सिंहायन आत्मचरित्र : शाही मंगल सोहळा | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : शाही मंगल सोहळा

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

 विवाहसंस्कार हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. वेळेत पार पडला तर तो अर्थवाही असतो. अन्यथा तो अर्थहीन ठरतो. ज्याप्रमाणं मृगाचं नक्षत्र निघाल्यावरच शेतकरी शेतात पेरणी करतो, त्याप्रमाणंच मुलगी उपवर झाली आणि मुलगा वयात आला की, त्यांचा विवाह होणं हे अधिक लाभदायक मानलं जातं. हिंदू धर्मात विवाहाला आध्यात्मिक पार्श्‍वभूमी आहे. ‘श्रुती’ ग्रंथामध्ये विवाहाची परिभाषा करताना स्पष्ट म्हटलेलं आहेे की, ‘दोन देह, दोन मनं, दोन बुद्धी, दोन हृदयं, दोन प्राण किंबहुना दोन आत्मे ज्यामुळे एकत्र येतात, तो विवाह होय.’ अशा या धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कारानं शुचिर्भूत होण्याची वेळ आता आमचे सुपुत्र चि. योगेश यांची होती.

चि. योगेश यांनी शिवाजी विद्यापीठातून बी.कॉम. ऑनर्स केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बी.सी.जे. ही जर्नालिझमची पदवी प्राप्‍त केली. मग त्यांनी सिम्बॉयसिसमधून एम.बी.ए.सुद्धा केलं आणि मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेटही मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘पुढारी’च्या कामकाजात उत्साहानं भाग घ्यायला सुरुवात केली. योगेश म्हणजे तरुण पिढीचे प्रतिनिधी. त्यात तंत्रज्ञानानं परिपूर्ण. त्यामुळे साहजिकच वृत्तपत्र व्यवसायाकडे पाहण्याचा त्यांचाही एक द‍ृष्टिकोन होता. काही वेगळ्या कल्पना होत्या.

विवाह सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती.

त्यांनी मोठ्या हिरिरीनं ‘पुढारी’च्या कामकाजात लक्ष घातल्यामुळे त्यांच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला. मी जेव्हा ‘पुढारी’ची सूत्रं हाती घेतली होती, तेव्हा मीही अशाच काही नव्या कल्पना आणि नवा द‍ृष्टिकोन घेऊनच आलो होतो. मी त्या कल्पना अमलातही आणल्या. त्यामुळे आता योगेश यांच्या कल्पनांना विरोध न करता मी त्यांचं स्वागतच केलं. त्याची परिणती ‘पुढारी’च्या विस्ताराच्या योजना पुढे येण्यात झाली आणि त्यावर अंमलबजावणीही होऊ लागली.

मुलगा मोठा झाला, व्यवसायात लक्ष घालू लागला, व्यवसायाच्या वाढीसाठी झटू लागला की, अशा वेळी कोणत्याही माता-पित्याची एकमेव जबाबदारी असते, ती म्हणजे त्याचे दोनाचे चार हात करून त्याला संसाराला लावण्याची! साहजिकच त्याचा विवाह करावा, सूनमुख पाहावे अशी आम्हा पती-पत्नीची स्वाभाविक इच्छा. त्याहूनही आमच्या आईसाहेबांना नातसून पाहण्याची आस लागून राहिली होती. आजकाल त्यांची तब्येत ठीक राहत नव्हती. त्या अंथरुणाला खिळूनच होत्या. मात्र, त्यांचे डोळे आता नातसुनेच्या आगमनाकडे लागले होते.

म्हणून मग आम्ही योगेशकरता वधूसंशोधन सुरू केलं. अर्थात, अशा गोष्टी वार्‍यासारख्या सर्वत्र पसरतात. तशात जर मुलगा कर्तबगार असेल, तर त्याच्याकडे सर्वांचंच लक्ष वेधलं जातं. योगेशही त्याला अपवाद नव्हते. त्यांच्यासाठी ठिकठिकाणांहून असंख्य स्थळं येऊ लागली. बड्या बड्या घराण्यांकडून निरोप येऊ लागले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय कुटुंबांतूनही विचारणा होऊ लागली.

आम्ही अशा स्थळांची माहिती घेऊ लागलो. मुलगी मुलाला अनुरूप असली पाहिजे, हे महत्त्वाचं. योगेशना आलेल्या स्थळांमध्ये आम्हाला तीन-चार स्थळं खूपच पसंत पडली. त्यातून एकाची निवड करणं भाग होतं. पण म्हणतात ना, लग्‍नगाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. या उक्‍तीप्रमाणंच घडलं आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील आणि सौ. भाग्यश्री पाटील यांची सुकन्या स्मितादेवी या आम्हाला पसंत पडल्या.

