रशियाची युद्धखोरी आणि मजबूत नॉर्डिक राष्ट्रे... | पुढारी

रशियाची युद्धखोरी आणि मजबूत नॉर्डिक राष्ट्रे...

गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून रशिया व युक्रेन यांच्यात घमासान युद्ध सुरू आहे. तुलनेेने दुबळ्या समजल्या जाणार्‍या युक्रेनने आठ महिने रशियाला प्रखरपणे तोंड देत झुंजवले आहे. अर्थात, युरोपियन महासंघ आणि अमेरिका यांची अखंडपणे सुरू असलेली रसद याला कारणीभूत आहे. या दोन देशांव्यतिरिक्त आणखी एका देशाचे नाव या प्रकरणात गोवलेले आहे, तो देश म्हणजे फिनलंड.

शांतताप्रिय आणि सहसा कुठल्याही संघर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षही सहभागी न होणारा हा देश आहे; कदाचित हेच त्याचे जगातला सगळ्यात आनंदी देश असण्याचे गमक असू शकते. हा एक नॉर्डिक देश आहे. नॉर्डिक म्हणजे नॉर्थ ऑफ युरोप – युरोपच्या उत्तरेकडील देश. यात फिनलंड व्यतिरिक्त डेन्मार्क, स्वीडन, आईसलँड आणि नॉर्वे यांचा समावेश होतो. हे सर्व देश आर्थिकद़ृष्ट्या संपन्न आणि समृद्ध आहेत. त्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे. कोरोनाच्या आपत्तीमधून सर्वात लवकर बाहेर पडलेले हे देश आहेत.

फिनलंडची एकूण लोकसंख्या 56 लाख आहे. संपूर्ण देशात फक्त 55 नागरिकांना कोरोनाची लागण झाली; पण ते लवकरच बरेही झाले. आपल्या देशात सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या समान असावेत, त्यांच्यात विषमता नसावी हा फिनलंड सरकारचा कटाक्ष आहे. फिनलंडचे चलन असलेला युरो सहसा वरखाली होत नाही. इथली आरोग्य सेवा सर्वोत्तम आहे. पण नागरिकांनी कमीत कमी औषधे घ्यावीत आणि स्वतःच्या रोगप्रतिबंधक शक्तीच्या बळावर व्याधीमुक्त व्हावे, अशी फिनलंडची भूमिका आहे. उत्तम वाहतूक व्यवस्था, ध्वनी आणि वायूचे शून्य टक्के प्रदूषण, अत्यंत स्वच्छता आणि राष्ट्रीयत्वाची प्रखर जाणीव, सर्वांनाच असलेली आपल्या कर्तव्यांची यथार्थ जाणीव यामुळे लोकांचे आरोग्य आणि एकूण आयुष्य चांगलेच राहते.

जगातील सर्वात शांत आणि आनंदी देश म्हणून सलग तीन वेळा प्रथम क्रमांकावर राहिलेल्या फिनलंडचे लष्करी सामर्थ्य नेमके आहे तरी काय व किती, याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 1939 मध्ये डोकावून पाहावे लागेल. 30 नोव्हेंबर 1939 या दिवशी ‘विंटर वॉर’ किंवा पहिले सोव्हिएत – फिनिश वॉर सुरू झाले. सुमारे साडेतीन महिने चाललेल्या या युद्धाचा शेवट मॉस्को शांतता कराराने झाला. या युद्धात अत्यंत ताकदवान आणि अत्याधुनिक लष्करी सामर्थ्य – प्रामुख्याने वायुदल आणि पायदल असूनही सोव्हिएत युनियनला प्रचंड हानी सोसावी लागली. त्यात रशिया फिनलंडला जिंकू शकला नाही. हे युद्ध जरी संपले असले, तरीही सुमारे 1300 कि.मी.ची अगदी जोडलेली संयुक्त सीमारेषा असणारा हा आपला सख्खा शेजारी कधीतरी पुन्हा आक्रमण करणार याची प्रत्येक फिनिश नागरिकाला जाणीव आहे. म्हणूनच गेली 83 वर्षे फिनलंड ह्या विस्तारवादी रशियाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सातत्याने युद्धसराव करीत आहे.

