आंतरराष्ट्रीय : चिंता वाढवणारी ‘हॅट्ट्रिक’

शी जिनपिंग यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसर्यांदा निवड झाली आहे. यामुळे जिनपिंग हे चिनी साम्यवादी पक्षाचे संस्थापक माओ त्से सुंग यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने झपाटलेला हा हुकूमशहा पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनणे ही बाब जगाची चिंता वाढवणारी आहे.
एकविसाव्या शतकातील हुकूमशहा म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो, अशा शी जिनपिंग यांची चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसर्यांदा निवड झाली असून नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. वास्तविक पाहता जिनपिंग यांच्या निवडीबाबतची खात्री जागतिक समुदायाला आधीपासूनच होती. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये पार पडलेल्या चीनमधील साम्यवादी पक्षाच्या सर्वांत मोठ्या राजकीय सोहळ्याला संबोधताना राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी केलेले भाषण हे एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखे होते. या भाषणातून त्यांनी जगाला एक संदेशवजा इशारा दिला होता. त्यानुसार, चीनच्या गाभ्याच्या विषयांवरून मागे फिरण्याचा त्यांचा कोणताही इरादा नाही हे स्पष्ट करण्यात आले होते. यामध्ये शून्य कोव्हिड धोरणापासून तैवान, लाचखोरीविरोधी अभियान आणि चीन प्रभुत्ववादी धर्म यांसारख्या त्यांच्या प्रमुख अजेंड्यांचा समावेश होता.
तिसर्यांदा अध्यक्ष बनल्यामुळे जिनपिंग हे चिनी साम्यवादी पक्षाचे संस्थापक माओ त्से सुंग यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. चीनच्या उज्ज्वल भविष्याविषयीच्या त्यांच्या संकल्पना स्पष्ट असून ते कोणत्याही परिस्थितीत निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने चीनला घेऊन जाणार आहेत. चीनला नव्या युगामध्ये घेऊन जाण्याचे सामर्थ्य केवळ आपल्यातच आहे, असे त्यांच्या भूमिकेतून स्पष्टपणाने अभिप्रेत होते. जेव्हा एखादा नेता आपली शक्ती वाढवत असतो, देशासाठी स्वतःची अपरिहार्यता दाखवत असतो तेव्हा जागतिक राजकारणात आपला कसा वरचष्मा आहे हे त्या देशातील नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी असते. हे लक्षात घेता जिनपिंग यांच्याकडून येणार्या काळात तैवान, अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशांबाबत पूर्वनिर्धारित रणनीतीनुसार आक्रमकता दाखवली जाईल, हे स्पष्ट होते.
वाढत्या शक्तीचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणात दिसणे हे तसे स्वाभाविकच म्हणायला हवे. आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळात जिनपिंग यांची नजर आपल्या उद्दिष्टपूर्ततेवर असणार आहे. यामध्ये चीनचा भव्य कायापालट करण्यासारख्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा समावेश असून त्यांची पूर्तता करून जिनपिंग हे आपली एकाधिकारशाही अधिक भक्कम करताना दिसतील. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वासाठी खास करून जिनपिंग यांच्यासाठी तैवानइतका अन्य कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाहीये. साम्यवादी पक्षाच्या परिषदेतील भाषणातही चीनचे एकीकरण आणि चीनचा भव्य कायापालट या जिनपिंग यांनी मांडलेल्या दोन उद्दिष्टांनाच सर्वाधिक पसंती मिळालेली दिसून आली होती. त्यांनी सांगितले की, इतिहासाची पाने आता आपल्याभोवतीच फिरत असून चीनच्या एकीकरणाचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत निःसंदिग्धपणाने पूर्णत्वाला नेले जाणार आहे. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून याविषयीचे महत्त्व आणि प्राधान्य अधोरेखित केले होते. जिनपिंग यांच्या दाव्यानुसार, चीनपासून विभक्त होण्यासाठी एकवटलेल्या सर्व विभाजनवादी शक्तींच्या सक्रियतेच्या पार्श्वभूमीवरही त्यांचे सरकार तैवानमधील अलगाववाद आणि विदेशी हस्तक्षेप यांचा निपटारा करण्यासाठी सक्षम आहे. याबाबत कोणतीही कसूर सोडली जाणार नाही आणि या मार्गाच्या आड येणार्या कोणत्याही प्रकारच्या विरोधाचा कठोरपणाने सामना केला जाईल. तैवानच्या स्वातंत्र्याला विरोध आणि भौगोलिक अखंडत्वाच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी तैवानचा मुद्दा सोडवण्यासाठी समग्र रणनीतीच्या अवलंब करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
जिनपिंग यांनी आपली ही गर्जना आणि इरादे केवळ समर्थकांपर्यंतच नव्हे तर तैपेईपर्यंत पोहोचावेत अशी व्यवस्था केली. तसेच शांततापूर्ण मार्गांचा अवलंब करतानाच गरज पडल्यास कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असल्याचे सूचित केले आहे. चीनच्या एकंदर वैश्विक दबदब्याच्या दृष्टिकोनातून तैवानचा मुद्दा किती केंद्रीय बनला आहे, याची प्रचिती यावरून येऊ शकते. तैवानच्या मुद्द्याबाबत जिनपिंग हे देशांतर्गत राजकीय समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तैवानला मिळणार्या कोणत्याही विदेशी मदतीला थोपवण्यासाठी चीनचे लष्कर सक्षम आहे, ही बाब जिनपिंग यांनी वारंवार जगाला सांगितली आहे. याबाबत जिनपिंग अत्यंत उतावीळ झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच त्यांनी यंदा चीनच्या संरक्षण खर्चामध्ये घसघशीत वाढ केली आहे. याचाच अर्थ तैवानवर येत्या काळात चीनचा दबाव वाढणार आहे.
