पर्यटन : पर्यटन उद्योगाला चालना | पुढारी

पर्यटन : पर्यटन उद्योगाला चालना

संजीव ओक

भारतीय पर्यटक प्रवासासाठी अधिक पैसे मोजण्यास तयार असून, देशातील पर्यटन उद्योग नवनवे विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाला आहे. 410 अब्ज डॉलर इतकी अवाढव्य उलाढाल यात अपेक्षित असून, त्याचा फायदा या क्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांना थेट पोहोचणार आहे. म्हणजेच, सर्व स्तरांतील घटकांना पर्यटनातील उलाढालीचा लाभ मिळेल.

भारतीयांची प्रवासाची आवड वाढली असून, वैविध्यपूर्ण ठिकाणांना भेट द्यायला त्यांना आवडते. विशेषत:, साथरोगानंतरच्या कालावधीत भारतीयांच्या प्रवासाच्या प्राधान्यक्रमात लक्षणीय बदल झालेले आहेत. नवनवीन ठिकाणांंना भारतीय भेट देत असून, भारतीयांचा प्रवास खर्च 150 अब्ज डॉलरवरून 2030 पर्यंत 410 अब्ज डॉलर इतका होईल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. बाहेरदेशी सहलींचा यातील वाटा 1 टक्का असला, तरी प्रवास खर्चात तो 25 टक्के इतका आहे. मात्र, येत्या दशकात तो 35 टक्क्यांपर्यंत वाढेल, असे संकेत मिळत आहेत. एकूण सहलींची संख्या 5 अब्जपर्यंत वाढेल, असेही मानले जाते.

म्हणजेच भारतीय पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करतील. विशेषतः, ज्या देशांचे अर्थकारण पर्यटकांवर अवलंबून आहे, असे देश त्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करतील. मात्र, भारतीय प्रवासी पारंपरिक पर्यटनस्थळांच्या पलीकडे जात नवीनतेच्या शोधात असून, त्यांना नावीन्य हवे असल्याचे एक अहवाल सांगतो. म्हणूनच दा नांग (व्हिएतनाम), अल्माटी (कझाकिस्तान), पारो (भूतान), बाकू (अझरबैजान), तिबिलिसी (जॉर्जिया) आणि ताश्कंद (उझबेकिस्तान) सारख्या ठिकाणांना वाढता प्रवास आहे. 2019 च्या तुलनेत प्रवासी कंपन्यांनी 250 ते 1000 टक्के वाढ नोंदवली आहे. ही वाढ अभूतपूर्व अशीच आहे. बाली आणि फुकेतसारख्या दक्षिण पूर्व आशियाई देशांतील प्रवासीस्थळांऐवजी भारतीयांनी अपारंपरिक ठिकाणांना प्राधान्य दिले आहे.

दुबई हे भारतीयांचे आवडते स्थळ होते. मात्र, आता तुलनेने कमी भारतीय दुबईला भेट देत आहेत. लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोसारख्या लांबच्या ठिकाणांमध्ये प्रवासी भाड्यात 50 टक्के वाढ झाल्यामुळे घट झाली आहे. बंगळूर-सिंगापूर मार्गालाही 2020 च्या तुलनेत 28 टक्के फटका बसला आहे. मात्र, त्याचवेळी अबुधाबी आणि मध्य पूर्वेत भारतीय मोठ्या संख्येने जाताना दिसून येत आहेत. किफायतशीर प्रवासाबरोबरच भारतीय व्हिसा धोरणांचा लाभ घेत आहेत. श्रीलंका, मलेशिया, थायलंड या देशांनी व्हिसा मुक्त प्रवेशाची केलेली घोषणा मोठा बदल घडवून आणणारी ठरली. म्हणूनच, या देशांना भेट देणार्‍या भारतीयांची संख्या 35 टक्क्यांनी वाढली. विमान कंपन्यांना ती अनपेक्षित लाभ मिळवून देणारी ठरली. व्हिएतनाम एअरलाईन्सच्या प्रवाशांमध्ये 40 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आपण मोजत असलेल्या पैशांच्या मोबदल्यात नावीन्यपूर्ण अनुभव, आरामदायी व्हिसा पॉलिसी यांना प्राधान्य दिले जात आहे. म्हणूनच, चौकटी तोडून ते नवनवी पर्यटनस्थळे शोधून त्यांना भेट देत आहेत. प्रवासाची व्याख्या अधिक व्यापक होताना दिसते.

