांची जागतिक महासंघावर निवड झाली आहे. त्याचा फायदा भारतीय अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रासाठी निश्चितच होणार आहे.

Back to top button