बहार विशेष : दिव्य तेज झळकती! | पुढारी

बहार विशेष : दिव्य तेज झळकती!

अमृता मोरे : सगळ्या संतांचं दैवत असणारा ‘पंढरीनाथ’ हा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत मानला जातो. विठूरायाचं सावळं-साजिरं रूप पाहण्यासाठीच वारकरी शेकडो किलोमीटरचं अंतर चालून पंढरपूरला जातात. त्याचं दर्शन घेतात आणि आपापल्या वाटेनं परत जातात. या त्यांच्या प्रवासात जितकं प्रेम, आनंद आणि ओलावा आहे, तितकीच रग जिरवण्याचीही सोय आहे. गेल्या सातशे-साडेसातशे वर्षांत या चळवळीनं प्रचंड रूप धारण केलेलं पाहायला मिळतं. आज आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने…

अध्यात्म किंवा परमार्थ हा उतारवयात करायचा उद्योग आहे, असा आपल्याकडे सरसकट समज दिसतो. निवृत्तीनंतर वेळ घालवायला काय करायचं? तर ‘गाथा-ज्ञानेश्‍वरी’ वाचायला सुरुवात करायची, असा लोकांचा समज असतो. वैदिक परंपरेनुसार जीवनातल्या चार आश्रमांपैकी वानप्रस्थाची संकल्पना तशीच दिसते. मात्र वारकरी संप्रदायाकडे थोड्या वेगळ्या द‍ृष्टीनं पाहण्याची गरज आहे. कारण मुळातच हा संप्रदाय वेदप्रामाण्याच्या पलीकडे पाहणारा आहे. वारकरी संप्रदायाची बांधणी करणारी, पांडुरंगाला भजणारी बहुतेक संतमंडळी तरुण होती. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळातच अध्यात्म-परमार्थ आणि स्वार्थ-प्रपंच यांची सांगड घातलेली दिसते.

संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्‍वर माऊली संप्रदायाचा प्रमाणग्रंथ म्हणजेच ‘ज्ञानेश्‍वरी’ लिहिताना अवघ्या 16 वर्षांचे होते. तर संप्रदायाचा कळस रचणार्‍या तुकोबांनी सर्व अभंगांची रचना करून त्यांचं जीवितकार्य संपवलं तेव्हा ते 42 वर्षांचे होते. संप्रदायात सर्वात ज्येष्ठ म्हणून ज्यांचा उल्लेख ‘काका’असा केला जातो, त्या गोरोबा काकांचं जीवन 50 वर्षांहून अधिक नव्हतं. तर सावतोबांचं आयुष्य अवघ्या 45 वर्षांचं. या सगळ्या मंडळींनी चंद्रभागेच्या वाळवंटी जेव्हा ‘खेळ मांडला’ होता, तेव्हा नामदेवरायसुद्धा पंचविशीच्या मागे-पुढे होते. निवृत्तीनाथ त्यांच्याहून तीनेक वर्षांनी लहान, सोपानदेव-मुक्‍ताई तर ज्ञानदेवांहून लहान आणि जनाबाई तिशीच्या मागे-पुढे. चोखोबांचं वयसुद्धा जास्त नव्हतं. याचाच अर्थ, ऐन तरुण वयात सर्व संतमंडळी संप्रदायात कार्यरत होती.

संबंधित बातम्या

या सगळ्या संतांनी कामाला दुय्यम न मानता कामातच परमार्थ शोधलेला आपल्याला दिसतो. सावतोबांनी तर ना कधी वारी केली, ना ते कधी पंढरीला गेले. ‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।’ म्हणत त्यांनी त्यांचा विठ्ठल त्यांच्या मळ्यातच शोधला. तर जनाबाईंनीसुद्धा ‘दळिता कांडिता’च देवाची भजनं म्हटली आणि केवळ आपलं कामच नाही, तर तुकोबा ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।’ असं सांगतात. हे संत उदासीन वृत्ती बाळगण्याऐवजी कृतिशील उद्यमाचा संदेश देतात. थोडक्यात, सर्वसंग परित्याग वगैरे कल्पनांना वारकरी संप्रदायात स्थान मिळालेलं दिसत नाही.

