नव्या ‘सुवर्णयुगा’चा प्रारंभ | पुढारी

नव्या ‘सुवर्णयुगा’चा प्रारंभ

डॉ. योगेश प्र. जाधव

भारतीय गुंतवणूक मानसिकता अद्याप सुवर्णकेंद्रित आहे. देशातील पहिले ‘आंतरराष्ट्रीय सुवर्णविनिमय केंद्र’ गुजरातमधील गांधीनगर येथे सुरू झाले आहे. आतापर्यंत बँकांमार्फत परवानाधारक आयातदार फक्त सोने आयात करत होते. आता या नव्या व्यवस्थेमुळे जागतिक सुवर्ण बाजारात एक महत्त्वाचा व निर्णायक घटक म्हणून भारत काम करू शकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिफ्ट शहर गांधीनगर (गुजरात) येथे 29 जुलै रोजी ‘भारतीय आंतरराष्ट्रीय सुवर्णविनियम केंद्रा’चे उद्घाटन केले आणि 2020-21 च्या अर्थसंकल्पात व्यक्त केलेल्या निर्धाराची पूर्तता केली. भारतीयांना अभिमानास्पद ठरणारी व दीर्घ कालखंडाचा विचार करता अर्थव्यवस्थेला, वित्त व्यवहाराला चालना देणारी ही व्यवस्था भारताच्या सुवर्णयुगाचा प्रारंभ करणारी ठरण्याची शक्यता असल्याने त्याचे स्वरूप, फायदे व महत्त्व लक्षात घेणे आवश्यक ठरते. ही एक शांततापूर्ण क्रांती (Slient Revolution) म्हणावी अशी दखलपात्र घटना आहे, हे निश्चित.

भारतीयांचे सुवर्णप्रेम जगप्रसिद्ध आहे. जागतिक पटलावर गरिबांच्या यादीत (दरडोई उत्पन्नाच्या निकषावर) भारत गणला जात असला, तरी सातत्याने व मोठ्या प्रमाणात सोने आयात करणार्‍या राष्ट्रांत काही वेळा भारताने चीनलाही मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोन्याची मोठी बाजारपेठ म्हणून आपण चीननंतर दुसर्‍या क्रमांकावर सातत्याने असल्याचे महत्त्वाचे कारण भारतीय गुंतवणूक मानसिकता अद्याप सुवर्णकेंद्रित आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, सोने हवे तेव्हा विकता येते आणि त्याच्या किमतीतही वाढ होत असल्याने त्याला प्राधान्य दिले जाते.

सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर 1964 मध्ये 64 रु. होता; तो 1970 मध्ये 184, 1980 मध्ये 1330, 1990 मध्ये 3200, तर 2000 मध्ये 4400 व आता 2022 मध्ये 53000 आहे. यातूनच सुवर्णपरतावा स्पष्ट होतो. लग्नसराई, सण, महत्त्वाचे प्रसंग सुवर्ण खरेदीनेच पूर्ण होतात. ही एवढी मोठी अंतर्गत बाजारपेठ असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात आपण केवळ ग्राहकच राहिलो. ही उणीव भरून काढणे आता IIBX (Indian International Bullion Exchange) म्हणेजच ‘भारतीय आंतरराष्ट्रीय सुवर्णविनिमय केंद्रा’ने शक्य होणार आहे. आतापर्यंत बँकांमार्फत परवानाधारक आयातदार फक्त सोने आयात करत होते. त्याऐवजी ही नवी कार्यक्षम व पारदर्शी व्यवस्था कार्यरत होईल.

सहभागी घटक

IIBX च्या स्थापनेत सीडीएसएल (CDSL), एनएसई, एमसीएक्स यांचा सहभाग असून केवळ सोने व चांदी खरेदी (आयात) एवढेच नाहीतर सुवर्ण, चांदी यांचे साठवण करणारी व्यवस्था उपलब्ध होते. सुवर्णकार (दागिने तयार करणारे), अनिवासी भारतीय व्यक्ती व संस्था यामध्ये व्यवहार करू शकतात. प्रारंभी 995 शुद्धतेचे 1 किलो सोने पूर्ण किंमत देऊन व नंतर टी+2 म्हणजे व्यवहार दोन दिवसात पूर्ण करणेची सुविधा दिली जाणार आहे. युएईप्रमाणे 12.5 किलोच्या सुवर्ण विटादेखील उपलब्ध होतील. चांदीचे व्यवहार नंतर सुरू होणार आहेत. सध्या जरी एमसीएक्स व एनसीडेक्स यावर सोन्याचे हवाला व्यवहार होत असले, तरी त्यांच्याकडे प्रत्यक्ष सुवर्ण साठा सुविधा नाहीत.

