सिनेमा : सिनेमातले देशप्रेम | पुढारी

सिनेमा : सिनेमातले देशप्रेम

मंदार जोशी 

देशभक्तीपटांची परंपरा आपल्याकडे तशी पूर्वापार चालत आली आहे. भारत-चीन आणि भारत-पाकिस्तानमधील युद्धानंतर देशभक्तीपटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली आणि प्रेक्षकांनीही अशा चित्रपटांना उदंड असा प्रतिसाद दिला.

आपल्याकडचा हिंदी चित्रपट हा ‘जॉनर’मध्ये विभागला गेला आहे. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, अ‍ॅक्शनपट हे आपल्याकडचे मूळ जॉनर. परंतु, एक असाजॉनर आहे की, त्याला प्रेक्षकांकडून आजवर हुकमी असा प्रतिसाद मिळाला आहे. तो म्हणजे देशभक्तीपट. 1950 च्या दशकात आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुतांशी निर्मात्यांचा कल हा सामाजिकपट आणि कौटुंबिकपटांकडे होता. परंतु, भारत-चीन आणि भारत-पाकिस्तानमधील युद्धानंतर देशभक्तीपटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली आणि प्रेक्षकांनीही अशा चित्रपटांना उदंड असा प्रतिसाद दिला.

गेल्या सात दशकांमध्ये अनेक उत्तम देशभक्तीपट आपल्याकडे बनले आहेत. देव आनंद आणि विजय आनंद यांचे ज्येष्ठ बंधू चेतन आनंद यांनी 1962 मध्ये ‘हकिकत’ हा चित्रपट सुरू केल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले होते. भारत-चीन युद्धावर तो आधारला होता. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या तंत्रज्ञानात म्हणावी तेवढी प्रगती झालेली नव्हती. तरीदेखील चेतन आनंद यांनी युद्धाचे प्रसंग अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रित केले. म्हणूनच आजही हा चित्रपट सर्वोत्तम युद्धपट मानला जातो.

यातील ‘कर चले हम फिदा’ हे गाणे साठ वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या तोंडी आहे. देशभक्तीपटांचे अनभिषिक्त सम्राट ठरले ते मनोजकुमार. ‘शहीद’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांती’ आदी चित्रपटांमधून मनोजकुमारनी देशभक्तीलाच प्राधान्य दिले. म्हणूनच ‘भारतकुमार’ अशी बिरुदावली त्यांच्या नावामागे जोडली गेली. आजही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन आला की, पहिले गाणे वाजते ते ‘मेरे देश की धरती’ हे.

1965 मध्ये मनोजकुमार यांनी क्रांतिकारक भगतसिंग यांचे जीवन चित्रपट माध्यमाद्वारे पहिल्यांदा ‘शहीद’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या समोर आणले होते. दोन दशकांपूर्वी तर भगतसिंग यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायला हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्दर्शकांमध्ये एकच चढाओढ लागली होती. राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी 2002 मध्ये एकाच दिवशी भगतसिगांंवरील आपले चित्रपट प्रदर्शित केले होते. त्यापैकी संतोषींच्या ‘दि लिजंड ऑफ भगतसिंग’ या चित्रपटामधील भगतसिंगांच्या व्यक्तिरेखेने अभिनेता अजय देवगणला त्याच्या कारकिर्दीमधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता.

मनोजकुमार यांच्याप्रमाणे दिग्दर्शक केतन मेहता यांनाही देशभक्तीवरील चित्रपटांचे विशेष आकर्षण आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचे आयुष्य त्यांनी 1993 मध्ये ‘सरदार’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणले. या चित्रपटामध्ये सरदार पटेलांची व्यक्तिरेखा साकारणार्‍या अभिनेता परेश रावळचे विशेष कौतुक झाले होते. मेहतांनी कालांतराने आमीर खानला घेऊन 1857 मध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या बंडाचा थरारक इतिहास ‘मंगल पांडे – द रायजिंग’ या चित्रपटाद्वारे दाखवला होता.

स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर दिग्दर्शक श्याम बेनेगलांनी तयार केलेला ‘नेताजी – द फरगॉटन हिरो’ हा चित्रपटदेखील उत्तम बनला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाची दखलही निर्माते सुधीर फडके यांनी एका मराठी चित्रपटाद्वारे घेतली होती. डॉ. जब्बार पटेल यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर अतिशय सुंदर असा चित्रपट बनवला होता.

आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील विविध घटना या चित्रपटातूनदेखील प्रेक्षकांसमोर आल्या होत्या. परंतु, स्वातंत्र्य चळवळीतील व्यक्तिमत्त्वांवर बनलेल्या चित्रपटांमध्ये सरताज ठरला तो महात्मा गांधी यांच्यावर रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी बनवलेला आणि बेन किंग्जले यांनी अभिनित केला ‘गांधी’ हा चित्रपट. या चित्रपटाने जगभर चांगला व्यवसाय केला; तसेच मोठे कौतुकही त्याच्या वाट्याला आले. त्यावर्षी 11 पैकी तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाच्या वाट्याला आले होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याही आयुष्याने आपल्याकडील फिल्ममेकर्सना प्रभावित केल्याचे दिसते. अगदी अलीकडे कंगना राणावतने ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट बनवून लक्ष्मीबाईंना मानवंदना दिली होती.