‘सुखे करावा संसार। परि न सांडावे दोन्ही वार।’, असं तुकोबा सांगतात. आणि तेच सगळ्या संतांनी केलेलं पाहायला मिळतं. संसार-प्रपंच करत करत परमार्थ करायचा, हीच तर वारकरी संप्रदायच्या उपासनेची गुरुकिल्ली आहे. अर्थात, संसार करत असताना चांगली कर्मं करणं मात्र अनिवार्य आहे. आणि त्या केलेल्या चांगल्या कामाचं फळसुद्धा मागायला हरकत नाही. तसं ते संतांनीही मागितलेलं दिसतं. त्यांना ते हवं आहे, ते तो स्वत:चा हक्‍क समजतात.

माऊली म्हणतात,
‘सर्व सुकृताचे फळ मी लाहीन। क्षेम मी देईन पांडुरंगी।’
हे सगळं वैयक्‍तिक पातळीवर साधत असताना संतांनी एकेकट्यानं केल्या जाणार्‍या परमार्थाची मात्र इच्छा केलेली दिसत नाही, तर एकटेपणातल्या ब्रह्मानंदी लागणार्‍या टाळीपेक्षा समाजाभिमुख उपासना त्यांनी जवळ केली आहे. त्यामुळेच तर, ‘वारी’सारखी सामुदायिक उपासनापद्धती ही त्यांच्यासाठी अनुपम्य सोहळा आहे. ज्ञानदेव-नामदेव अनुक्रमे ऐन विशी-पंचविशीत तीर्थाटनाला गेले होते. भारतभरात फिरून त्यांनी परिस्थितीचं अवलोकन केलेलं दिसतं. आणि त्यानंतरच नामदेवरायांनी संप्रदायाचा महाराष्ट्राबाहेर प्रचार-प्रसार केला. पंजाबात त्यांना ज्या प्रमाणात मानतात, त्यावरून त्यांच्या एकंदर प्रभावाची कल्पना येते.

या सगळ्या संतांनी समाजाला केवळ पारमार्थिक दिशाच दिली असं नाही, तर समाजाला एकत्र करण्याचं, समाजात विवेक रुजवण्याचंही महत्त्वाचं काम केलेलं दिसतं. ‘सकळांसि येथ आहे अधिकार’, असं म्हणत समाजातला भेदभाव दूर करण्यात संतांनी फार मोठा हातभार लावलेला दिसतो. ‘नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती।’ असं म्हणत त्यांनी अंधश्रद्ध कल्पनांना मोडीत काढलेलं पाहायला मिळतं. ‘ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधू।’, असं म्हणत बाबा-बुवांपासून समाजाला परावृत्त करण्यात संतमंडळी कायमच अग्रस्थानी होती.

या सगळ्या संतांचं दैवत असणारा ‘पंढरीनाथ’ हा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत मानला जातो. या विठूरायाचं सावळं-साजिरं रूप पाहण्यासाठीच वारकरी शेकडो किलोमीटरचं अंतर चालून पंढरपूरला जातात. त्याचं दर्शन घेतात, पायाला मिठी मारतात आणि आपापल्या वाटेनं परत जातात. या त्यांच्या प्रवासात जितकं प्रेम, आनंद आणि ओलावा आहे, तितकीच रग जिरवण्याचीही सोय आहे. संप्रदायाच्या सुरुवातीला त्याचा उद्देश कदाचित तसा नसावा. पण तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर माणसाचं जगणं सुखासीन होत गेल्यानं आताच्या काळात वारीकडे त्याही द‍ृष्टीनं पाहायला हरकत नाही. नाचत-गात-खेळत चालत जाणं ही अवघ्यांसाठी एक पर्वणीच असते.

आणि हे सगळं ज्या विठूरायासाठी आहे, तो एक आगळावेगळा देव म्हणावा लागतो. तो कधीही चतुर्भुज (चार हातांच्या) रूपात दिसत नाही. विठ्ठलाला दोनच हात आणि तेही कंबरेवर. कारण तो तुमच्या-आमच्यातला देव आहे. माणसांतला, माणसांसारखा देव आहे. तो भव्य-दिव्य असला तरी त्याचं दडपण येत नाही, तर ती भव्यता आपल्यालाही मोठं व्हायचं प्रोत्साहन देते. तो तेज:पुंज असला, तरी त्याच्या तेजानं डोळे दिपत नाहीत, तर पुढची वाट प्रकाशमान होते. हा देव सोनं-नाणं, पैसा-अडका काहीही देत नाही. ना कुणाला वरदान देतो, ना अभय देतो. म्हणूनच कदाचित इतर देवांप्रमाणे त्याचे हात वरद मुद्रेत किंवा अभय मुद्रेतसुद्धा दिसत नाहीत. विठ्ठलाचे दोन्ही हात गेली अठ्ठावीस युगं कंबरेवरच आहेत. आणि त्याचं आणि हिंसेचं तर वाकडंच आहे. त्याच्या हातात चुकूनही कधी कोणतं आयुध पाहायला मिळत नाही.

