गुन्हेगारी : उत्तर प्रदेशातील काळे साम्राज्य!

गुन्हेगारी : उत्तर प्रदेशातील काळे साम्राज्य!
Published on
Updated on

शेकडो माफिया एकट्या उत्तर प्रदेशात आहेत आणि ते राजकारण्यांच्या चारापाण्यावर पोसले गेले आहेत. एवढेच नव्हे, तर यातील अनेक जण कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या वळचणीला जाऊन 'सन्माननीय'ही बनले आहेत. गुन्हेगारी जगताचा हा काळा इतिहास पाहता, संपूर्ण देशावर आणि समाजावर पसरलेली ही दहशत संपवण्यासाठी काय करायला हवे, हा खरा प्रश्न आहे.

ग्रीक पौराणिक कथांमध्ये 'हायड्रा'चे वर्णन सर्वात भयानक राक्षस म्हणून केले जाते. हायड्रा हा अनेक डोके असलेला साप होता. त्याच्याकडे आपले डोके आणि प्राणघातक विष पुन्हा निर्माण करण्याची अद्भुत शक्ती होती. त्याचे एक डोके कापले, तर दोन नवीन डोकी उगवत असत. विविध प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये गुंतलेले माफिया आणि विविध प्रकारचे विषाणूदेखील अशा हायड्रासारखे असतात. एक डोके कापले, तर दोन नवीन वाढतात. हे जगभर होत आले आहे. पण ग्रीक पौराणिक कथेत एक नायक देखील आहे, हेरक्लस. रोमन पौराणिक कथांमध्ये त्याला 'हरक्यूलिस' म्हटले जाते. या नायकाने हायड्राचा पराभव केला. माफिया आणि गँगस्टर्स आणि व्हायरसच्या बाबतीतही असेच झाले आहे.

मेक्सिको आणि कोलंबियाचे ड्रग कार्टेल, अमेरिकेचे सिसिलियन माफिया, अल साल्वाडोरच्या भयानक टोळ्या, फिलीपिन्सचे ड्रग माफिया, ब्राझीलच्या टोळ्या… हे सर्व हायड्रा आहेत. पोलिस, लष्कर, न्यायालय सारेच जण त्यांच्यापुढे हतबल झाले. परंतु सरकारांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांच्यापासून मुक्ती मिळवता आली. अर्थात, हे सर्वत्र घडले नाही. अनेक देशांमध्ये आणि समाजात गुन्हेगारी टोळ्या आजही हायड्रा बनून उपद्रव करत आहेत.

भारताचेच उदाहरण पाहा. अगदी आताचे ताजे प्रकरण म्हणजे अतीक अहमदचे. त्याने चांदबाबाच्या रूपातील सापाला मारले आणि स्वतः त्याच सापाचे नवे शिर बनला. पण नंतर त्याच्याच टोळीतील इतर सदस्यांच्या रूपाने हायड्राची नवी डोकी उगवली. अतीकच्या मृत्यूनंतर यापैकी कोणी ना कोणी निश्चितपणाने डोके वर काढण्याच्या प्रयत्नात असेल, यात शंका नाही. एका अहवालानुसार, अतीक अहमद आणि अशरफची हत्या करणार्‍या तरुणांनी काहीतरी मोठे बनण्याच्या इच्छेनेच हे कृत्य केले, असे म्हटले आहे. मुख्तार अन्सारी, ब्रिजेश सिंग, धनंजय सिंग, अभय सिंग, विजय मिश्रा, हाजी याकूब, हाजी इक्बाल, बदन सिंग बड्डो, संजीव माहेश्वरी, डीपी यादव, रामू द्विवेदी, बबलू श्रीवास्तव… असे शेकडो माफिया एकट्या उत्तर प्रदेशात आहेत आणि ते राजकारणातील चारापाण्यावर पोसले गेलेले आहेत. एवढेच नव्हे, तर यातील अनेक जण कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या वळचणीला जाऊन 'सन्माननीय'ही बनल्याचे दिसून आले आहे.
एके काळी श्रीप्रकाश शुक्ला नावाचा गुन्हेगार उत्तर प्रदेशामध्ये चांगलाच चर्चेत आला होता. त्याला इतरांची हत्या करून गुन्हेगारी जगताचा बादशहा बनायचे होते. केवळ आपली दहशत वाढवण्यासाठी त्याने अनेक धाडसी खून केले; परंतु अखेरीस त्याचा खात्मा करण्यात आला. तो गेला असला तरी त्याच्या जागी अनेक नवे श्रीप्रकाश तयार झाले. याच साखळीमध्ये हरिशंकर तिवारी आणि वीरेंद्र शाही यांचीही नावे घेता येतील.

