ताजिकिस्तानचा अब्दू ठरलाय बॉलीवूडचा ‘छोटा भाईजा’ | पुढारी

ताजिकिस्तानचा अब्दू ठरलाय बॉलीवूडचा ‘छोटा भाईजा’

‘बिग बॉस’ या हिंदी रिअ‍ॅलिटी शोचं सोळावं पर्व सुरू होऊन सात आठवडे उलटून गेलेत. भारतातले लोकप्रिय चेहरे या शोमध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करतायत. या सगळ्यांमध्ये अब्दू रोझीक नावाचा एक गोंडस आणि विदेशी चेहरा मात्र बिग बॉस आणि प्रेक्षकांचा लाडका बनत चाललाय.

भारतीय प्रेक्षकांना रिअ‍ॅलिटी शोचं असलेलं आकर्षण आता लपून राहिलेलं नाही. हिंदी ‘बिग बॉस’ हा भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोजमधला आघाडीचा शो. गेली 16 वर्षं हा शो नित्यनेमाने प्रसारित होतोय. कितीही वादाच्या भोवर्‍यात सापडला तरी या शोची लोकप्रियता आजवर तसूभरही कमी झालेली नाही. मुळात वाद म्हणजेच लोकप्रियता हेच या शोचं सूत्र आहे.

या गेम शोमध्ये पंधरा स्पर्धकांना सर्व सुखसोयींनी युक्त अशा ‘बिग बॉस’च्या घरात 100 दिवस राहून बिग बॉस जे सांगेल ते काम इमानेइतबारे पार पाडायचं असतं. त्यात अपयशी ठरणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. ‘बिग बॉस’चं घर, त्या घरात खेळले जाणारे खेळ, रोजची भांडणं यासोबतच त्यातले खेळाडू म्हणजेच घरचे सदस्य प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण ठरतात.

सध्या ‘बिग बॉस’चं सोळावं पर्व सुरू आहे. यावेळी बाहेरच्या जगात अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, मॉडेल, गायक, राजकारणी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले भारतीय सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घराचे सदस्य बनलेत. या सगळ्यांमध्ये ताजिकिस्तानचा लोकप्रिय गायक अब्दू रोझीक हा विदेशी चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय.

कोण आहे अब्दू रोझीक?

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बर्गर खाणार्‍या एका गोर्‍या मुलाचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला. त्यात तो मुलगा कॅमेर्‍यासमोर बर्गरला ‘बुर्गिर’ म्हणत होता. त्याचा आवाज आणि उच्चार नेटकर्‍यांना खास वाटला आणि त्यांनी यावर बरेच रील बनवले. आपल्या लहान तोंडी बुर्गिरचा मोठा घास घेऊ पाहणारं हे पोरगं म्हणजेच अब्दू रोझीक. अब्दू बुर्गिरच्या व्हिडीओमुळे भारतात व्हायरल झाला असला तरी भारताबाहेर तो आधीपासूनच एक गायक म्हणून प्रसिद्ध होता. मूळचा ताजिकिस्तानच्या गिज्दार्वा गावचा रहिवासी असलेला अब्दू ताजिक, फारसी आणि थोडीफार रशियन, इंग्रजी भाषा बोलू शकतो. पूर्वी केवळ गिज्दार्वाच्या स्थानिक बाजारात गाणारा आणि रॅप करणारा अब्दू आज त्याच्या आवाजामुळे जगभर पोचलाय.

ताजिकिस्तानमधल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेला अब्दू आज ताजिकिस्तानची ओळख बनलाय. अब्दूच्या या लोकप्रियतेमागे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई सरकारचा मोठा वाटा आहे. यूएईने त्याला तिथला अधिकृत नागरिक म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिलीय. त्याचबरोबर 2020 मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी तिथला गोल्डन व्हिसा मिळवणारा अब्दू हा पहिला ताजिकिस्तानी ठरलाय.

एकोणीस वर्षांचा चिमुरडा

‘बिग बॉस’मध्य खेळण्यासाठी वयाची 18 वर्षं पूर्ण असणं ही एक प्रमुख अट आहे. त्यामुळे अब्दूला पहिल्यांदा पाहणार्‍यांना हा 3 फूट 1 इंच उंचीचा, निरागस, छोटा मुलगा ‘बिग बॉस’मध्ये काय करतोय, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. याचं कारण अब्दूला लहानपणी जडलेल्या शारीरिक आजारात दडलंय.

अब्दूला बुटकेपणा हा ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सीमुळे होणारा विकार जडलाय. या आजारात वाढीसाठी आवश्यक असणारे हार्मोन शरीरात नसल्यामुळे व्यक्तीची शारीरिक वाढ खुंटते. पण अब्दूला असलेला बुटकेपणा हा दुर्मीळ प्रकारचा आहे, ज्यात त्या व्यक्तीची शारीरिक वाढ तर खुंटतेच; पण त्यासोबतच त्या व्यक्तीचं वागणं-बोलणंही लहान मुलांसारखं होऊन जातं. अब्दूच्या लहानपणी जेव्हा त्याच्या आई-वडिलांना या आजाराबद्दल कळलं, तेव्हा त्यांच्याकडे योग्य उपचारासाठी पैसे नव्हते. परिणामी अब्दूच्या नशिबी बुटकेपणा आला. त्यामुळे 19 वर्षांचा अब्दू प्रत्यक्षात मात्र चार वर्षांच्या मुलासारखा वागताना आपल्याला दिसतो. पण त्याचं हे शारीरिक व्यंग त्याने समजूतदारपणा दाखवत स्वीकारलंय आणि त्याच्यासारख्या इतरांसाठी तो प्रेरणेचा एक स्रोत बनलाय.

