सिंहायन आत्मचरित्र : फक्त समाजकारण | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : फक्त समाजकारण

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

‘Always bear in mind that your own resolution to succeed is more important than any other.’

राजकारणातील आपल्या यशस्वितेची मीमांसा करताना, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी हे गुपित उघड केलं होतं. मीदेखील समाजकारणात कार्यरत राहताना माझा स्वतःचा अजेंडा ठरवून टाकला होता आणि तसा तो ठरवावाच लागतो. कारण, कुठलाही निश्चित कार्यक्रम डोक्यात असल्याशिवाय सामाजिक किंवा राजकीय काम करताच येत नाही. म्हणूनच मी माझा अजेंडा ठरवून, त्यानुसारच माझी वाटचाल सुरू ठेवली होती अन् विशेष म्हणजे, मी माझ्या मिशनमध्ये नेहमीच यशस्वीही होत आलो आहे.

मी माझ्या जीवनात सक्रिय राजकारणाचा कधी सोस धरला नाही. त्याऐवजी मी केवळ समाजकारणाचाच अंगीकार केला. कारण, ‘राजकारण’ हा एकेकाळी एक पवित्र शब्द होता; परंतु आज राजकारणातल्या शुचिर्भूततेला तडा गेल्यामुळे त्या शब्दाचंच पावित्र्य डळमळीत झालं आहे. पूर्वी राजकारणात जाणं, हे प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. म्हणूनच राजकारणापासून चार हात दूर राहूनच, मी सामाजिक परिवर्तनाच्या द़ृष्टिकोनातून राजकारणाची सूत्रं हलवीत राहिलो. त्यामुळेच मी ‘किंगमेकर’ या उपाधीने गौरविला गेलो.

अर्थात, राजकारण काय नि समाजकारण काय, शेवटी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. एकीकडे छापा असतो, तर दुसरीकडे काटा. काट्याची बाजू असते राजकारणाची. छापाची बाजू समाजकारणाची. काट्याच्या बाजूवर लिहिलेला आकडा, त्या-त्या राजकीय व्यक्तीची राजकीय किंमत ठरवत असतो. राजकीय बाजारपेठेत कधी कधी त्या आकड्याचं अवमूल्यनही होत असतं. परंतु, छापाची बाजू अनमोल असते. कारण, तिच्यावर आकडा नसतो, तर राष्ट्रीय चिन्ह असतं. त्या राष्ट्रीय चिन्हाची किंमत कुठल्याही रुपया, डॉलर किंवा पौंडापेक्षा अधिक असते. त्यालाच समाजकारण म्हणतात. म्हणूनच ओली-सुकीच्या डावात मला समाजकारणाच्या छापाचाच कौल मिळाला आणि मी आनंदानं त्याचा स्वीकार केला.

अर्थातच, त्याची पायाभरणी आबांनीच केली होती. आबांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय, स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात मुंबईतूनच केली होती. त्यांनी सत्यशोधक चळवळ, ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ, स्वातंत्र्य चळवळी, दलित चळवळ अशा सर्व चळवळींत सहभाग घेतला होता. त्यांचे महात्मा गांधी ते आंबेडकर यांच्याशी जवळचे संबंध होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आबांचा प्रथमपासूनच सहभाग होता. आबा कोल्हापूर शहरातील पहिले आमदार. 1949 साली ते आमदार होते. त्यांची जडणघडण ही काँग्रेसच्या मुशीत तयार झालेली. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडताना त्यांच्या मताचा आदर केला जात असे. श्रीपतराव बोंद्रे, डी. वाय. पाटील यांच्यासह अनेकांना त्यांच्यामुळे आमदारकीची उमेदवारी मिळाली. ते विजयी झाले. तसेच कोल्हापूर नगरपालिका, जिल्हा लोकल बोर्ड आणि त्याचंच रूपांतर झालेली जिल्हा परिषद या संस्थांच्या पदाधिकारी निवडीतही त्यांचा सहभाग असे. विशेष म्हणजे, आबांना स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी होती. ते स्वातंत्र्यासाठी लढले होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळाचे प्रतिनिधी असल्याने आबांकडे समाजकारणाची सखोल द़ृष्टी होती. कुठे काय केलं पाहिजे, कोणता प्रश्न कोणत्या मार्गाने सुटेल, याची जाण व भान त्यांना होतं. त्यामुळेच त्यांच्या समकालीन नेत्यांमध्ये ते नेहमीच उजवे ठरले. आबांची ही परंपरा पुढे मीही चालवली.

तसं पाहिलं, तर मला पहिल्यापासूनच राजकीय वारसा होता, आबांच्या राजकारणाची पार्श्वभूमी होती. प्रांतीय सरकारच्या काळापासून म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हायच्या आधीपासूनच आबा मुंबई कौन्सिलवर आमदार होते. त्यानंतरही त्यांनी कोल्हापुरातून आमदारकीची निवडणूक लढवली होती. आबांचा राजकीय वर्तुळात चांगलाच दबदबा होता. त्याचा मला नक्कीच फायदा झाला असता. मी तेव्हा जर राजकारणात आलो असतो, तर दक्षिण महाराष्ट्रातील एक बलाढ्य शक्ती म्हणूनच उदयाला आलो असतो, यात शंकाच नाही. आबांच्या भक्कम पाठिंब्याबरोबरच, माझ्या हातात ‘पुढारी’सारखं जनताभिमुख ताकदवर वर्तमानपत्र होतं. तसेच मी स्वतः उच्चशिक्षित आणि आक्रमकही होतो. माझ्याजवळ उत्तम वक्तृत्व होतं. शिवाय, मी मराठा समाजातून आलेलो होतो. कोणत्याही प्रश्नाचा सर्वंकष अभ्यास करून लढ्याचा माझा पिंड होता. सीमा प्रश्नाचं आंदोलन, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाची त्रिशताब्दी, राजर्षी शाहू महाराजांची जन्मशताब्दी आदी कारणानी माझं व्यक्तिमत्त्व झळाळून उठलेलं. माझ्या वक्तृत्वावर मोहित झालेल्या तरुणांकडून मला प्रचंड मागणी होती.

