क्रीडा : किमयागार युवा टेनिसपटू | पुढारी

क्रीडा : किमयागार युवा टेनिसपटू

मिलिंद ढमढेरे

इच्छाशक्तीला कष्टप्रद प्रयत्न आणि आत्मविश्वासाची जोड दिली तर कठीण आव्हान देखील पार करता येते हे सुमित नागल आणि कारमान कौर थाडी यांनी दाखवून दिले. सुमित याने युरोपमध्ये तर थाडी हिने अमेरिकेत ऐतिहासिक विजेतेपदांची नोंद करीत भारतीय टेनिसला अनोखी झळाळी दिली आहे. लिएंडर पेस, सानिया मिर्झा यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता आपल्याकडे आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे.

सुमित याने नुकत्याच फिनलंडमध्ये झालेल्या टॅम्पेरे चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले आणि युरोपमध्ये एकेरीच्या दोन एटीपी स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळविला. थाडी हिने इव्हानस्विली चषक स्पर्धा जिंकली. अमेरिकेत यापूर्वी सानिया मिर्झा हिने व्यावसायिक टेनिस पद्धतीच्या एकेरीत विजेतेपद पटकावले होते. थाडी हिने इव्हानस्विली चषक जिंकताना आणखी एक पराक्रम केला आहे. या विजेतेपदामुळे तिला अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.

विजय व आनंद अमृतराज बंधू, प्रेमजीत लाल, शशी मेनन, रामनाथन कृष्णन, रमेश कृष्णन, निरुपमा मंकड इत्यादी श्रेष्ठ खेळाडूंचा वारसा लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा यांनी तितक्याच समृद्धतेने पुढे नेला आहे. पेस याने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकावरही नाव कोरले. या खेळाडूंचा सातत्यपूर्ण कामगिरीचा वारसा पुढे कोण चालवणार हा नेहमीच प्रश्न असायचा. तथापि गेल्या तीन-चार वर्षांमध्ये भारताचे अनेक युवा खेळाडू एटीपी व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार यश मिळवू लागले आहेत. या खेळाडूंमध्ये थाडी व नागल यांनी मिळवलेल्या अतुलनीय कामगिरीचाही मोठा वाटा आहे. योगायोग म्हणजे हे दोन्ही खेळाडू 25 वर्षांचे आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आठव्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली आणि त्यांना भूपती यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे.

हरियाणात जन्मलेल्या सुमित याला लहानपणीच टेनिसची आवड निर्माण झाली. काही महिन्यांच्या सरावाच्या जोरावरच त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये चमक दाखवण्यास सुरुवात केली. भूपती याच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि सुमितला दहाव्या वर्षीच भूपतीच्या अकादमीत प्रवेश मिळाला. मूर्तिकार मातीला वेगवेगळे आकर्षक आकार देत असतो, त्याप्रमाणेच भूपतीच्या अकादमीत सुमित याच्या टेनिस कौशल्यास खर्‍या अर्थाने दिशा मिळाली. त्यानंतर त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश मिळविले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

विम्बल्डन स्पर्धेच्या ग्रास कोर्टवर खेळण्याची संधी मिळणे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. सुमित याने इसवी सन 2015 मध्ये हे स्वप्न साकारताना कनिष्ठ गटाच्या दुहेरीत अजिंक्यपदही पटकावले. व्हिएतनामच्या ली होंग नाम याच्या साथीत त्याने मुलांच्या दुहेरीत अनेक मानांकित जोड्यांवर मात करीत हे यश मिळविले. विम्बल्डन स्पर्धा म्हणजे युवा खेळाडूंना नवीन नवीन शिकण्याची, ज्येष्ठ खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची, अनुभव समृद्ध करण्याची संधी असते. सुमित त्याने या संधीचा लाभ घेतला नसता तर नवलच. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. कारकिर्दीत एटीपी चॅलेंज स्पर्धांच्या मालिकेत चार वेळा विजेतेपद, एकदा उपविजेतेपद तर आयटीएफ फ्युचर्स स्पर्धांच्या मालिकेत नऊ वेळा अजिंक्यपद तर एकदा उपविजेतेपद असे घवघवीत यश त्याने मिळवले आहे. आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण भरारी केली होती. सांघिक खेळाच्या दृष्टीने जगात अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणार्‍या डेव्हिस चषक स्पर्धांसाठी तो भारतीय संघाचा मोठा आधारस्तंभ मानला जातो.

