कोल्हापूर : जिल्ह्यात थँलेसेमियाचे ३०० रुग्ण | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात थँलेसेमियाचे ३०० रुग्ण

आशिष शिंदे

कोल्हापूर : थॅलेसेमियाचे जिल्ह्यात 300 रुग्ण असून, गेल्या वर्षभरात 4 थॅलेसेमियाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. जनुकीय दोषामुळे हिमोग्लोबिन व लाल रक्तपेशी निर्मितीवर परिणाम झाल्याने थॅलेसेमिया होतो. यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होते. फाईट अगेन्स्ट थॅलेसिमिया या संस्थेच्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ थॅलेसेमिया रुग्णांसाठी महिन्याला 600 हून अधिक रक्तपिशव्या लागतात. यामुळे विवाह करताना वधू व वराची थॅलेसेमिया मायनर तपासणी करणे गरजेची आहे.

थॅलेसेमिया वंशपरंपरागत रक्त विकार

थॅलेसेमिया हा एक वंशपरंपरागत रक्त विकाराचा आजार आहे. ज्यामुळे शरीराची हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी निर्माण करण्याची क्षमता कमी होते अथवा पूर्णपणे थांबते. परिणामी थॅलेसेमियाग्रस्तांमध्ये शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. यामुळे थॅलेसेमिया रुग्णांना महिन्यातून किमान दोनवेळा रक्त द्यावे लागते.

थॅलेसेमिया रुग्णांना मिळते मोफत रक्त

जिल्ह्यात 300 थॅलेसेमिया रुग्ण आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यातून कोल्हापुरात उपचारासाठी रुग्ण दाखल होत असतात. या सर्व थॅलेसेमिया रुग्णांसाठी सरकारी व खासगी रक्तपेढ्यांमधून मोफत रक्त दिले जाते.

थॅलेसेमियाचे प्रकार

अल्फा थॅलेसेमिया, अल्फा थॅलेसेमिया मेजर, अल्फा थॅलेसेमिया मायनर, बीटा थॅलेसेमिया

थॅलेसेमियाची लक्षणे

अ‍ॅनिमिया, सतत दम लागणे, थकवा येणे, श्वास अपुरा पडणे, छातीची धडधड वाढणे, चेहरा निस्तेज दिसणे

थॅलेसेमिया हा वंशपरंपरागत आजार आहे. यामुळे जवळच्या नात्यात विवाह होत असल्यास वधू व वराची थॅलेसेमिया मायनरसाठी तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे थॅलेसेमिया रोखता येऊ शकते.
– धनंजय नामजोशी, महाराष्ट्र अध्यक्ष, फाईट अगेन्स्ट थॅलेसिमिया

 

Back to top button