डॉ. पी. डी. पाटील हे बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे जामात. स्मितादेवी या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नात. दोन्ही घराणी मातब्बर. त्यात डी. वाय. हे माझे निकटवर्ती स्नेही. आमचा सुमारे चाळीस वर्षांचा घरोबा. या स्नेहबंधाचं रूपांतर आता नातेबंधात व्हायचं निश्‍चित झालं!

डॉ. पी. डी. पाटील यांचा धार्मिक शास्त्रावर मोठा विश्‍वास. प्रत्येक गोष्ट काटेकोर आणि शास्त्रोक्‍त पद्धतीनं करण्यावर त्यांचा कटाक्ष. त्यामुळे त्यांनी चि. योगेश आणि चि. सौ. कां. स्मितादेवी यांचा वाङ्निश्‍चयही अगदी वैदिक पद्धतीनंच करायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 7 मे 2005 हा वाङ्निश्‍चयाचा मुहूर्त ठरला. अष्टविनायकांपैकी थेऊरचा चिंतामणी हे महत्त्वाचं देवस्थान. त्याच्या साक्षीनंच वाङ्निश्‍चय पार पडावा, ही पी. डी. पाटील यांची इच्छा आणि आम्हालाही ती कल्पना पसंत पडलीच होती. मग थेऊरच्या त्या पवित्र परिसरातील पी. डी. पाटील यांच्या श्री दत्तप्रभा फार्म हाऊसवर हा भव्य वैभवशाली वाङ्निश्‍चय सोहळा निश्‍चित झाला.

सिंहायन आत्मचरित्र : शाही मंगल सोहळा
चि. योगेश व चि. सौै. कां. स्मिता यांच्या वाङ्निश्‍चयप्रसंगी (डावीकडून) सौ. भाग्यश्री पाटील, डॉ. पी. डी. पाटील, मौनी महाराज, डॉ. डी. वाय. पाटील, मी व सौ. गीतादेवी जाधव.

‘वाग्दान किंवा वाङ्निश्‍चय’ म्हणजे ‘वधू आणि वर’ यांच्या पालकांनी विवाह निश्‍चितीचे एकमेकाला दिलेलं अभिवचन होय. अष्टविवाह प्रकारातील प्रधान अशा परंपरागत ‘ब्राह्मविवाह’ विधीचा प्रारंभ वाङ्निश्‍चयाला अर्धं लग्‍नच मानलं जातं. त्याकरताच हा सोहळाही धार्मिक पद्धतीनंच व्हावा, ही आमची मनिषा.

आम्ही वराकडील मंडळी 7 मे रोजी पुण्याहून थेऊरला पोहोचलो. आमच्या स्वागतासाठी प्रत्यक्ष माजी राज्यपाल आणि माझे मित्र डॉ. डी. वाय. पाटील उभे होते. मग वरपिता नि वरमाता या नात्यानं मी आणि सौ. गीतादेवी, तर वधूपिता नि वधूमाता पी. डी. पाटील आणि सौ. भाग्यश्री पाटील असे आम्ही चौघे वैदिक पद्धतीनं झालेल्या धार्मिक सोहळ्यात सामील झालो. 11 वेदशास्त्रसंपन्‍न पुरोहितांनी केलेल्या मंत्रोच्चारांनी आणि वेदपठणानं तसेच पूजाविधीयुक्‍त धार्मिक सोहळ्यानं चि. योगेश आणि चि. सौ. कां. स्मितादेवी यांचा वाङ्निश्‍चय मोठ्या थाटामाटात संपन्‍न झाला.

वाद्यांची मंत्रमुग्ध करणारी सुरावट वातावरणात दरवळत होती. धार्मिक विधीच्या प्रत्येक टप्प्यावर सूर आपला राग बदलत होते. सारं वातावरण भारल्यासारखं झालं होतं. वधूनं वराच्या बोटात अंगठी घातल्याबरोबर सुरावटीनं एकदम षड्ज गाठला आणि भव्य नेत्रदीपक आतषबाजीनं आकाशावर अग्‍निफुलांची नक्षी कोरली! या समारंभासाठी खास हॉलंडहून ट्युलिप्सची फुलं मागवण्यात आली होती. ट्युलिप्सच्या देखण्या सात हजार फुलांनी केलेली सजावट पाहून उपस्थितांना हॉलंडची सफर केल्याचा आनंद मिळत होता. रूपसंपन्‍न ट्युलिप आणि ऐटबाज टायगर लिली या फुलांचा जणू तिथं उत्सवच साजरा होत होता!

