आव्हान गारपिटीचे | पुढारी

आव्हान गारपिटीचे

मैलोगणती क्षेत्र गारपिटीच्या कचाट्यात सापडणे, अत्यंत तीव्रतेने पाऊस पडणे, या घटना दुर्मीळ स्वरूपाच्या आणि पूर्वी कधीही न दिसून आलेल्या आहेत. हवामानबदलाचे द़ृश्य परिणाम म्हणून याकडे पाहतानाच त्यापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून व्यापक विचार होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात गेल्या 8-15 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे कृषी क्षेत्राला खूप मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक काही मिनिटांमध्ये गारपिटीमुळे मातीमोल झालेले पाहून शेतकर्‍याची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही. अशाप्रकारची गारपीट किंवा इतक्या सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस हा पूर्वी कधी झालेला नाही. आताच्या पावसाचे कारण हे पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) हे आहे.

यामध्ये उत्तरेकडून वारे आपल्याकडे वाहत येतात आणि येताना ते बाष्पही घेऊन येतात आणि त्यामुळे हा पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी ‘एल निनो’चा प्रभाव दिसून येणार असल्याचे भाकीत हवामान संस्थांकडून वर्तवण्यात येत आहे. ढोबळमानाने सांगायचे झाल्यास, हिंदी महासागरावरील बाष्प पॅसिफिक महासागराकडे ओढले जाण्याची प्रक्रिया ‘एल निनो’च्या वर्षांमध्ये घडताना दिसून येते. ‘एल निनो’ सक्रिय नसेल किंवा ‘ला निना’ स्थिती असेल, तर अगदी सहजतेने प्रशांत महासागरावरील बाष्प भारतीय उपखंडाकडे येते.

संबंधित बातम्या

यावर्षी गुजरात-राजस्थानमध्ये तयार झालेले वातावरण हे विस्तृत प्रमाणावर पूर्वमान्सून पाऊस पडणार याचे संकेत देणारे होते. त्यानुसार हवामान विभागाकडूनही तसे इशारादर्शक अंदाज दिले गेले; परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर गारपीट होणे हा प्रकार असामान्यच म्हणावा लागेल. तसेच मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या अवकाळीने राज्यातील 14 जिल्ह्यांना तडाखा दिला असून, 40 ते 45 हजार हेेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च ते 9 एप्रिल या काळात देशात 28 टक्के पावसाची नोंद झाली असून, यामध्ये सर्वाधिक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाला आहे. हे प्रमाण 80 टक्के इतके आहे. या पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, मका, फळबागा, भाजीपाला आदी सर्व पिकांची मोठी हानी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या आंब्याच्या हंगामालाही याचा फटका बसला आहे. सध्या झालेल्या फळधारणेपैकी 75 टक्के हापूस आंबा गळून पडत आहे.

अवकाळी आणि गारपिटीच्या वाढत्या घटनांपासून बचावासाठी ठोस यंत्रणा उभी करणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. साधारणतः, हवामान बदलांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी शेडनेट उभारण्यात येतात. परंतु, 2013 साली वैजापूर गावातील पिंपळगाव येथे इतकी भयानक गारपीट झाली की, श्रीरामपूर-वैजापूर रस्ता बर्फवृष्टी झाल्यासारखा पांढरा शुभ्र झाला होता. या गारपिटीने शेडिंग नेट पूर्णपणे फाटून गेल्या. यंदाही तशीच स्थिती अनेक ठिकाणी दिसून आली आहे. नाशिक जिल्ह्यात दातेगाव परिसरात मी गेलो असता तेथे सुपारीएवढ्या गारा पडताना मी पाहिल्या. पश्चिमी विक्षोभामुळे एकत्रित झालेल्या बाष्पाला गार वारे लागल्यानंतर हे बाष्प अक्षरशः गोठते आणि जमिनीवरील दाब कमी झाल्यामुळे त्या गारांच्या स्वरूपात फार वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतात. त्यांची तीव्रता आणि घनता जास्त असल्यामुळे झाडांचा पाला गळून जाणे, पिकांची प्रचंड हानी होणे, फळे गळून पडणे असे प्रकार दिसतात. दातेगावमध्ये झालेल्या गारपिटीनंतर कांदे अक्षरशः एखाद्या ट्रकखाली चिरडून जावेत तशी स्थिती झाली होती आणि सबंध गावामध्ये कांद्याचा वास सुटला होता.