माझी झेप तशीच गगनभेदी होती. ‘पुढारी’ची सूत्रे हातात घेतली आणि माझ्या पहिल्या अग्रलेखानेच सीमाभाग पेटून उठला. सीमालढा सुरू होताच ऐन पंचविशीतच मी सर्वपक्षीय सीमा कृती समितीचा अध्यक्ष झालो होतो. त्या समितीमध्ये डी. एस. चव्हाण, नार्वेकर, गोविंदराव पानसरे, रत्नाप्पाण्णा कुंभार, श्रीपतराव बोंद्रे, सा. रे. पाटील, तात्यासाहेब कोरे, एन. डी. पाटील आदी त्या काळातील दिग्गज राजकारणी आणि समाजकारणी मंडळींचा समावेश होता. मात्र, माझ्याकडे असलेली धडाडी, कामाची गती आणि उरक या गोष्टी सर्वांच्या मनावर चांगल्याच ठसलेल्या होत्या. म्हणूनच त्यांनी पक्षीय गटा-तटाचं राजकारण बाजूला ठेवलं आणि ते माझ्या नेतृत्वाखाली एकत्र आले. त्या काळात मी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या आंदोलनात बेदिक्कत उडी घेतली. तसेच छ. शिवाजी महाराज यांचा त्रिशताब्दी जन्मसोहळा आणि शाहू जन्मशताब्दी सोहळ्याचंही नेतृत्व केलं. या दोन्ही सोहळ्यांचा निमंत्रक, संकल्पक आणि अध्यक्ष होण्याचं भाग्य मला लाभलं. त्या गोष्टींची आठवण करून देताना, माझे स्नेही डॉ. डी. वाय. पाटील आजही म्हणतात, “बाळासाहेब, तुम्ही राजकारणात जायला हवं होतं. फार पुढे गेला असता!”

डॉ. डी. वाय. पाटील यांचे हे बोल फुकाचे नव्हते. कारण, मैदानात अतिरथी नि महारथी असताना, ऐन पंचविशीतील एक तरुण धडाडीनं पुढे येतो काय, स्वतःची वेगळी जागा निर्माण करतो काय, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यावेळी माझी गरुडझेप पाहणार्‍या या भागातील सर्वच लहान-थोर राजकीय नेत्यांना वाटत होतं की, मी बहुतेक विधानसभेची निवडणूक लढवणार आणि आमदारकी सहजगत्या खिशात टाकणार. या कल्पनेनंच त्यावेळच्या इच्छुकांना धडकी भरली होती. एकूण काय, तर परिस्थितीला कधीच शरण जायचं नसतं; तर परिस्थितीवर स्वार होऊन तिला वश करून घ्यायचं असतं, हे मी त्यावेळी सोदाहरण दाखवून दिलं, ही वस्तुस्थिती आहे.

माझे लॉ कॉलेजपासूनचे मित्र विलासराव देशमुख हेही मुख्यमंत्री झाले. त्यांची सुरुवात तर बाभुळगावच्या सरपंचपदापासून झाली. सुशीलकुमार शिंदे हे लॉ कॉलेजला होते. परंतु, मी जेव्हा माझ्या कारकिर्दीच्या कळसाला जाऊन पोहोचलो होतो, तेव्हा ही सारी मंडळी नुकतीच राजकारणात प्रवेश करीत होती. विस्मयाची गोष्ट म्हणजे, पुढे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री झालेले अनेक नेते जेव्हा राजकीय पटलावर येत होते, तेव्हा मी मात्र सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून मैदान लढवीत होतो. साहजिकच, मी राजकारणात का आलो नाही आणि आलो असतो तर काय झालं असतं, याबाबतीत आजही चर्चेचे फड रंगतात. तो तसा आजही समाजात चर्चेचा विषय आहे. परंतु, नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या दोन्हीही महत्त्वाच्याच असतात. माझ्याही व्यक्तिमत्त्वाला दोन बाजू आहेतच. ऐन पंचविशीत मी सुसाट सुटलेलो. अर्थातच, ते यशवंतराव चव्हाणांसारख्या राजकारण्याच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हतं. त्यांनी आबांना विनंती केली होती की, “बाळासाहेबांना आता आमच्याकडे सोपवून द्या.

कोल्हापूर काँग्रेसमध्ये कोणीही तरुण त्यांच्याइतका शिकलेला नाही. त्यांना संधी आहे. आम्ही त्यांना आमदारकी देऊ.”
त्यावेळी माझे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले. मी इंग्लिश वाङ्मय घेऊन बी.ए. ऑनर्स व एलएल.बी.ही होतो. शिवाय, पत्रकारितेतील डिग्रीही माझ्या गाठी होती. शिवाय, माझ्याकडे वक्तृत्व होतं… कोल्हापुरातील एखादं मंडळ असेल, तालीम असेल वा अन्य सांस्कृतिक कार्यक्रम… तिथं मला हक्कानं व आदरानं बोलावलं जायचं. त्यावेळी कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक रामदेव त्यागी, जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर व मी असे त्रिकूट होते. शिवजयंती असो वा गणपतीतील कार्यक्रम… आमच्या सहभागाविना असा एखादा कार्यक्रम पार पडला नाही, असं क्वचितच घडायचं. तेव्हा माझ्या वक्तृत्वावर जनसामान्य फिदा होते. त्याच काळात सीमा प्रश्नाच्या आंदोलनात उतरलो होतो. तेव्हा मी वयाच्या अवघ्या 25-26 व्या वर्षीच सर्वपक्षीय कृती समितीचाही अध्यक्ष झालो होतो. अर्थातच, माझा दांडगा जनसंपर्क होता. छत्रपती शाहू जन्मशताब्दी, छत्रपती शिवरायांचा त्रिशताब्दी राज्यारोहण समारंभ, अशी अनेक विधायक कार्ये माझ्या पुढाकाराने पार पडलेली. एक पुरोगामी, समाजमनाची नस जाणणारा, धाडशी व लढाऊ तरुण अशी त्या कालखंडात माझी क्रेझच तयार झालेली. त्यामुळे यशवंतरावांची नजर माझ्यावर न खिळेल तर नवलंच!