भारत ही विमान कंपन्यांसाठी सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आता जगभरातील विमान कंपन्यांना त्याचा अनुभवही येत आहे. व्हिएतनाम एअरलाईन्सने नोंदवलेली 40 टक्के वाढ ही बाब अधोरेखित करणारी आहे.

साहसी खेळाला चालना देणारी ठिकाणे, तसेच सांस्कृतिक ठिकाणांना भारतीयांची पसंती आहे. पर्यटनाला चालना देण्यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. पर्यटक आपले अनुभव इन्स्टाग्राम तसेच अन्य माध्यमांवरून कसे ‘ट्रेंड’ होतील याचा विचार करतात. व्हिसा हा विदेशात जाणार्‍या पर्यटकांसाठी महत्त्वाचा विषय असतो. व्हिसा प्रक्रिया सुलभ असेल, तर प्रवासी त्या देशाची प्राधान्याने निवड करतात. म्हणूनच काही निवडक देशांनी भारतीयांसाठी व्हिसा फ्री धोरण जाहीर केले, त्याचा त्या देशांना लक्षणीय लाभ होताना दिसून येतो. देशातील प्रवासी उद्योग अर्थातच, पर्यटकांच्या बदलत्या प्राधान्यक्रमाशी स्वतःला जुळवून घेत आहे. नवीन गंतव्यस्थाने समाविष्ट करण्यासाठी विमान कंपन्या त्यांचे नेटवर्क वाढवत आहेत, तर पर्यटन कंपन्या स्वतःला अद्ययावत ठेवत आहेत. दक्षिण आफ्रिकेला गेल्या आर्थिक वर्षात केवळ 79 दशलक्ष भारतीयांनी भेट दिली. साथरोगाच्या पूर्वीच्या तुलनेत ही आकडेवारी केवळ 48 टक्के इतकीच आहे. थेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि भारतीयांना आकर्षित करू शकणार्‍या नावीन्यपूर्ण स्थळांचा अभाव, ही आफ्रिकेसमोरील समस्या आहे.

त्याचवेळी, भारतीय मोठ्या संख्येने प्रवासासाठी पैसे खर्च करत असल्याचेही एक अहवाल सांगतो. मजबूत अर्थव्यवस्था, वाढता मध्यमवर्ग आणि युवा लोकसंख्या यामुळे भारतीय प्रवासाला प्राधान्य देत आहेत. उत्पन्नातील अपेक्षित बदलांमुळे वार्षिक 35 हजार डॉलर उत्पन्न असणार्‍या कुटुंबांमध्ये सहापट वाढ झाली आहे. विदेशी प्रवास तुलनेने सुलभ झाला असल्यामुळे, हे प्रवासी श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि नेपाळ येथे मुख्यत्वे जाताना दिसून येतात. भारतीय पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या पर्यायांचे वैविध्य दिसून येत आहे. बँकॉक, नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या ठिकाणांसाठी 5 दिवसांच्या आंतरराष्ट्रीय पॅकेजची किंमत याच कालावधीसाठी देशांतर्गत पॅकेज इतकीच असते, ज्यामुळे विदेश प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. भारतातील काशी, कोईम्बतूर, म्हैसूर, पुद्दुचेरी, चंदीगड आणि कोची ही छोटी शहरे लोकप्रिय आहेत. यातील काही शहरे ही पर्यटनस्थळे आहेत, तर काही पर्यटनस्थळांचे प्रवेशद्वार म्हणून काम करतात. छोट्या शहरांना प्रोत्साहन देण्यासाठी आखण्यात आलेली स्वदेश दर्शन, आध्यात्मिक आणि धार्मिक पर्यटनाला वाढती लोकप्रियता, देशांतर्गत वाढलेली हवाई कनेक्टिव्हिटी हे घटक देशांतर्गत प्रवासाला चालना देत आहेत.