माऊली म्हणतात तसं, पांडुरंग हा केवळ प्रेमाचा कल्लोळ आहे. ते विठ्ठलाला म्हणतात,
‘तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतळ।
पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा॥’
प्रेमाचा जर असा कल्लोळ असेल, तर राग, द्वेष, हिंसा या सगळ्याला जागाच कशी असेल? मग भले सगळी संतमंडळी तरुण असली तरीही. आज आपल्याला आजूबाजूला तरुण आणि राग, तरुण आणि हिंसा हे अतिशय ग्लॅमराईज्ड समीकरण पाहायला मिळतं. भारतीय समजाचा गेल्या चाळीस-पन्‍नास वर्षांचा सांस्कृतिक आढावा घेतला, तर विशेषत: अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅनला जस जसं ग्लॅमर प्राप्‍त होत गेलं, तसतसा तरुणांना हा अँगर चिकटल्यासारखा झालाय. पण इथे वारकर्‍यांचे सगळे नायक म्हणजेच संतमंडळी आणि साक्षात विठ्ठलसुद्धा हिंसक नाहीत. हां, प्रसंगी त्यांना राग येतो, ते तो व्यक्‍तही करतात. कधी कडक शब्दांत समोरच्याला दमही देतात. पण हिंसा करताना इथे कोणीही दिसत नाही. चुकल्या-माकल्यांना त्यांची चूक दाखवावी, प्रसंगी जागाही दाखवावी; पण मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन घडवून आणायचं ते सहिष्णुतेनंच! असा यांचा शिरस्ता दिसतो. नाहीतर ‘नाठाळाचे माथी काठी हाणू’ म्हणणारे तुकोबा अभंगांच्या वह्या बुडवल्यावर तेरा दिवस सत्याग्रहाला कशाला बसले असते? अपमान सहन न होऊन कुटीचं दार लावून घेतलेले ज्ञानदेव कोणताही विध्वंस न करता ताटी उघडून बाहेर कशाला आले असते? हिंसा इथे सर्वस्वी वर्ज्य आहे. आणि त्याचं कारण कदाचित हा शस्त्रविरहित देव असावा. हा आगळावेगळा देव तारणहार नाही, तो भक्‍तांच्या शत्रूंना मारायला कधीही येत नाही. आलाच तर दळण-कांडण आणि वेणी-फणी करायला मदतीला तेवढा येतो.तिथेही तो दैवी सामर्थ्यानं सगळंच्या सगळं दळून देत नाही, तर माणसांप्रमाणेच स्वत: श्रम करून दळायला मदत करतो.

तसंही विठ्ठलाकडे काही मागणं आणि त्यानं काही देणं हेच मुळी अपेक्षित नाही. विठ्ठल केवळ प्रेम देतो आणि त्याबदल्यात त्याला प्रेमच हवं असतं. विठ्ठलला अमुक एक बळी लागतो, अमुकच नैवेद्य लागतो, असं कोणाच्या ऐकीवात आहे का? नसणारच. कारण मुळातच विठ्ठलला कशाचीही अपेक्षा नसते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,
‘गात जा गा, गात जा गा, प्रेम मागा विठ्ठला!’

पुन्हा जर विठ्ठलाच्या स्वरूपाचा, त्याच्या मूर्तीचा विचार करायचा झाला, तर त्याचे दोन्ही पायसुद्धा समांतर असतात. समचरण. कारण हा देव बॅलन्स्ड आहे. आणि त्याच्या भक्‍तांनीही तसंच असावं, अशी कदाचित त्याची इच्छा असावी. राग, द्वेष, मद, मोह, मत्सर या सगळ्यांवर तो मात करायला सांगतो, पण लोभ मात्र ठेवायला सांगतो. आणि लोभ कशाचा? तर त्याला भेटण्याचा लोभ! त्याला डोळे भरून पाहण्याचा लोभ! लोकांच्यात राहण्याचा लोभ! एकत्रित भगवंताचं नाव घेण्याचा लोभ! आणि तोही इतका की, समाधानच होणार नाही. या जन्मात मिळेल तेवढं पुरणार नाही. म्हणूनच तुकोबा म्हणतात,
‘तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।’