त्यावेळी काँग्रेसमध्येही मोठी पोकळी निर्माण झालेली. एक तर कोल्हापूरवर शेतकरी कामगार पक्षाचा वरचष्मा होता. तसेच माझ्यासारख्या उच्चविद्याविभूषित तरुणांचीही त्यांच्याकडे तशी वानवाच होती. विशेष म्हणजे, त्या काळात कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होईल, याचा पोलिस विभागामार्फत सत्ताधारी आढावा घ्यायचे. त्या आढाव्यात मला उमेदवारी दिली, तर इथं काँग्रेसचा उमेदवार विनासायास निवडून येईल, असा पोलिसांचा अहवाल होता. साहजिकच, माझ्याबाबतचे सर्वच प्लस पॉईंट यशवंतरावांनीही हेरलेले. अशावेळी मी जर काँग्रेसकडून उभा राहिलो असतो, तर कोल्हापूरची विधानसभेची जागा अलगदच काँग्रेसच्या पारड्यात पडली असती, हे यशवंतराव चव्हाणांसारख्या मुत्सद्दी नेत्याच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं.

अन् यशवंतरावांनीही माझ्या उमेदवारीबाबत चांगलाच मुहूर्त साधला होता. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला होता. त्याबद्दल खासबाग मैदानात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समितीचा मी अध्यक्ष होतो. त्याप्रसंगी मी केलेल्या भाषणानंही यशवंतराव चव्हाण चांगलेच प्रभावित झाले होते. कार्यक्रमानंतर चव्हाणसाहेब आणि इतर पाहुण्यांसाठी आमच्या घरीच भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगाचं औचित्य साधूनच साहेबांनी आमच्या आबांकडे मला विधानसभेला उभं करण्याचा विषय काढला होता.
त्यावेळी यशवंतराव चव्हाणांकडून आमदारकीची ऑफर कशी आली आणि त्यावेळचं राजकारण काय होतं, याबाबीही खूपच खुमासदार आहेत. भोजनाच्या त्या कार्यक्रमादरम्यान यशवंतराव चव्हाण आबांना म्हणाले,
“शेकापला टक्कर देईल, असा कुणी नेता आमच्याकडे नाही. तेव्हा तुमचे चिरंजीव बाळासाहेबांना आमच्याकडे द्या!”
तेव्हा आबा त्यांना म्हणाले, “बाळासाहेब आता उच्चशिक्षित झाले आहेत. त्यांचे निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत. त्यांना जर तसं वाटत असेल, तर माझी आडकाठी असण्याचं कारण नाही.”
मग, यशवंतरावांनी थेट मलाच विचारलं, “काय बाळासाहेब, आहे ना तुमची तयारी?”

कुणालाही मोहात पाडणारा हा क्षण. समोर साक्षात सह्याद्री बसला होता आणि माझं बोट धरून तो मला हिमालयाकडे घेऊन जायला तयार होता. माझं वय होतं अवघं 29. ज्या वयात मोहाचे क्षण टाळता येत नाहीत, असं कोवळं वय; पण मी मोहावर विजय मिळवला आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना नम्रपणे उत्तर दिलं,
“माफ करा साहेब! पण मला राजकारणापेक्षा समाजकारणच अधिक आवडतं!”

“मग, राजकारणात समाजकारण नसतं काय?” मुत्सद्दी यशवंतरावांनी कोड्यात टाकणारा प्रश्न केला. त्यावर मी लगेचच हसून म्हणालो.
“राजकारणाच्या भाऊगर्दीत समाजवाद गुदमरतो, असं माझं मत आहे! शिवाय माझा ‘पुढारी’ हा नि:पक्ष असावा, असे माझे मत आहे. त्यामुळे मला राजकारणात जायचे नाही.”

माझ्या या उत्तरावर यशवंतराव हसले आणि त्यांनी तो विषय तिथेच सोडून दिला; पण ते मनातून मात्र नाराज झाल्याचं माझ्यासारख्या सव्यसाची पत्रकाराच्या नजरेतून सुटलं नाही. खरं तर, त्यांना नकार देणं, हे मोठं धाडसाचंच काम होतं. कारण, त्यावेळी यशवंतरावांची प्रतिमा आभाळाएवढी मोठी होती. ‘सर्वच नेत्यांना पुढून मुजरे झडतात; पण यशवंतरावांना मागूनही मुजरे झडतात,’ असा वाक्प्रचार तेव्हा रूढ झालेला होता. त्यांचे शब्द खाली पडू नयेत म्हणून लोक त्यांच्यासमोर हातांच्या ओंजळी करून उभे असत. अशा परिस्थितीत मी त्यांना नकार दिला होता.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही आबांकडे हीच इच्छा व्यक्त केली होती; पण मी त्यांनाही सविनय नकार दिलेला होता. कारण, मी माझ्या तत्त्वांशी ठाम होतो.

मी राजकारणात येणार की नाही, याची पुढेही वेळोवेळी चर्चा होतच राहिली. त्याला अनेक तात्कालिक कारणेही कारणीभूत होती, आहेत. आता हेच पाहा, ‘पुढारी’चा सुवर्ण महोत्सव आणि राजीव गांधींसमवेत केलेल्या त्रिदेश दौर्‍यामुळे आमची जवळीक चांगलीच वाढलेली. राजीवजींची माझ्यावर मर्जी होती. राष्ट्राचं एक उमदं नेतृत्व म्हणून मलाही ते आवडायचे. आमच्या सतत गाठीभेटी होत असत. ते पाहून, मी नक्कीच राजकारणात जाणार, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात सुरू होती. बड्या बड्या ज्येष्ठ राजकारण्यांनीही तसाच कयास बांधला होता. डॉ. डी. वाय. पाटील तर तेव्हा मला म्हणालेले की, ‘आता आमदारकी नाही तर खासदारकीची तयारी करा. साक्षात पंतप्रधानांच्या जवळ असणं, ही सहजसाध्य गोष्ट नव्हे!’