शी जिनपिंग यांनी तैवानशी संघर्ष करण्यापेक्षा आणि आक्रमक भूमिका घेण्यापेक्षा देशांतर्गत पातळीवर त्यांना होणारा विरोध आणि त्यांच्या विरोधात होणारी आंदोलने यांवर लक्ष देण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी बीजिंगमध्ये ‘शून्य कोविड नीती’ बंद करण्यासाठी आणि जिनपिंग यांना सत्तेवरून हटवण्याची मागणी करण्यासाठी जोरदार निदर्शने झालेली दिसून आली होती. त्यांची न्याय्य दखल घेण्याऐवजी चिनी सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबताना दिसू शकते. कारण चीनने संरक्षण अर्थसंकल्पात वाढ करताना अंतर्गत सुरक्षेसाठीची तरतूदही लक्षणीयरीत्या वाढवली आहे.
जिनपिंग यांच्या काळात चीनच्या वाढलेल्या आक्रमक विस्तारवादामुळे त्यांची तिसर्यांदा झालेली निवड ही घडामोड जगासाठी चिंतेची ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून जिनपिंग हे आपला व्यक्तिगत प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा आणि साम्यवादाची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही चीनमध्ये विरोधी पक्षांना स्थान नाही. प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था मुक्त नाहीत. आजही चीनमध्ये लोकांना आपली मते मुक्तपणाने मांडण्याचा अधिकार नाही. आजही चीनमध्ये अल्पसंख्याकांची आंदोलने हिंसक पद्धतीने दडपली जातात. शिनशियाँग, तिबेट यांसारख्या भागातील अल्पसंख्याकांचे उठाव हिंसक मार्गाने दाबून टाकले जातात. सरकारविरुद्ध टीका करण्याच्या लोकांच्या प्रवृत्तीविरुद्ध जिनपिंग यांनी अघोषित अंतर्गत युद्ध सुरू केले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हजारो लोकांंना तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत कारभारावर टीका करणारे परदेशात स्थायिक झालेल्या चिनी नागरिकांना संपवण्याचा प्रयत्न शी जिनपिंग यांच्याकडून होत आहे.
दुसरीकडे, जिनपिंग यांनी सत्ता हातामध्ये घेतल्यापासून चीनने आपल्या शक्तीसामर्थ्याचे जोरदार प्रदर्शन केले पाहिजे आणि त्या माध्यमातून जगाला धमकावले पाहिजे अशी भूमिका घेतली. पूर्व लडाखमध्ये याची प्रचिती आपण घेतली आहे. हाँगकाँग, तैवान, जपान, दक्षिण चीन समुद्र येथे चीन अशाच प्रकारे आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर दादागिरी करत आहे. लष्करी विकासावर भर देत चीनचे लष्करी आधुनिकीकरण प्रचंड वेगाने केले. याआधारे चीनने शेजारी देशांना आक्रमकता दाखवण्यास सुरुवात केली. विविध भूभागांवर, प्रदेशांवर दावा सांगत अनेक देशांशी भांडणे उकरून काढायला सुरुवात केली. या सर्वांमुळे चीन आज जगासाठी अत्यंत मोठी डोकेदुखी आणि धोका बनला आहे.
साम्यवादी पक्षाच्या अधिवेशनादरम्यान द ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये जिनपिंग यांचा प्रवेश होत असतानाच तेथील भव्य आकाराच्या स्क्रिनवर गलवानमध्ये झालेल्या संघर्षाचे व्हिडिओ फुटेज दाखवण्यात आले होते. त्यातून चीनी सैनिक भारतीय सैन्यावर कसे भारी पडले हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. यावरुन जिनपिंग हे येत्या काळात भारताशीही संघर्ष करू शकतात ही बाब स्पष्ट होते. अमेरिकन थिंक टँकंनीही याबाबतचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे भारताने येत्या काळात अत्यंत सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. 2049 पर्यंत चीनला सर्वश्रेष्ठ सत्ता बनवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची अरेरावीची भाषा जिनपिंग करताहेत. अशी व्यक्ती पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनणे ही घटना जगाची डोकेदुखी वाढवणारी आहे. त्यामुळे तैवानबाबतची चीनची भूमिका ही केवळ हिमनगाचे टोक आहे किंवा आजाराचे एक लक्षण आहे असे म्हणावे लागेल. हा आजार आहे जिनपिंग यांना जडलेल्या साम्राज्यवादी लालसेचा ! त्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा ही केवळ तैवानपुरती मर्यादित नाही किंवा तैवानच्या एकीकरणाने पूर्ण होणार नाही. भारत, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्र यांबाबतची त्यांची भूमिका आणि रणनीती स्पष्ट असून ती नजरेआड करता येणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर चीनविरोधात एक व्यापक एकजूट दर्शवणे ही काळाची गरज आहे, असे म्हणावे लागेल.
हर्ष व्ही. पंत,
किंगस्टन विद्यापीठ, लंडन