आवश्यक अटी व कार्यपद्धती

सुवर्णविनिमय केंद्रात (IIBX) सहभागी होण्यासाठी 25 कोटींची नक्त मत्ता असणे आवश्यक आहे. सुवर्णकार व्यापारी, ग्राहक म्हणून सहभागी होऊ शकतो. त्यांना गिफ्ट शहरातील IFSC मध्ये शाखा उघडता येते. सध्या 64 सुवर्णकार यात सहभागी असून, ही संख्या शंभरहून अधिक लवकरच होईल. सुवर्ण आयातीचे महाप्रवेशद्वार (Cateway of Bullion imports) असे याचे स्वरूप असणार असून, सर्व आधुनिक व्यापार परिसेवा यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे केंद्र म्हणून कार्यरत होईल. यामार्फत BDR (Bullion Deposit Receipts) म्हणजे सुवर्ण ठेवपावत्या दिल्या जातील.

त्या तत्काळ डीमॅट स्वरूपात सुवर्ण खरेदीदाराच्या खात्यावर केवळ 30 मिनिटांत दिल्या जातील. सुवर्णकार त्याआधारे हवे तेव्हा प्रत्यक्ष सोने घेऊ शकतो. पात्र सुवर्णकारांना रिझर्व्ह बँकेने डॉलरचा व्यवहार करणेस अनुमती दिली असून, ते सुवर्ण आयात करू शकतात व भारतात पुरवठा करू शकतात. हे आंतरराष्ट्रीय विनियम केंद्र असल्याने सर्व व्यवहार डॉलरमध्येच होणार आहेत. सुवर्णकारांना यामध्ये व्यापारी सदस्य या नात्याने सहभागी होता येते. हे केंद्र ड्युटी फ्री क्षेत्रात असल्याने आयात शुल्क भरावे लागणार नाही.

IIBX चे फायदे

जागतिक सुवर्ण बाजारातील एक महत्त्वाचा व निर्णायक घटक म्हणून भारत काम करू शकेल व त्यातून अर्थव्यवस्था व रुपया बळकट होईल. सध्या सोने आयातीत असेल त्या किमतीस व्यवहार करावा लागतो. किमतीवर आपला प्रभाव नाही. परंतु IIBX मुळे खरेदीचे विविध दर (Bid Rate) व प्रमाण (Quantity) देऊन त्याचा फायदा घेता येतो. सध्या विविध बँका सोने आयात करून सुवर्णकारांना देतात. यामध्ये सुवर्णकारांना मागणी नोंदवलेले सोने घ्यावे लागते; अन्यथा दंड असतो. नव्या व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक दराने खरेदी करणे शक्य झाल्याने बँकांचे शुल्क वाचते. ही बचत प्रती किलोस 50 डॉलर एवढी मोठी असल्याने 2020 मध्ये 1069 किलो सोने आयात केले. त्यावर 41 द.ल. डॉलरची बचत झाली असती. महत्त्वाचे म्हणजे विशेष निर्यात क्षेत्रात (SEZ) असणारे सर्व सुवर्णकार IIBX मार्फत जोडले जाणार असून, सोन्याची एकसंघ व कार्यक्षम बाजारपेठ तयार होईल.

सुवर्णकार आपली सुवर्णसाठा गुंतवणूक अतिशय कार्यक्षमपणे करू शकतात. सध्या दराची अनिश्चितता, पुरवठा अडचण यामुळे सुवर्णसाठा (Gold Inventory) अधिक ठेवतात. त्याऐवजी आवश्यकतेनुसार व तत्काळ सोने घेऊ शकत असल्याने या बचतीचाही मोठा फायदा होईल. भारतासारख्या खंडप्राय देशात सोन्याचे दर विविध राज्यांत बदलतात. हे बदल हळूहळू कमी होऊन ‘एक देश एक दर’ असा सुवर्ण नियम येऊ शकेल. यासाठी अर्थातच देशभर सुवर्णसाठे ठेवणे, त्यांचे व्यवहार IIBX मधून होणे आवश्यक ठरते. भारत हा सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध होता. ते वैभव पुनश्च या IIBX मार्फत साध्य होऊ शकते. अर्थात, विखुरलेला ‘सुवर्णकार’ नव्या तंत्रसुकर पद्धतीत वेगाने समाविष्ट झाला, तर अंतिम ग्राहकास ‘सुवर्णयोग’ विश्वासार्ह व किफायतशीर होऊ शकेल.

भारतातील सोने : एक द़ृष्टिक्षेप

सोन्याचा सर्वाधिक साठा असणार्‍या जगातील पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताकडे 754 मेट्रिक टन इतका सोन्याचा साठा असून, त्यावर आरबीआयचे नियंत्रण आहे. याशिवाय किमान दोन हजार टन सोने भारतातील मंदिरांच्या मालकीचे आहे. देशातील 75 टक्के कुटुंबांकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सोने आहे. गतवर्षी 2021 मध्ये एकुणात 797 टन सोने खरेदी केले होते. या वर्षात 800 ते 850 टन इतके सोने खरेदी होईल, असा अंदाज ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने व्यक्त केला आहे.

Back to top button