पुढे युती सरकारच्या काळातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनही मला खासदारकीची ऑफर आलेली होती. तसे बाळासाहेबांचे नि माझेही अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. सीमा आंदोलनात मी लिहिलेला खरमरीत अग्रलेख त्यांनी त्यांच्या ‘मार्मिक’मध्ये जसाच्या तसा पुनर्मुद्रित केला होता. आमची मैत्री 1962 पासून जी जमली, ती शेवटपर्यंत. मी मुंबईला गेलो की, हमखास त्यांना भेटत असे आणि ते कोल्हापूरला आले की, मला भेटल्याशिवाय जात नसत. आमच्या गप्पांना राजकारणापासून साहित्य, नाट्य, चित्रपट आणि क्रिकेट यातला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. बाळासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.

गमतीशीर गोष्ट म्हणजे, मला एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून असाच एक दुसरा प्रस्ताव अगदी अनपेक्षितपणे आला होता. एकेदिवशी मी माझ्या कामात असाच व्यग्र असताना बाळासाहेबांचा मला फोन आला.
ते म्हणाले, “बाळासाहेब, तुम्ही लोकसभेची तयारी करा.”
मी विस्मयचकितच झालो. ते मला आता लोकसभेसाठी विचारत होते. खरं तर, शिवसेनाप्रमुखांचं सांगणं म्हणजे तो आदेशच. त्यामुळे मी अवाक्च झालो होतो. मी काही उत्तर देण्याआधीच ते मला म्हणाले, “मी आपल्याला अंतर्बाह्य ओळखतो. शिवाय, पोलिस विभागाचेही आपल्याविषयी अनुकूल अहवाल आहेत. आपण निश्चितच विजयी होणार.”

आता उत्तर द्यायची माझी वेळ होती. बाळासाहेबांचं मोठेपण, त्यांचा राग-लोभ, त्यांचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास, या सार्‍या बाबी लक्षात घेऊनच मला उत्तर द्यायचं होतं आणि मी ते देऊन टाकलं.
“क्षमा असावी! पण मी राजकारणात पडणार नाही!”
क्षणभर पलीकडे सन्नाटाच पसरला. बाळासाहेबांनी फोन ठेवला तर नाही ना, अशी मला शंका आली; पण रीसिव्हर क्रेडलवर ठेवल्यानंतरची क्लिक ऐकू आली नव्हती. मी थोडासा अस्वस्थ झालो. तेवढ्यात त्यांचा आवाज आला.
“पडणार नाही, असं म्हणू नका! राजकारणात जाणार नाही, असं म्हणा!”
त्यांच्या आवाजातील नाराजी मला स्पष्ट जाणवली होती; पण काय करणार? त्यांनी मला विचारलं होतं. खरं तर, बाळासाहेबांचे आणि माझे संबंध लक्षात घेता, त्यांना नाही म्हणणं, हे मुळीच संयुक्तिक नव्हतं; पण काय करणार? मीही माझ्या तत्त्वांशी तडजोड करू शकत नव्हतो. अर्थात, त्यानंतरही आमच्यातला स्नेह पहिल्यासारखाच राहिला, हे विशेष!

मात्र, एकदा काय झालं? 1995 साली महाराष्ट्रात युतीचं सरकार असतानाची ही गोष्ट. एकेदिवशी मला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा फोन आला. बाळासाहेबांनी मला मुंबईला बोलावलं असल्याचा त्यांनी निरोप दिला. त्याप्रमाणे मी मुंबईला जाऊन बाळासाहेबांना भेटलो. त्यांनी मला आश्चर्याचा धक्काच दिला. मला राज्यसभेवर नियुक्त करणार असल्याचं त्यांनी मला सांगितलं. साहजिकच, माझ्या ठिकाणी दुसरा कुणी असता तर पार हुरळून गेला असता; पण क्षणाचाही विलंब न लावता, मी त्यांना नम्रपणे नकार दिला.

ही गोष्ट तेवढी सोपी नव्हती. बाळासाहेबांचा शब्द मोडण्याची हिंमत भल्याभल्यांना होत नसे. मी मात्र ते धारिष्ट दाखवलं. परंतु, तसं करताना, त्यांना मी त्याचं कारणही विशद केलं. मला राजकारणापासून अलिप्तच राहायचं आहे असं सांगतानाच, मी त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी एकेकाळी मला दिलेल्या आमदारकीची ऑफरही मी नाकारली होती, याचीही कल्पना दिली. तसेच राजीव गांधी यांच्याशी माझे कसे जवळिकीचे संबंध होते व राजकारणात येण्याबाबत काय तो माझा होकारच येणं बाकी होतं, याबाबतही बोललो. मी माझ्या मताशी ठाम आहे, म्हटल्यावर मग बाळासाहेबांनी अ‍ॅड. शिरोडकरांना राज्यसभेवर पाठवलं.

राजकारणाचा मोह टाळून मी ‘पुढारी’च्या विकासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं; पण हा प्रश्न इथेच मिटला नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे माझ्याकडे अनेकदा यायचे. आमचे राजकीय गप्पांचे फड रंगायचे. राज्यात 1995 ची युतीची सत्ता येण्याअगोदर त्यांनी राज्यात काढलेल्या जनसंपर्क यात्रेची ‘पुढारी’त पब्लिसिटी करण्याबाबत त्यांनी मला विनंतीही केलेली. मीही त्यांना सर्वतोपरी साहाय्य केले होते; तर गोपीनाथरावांनीही मला आमदारकीच काय, खासदारकीबद्दलही वारंवार विचारणा केलेली. अनेकदा त्यांनी हक्कानं हट्ट धरलेला. तेव्हा भाजपला पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात आपला पाया भक्कम करायचा होता व त्यामध्ये माझी सिंहाची भूमिका राहील, अशी त्यांना खात्री होती. एकदा तर मुंडे खुद्द प्रमोद महाजन यांना घेऊन मला कोल्हापूरला भेटायला ‘पुढारी’ कार्यालयामध्ये आले. तिथंही माझ्या राजकारण प्रवेशाची चर्चा झालेली; पण मी माझे व्यक्तिगत संबंध न दुखावतील अशा पद्धतीने या गोष्टी टाळलेल्या.