रशियाने कधीही आक्रमण केले, तरी त्याला आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो, असा विश्वास केवळ फिनिश सरकार आणि फिनिश लष्करच नव्हे, तर प्रत्येक फिनिश नागरिकाला वाटत आलेला आहे. म्हणूनच प्रत्येक घरातला एक फिनिश तरुण सैन्यात दाखल होतो, युद्धसरावात मोठ्या तडफेने भाग घेतो. म्हणूनच रशियाची भीती इथल्या नागरिकांना वाटत नाही. त्यांचा आपल्या सैन्याच्या सामर्थ्यावर गाढ विश्वास आहे. फिनलंडचे सुमारे 2 लाख 80 हजार सैन्य आहे, तसेच 8 लाख 70 हजार नागरिकांना सैन्याचे प्रशिक्षण देऊन युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आलेले आहे. फिनलंडची शस्त्रसामग्री ही युरोपातील सर्वात सामर्थ्यसंपन्न मानली जाते. त्यात लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक फायटर जेटस्, लांब पल्ल्याची ड्रोन्स, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रत्येक घरातला एक लढवय्या सैनिक यांचा समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तेव्हापासूनच ह्या युद्धाची व्याप्ती वाढेल का, असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला होता. आणि जर तसे झालेच असते, तर रशियाचे पहिले सावज फिनलंडच असणार, असा कयास अनेक विचारवंत आणि अभ्यासकांनी केला होता. पण जर रशियाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर समान भौगोलिक रचना असणार्‍या फिनलंडला काबीज करणे, तेवढेच महत्त्वाचे असेल का? एकंदरीत फिनलंडचे लष्करी सामर्थ्य, युरोपियन महसंघाचे सदस्यत्व, अमेरिका-ब्रिटन या राष्ट्रांशी असलेली जवळीक हे ध्यानात घेता फिनलंड हे सहजपणेे जिंकण्याइतके सोपे सावज नाही, हे रशियाला कळून चुकले आहे. म्हणूनच फिनलंड आणि स्वीडन यांच्या ‘नाटो’ सदस्यत्वाला रशियाकडून म्हणावा तितका तीव्र विरोध झाला नाही. पुढील काही महिन्यांत फिनलंड आणि स्वीडन ‘नाटो’चे सदस्य होतीलही. तथापि रशिया त्याला कुठल्याही प्रकारचा लष्करी प्रतिकार करेल याची शक्यता नाही. याचे कारण असे की, युद्धसरावाच्या नावाखाली अमेरिकेने फिनलंडला पाठविलेली युद्धनौका आणि विमाने, तसेच ब्रिटन आणि अमेरिकेने फिनलंडच्या बाजूने युद्धात उतरण्याची दिलेली थेट ग्वाही.

लष्करी कारवायांची फारशी शक्यता नसली, तरीही रशिया फिनलंडवर विविध प्रकारचे सायबर अ‍ॅटॅक करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तसे काही प्रयत्न गेल्या काही महिन्यांत झालेलेही आहेत. आणि रशियाचे हे सायबर हल्ले समर्थपणे परतवून लावण्यात फिनलंड यशस्वी झालेला आहे. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष साउली नीनिस्तो यांचे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी असलेले सौहार्दाचे संबंध आणि फिनलंडच्या ‘नाटो’ अर्जाविषयी त्यांनी पुतीन यांच्याशी साधलेला थेट संवाद यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा फिनलंडच्या नागरिकांवर जर कधी काळी काही तणाव असलाच, तर तोही आता पुष्कळ अंशी निवळलेला आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर काहीशी पसरलेली भीतीची छाया त्यांच्या मनावर आता उरलेली नाही. फिनलंडचे नागरिक सतत भीतीच्या छायेखाली वावरत आहेत, असे जर कोणी म्हणत असतील, तर तो त्यांचा फार मोठा गैरसमज आहे, हे मात्र खरे!

एकंदरीत फिनलंडच्या दैनंदिन जीवनावर ह्या युद्धाचा काही अंशी परिणाम झालेला आहे, हे खरे. पण तो काही अंशीच. जसे की, युरोपियन महासंघ आणि अमेरिका यांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशियातून फिनलंडला येणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. याचा परिणाम काही प्रमाणात औद्योगिक आणि रहिवासी क्षेत्रांवर झालेला आहे, तसेच रशियातून फिनलंडला केला जाणारा विद्युत पुरवठाही बंद झालेला आहे; परिणामी फिनलंडमध्ये सध्या विद्युतऊर्जा आणि पेट्रोल-डिझेल अशा इंधनांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झालेली आहे. तोंडावर उभा ठाकलेला हिवाळा आणि हे विद्युतसंकट यामुळे ऐन हिवाळ्यात फिनलंडच्या नागरिकांना गोठवणार्‍या थंडीचा त्रास सहन करावा लागेल का, ही चिंता त्यांना सतावत आहे.