आवाजाच्या जादूने घातली मोहिनी

घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे जेमतेम वीस दिवस शाळेत गेलेल्या अब्दूने लहान वयातच गिज्दार्वाच्या स्थानिक बाजारात आपली गायनकला सादर करायचं ठरवलं. ताजिक भाषेतली लोकगीतं गाणारा आणि रॅप करणारा अब्दू लोकांना आवडू लागला. त्याची उंची आणि त्याचा अनोखा आवाज तिथल्या गर्दीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

त्याचे गायनाचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होऊ लागल्यानंतर यूएईमधल्या ‘इंटरनॅशनल फायटिंग चॅम्पियनशिप मॅनेजमेंट’ या कंपनीने त्याच्या संपूर्ण खर्चाची आणि करियरसाठी लागणार्‍या मार्गदर्शनाची जबाबदारी उचलली. 2020ला यूएईमध्ये झालेल्या ‘एक्स्पो 2020 परिषदे’त अब्दूला सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार ए. आर. रेहमानसोबत एकाच मंचावर आपली कला सादर करायची संधी मिळाली.

तीनवेळचा ‘ग्रॅमी’ विजेता रेडवन, बॉलीवूडमधला सुप्रसिद्ध गायक गुरू रंधावा, ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ मार्क वॉल्टन अशा संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांवर अब्दूने आपल्या आवाजाने मोहिनी घातलीय. फक्त संगीत क्षेत्रच नाही तर सुप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो, मोहम्मद सलाह, डेविड डोब्रिक तसेच शेफ सॉल्ट बे, क्रिकेटर विराट कोहली असे इतरही क्षेत्रात अब्दूचे असंख्य चाहते आहेत.

फायटर पठ्ठ्या

2021 मध्ये सर्बियात झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात गायलेल्या अब्दूला बॉक्सिंगचीही आवड आहे. तो त्याचं प्रशिक्षणही घेतोय. बॉक्सिंगमध्ये नाव कमवलेल्या अनेक जगज्जेत्या खेळाडूंनी त्याला यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलंय. वयाच्या बाविसाव्या वर्षी बॉक्सिंग जगज्जेतेपदाला गवसणी घालणारा अमीर खान हा स्वतः अब्दूचा वैयक्तिक प्रशिक्षक बनलाय.

केवळ बॉक्सिंगच्या मैदानातच नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातही अब्दू एक फायटरच आहे. तो त्याच्या शारीरिक आणि आर्थिक मर्यादांशीही तितक्याच जोमाने लढतोय. डोंगराळ भाग सोडून शहरात स्वतःचं घर बांधायचं स्वप्न तो बघतोय. शारीरिक, आर्थिक, मानसिक आव्हानांना संकट मानून त्यासमोर हातपाय गाळणार्‍या तरुणाईसाठी स्वतःच्या उदाहरणातून अब्दू एक आदर्श निर्माण करू पाहतोय.

बिग बॉस आणि बॉलीवूड

अब्दूचं हिंदी भाषेचं ज्ञान तोकडं आहे. पण लवकरच तो अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई, किसी की जान’ या सिनेमातून गायक आणि अभिनेता म्हणून बॉलीवूडमधे पदार्पण करतोय. ‘बिग बॉस’च्या एका पत्रकार परिषदेत ‘बिग बॉस’चा पहिला स्पर्धक म्हणून अब्दूच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यावेळी अब्दूने त्याची ‘छोटा भाईजान’ अशी ओळख सगळ्यांना करून दिली.

‘बिग बॉस’च्या घरात बॉलीवूडचा प्रख्यात दिग्दर्शक साजिद खान अब्दूचा जवळचा मित्र बनलाय. प्रतिस्पर्धी शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्याशीही अब्दूचं मैत्रीपूर्ण नातं आहे. त्याचा खेळ स्पर्धकांना, ‘बिग बॉस’ला आणि प्रेक्षकांनाही आवडतोय. त्याच्याशी गैरवर्तन करणार्‍या स्पर्धकांना शोचा होस्ट सलमान आणि स्वतः ‘बिग बॉस’ने वेळोवेळी सक्त ताकीद दिल्याचे व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल होतायत. मागच्याच आठवड्यात अब्दू ‘बिग बॉस’च्या घराचा कॅप्टनही बनला. त्यानिमित्ताने घराला शिस्त लावताना एरवी गोंडस दिसणार्‍या अब्दूचं कठोर रूप पाहायला मिळालं. आपल्या शारीरिक व्यंगामुळे काही खेळ अब्दूला जड जाऊ शकतात पण हा पठ्ठ्या हार मानणार्‍यातला नाही. त्याच्या पाठीशी असलेला भरभक्कम जनाधार आणि जिंकायची ईर्ष्या यामुळे या पर्वाच्या विजेतेपदासाठी तो एक प्रबळ दावेदार मानला जातोय.

प्रथमेश हळंदे

Back to top button