पुढेही वारंवार काँग्रेसकडून आमदारकीबरोबरच खासदारकीसाठीही विचारणा होत राहिली. पुढच्या काळात तर माझे एलएल.बी.चे सहअध्यायी मित्र विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघेही मुख्यमंत्री झाले. त्या दोघांनाही मी राजकारणात यावं, असं वाटत होतं. इतकेच नव्हे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मी शिवसेनेच्या तिकिटावर कोल्हापुरातून खासदारकीची निवडणूक लढवावी म्हणून माझी खूप मनधरणी केली होती. मी त्यांनाही नकार दिला, तर त्यांनी मला राज्यसभेची ऑफर दिली; पण मी बधलो नाही. मी ही सर्व प्रलोभने टाळतानाच समाज विकासावर लक्ष केंद्रित केले व जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. मी माझ्यातील माणूस कधी गुलाम केला नाही. त्याला स्वतंत्रपणे वाढवून समाजाच्या भल्यासाठी विकसित केले.

समाजकारण हा माझा पिंड असला, तरी राजकारणातील ‘किंगमेकर’ची वाट्याला आलेली भूमिका मात्र मी तितक्याच तत्परतेनं व उत्साहाने पार पाडली. नगरसेवक, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार अशा किती तरी लोकांना घडवण्याचं, निवडण्याचं काम मला करावं लागलं व ते मी मनोभावे पूर्ण केलं. युतीच्या काळात मी युती सरकारला बारा आमदारांचं बळ दिलं होतं. शिवाय, बाळासाहेब ठाकरे यांना सांगून भरमू सुबराव पाटील यांना मंत्रिपदही मिळवून दिलं होतं, हे सर्वश्रुतच आहे; पण स्थानिक पातळीवरही माझी ‘किंगमेकर’ची भूमिका आजतागायत मी निभावतोच आहे. सर्वपक्षीय नेते असतील वा जनता… सर्वच माझ्याकडे निर्णय घेण्याचे हक्काचे ठिकाण म्हणूनच पाहतात. निर्णयासाठी प्रश्न बाळासाहेबांकडे गेला ना; मग तिथंच योग्य निर्णय होणार, याची त्यांना शंभर टक्के खात्री असते. हा विश्वास सहजासहजी मिळत नाही. ते सतीचं वाण आहे व त्यासाठी डोळ्यात तेल घालून सजग राहावं लागतं. त्याला तडा जाऊन उपयोग नसतो व मीही हे व्रत प्राणपणानं जपलं.

कोल्हापूरचं राजकारण हे अळवावरच्या पाण्यासारखं. कोणता थेंब कधी कोणत्या पानावर घसरेल किंवा खाली टपकेल, हे सांगता येत नाही. साधं कोल्हापूर महापालिकेचंच उदाहरण घेऊ. कोल्हापूर महापालिकेत तसं अनेक गटा-तटांचं राज्य. एकमेकांवर मात करून सत्ता काबीज करणं इतकंच सीमित ध्येय. महापालिकेचं राजकारण म्हणजे एकप्रकारची सर्कसच. ज्याच्या हाती हंटर तो रिंगमास्टर, अशी तिथली तर्‍हा होती. सुरुवातीला गायकवाड आणि बोंद्रे गटानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करून सत्ता काबीज केली होती. परंतु, या बुद्धिबळाच्या खेळात कधी कुणाची सरशी होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच नंतर नव्वदच्या दशकात महाडिक-नरके-पाटील या त्रिकुटानं सत्ता खेचून घेतली. पुढे मग राजकीय आघाड्यांचंच राज्य आलं.

तथापि, या गटांचे वा आघाड्यांचे नेते महापौर निवडीपूर्वी माझ्याशी संपर्क साधायचे व माझ्या सल्ल्यानेच ही निवड करायचे. ही प्रथा आजही सुरू आहे. अनेकदा तर मी महापौरपदासाठी नावही सुचवीत असे आणि ते मान्यही होत असे. या गटा-तटाच्या राजकारणात अनेक जण महापौरपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असत. अशावेळी त्या गटांच्या नेत्यांचीही चांगलीच कोंडी व्हायची. आजही होते. मग, कोणाला महापौर करायचं? हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा राहत असे; मग ते माझ्याशी चर्चा करण्यासाठी भेटत असत.

पुढे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणाला अचानक वेगळं वळण लागलं. तिथं घोडेबाजाराला एकदम ऊत आला. सकाळी एका गोटात असलेला शिपाईगडी, संध्याकाळी दुसर्‍याच तंबूत मुक्कामाला गेलेला असायचा. हरियाणामध्ये पक्षबदलाचा ‘आयाराम-गयाराम’चा किस्सा घडला व ते राजकारणाचं एक मूलभूत अंग ठरलं. त्यातलाच हा प्रकार. अर्थातच, हा सारा अर्थपूर्ण वाटाघाटींचाच प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र चालू असे. साधनशुचितेला केव्हाच तिलांजली देण्यात आलेली. त्यामुळे सर्वसामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्ता बाजूला पडलेला असायचा. ही परिस्थिती बदलायला हवी, असं मला मनापासून वाटत होतं. राजकारणाला चांगलं वळण लागून, प्रामाणिक कार्यकर्त्याला योग्य संधी मिळावी, ही माझी प्रामाणिक तळमळ होती व त्याद़ृष्टीनेच मी वाटचाल सुरू ठेवलेली. या वाटचालीत 2008 साल हे एक महत्त्वाचे वर्ष. 2008 साली कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-ताराराणी आघाडी आणि राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी अशा दोन आघाड्या होत्या. या दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख नेत्यांची मी 12 मे 2008 रोजी ‘पुढारी’ भवनमध्ये बैठक बोलावली. त्यावेळी मी सर्वांनाच म्हणालो होतो, “कोल्हापूरच्या राजकारणातील अनिष्ट प्रथांवर बाहेर वाईट चर्चा होत आहे. शाहूरायांची ही पावन भूमी अशारीतीनं बदनाम होणं योग्य नाही. माझ्यासारख्या पत्रकाराला त्याचा त्रास होतो. माझ्याच कोल्हापुरातील अनिष्ट प्रवृत्तीचे वाभाडे काढणं, माझ्या मनाला यातना देतं! राजर्षी शाहू महाराज आणि रणरागिणी ताराराणी, यांच्या नावानं कार्यरत असलेल्या आघाड्यांनी एकमेकांवर कुरघोडी करीत न बसता, शहराच्या विकासाला आणि प्रलंबित मागण्यांना चालना द्यावी. कोल्हापूरचं नाव बदनाम होईल, अशा चर्चांना पूर्णविराम द्यावा!”