रॉजर फेडरर हा जगातील श्रेष्ठ टेनिसपटू मानला जातो. अनेक युवा क्रीडापटूंसाठी तो आदर्श खेळाडू आहे. त्याचा खेळ पाहण्याची संधी मिळणे हे देखील कठीण असते. मात्र सुमित याला ही हुकमी संधी मिळाली ती देखील त्याच्याबरोबर अमेरिकन खुल्या स्पर्धेत सामना खेळण्याचीच. सन 2019 मध्ये झालेल्या या सामन्याने अनेक टेनिस पंडितांचे लक्ष वेधले होते, त्याला कारणही तसेच होते. सुमित याने या सामन्यात पहिला सेट जिंकताना आपणही फेडरर याला चिवट लढत देऊ शकतो याचा प्रत्यय घडवला होता. हा सामना फेडरर याने जिंकला खरा. परंतु प्रेक्षकांनी सामना संपल्यानंतर सुमित याला उभे राहून अभिवादन दिले होते ही खरोखरीच भारतीयांसाठी भाग्याचीच गोष्ट होती. सुमित याच्या खेळाचे राफेल नदाल याने देखील भरभरून कौतुक केले होते. किंबहुना अनेक टेनिस समीक्षक सुमित याच्या खेळाची नदाल याच्या खेळाशी तुलना करतात.

खेळाडू आणि दुखापती हे नेहमीचे समीकरण असते. सुमित याला कोरोनाच्या काळात अनेक वेळा आजारास सामोरे जावे लागले होते. गतवर्षी दुखापतींमुळे अनेक महिने स्पर्धात्मक टेनिसपासून त्याला दूर राहावे लागले होते. या काळामध्ये खेळाडूच्या शारीरिक तंदुरुस्तीप्रमाणेच मानसिक तंदुरुस्तीचीही कसोटीच ठरते. सुमित याने या सर्व प्रसंगांना अतिशय धैर्याने तोंड दिले आणि एप्रिल महिन्यात रोम येथे झालेली एटीपी स्पर्धा जिंकून पुन्हा टेनिस क्षेत्रात शानदार पुनरागमन केले.

सुमित याच्याप्रमाणेच थाडी हीदेखील अतिशय संयमी, महत्त्वाकांक्षी, जिगरबाज खेळाडू मानली जाते. आयटीएफ स्पर्धांच्या मालिकेत चार वेळा अजिंक्यपद तर आठ वेळा उपविजेतेपद अशी भरीव कामगिरी तिने केली आहे. दुहेरीच्या सामन्यांमध्ये सहभागी झाले की अनुभव अधिक चांगला मिळतो असे मानणार्‍या खेळाडूंमध्ये थाडी हिचा समावेश आहे. दुहेरीमध्ये खेळल्यामुळे भरपूर शिकावयास मिळते, वेगवेगळ्या शैलीचा अभ्यास करता येतो, समन्वय साधता येतो असे ती नेहमीच मानते. त्यामुळेच की काय, तिने आत्तापर्यंत आयटीएफ स्पर्धांच्या मालिकेत दुहेरीत चार वेळा विजेतेपद आणि तेवढ्याच वेळा उपविजेतेपदावर मोहोर नोंदवली आहे.

फेडरर, मारिया शारापोवा, सेरेना विल्यम्स यांना आदर्श मानणारी थाडी हिने आशियाई क्रीडा स्पर्धा, फेडरेशन चषक स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पराभवाच्या छायेतून सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता तिच्याकडे आहे याचा प्रत्यय तिने अनेक वेळा दाखवला आहे. कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक अनुभवी खेळाडूंवर सनसनाटी विजय नोंदवण्याची किमया तिने केली आहे. हार्ड कोर्ट हे जरी तिचे आवडीचे आणि हुकूमत गाजवण्याचे मैदान असले तरीही अन्य मैदानांवरही तिने प्रभावी कामगिरी केली आहे. सहा फूट उंच असल्यामुळे त्याचा फायदा घेत वेगवान, खोलवर आणि भेदक सर्व्हिस करण्याबाबत ती नेहमीच अग्रेसर असते. फोर हँडचे ताकदवान आणि क्रॉसकोर्ट फटके, व्हॉलीज अशी विविधता तिच्या खेळात आहे. तसेच दोन्ही हाताने एकदम बॅक हँड फटके मारण्याबाबतही ती अव्वल दर्जाची खेळाडू मानली जाते. अशा वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यामुळेच ती भारताची मोठी आशास्थान आहे.

अखिल भारतीय टेनिस संघटनेने गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये आपल्या देशातील खेळाडूंना घरच्या मैदानांवरच अधिकाधिक आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धा खेळण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे खेळाडूंचा परदेशीतील स्पर्धांसाठी जाण्याकरिता होणारा खर्च आणि वेळ देखील वाचू लागला आहे. आज जागतिक स्तरावर सुमित, कारमान, अंकिता रैना, ऋतुजा भोसले, प्रार्थना ठोंबरे, मानस धामणे, साकेत मायनेनी, रामकुमार रामनाथन असे अनेक खेळाडू चमक दाखवू लागले आहेत. या खेळाडूंनी अनुभवाचा फायदा घेत आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकून देशाचा नावलौकिक उंचावावा हीच अपेक्षा आहे.

Back to top button