परंपरा : खेळताना रंग बाई होळीचा… | पुढारी

परंपरा : खेळताना रंग बाई होळीचा...

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे   फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत 5-6 दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस होलिकोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात मुख्य विधान असते, ते होलिकादहनाचे किंवा होळी पेटवण्याचे. या होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम कोणी होलिका किंवा होलाका, ढूंढा, पुतना यांच्यासारखा लहान मुलांना पीडा देणार्‍या राक्षसींच्या दहनाच्या पुराणोक्त कथेत शोधतात; तर कोणी तो मदनदहनाच्या कथेत शोधतात. काही विद्वानांच्या मते हा प्राचीन अग्निपूजकांच्या परंपरेचा विशिष्ट आविष्कार असावा.

होळी एक लोकोत्सव. याला उत्तरेत होरी, महाराष्ट्रात होळी किंवा शिमगा आणि कोकण-गोमंतकात शिग्मा किंवा शिग्मो अशी संज्ञा आहे. शिमगा किंवा शिग्मा या शब्दाचा उगम सांगताना लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे लिहितात, देशी नाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘सुगिम्हअ’ म्हणजे ‘सुग्रीष्मक’ असे नाव दिले आहे. या नावापासूनच कोकण-गोमंतकातील मराठीत ‘शिग्मा’ हा शब्द सिद्ध झाला आहे आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात वर्णविपर्ययाने शिमगा असे त्याचे रूप रूढ झाले आहे.

देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत 5-6 दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात मुख्य विधान असते, ते होलिकादहनाचे किंवा होळी पेटवण्याचे. या होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम कोणी होलिका किंवा होलाका, ढूंढा, पुतना यांच्यासारखा लहान मुलांना पीडा देणार्‍या राक्षसींच्या दहनाच्या पुराणोक्त कथेत शोधतात. तर कोणी तो मदनदहनाच्या कथेत शोधतात. काही विद्वानांच्या मते हा प्राचीन अग्निपूजकांच्या परंपरेचा विशिष्ट आविष्कार असावा.

या उत्सवाचे लौकिक विधि-से- होळीपौर्णिमेच्या आधी येणार्‍या पौर्णिमेच्या म्हणजे माघी पौर्णिमेच्या दिवशी गावाच्या मध्यभागी अथवा चव्हाट्यावर एक एरंडाची फांदी पुरून होळीची मुहूर्तमेढ रोवतात. या पौर्णिमेला दांडीपौर्णिमा असे म्हणतात. नंतर फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गवर्‍या जमा करायला आरंभ होतो. लाकडे, गोवर्‍या चोरून आणाव्या असा संकेत आहे. होळी पेटवण्यासाठी लागणारा विस्तव चांडाल ज्ञातीच्या एखाद्या माणसाकडून लहान मुलांच्या द्वारा आणावा, असे सांगितले आहे. होळी पेटवल्यानंतर गावाबाहेर जाऊन अगर गाव मोठा असेल तर, त्याच्या मोहल्ल्या-मोहल्ल्यात गटागटाने हिंडून वाद्ये वाजवत, अश्लील शिवीगाळ करीत किंवा अश्लील गाणी म्हणत, नाच करीत दिवसाचा सर्व वेळ काढावा. या प्रसंगी कुठे कुठे दान करण्याचीही प्रथा आहे. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध व तूप शिंपून शांत करावी व मग जमलेल्या लोकांना नारळ, पपनस यासारखी फळे वाटावी. त्या दिवशी सारी रात्र नृत्य-गायनात व्यतीत करावी. दुसर्‍या दिवशी सकाळी खूप अश्लील बोलून हेाळीची रक्षा विसर्जित करावी. काही ठिकाणी ही रक्षा व शेण, चिखल यासारखे पदार्थ अंगाला माखून नृत्य-गायन करण्याचीही प्रथा आहे. ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीत बारीचा तमाशा यात होळीच्या संदर्भातील अनेक लावण्या आणि गौळणी आढळतात. कृष्णाने गौळणींबरोबर होळीचा खेळ खेळला त्याचे प्रत्यक्षदर्शन तमाशात अनेकवार होते.

आला शिमग्याचा हा सण ।
दारी आला गं साजण
संगे गडी गडणी घेऊ गं । खेळू म्हणे रंग रंग रंग
रंगात पंचमी आली । रंगात न्हाऊ लागली

शिमग्याची ही लावणी पारंपरिक लावणी कलावंतांकडून अनेकदा ऐकली. शिमगा, होळी आणि लावणीचा खूप जवळचा संबंध आहे. कारण होळी, शिमगा म्हणजे रंगांची उधळण. ही रंगांची उधळण लावणीतही दिसते. शब्दांच्या रूपाने. ‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा । फाटला गं कोना माझ्या चोळीचा’ ही लावणी देखील होळीचे वर्णन करणारी. लावणीची जे अनेक प्रकार आहेत त्यात हौद्याची लावणी नावाचा प्रकार आहे. बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि पुण्याचे पेशवे यांच्या राजमहालात होळीचे, शिमग्याचे, रंगपंचमीचे रंग खेळण्यासाठी स्वतंत्र हौद असत. या हौदातून रंगांची रेलचेल असे. हे रंग खेळताना सादर होणार्‍या लावण्या म्हणजेच हौद्याच्या लावण्या होत.

छक्कड, जुन्नरी, बालेघाटी, पंढरपुरी बाजाची असे लावणीचे विविध प्रकार असून अनेक लावण्यांमध्ये होळी, शिमग्याचा व रंगांचा उल्लेख हमखास असतो. या सर्व लावण्यांचा मुख्य स्रोत संत वाङ्मयात आढळतो. संत वाङ्मयात ‘पाच रंगांच्या पाच गौळणी’ आहेत. कृष्णाने गौळणींवर रंग उडविल्याचा उल्लेख संत वाङ्मयात आढळतो व संतोस्तवाचे दर्शन घडविणार्‍या या रंगोत्सवाचे खरे सामर्थ्य उत्स्फूर्ततेत आहे. शृंगार रसाच्या विविध छटांचे दर्शन घडविणार्‍या लावण्यांमध्ये रंगोत्सव आहे. पंढरपूरचे दिवंगत लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांनी होळीच्या अनेक लावण्या रचल्या आहेत; इतकेच नव्हे तर रंगपंचमीच्या दरम्यान पंढरपुरात उत्पात मंडळी लावणी गायनाचा महोत्सव साजरा करीत असतात. आजही ही परंपरा भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी सुरू ठेवली आहे. ‘श्रीरंगा सारंगधरा मी लाजून धरते करा चला निघा माझ्या मंदिरा उडवा रंग रंग रंग ही’ शाहीर पठ्ठे बापूरावची गौळण प्रसिद्ध आहे. शाहीर पठ्ठे बापूरावच नव्हे तर प्रभाकर, होमाजी बाळा, राम जोशी, अनंत फंदी अशा अनेक शाहिरांनी होळीच्या लावण्या आणि गौळणी रचल्या आहेत. ज्यातून लावणीच्या शब्दकलेतून रंगांचा उत्सव द़ृग्गोचर होतो.

Back to top button