माझी मात्रा बरोबर लागू पडली. सर्वच नेत्यांनी अंतर्मुख होऊन माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, आ. महादेवराव महाडिक, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे, पी. एन. पाटील यासारखे मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी एकमुखानं संमती दिली. दोन्ही आघाड्यांत समझोता होऊन पदाचं वाटप झालं. ‘पुढारी’ भवनात एका नव्या सकारात्मक राजकारणाचा प्रारंभ झाला. हे काम मी कुणा एकाची बाजू घेऊन नाही, तर नीरक्षीर विवेकबुद्धीनं केलं होतं. माझ्या या स्वभावामुळेच लोक माझा निवाडा मान्य करीत असत.

माझ्या निरपेक्ष व तत्त्वनिष्ठ भूमिकेमुळे ‘पुढारी’ भवन हे नेहमीच कोल्हापूरच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिलं. इथं अनेक बैठका होऊन अनेक महत्त्वाचे प्रश्न सुटले. याच भवनातून सीमा प्रश्नासह जिल्ह्यातील दूध-ऊस दरवाढ, टोल-रिक्षा, खंडपीठ, हद्दवाढ आदी आंदोलनांचे रणशिंग फुंकले गेले. जनतेच्या जीवाभावाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले. अनेक समाजोपयोगी समित्यांची निर्मितीही ‘पुढारी’ भवनातच झाली. दलितांसाठी अंबाबाई मंदिराचा गाभारा खुला करण्यासारख्या आंदोलनाची रूपरेषाही इथंच ठरली. विशेष म्हणजे, ‘पुढारी’चं हे भाग्य अन्य कुणालाही लाभलं नाही.

आपल्याला सकारात्मक राजकारण करायचं असेल, तर जनकल्याणासाठी चांगलेच लोक निवडले पाहिजेत, ही माझी भूमिका. गटा-तटाच्या राजकारणामध्ये मनं कलुषित होण्याचीच शक्यता अधिक असते. परंतु, माझ्याकडे यायचं तर शुद्ध मनानंच यायला हवं, याची सर्वांनाच कल्पना असते. त्यामुळेच कोणताही प्रश्न हाताळताना मला कधीच प्रयास पडत नाहीत. अगदी सहजगत्याच सारे प्रश्न सुटत जातात.

केवळ कोल्हापूर महापालिकाच नव्हे, तर आमदार आणि खासदार निवडणुकीतही ‘पुढारी’चा प्रभाव होता आणि आजही आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे प्रथम आमदार झाले तेव्हा त्यांना निवडणुकीला मीच उभा केले होते. त्यांच्या विजयी सभेत खासदारकीच्या उमेदवारीबाबत माझ्या नावाची घोषणा करून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू, असं शेट्टी यांच्यासह अनेकांनी सांगितलं होतं; परंतु मी त्याच सभेत त्यांच्या विधानांचं खंडन करून, मी राजकारणात जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलं होतं अन् पुढे माझ्या पाठिंब्यावर राजू शेट्टी हे लोकसभेचे खासदार झाले.

2009 च्या लोकसभेच्या निवडणुकीत खा. सदाशिवराव मंडलिक आणि राजू शेट्टी निवडून आले. त्यांच्या विजयात ‘पुढारी’चं पाठबळ होतं असं मी नाही, तर त्या दोघांनीच जाहीररीत्या प्रांजळपणे मान्य केलेलं आहे. कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ‘पुढारी’नं 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांत समतोल भूमिका घेतली आणि ‘पुढारी’ची राजकारणातील पकड किती अचूक आहे, हे दाखवून दिलं.

कोल्हापूरच्या, राज्याच्या अनेक प्रश्नांत मी लवादाची भूमिका उत्तमप्रकारे बजावलेली आहे. ऊस दरापासून ते सर्व आंदोलनांपर्यंत मी मध्यस्थाची भूमिका योग्य पार पाडली आहे. अगदी बारामतीला राजू शेट्टी यांनी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले, त्यावेळी दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या विनंतीवरूनच मी पुण्यात जाऊन शेतकरी संघटना व शासन यांच्यात लवादाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे.
केवळ कोल्हापूरच नव्हे, तर सांगली, सातारा, बेळगावसह अगदी कोकणातही अनेक कुटुंबांशी माझे अत्यंत घरोब्याचे संबंध होते आणि आजही आहेत. संबंध कधी संपत नसतात आणि मी नाती जोडणारा माणूस आहे. यातल्या काही ठिकाणी तर नातेसंबंधही निर्माण झालेले. अगदी उद्योगपतींपासून व्यापारी, व्यावसायिक, बिल्डर्स, डॉक्टर्स, वकील, सरंजामदार आणि नेते अशा विविध क्षेत्रांतील कुटुंबांतील अनेक कार्यक्रमांसाठी माझी सहकुटुंब उपस्थिती असते. तसेच माझा मित्र परिवारही दांडगा. या सर्वच मंडळींना कोणताही अवघड निर्णय घ्यायची वेळ आलीच, तर ते सर्वप्रथम माझाच सल्ला घेतात.

काहीवेळा कुटुंबांतर्गत वाद होतात. मतभेद होतात. संघर्ष टोकाला जातात. अशावेळी मला हमखास बोलावलं जातं. मी दोन्ही बाजू समजावून घेतो आणि मग सर्वांना मान्य होईल, असा तोडगा काढतो. त्यांना तो तोडगा मान्य होतो आणि कलह संपुष्टात येतो. अशाप्रकारच्या वादात मी लवाद झाल्याची किती तरी उदाहरणं आहेत. उगाच का जनतेनं मला ‘लवाद’ ही पदवी दिलेली आहे! अशावेळी माझा वकिलीचा अभ्यासही माझ्या मदतीला येतो. अशा वादग्रस्त कुटुंबातला दुरावा दूर होऊन ते गुण्यागोविंदानं नांदू लागले की, मला होणारा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही.