ही सर्व परिस्थिती जागतिक तापमानवाढीच्या आणि त्यामुळे होणार्‍या हवामानबदलांचा परिपाक आहे. या बदलांचे अनेक फटके शेती क्षेत्राला जगभरात बसत आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी किंवा या संकटांचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक पातळीवर काही प्रयोगही सुरू आहेत; पण ते वेगळ्या स्वरूपाचे आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यास या तापमानाच्या प्रभावाला अनुकूल शेती करता येईल का, याद़ृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत दक्षिण भारतामध्ये एक प्रयोग सुरू असून, त्यामध्ये प्रामुख्याने गव्हाबाबत संशोधन सुरू आहे. त्यानुसार पृथ्वीवरील तापमान कमालीचे वाढले आणि गहू पिकाला फटका बसला, तर गव्हाच्या पिठासाठी कंदांचा वापर करता येईल का, याद़ृष्टीने विचार आणि संशोधन सुरू आहे. कारण, गहू हे आपल्या एकूण कृषी उत्पादनामधील महत्त्वाचे पीक आहे. अर्थात, अशा प्रयोगांचे,

संशोधनाचे प्रमाण हे संकटाच्या व्यापकतेच्या, तीव्रतेच्या तुलनेने खूप कमी आहे. त्यामुळे आजघडीला तरी या समस्येवर मात करणारी फार सक्षम यंत्रणा आपल्याकडे नाही, हे वास्तव आहे.

असे असले तरी वारंवार येणार्‍या या आपत्ती खरोखरीच विचार करायला लावणार्‍या असून, त्यांची चिकित्सा आवश्यक बनली आहे. कारण, गारपीट एखाद्या गावात, कोपर्‍यात होणे समजू शकतो; पण मैलोगणती क्षेत्र गारपिटीच्या कचाट्यात सापडणे, अत्यंत तीव—तेने पाऊस पडणे, या घटना दुर्मीळ स्वरूपाच्या आणि यापूर्वी कधी न दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची गरज अनिवार्य आहे. या सर्व परिस्थितीत पीक पद्धतीचाही फेरविचार करावा लागणार आहे. तसेच शेतकर्‍यांनी भांडवली गुंतवणूक किती करावी, याबाबतही विचार करणे आवश्यक आहे.

पीक विमा हे यावरचे उत्तर असू शकत नाही. माणसाचा विमा उतरवला जातो; कारण तो लगेच न मरण्याची खात्री बर्‍याच अंशी असते. त्यामुळे थोडी जोखीम पत्करून त्याचा विमा काढला जातो. तशाप्रकारे शेतीच्या बाबतीत टिकाऊपणाची खात्री देता येईल, अशी पीक पद्धत ठेवल्यास त्याचा विमा उतरवणे शक्य होईल. तसेच अशाप्रकारचा पाऊस पडून नुकसान झाल्यास त्याबाबत विम्याचे निकष काय असावेत, हेही आता नव्याने ठरवावे लागणार आहे. कारण, इतरवेळी होणारे नुकसान आणि गारपिटीने होणारे नुकसान, यामध्ये मूलभूत फरक आहे. एखाद्या शत्रूचा हल्ला झाल्यावर ज्याप्रकारे संपूर्ण लोकवस्ती उद्ध्वस्त केली जाते तशाप्रकारे गारपीट हा निसर्गाचा शेतीवरील कोप आहे. गारपिटीनंतर अक्षरशः त्या भागातील शेतीमध्ये काहीही शिल्लक राहत नाही. अशावेळी आपल्या विम्याबाबतच्या साचेबद्ध पद्धती बदलाव्या लागतील.

या घटनांवरून आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे हवामानबदलांबाबतचे आपले ज्ञान अद्यापही तोकडे आणि अपुरे आहे. या बदलांचे आकलन आपल्याला अजूनही झालेले नाहीये, ही गोष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे याबाबत वैज्ञानिकांचीही जबाबदारी मोठी आहे. येणार्‍या काळात अशाप्रकारचे संकट कधीही येऊ शकते. हे लक्षात घेता आपल्या आधीच्या अनुभवावरून अशी परिस्थिती कधी ओढावू शकते, त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा आराखडा तयार करता येऊ शकेल आणि शेतकर्‍यांसोबत त्याविषयी चर्चा करून उपाययोजना करता येऊ शकतील.

– उदय देवळाणकर, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ

Back to top button