आपल्या देशाच्या संरक्षणासंदर्भात ज्या काही विशेष घटना घडल्या, त्याचे प्रतिबिंब आपल्या हिंदी चित्रपटांमधून प्रकर्षाने दिसते. कारगिल युद्धानंतर त्याचा वेध घेणार्‍या बर्‍याच कलाकृती आपल्याकडे आल्या. जॉन मॅथ्यू माथन या दिग्दर्शकाने ‘सरफरोश’ या चित्रपटाद्वारे भारतामधील दहशतवादी कारवायांना थेटपणे पाकिस्तानला जबाबदार धरले होते. अलीकडच्या काळात उरी येथील पाकिस्तानच्या लष्करी तळावर भारताने केलेला हल्लादेखील प्रभावीपणे चित्रपटामधून पाहायला मिळाला होता. भारत-पाकिस्तानमधील 1971 च्या युद्धाची पार्श्वभूमी घेऊन बनविलेल्या ‘द गाझी अटॅक’ या चित्रपटानेदेखील 18 दिवस समुद्रात चाललेल्या थरारावर प्रकाशझोत टाकला होता.

मनोजकुमार यांच्याबरोबरच जे. पी. दत्ता यांनीदेखील आपल्या चित्रपटामधून देशभक्तीला चांगले स्थान दिले. 1997 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘बॉर्डर’ चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला होता. या चित्रपटामधील ‘संदेसे आते है’ हे गाणे सीमेवर लढणार्‍या आपल्या जवानांना खर्‍या अर्थाने सलाम करणारे ठरले. परंतु, याच दत्तांनी ‘एलओसी’मध्ये केलेला देशभक्तीचा ओव्हरडोस प्रेक्षकांनी साफ नाकारला होता. वास्तव आणि कल्पना यांची सरमिसळ बर्‍याच चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये अग्रक्रमी आहे, तो आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ हा चित्रपट. शंभर वर्षांपूर्वीचे कथानक निवडून त्यांनी खेळ आणि देशभक्ती यांचा सुरेख संगम या चित्रपटात दाखवला होता.

दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या ‘गदर’मध्ये भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर जो काही रक्तपात घडला होता, त्याचे विदारक दर्शन घडले होते. सर्वाधिक व्यवसाय करणार्‍या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा क्रमांक खूप वरचा आहे. हे दोन्ही चित्रपट 2001 मध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होऊन यशस्वी ठरले होते, हे विशेष. गोवारीकर यांनीच ‘स्वदेस’मधून विदेशात स्थायिक झालेल्या; परंतु भारताची ओढ लागलेल्या नायकाची अत्यंत प्रभावी कथा मांडली होती. शाहरूख खानच्या कारकिर्दीमधील हा सर्वोत्तम चित्रपट मानला जातो.

शोमन सुभाष घई यांनीदेखील ‘परदेस’द्वारे भारतीय संस्कृतीचा गौरव केला होता. या चित्रपटामधील ‘आय लव्ह माय इंडिया’ हे गाणे खूप गाजले होते. यापूर्वी त्यांनी ‘कर्मा’मध्येही अनुपम खेर यांनी साकारलेल्या डॉ. डँग या व्यक्तिरेखेद्वारे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा विषय मांडला होता. दिग्दर्शक फरहान अख्तर यांचा ‘लक्ष्य’ हा देशभक्तीवरचा थोडासा दुर्लक्षित चित्रपट म्हणावा लागेल. राकेश ओमप्रकाश मेहरा या दिग्दर्शकाने वास्तव आणि भूतकाळ यांचे अप्रतिम मिश्रण केले होते, ते ‘रंग दे बसंती’ या चित्रपटामध्ये. आमीर खानच्या काही वेगळ्या चित्रपटांपैकी हा एक मानला जातो.

मणिरत्नम यांच्या ‘रोजा’ आणि ‘दिल से’मधून देशभक्ती पाहायला मिळाली होती. मेघना गुलजार हिनेदेखील अगदी अलीकडे ‘राजी’ चित्रपटामधून रॉ एजंटची हृदयस्पर्शी कथा मांडली होती. पण हल्ली देशभक्तीपटांच्या नावाखाली काही दिग्दर्शक विशिष्ट पक्षांसाठी राजकीय प्रचारपट तयार करीत असल्याचाही आरोप केला जात आहे. ‘उरी’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ ही त्याची काही ठळक उदाहरणे. चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा असल्यामुळे त्याचा प्रसिद्धीसाठी उपयोग होणे साहजिकच आहे. त्यामुळेच पुढील काळात चांगल्या देशभक्तीपटांबरोबरच स्वतःचा अजेंडा राबविणारे काही प्रचारपटही आल्यास आश्चर्य वाटू नये.

Back to top button