अगदी मातब्बर कुटुंबातील मालमत्तेचे न्यायालयात गेलेले वादही माझ्या शब्दावर सामोपचारानं मिटलेले आहेत. माझ्या मध्यस्थीनं अनेक कौटुंबिक तिढे कायमचे सुटलेले आहेत, याचं मला फार समाधान वाटतं. मी या कामाला एक पुण्यकर्मच मानतो. कारण, हे कौटुंबिक वाद केवळ त्या पिढीपुरतेच मर्यादित नसतात, तर त्याचा दुष्परिणाम पुढच्या पिढ्यांवरही होत असतो. तो होऊ नये आणि येणार्‍या पिढ्या सुखानं जगाव्यात, असं मला मनापासून वाटत असतं. कारण, घराघरांत कलह माजला, तर त्याचा वाईट परिणाम त्या घरासह देशाच्या उभारणीवर, संस्कृतीवरही होत असतो.

महाराष्ट्रातील राजकारणाचा एकूणच सारा पट माझ्यासमोरच उलगडत गेलेला. अनेकदा घडणार्‍या घटनांचा मी केवळ साक्षीदारच नव्हे, तर त्यातला एक घटकही बनून गेलो होतो. मलाही सत्तेमध्ये जाण्याची प्रलोभने चालून आलेली. परंतु, ती मी नम्रपणे नाकारली याबाबत मी वरती लिहिलंच आहे. याबाबत पहिली गोष्ट म्हणजे, समाजसेवा हेच माझं ब्रीद होतं आणि पत्रकारिता हा माझा धर्म होता. दुसरी गोष्ट म्हणजे, कोणाचं तरी मांडलिकत्व स्वीकारण्याचा माझा स्वभावच नव्हता. वरिष्ठांच्या ‘हो’ त ‘हो’ मिसळण्याचा माझा पिंडच नव्हता. माझे वरिष्ठ माझे आबा होते. त्यांच्यानंतर माझा बॉस मीच आहे. त्यामुळे सत्तेत जाऊन मिंधेपणा घेण्यापेक्षा स्वबळावर आपलं स्वतःचं वेगळं विश्व उभं करण्याकडेच माझं विशेष लक्ष होतं. म्हणूनच मला मिळालेली अशी अनेक प्रलोभने मी निश्चयपूर्वक नाकारली.

एकंदरीत काय, तर राजकारणात प्रवेश करण्याची संधी माझ्या दारात हात जोडून उभी होती; पण मी ती निश्चयपूर्वक अव्हेरली आणि पत्रकारितेतून समाजकारण करीत राहिलो. मी असं का केलं, यापाठीमागे माझा एक ठाम विचार होता. जर मी एखाद्या राजकीय पक्षाच्या कुबड्या घेऊन सत्तेच्या प्रांगणात पाय ठेवला असता, तर तो माझ्या स्वतंत्र बाण्यावर घाला ठरला असता. मला माझे स्वतंत्र अस्तित्व ठेवता आलं नसतं. मला माझा ‘पुढारी’ कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला नेऊन बांधावा लागला असता. त्यामुळे माझ्या निर्भीड, नि:पक्ष विचारसरणीला छेद गेला असता. म्हणूनच मी राजकारणापासून चार हात दूर राहिलो आणि समाजकारणाची कास धरली.

‘पुढारी’ची धुरा सांभाळतानाच मी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिलं. असं करताना मला कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा नव्हती; पण इतरांना संधी मिळावी म्हणून मी माझं वजन वेळोवेळी खर्ची घातलं, हा इतिहास आहे. परंतु, आज आयुष्याच्या या वळणावर, मागे वळून पाहताना मला एक प्रश्न पडतो की, तेव्हा जर मी सत्तेची पदं स्वीकारली असती. त्यामुळे निश्चितच कोल्हापूरचा अधिक विकास झाला असता. येथील सामाजिक कामांना अधिक गती मिळाली असती. कोल्हापूरकडे निधीचा ओघ लागला असता; पण मला माझ्या तत्त्वांना मुरड घालावी लागली असती, कोणाचे तरी ओझे, मग तो पक्ष असेल वा एखादं व्यक्तिमत्त्व; डोक्यावर घेऊन वागावे लागले असते.
एक तर कोल्हापूर हे स्वकर्तृत्वावर वाढलेलं शहर आहे. या शहराला किंवा जिल्ह्याला कोणताही एक असा सक्षम राजकीय चेहरा नाही. इथल्या मूलभूत प्रश्नांसाठी लढणारं सर्वंकष असं नेतृत्व काल नव्हतं, आजही नाही आणि उद्या असेल, याची खात्री नाही. इथं प्रत्येक जण आपला विशिष्ट सुभा सांभाळण्याच्या धडपडीत आहे. अन् सुभेदारीत रममाण राहण्यानं जिल्ह्याचा सर्वंकष विकास होत नाही. त्याला निश्चितच खीळ बसते. शिवाय, डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून विरोधकांना बदनाम कसं करता येईल, याचं षड्यंत्र रचण्यातही

आजचे राजकारणी मश्गूल आहेत. शह-काटशहाच्या या राजकारणात कोल्हापूरचे महत्त्वाचे अनेक प्रश्न टांगते राहिलेले आहेत. त्याची कुणाला खंत, ना खेद. त्याला कुणी वालीच नाही, अशी परिस्थिती आजही आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यापासून महापालिका हद्दवाढ ते पाणी प्रश्नापर्यंत कोल्हापूर शहराचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही विकासाची घोंगडी अशीच भिजत पडलेली आपल्याला दिसतील. सर्वंकष नेतृत्व नसल्यामुळे ही जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती मी राजकारणात उतरलो असतो, तर मुळीच निर्माण झाली नसती. मी राजकारणात नसतानाही केवळ सामाजिक बांधिलकी मान्य करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला चालना देण्याचं काम मोठ्या हिरिरीनं केलं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर या आराखड्याचं सादरीकरणसुद्धा केलं. साहजिकच, मी जर सत्तेत असतो, तर कोल्हापूरला कोणत्याही प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तिष्ठत बसावं लागलं नसतं. ‘पुढारी’च्या माध्यमातून मी कोल्हापूरच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवीत आलो. परंतु, मी राजकीय फ्रंटवरही लढा द्यायला हवा होता, ती या शहराची गरज होती, अशी चर्चा होत असली; तरी माझं व्यक्तिस्वातंत्र्य एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधून मला हे कदापि शक्य झालं नसतं.