सोशल मीडिया, टी.व्ही.वरील कार्यक्रम आणि चित्रपट यांचा भारतीयांवर मोठा प्रभाव आहे. क्रीडा स्पर्धा विशेषतः क्रिकेट स्पर्धा, जी-20 शिखर परिषदेसारख्या परिषदा, संगीताचे कार्यक्रम प्रवासाला चालना देणारे ठरतात. यूट्यूबपाठोपाठ इन्स्टाग्राम प्रवासाला प्रेरणा देणारे ठरते. अखेरच्या क्षणी प्रवासाचा निर्णय घेणारे अशीही भारतीयांची ख्याती आहे. सहलींसाठी दोन-दोन महिने आधी बुकिंग करण्याऐवजी 25 ते 30 दिवसांत त्यासाठीचे निर्णय घेतले जातात. भारतीय पर्यटक एकेकटे प्रवास करण्याऐवजी मित्र-कुटुंबासमवेत सहलींना जातात.

गेल्या 10 वर्षांत देशांतर्गत वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये 200 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक झाली. रस्त्यांची गुणवत्ता कमालीची सुधारली. तसेच विमानतळांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. प्रवासाचा अनुभव निश्चितच चांगला झाला आहे. म्हणूनच 2030 पर्यंत हवाई प्रवासात 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होणार असून, भारत जागतिकस्तरावर सर्वाधिक वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून ओळखला जाणार आहे.

भारतीयांनी 2024 मध्ये प्रवासासाठी जास्तीची तरतूद केली असून, 63 टक्के भारतीय प्रवासावर खर्च करण्याची योजना आखत आहेत, असे एक अहवाल सांगतो. अन्य कोणत्याही देशापेक्षा ही तरतूद सर्वाधिक आहे. भारतीय यावर्षी मोठ्या संख्येने विदेशात सुट्टी घालवण्याचा विचार करत आहेत. बिझनेस किंवा फर्स्ट क्लास तसेच सीट सिलेक्शन आणि एअरपोर्ट लाऊंजमध्ये प्रवेश यासारख्या प्रवासादरम्यान अधिक आरामदायी प्रवासासाठी जास्तीचा खर्च करण्यास भारतीय तयार आहेत. संयुक्त अरब अमिरात, स्पेन, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया आणि सिंगापूर येथील प्रवाशांसह भारतीय प्रवासीही मोबाईलवर बुकिंग करण्याला प्राधान्य देत आहेत.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे ‘डिजियात्रा’ हे डिजिटल एअर ट्रॅव्हल अ‍ॅप आहे, जे विमानतळावर प्रवाशांच्या जलद प्रक्रियेला चालना देते. ही प्रणाली भारतातील 13 विमानतळांवर कार्यान्वित असून, ती देशांतर्गत प्रवासासाठी वापरली जाते. 2025 मध्ये आणखी 11 विमानतळांवर ही सुविधा देण्यात येणार आहे. एकूणच, भारतीय पर्यटक प्रवासासाठी अधिक पैसे मोजण्यास तयार असून, देशातील पर्यटन उद्योग नवनवे विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाला आहे. 410 अब्ज डॉलर इतकी अवाढव्य उलाढाल यात अपेक्षित असून, त्याचा फायदा या क्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांना थेट पोहोचणार आहे. म्हणजेच, सर्व स्तरांतील घटकांना पर्यटनातील उलाढालीचा लाभ मिळेल.

Back to top button