तथापि, फिनलंड सरकारच्या नियोजनानुसार हा विद्युत पुरवठा औैद्योगिक क्षेत्रातच खंडित केला जाऊ शकतो. त्यामुळे ऐन हिवाळ्यामध्ये एकंदरीत काय परिस्थिती असेल, याचे पूर्वानुमान करता येत नाही. फिनलंडमध्ये सध्या हिवाळा सुरू झालेला आहे. परंतु हा गोठवणारा कडाका नाही. हिमवर्षाव करणारा कडक हिवाळा डिसेंबरमध्ये सुरू होतो. तो जानेवारीनंतर अतिशय तीव्र रूप धारण करतो. याच काळात जर नागरी वसाहतीत विद्युत पुरवठा खंडित झाला, तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्रास होऊ शकतो. कारण फिनलंडमधील बहुतांश नागरिक विद्युत ऊर्जेवर चालणारी उष्णतानिर्मिती संयंत्रे वापरतात. अगदी थोडे नागरिक नैसर्गिक वायूवर चालणारी उष्णतानिर्मिती संयंत्रणा उपयोगात आणतात. विद्युत ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणार्‍या फिनिश नागरिकांवर ह्या तुटवड्याचा परिणाम होणार आहे, हे खरेच!

ह्या युद्धाचा सगळ्या जगावरच कमी-अधिक प्रमाणावर परिणाम झालेला आहे. पण त्याहून जास्त दुष्परिणाम स्कँडिनेव्हियन किंवा नॉर्डिक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. सध्या ह्या देशांची कासवाच्या गतीने सुरू असलेली आयात-निर्यात, त्याचप्रमाणे यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांच्या उत्पादन व उपलब्धतेला लागणारा वेळ यामुळे ह्या देशांचा आर्थिक विकास हा गतवर्षीप्रमाणेच मंद गतीने सुरू आहे. फिनलंडमध्ये 72.07 टक्के सेवा व्यवसाय चालतो, उर्वरित क्षेत्र तेल शुद्धीकरण उद्योग, धातू उत्पादने, विद्युत (इलेक्ट्रॉनिक) उत्पादने यांनी व्यापलेले आहे. त्यावर गंभीर परिणाम होणार आहे. तथापि आपण एकता, दृढ निर्धार आणि साहसाच्या बळावर त्यातून लवकरच बाहेर पडू, असा द़ृढ विश्वास फिनलंड सरकारला आहे. युरोपियन महासंघाच्या संसदेत फिनलंडच्या पंतप्रधान सॅना मरीन म्हणतात, “विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या रशियाच्या धमकीला आणि येणार्‍या तीव्र आणि दीर्घ हिवाळ्याला आपण समर्थपणे तोंड देऊ. फक्त आपल्यात एकता, द़ृढ निश्चय आणि साहस आवश्यक आहे.”

युरोपियन महासंघाने आपल्या सदस्य राष्ट्रांना, युके्रनमधील निर्वासित नागरिकांना विभागून आश्रय देण्याची सूचना केलेली आहे. त्यामुळे ह्या निर्वासित आश्रितांच्या भरणपोषणाचाही काही प्रमाणात त्यांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडणार आहे. पण त्याचीही तयारी त्यांनी केलेली आहे. ह्या आर्थिक ताणतणावातून आपण लवकरच बाहेर पडू, याबाबत ह्या राष्ट्रांना कोणतीही शंका वाटत नाही.

फिनलंडच्या सरकारमध्ये कमालीचा एकोपा आहे. पाच पक्षांचे सरकार देश चालवते. विरोधासाठी विरोध आणि राजकारणासाठी राजकारण फिनलंडमध्ये केले जात नाही. 16 नोव्हेंबर 1985 या दिवशी जन्मलेल्या अवघ्या 37 वर्षांच्या सॅना मरीन उत्साही, चैतन्यमय आणि ऊर्जावान पंतप्रधान आहेत. आपले राष्ट्र निरोगी – निरामय, मजबूत, एकसंध ठेवण्यात त्या सातत्याने यशस्वी झालेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही संकटावर मात करण्यास हे राष्ट्र निश्चितच समर्थ आणि सक्षम आहे.

(लेखक फिनलंडमधील नॉर्डिया फायनान्स येथे आय.टी. मॅनेजर आहेत.)

शिवराज श्रीराम पचिंद्रे, (हेलसिंकी, फिनलंड)

Back to top button