आज आपण पुष्कळ दैनिकं आणि टी.व्ही. चॅनेल्स पाहतो. कित्येकांनी या माध्यमांचा वापर स्वतःला राज्यसभेवर खासदारकी मिळवण्यासाठी केला. म्हणजेच त्यांनी त्यामध्ये केवळ आपलाच स्वार्थ पाहिला. माझं तसं नव्हतं. मी तरुण होतो तसेच कायदा शाखेचा पदवीधरही होतो. मी जर त्यावेळी राजकारणात उतरलो असतो, तर माझी दौड केवळ मंत्रिपदापर्यंतच सीमित राहिली असती का? अर्थातच नाही. माझी महत्त्वाकांक्षा आकाशाला कवेत घेणारी होती.

म्हणूनच मला आज विचार करताना वाटतं की, तेव्हा मी जर राजकारणात प्रवेश केला असता, तर जनतेसाठी काही चांगली कामं करू शकलो असतो. परंतु, मी राजकारणात न जाताही जी काही सामाजिक कामं केली, त्यालाही तोड नाही, हेही खरेच! सियाचीन हॉस्पिटल हे त्यातील एक ठळक उदाहरण आहे. आजची परिस्थिती अशी आहे की, जनतेची जी कामं आमदार/खासदारांकडून होत नाहीत, ती कामं घेऊन अनेक लोक मला भेटत असतात. मग मी काय करतो, संबंधित मंत्र्यांना एक डीओ लेटर लिहितो. त्यामध्ये संबंधितांच्या समस्येचा ऊहापोह असतो व तो सुटणं कसं गरजेचं आहे, हे मी त्यांच्या द़ृष्टिपथास आणतो. माझ्या पत्रावर संबंधिताचं काम लगेच होतं! म्हणजे मी राजकारणात नसलो, तरी समाजकारणाबरोबरच मी नेहमीच राजकीय भूमिकाही निभावत आलो, हेही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे.

राज्यातील महत्त्वाच्या अशा सर्वच राजकीय पक्षांकडून मला नेहमीच ऑफर आल्या; पण मी बधलो नाही. कारण, मला राजकारणापेक्षा समाजकारणातच अधिक रस होता आणि आजही आहे. अखेर ज्याचा त्याचा एक पिंड असतो. प्रकृती असते आणि त्याप्रमाणंच प्रवृत्तीही घडत असते. म्हणूनच मला अब्राहम लिंकन यांच्या एका विधानाची पुनःपुन्हा आठवण येते आणि माझ्याकडून पुनरुक्तीचा दोषही घडतो.

‘Perhaps a man’s character is like a tree, and his reputation like its shadow; the shadow is what we think of it, the tree is the real thing.’

त्या विधानानुसार झाड जर मजबूत आणि खंबीर असेल, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा दरवळ सर्वत्र पसरायला वेळ लागत नाही. मी माझ्या व्यक्तिमत्त्वाची जोपासनाही याच विचारांतून केलेली आहे.

‘हिरा ठेविता ऐरणी । वाचे मारिता जो घणी ॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥’

खरा हिरा ऐरणीवर ठेवून, त्याच्यावर घाव घातले, तरी तो मुळीच फुटत नाही. असा हिराच खर्‍या किमतीला उतरतो आणि जे बनावट असतात, त्यांचा मात्र चुराच होत असतो. तुकोबारायांच्या या शिकवणीचं भान मी सदोदितच ठेवलं आणि चांगल्याचाच अंगीकार केला. त्यामुळेच राजकारणापासून चार हात दूर राहूनही राजकारणावर पकड ठेवण्याचं भाग्य मला लाभलं.

मुळात मी कोण आहे? माझी सामाजिक जाण आणि भान काय? याची मला पूर्णपणे जाणीव होती. राजकारणात पडून आमदार, खासदार किंवा मंत्री होण्याची माझी मनीषा कधीच नव्हती. माझा पिंड अन्यायाविरुद्ध लढण्याचा आहे. अशावेळी मी स्वकीयांचीसुद्धा गय करीत नाही. परंतु, राजकारणात तसं चालत नाही. आपला पक्ष चुकत असला, तरी मूग गिळून गप्प बसावं लागतं. बोटचेपेपणाची भूमिका स्वीकारावी लागते. मला ते कधीच जमलं नसतं.

का? असं का? हा प्रश्न मी जेव्हा स्वतःलाच विचारतो, तेव्हा मला त्याचं उत्तरही मिळतं. ते उत्तर असं असतं की, मी प्रथमतः आणि अंतिमतःही एक पत्रकार आहे. माझा बाणा हा पत्रकाराचा आहे. एक पत्रकार म्हणून निर्भीडपणे मला माझं मत मांडता आलं पाहिजे. नि:पक्षपणे अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभं राहता आलं पाहिजे. मी जर एखाद्या राजकीय पक्षाची टोपी डोक्यावर घातली किंवा झूल चढवली, तर माझ्यावर त्या पक्षाच्या विचारांची बंधनं लादली जातील. पक्षाच्या धोरणाविरुद्ध मला तोंड उघडता येणार नाही. मला नेमकं तेच नको होतं.

माझा बाणा स्वतंत्र आहे. विचारही स्वतंत्र आहेत. एखाद्या राजकीय पक्षात सामील होऊन मला माझा ‘पुढारी’ त्यांच्या दावणीला नेऊन बांधायचा नाही. म्हणूनच मी राजकारणापासून चार हात दूर राहिलो. त्यामुळेच मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नसलो, तरी मी सर्वांचाच आहे. मात्र, राज्यकर्त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याचा माझा अधिकार, मी अबाधित ठेवलेला आहे.
‘पुढारी’ हा कधीच कुठल्या राजकीय विचारसरणीचा नव्हता, नाही आणि यापुढेही राहणार नाही.

‘भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥’
ते तुकोबारायांचं ब्रीद. एक पत्रकार म्हणून, एक संपादक म्हणून मला तुकोबांचा हा विचार अधिक श्रेष्ठ वाटतो.

Back to top button