मोक्षापेक्षा संतांना पुन: पुन्हा जन्म घ्यायचाय, कारण पुन: पुन्हा पांडुरंगाचं दर्शन व्हावं, पुन: पुन्हा त्याची भक्‍ती करता यावी, पुन: पुन्हा प्रेम करता यावं, अशी त्यांची इच्छा आहे. तेव्हा इतर कोणत्याही भावनांपेक्षा केवळ ही प्रेमाची भावनाच सर्वत्र भरून राहावी, अशी इच्छा असणारा हा अलौकिक देव आहे.

पण गंमत म्हणजे ‘विठ्ठल’ जसा प्रेमाचं प्रतीक आहे, तसाच तो खोडकरपणाचं आणि खेळकरपणाचंही प्रतीक आहे. वारकरी वारीला जात असताना किंवा एरवीसुद्धा पाऊली खेळतात, फुगड्या वगैरे घालतात. हमामा, हुतूतू, फुगडी, विटीदांडू, चेंडूफळी, लगोरी अशा कितीतरी खेळांचे उल्लेख संतांच्या अभंगांमध्ये सापडतात. आणि हे सगळे खेळ स्वत: पांडुरंगही खेळतो. आणि इतकंच नाही, तर या भगवंताच्या क्रीडाही आहेत. बाळक्रीडेचे कित्येक अभंग प्रसिद्ध आहेत. आणि त्याचवेळी तो कलासक्‍तही आहे. तो वेणू वाजवतो, नाचतो, गातो. तो काला करून सगळ्यांना एकत्रित आणतो, भेदाभेद विसरायला लावतो.

थोडक्यात काय, तर ‘वारकरी संप्रदाय’ ही प्रामुख्याने तरुणांनी संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी सुरू केलेली चळवळ होती. गेल्या सातशे-साडेसातशे वर्षांत या प्रेमाच्या चळवळीनं प्रचंड रूप धारण केलेलं पाहायला मिळतं. स्वाभाविकपणे लोकसंख्येच्या प्रमाणात वारकरी संप्रदायसुद्धा वाढत गेलेला दिसतो. गावा-खेड्यांतून लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होताना दिसतात. इतकंच नाही, तर गेल्या काही वर्षात शहरी मंडळीसुद्धा वारीकडे आकृष्ट होत असलेली पाहायला मिळतायंत.

या सगळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आजच्या तरुणांचं विठ्ठलाशी आणि वारीशी काय कनेक्शन दिसतं? तर, काही अंशी परिस्थिती आशादायी वाटते. वारीत अनेक तरुण चेहरेसुद्धा पाहायला मिळतात. सांप्रदायिक घरांमधल्या तरुणांबरोबरच कोणतीही सांप्रदायिक पार्श्‍वभूमी नसलेले, नव्यानं वारीत येणारे तरुणही इथे पाहायला मिळतात. दिवसेंदिवस वारी डिजिटलीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचतेय. देहूच्या स्वप्नील मोरेनं सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’चं यंदाचं दहावं वर्ष होतं. ‘अभंग री-पोस्ट’ नावाचा म्युझिक ग्रुप गेली अनेक वर्षं संतांच्या रचनांना आधुनिक चाली लावून हे अभंग नव्या रूपात तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. तरुणांची शक्‍ती, ऊर्जा, ऊर्मी, तेज हे सगळं एकवटून समाजहिताच्या आणि समाज प्रबोधनाच्या कामी येण्यासाठी संप्रदायासारखं संघटन इतिहासात उपयुक्‍त ठरलं होतं आणि इथून पुढेही ठरू शकतं. कन्झ्युमरिझमच्या व्यूहात अडकत चाललेल्या नव्या जमान्याला ‘चित्ती असू द्यावे समाधान’ म्हणणारे तुकोबा आणि व्यक्‍तिकेंद्रित होत चाललेल्या पुढच्या पिढ्यांना ‘विश्‍वात्मक देवाला’ प्रार्थना करणारे ज्ञानोबा नक्‍की दिशा दाखवतील, यात शंका नाही. विठ्ठलाच्या दिव्य तेजात विवेकाची वाट सापडेल, यातही शंका नाही.

हेही वाचा

Back to top button