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम हा मुंबईतील माफिया होता. तोदेखील अशाच 'हायड्रा सिंड्रोम'चा परिणाम होता. त्याआधी हाजी मस्तान, करीम लाला यांसारखे स्मगलर आणि गुन्हेगार अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होते. त्यांचे साम्राज्य संपवून दाऊदने डी गँगची स्थापना केली आणि अंडरवर्ल्डचा डॉन बनला.

एक केस स्टडी म्हणून दाऊद किंवा मुंबईतील अंडरवर्ल्डकडे पाहिल्यास, आपल्या लक्षात येईल की, हायड्राच्या रूपाने गुन्हेगारांचे नवे हस्तक म्हणून काही पोलिस अधिकारीही उदय पावले. उदाहरणार्थ, जेव्हा मुंबईतील अंडरवर्ल्डच्या टोळ्यांनी अतिरेक केला तेव्हा शेकडो गुन्हेगारांना मुंबई पोलिसांच्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिसांनी संपवले. पण यातील काही एन्काऊंटर स्पेशालिस्ट स्वतःच या माफियांचे 'गणवेशधारी प्रमुख' बनले. एके काळी ते हिरो होते; परंतु नंतर ते खलनायक बनले.

गुन्हेगारी जगताचा हा काळा इतिहास पाहता, संपूर्ण देशावर आणि समाजावर पसरलेली ही दहशत संपवण्यासाठी काय करायला हवे, हा खरा प्रश्न आहे. विशेषतः राज्यकर्त्या वगार्र्ने यासाठी काय करायला हवे? की त्यांनी फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतर्ते यांच्यासारखे बनले पाहिजे? रॉड्रिगो यांनी आपल्या देशातून ड्रग्ज, भ्रष्टाचार आणि माफिया नष्ट करण्यासाठी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे धोरण स्वीकारले होते. या धोरणांतर्गत तेथील पोलिसांनी आणि सुरक्षारक्षकांनी जवळपास 30-40 हजार लोकांना गोळ्या घालून ठार केले. अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी आपल्या देशावरील टोळ्या आणि गुंडांचा कलंक दूर करण्यासाठी एक लाख गुंडांना तुरुंगात टाकले. त्यांना ठेवण्यासाठी देशात बांधण्यात आलेल्या मेगा जेलची क्षमता 40 हजार कैद्यांची आहे.

अमेरिकेचेही उदाहरण यानिमित्ताने पाहता येईल. इटलीच्या सिसिली प्रदेशातील माफिया टोळ्यांनी अमेरिकेच्या जरायमावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते. खून, दरोडे, लूटमार, बलात्कार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांचा माफियांनी अक्षरशः धडाका लावला होता. यापलीकडे जाऊन या माफियांनी पोलिस आणि न्यायाधीशांनाही विकत घेतले होते. पण 60 आणि 70 च्या दशकात या माफियांविरुद्ध सुरू केलेल्या राजकीय मोहिमेमुळे बडे माफिया उद्ध्वस्त झाले. त्यांना 100 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली आणि हळूहळू करत त्यांचे साम्राज्य संपुष्टात आले.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे जोपर्यंत माणूस अस्तित्वात आहे तोपर्यंत गुन्हे आणि गुन्हेगार संपणार नाहीत. कितीही कटू असली तरी ही वस्तुस्थिती आहे. हायड्राच्या रूपातील संघटित गुन्हेगारी आणि माफिया राक्षसांचा नायनाट केला जाऊ शकतो. पण त्यामागे राजकीय प्रामाणिकपणा आणि तळमळ असावी लागते. आपण माफिया किंवा गुन्हेगारांना निवडणूक लढविण्यासाठी परवानगी देतो, राजाश्रय देतो, राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर त्यांना सन्मानाने बसण्याची परवानगी देतो आणि त्याचवेळी दुसरीकडे गुन्हेगारी संपवण्याच्या गोष्टी करतो, हा विरोधाभास आहे. अशा दुहेरी भूमिकेमुळे गुन्हेगारी साम्राज्यांवर नियंत्रण मिळवणे किंवा त्यांचा बीमोड करणे कदापि शक्य नाही. पोलिस आणि राजकीय पाठिंब्याशिवाय गुन्हेगारी विश्व फोफावू शकत नाही, हे वास्तव आहे.

अतीक, मुख्तार, आनंद मोहन, अनंत सिंग, शहाबुद्दीन, सूरजभान सिंग, पप्पू यादव, रमाकांत यादव, उमाकांत यादव, गुड्डू पंडित, त्रिभुवन सिंग यांना सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. ते माफिया आहेत हे सर्वांनाच माहीत होते; परंतु त्यांच्या या माफियापणाचा आपल्याला फायदा होईल,या उद्देशाने या गुंडांना राजाश्रय मिळाला. दाऊद, अरुण गवळी, भाई ठाकूर, हाजी मस्तान यांच्यापासून बिहार आणि उत्तर प्रदेशातील गुंडांना, बाहुबलींना राजकीय खतपाणी भरपूर मिळाले आहे. आजही ते मिळत आहे. एकदा का राजकीय पाठबळ मिळाले की, पोलिस आणि प्रशासन आपोआपच त्यांच्याशी हातमिळवणी करतात. अतीकच्या प्रकरणात काय झाले? प्रयागराजचे अनेक पोलिस अधिकारी अतीकच्या पॅरोलवर असल्याचे दिसून आले. त्यांची हातमिळवणी ही आजची नव्हती. या पोलिसांनी, अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनीच अतीक आणि विकास दुबे यांना मोठे केले. त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याची हिंमत या अधिकार्‍यांत होती का? या गुंडांनी अनेक बेकायदा अतिक्रमणे केली, बांधकामे उभी केली कारण या हायड्रांना पोसण्यात संपूर्ण यंत्रणा गुंतलेली होती.

ग्रीक पौराणिक कथांमधील हायड्रा एका तलावात राहत होता. त्याला अनेक डोकी होती. त्याचा श्वास, वास आणि रक्तदेखील अत्यंत विषारी होते. टायफस आणि एकिडना हे प्राणी त्याचे माता-पिता होते आणि त्याच्या भावंडांमध्ये सेर्बरस आणि चिमेरासारखे इतर बहुशिर असणारे प्राणी समाविष्ट होते. ते सर्व भयंकर राक्षस होते आणि त्या सर्वांनी हायड्राला पोषण दिले. अशा हायड्रांच्या ठिकाणी आपण कोणत्याही माफियाला ठेवा आणि त्याच्या माता-पित्यांच्या जागी आपल्याकडे पारदर्शक यंत्रणा ठेवण्याची जबाबदारी असणार्‍यांना ठेवा. तुमच्यासमोर चित्र आपोआप स्पष्ट होईल. दुर्दैवाची बाब अशी की, चित्र स्पष्ट होऊनही काहीही होणार नाही म्हणूनच हे चित्र नष्ट व्हायला हवे. योगी आदित्यनाथ यांनी सुरुवात केली आहे. ही मोहीम अशीच चालू ठेवावी, असे सोशल मीडिया, माध्यमे आणि जनतेतून बाहेर पडणारे संदेश स्पष्टपणे सांगत आहेत. या सफाई मोहिमेने योगींना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. देशातील इतर नेत्यांसाठी हा संदेश आणि धडा आहे. कोण किती आणि कसा धडा घेतो हे पाहूया. (लेखक आऊटलूकचे उत्तर प्रदेशातील माजी ब्यूरोचीफ आहेत.)

अतीकचे कारनामे

उत्तर प्रदेशातील गुंड आणि माजी खासदार अतीक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. अतीकने कुटुंबीयांच्या साथीने स्थापन केलेल्या गुन्हेगारी साम्राज्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अतीकचे दोन मुलगे तुरुंगात आणि इतर दोन अल्पवयीन मुले बालगृहात आहेत. अतीकची पत्नी आणि इतर अनेक कुटुंबीय फरार आहेत. गेल्या तीन दशकांमध्ये अतीकने सुमारे 1200 कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीचे साम्राज्य उभे केले होते. अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काऊंटरपूर्वी 'ईडी'ने अतीक आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर 'ईडी'ला 15 ठिकाणांहून 100 हून अधिक बेकायदेशीर आणि बेनामी मालमत्तांची कागदपत्रे मिळाली होती. यादरम्यान त्याने लखनौ आणि प्रयागराजमधील श्रीमंत भागात अनेक मालमत्ता खरेदी केल्याचेही समोर आले आहे. या मालमत्ता अतीकच्या किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत.

1989 मध्ये अतीकने अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि निवडूनही आला. यानंतर तो समाजवादी पक्षात आणि नंतर अपना दलात गेला. तब्बल पाच वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेल्या अतीक अहमदवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी यांसारखे 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 2012 मध्ये निवडणुकीत अतीक अहमद यांचा राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल यांच्याकडून पराभव झाला होता. अतीक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडात अतीकच्या पत्नीचे नाव आहे. 24 फेब्रुवारीला राजू पाल हत्याकांडाचा साक्षीदार उमेश पाल याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

योगेश मिश्र,
ज्येष्ठ पत्रकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news