वातावरण सनई-चौघड्याच्या मंजूळ सुरांनी मंतरलेलं होतं. अशा मंतरलेल्या वातावरणाची आणि एकूणच सोहळ्याची शान वाढवली, ती ‘सारेगम’फेम प्रसिद्ध गायक ‘शान’ यांच्या सुरेल मैफलीनं! मनामनांवर भुरळ घालणार्‍या, थिरकत्या स्वरविलासाच्या वाद्यवृंदानं सार्‍या पाहुण्यांच्या मनावर जणू जादूच केली. संगीतकार शिवमणी यांच्या संगीताची मोहिनी काही औरच. शान-शिवमणी जोडीनं या वाङ्निश्‍चय सोहळ्याची रंगत आणखीनच खुलवली. जणू गोड दुधात केशरच पडलं! संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला हा सोहळा पहाटे दोन वाजेपर्यंत उत्तरोत्तर खुलतच गेला. अधिकच रंगत गेला. श्रोते थकले नाहीत, की आकाशातले तारे-तारका मंदावल्या नाहीत.

विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेन्मेंट प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करणार्‍या संस्थेनं या ‘इव्हेंट’चं अक्षरशः सोनं केलं होतं. या सोन्यासारख्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रांमधले मान्यवर उपस्थित होते. डॉ. पी. डी. पाटील आणि भाग्यश्री पाटील यांनी हा वाङ्निश्‍चय सोहळा नेत्रदीपक पद्धतीने पार पाडला.

वाङ्निश्‍चय झाला आणि विवाह सोहळ्याचे वेध लागले आणि मग एकच घाई उडाली. लगीनघाई हा शब्द उगाच वापरला जातो का? लग्‍न म्हणजे असंख्य विवंचना. करेल तितकं थोडंच. तरीही ते अपुरंच असतं. साहजिकच लगीनघाई या शब्दाचा शब्दशः अर्थ मी अनुभवीत होतो. त्यात योगेश आमचे एकुलते एक पुत्र. तसेच जाधव कुटुंबातील आताच्या पिढीमधला हा अखेरचा विवाह सोहळा. त्यामुळे तो थाटामाटात, शानदारपणे व्हावा, ही सर्वांचीच इच्छा.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातूनच नव्हे, तर कर्नाटक-गोव्यातून आणि दिल्‍लीहूनही या सोहळ्याला असंख्य लोक उपस्थित राहणार होते. त्या सर्वांना रीतसर आणि काळजीपूर्वक निमंत्रणं पाठवणं हे जबाबदारीचं काम होतं. चुकून एखाद्याला जरी निमंत्रण गेलं नाही, तर ‘संगीत मानापमाना’चा नाट्यप्रयोग ठरलेलाच! त्यामुळे डोळ्यात तेल घालून निमंत्रणाच्या याद्या करणं आणि त्याबरहुकूम निमंत्रणं पोहोचतील याची दक्षता घेणं, ही मोठी जोखीमच होती. निमंत्रण पत्रिका छापणं हा तरी एक मोठा उद्योगच होता. पन्‍नास हजारांहून अधिक पत्रिका छापण्यात आल्या. कारण राजेरजवाडे, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, आमदार, खासदार, जहागीरदार, सरंजामदार, उद्यम-व्यापारातील प्रमुख मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षण-सहकार-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, वकील अशा विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ व्यक्‍ती तसेच विविध वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकार मंडळी असे असंख्य, असंख्य आणि असंख्य व्ही.आय.पी. तसेच अभिजन, महाजन आणि बहुजन या सर्वांनाच न चुकता निमंत्रण देणं अत्यंत आवश्यक होतं.

वास्तविक, मुलीचे वडील डॉ. पी. डी. पाटील यांना विवाह पुण्यात व्हावा असं वाटत होतं. तशी त्यांची इच्छा होती. पण आमचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे आम्ही हा विवाह कोल्हापुरातच व्हावा, असा आग्रह धरला. तो डॉ. पी. डी. पाटील यांनी मान्य केला. मात्र, एकदा कोल्हापुरात लग्‍नसोहळा घ्यायचं ठरल्यावर, डॉ. पी. डी. पाटील आणि त्यांच्या विद्यापीठातील सर्व स्टाफ, हा सोहळा अप्रतिम व्हावा म्हणून रात्रीचा दिवस करून कोल्हापुरात राबत होते. डॉ. पाटील यांच्या घरातील हा पहिलाच विवाह समारंभ असल्यानं, ते अधिक उत्साहानं कामाला लागले होते.

विवाहाची तारीख ठरली. गुरुवार, दि. 17 नोव्हेंबर 2005. सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटं! अर्थात गोरज मुहूर्त. विवाहस्थळ होतं, पोलिस परेड ग्राऊंड. एक भव्य क्रीडांगण. या क्रीडांगणाला एखाद्या स्वप्ननगरीसारखं सजवण्यात आलं. कायापालटच झाला त्याचा. जणू दुसरी इंद्रपुरीच!

विझक्राफ्ट या सुप्रसिद्ध कंपनीनं विवाहाचं व्यवस्थापन केलेलं. तिरुपतीच्या बालाजी मंदिराची साकारलेली भव्य प्रतिकृती हे या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण होतं. द्राविडी शिल्पकलेचा अजोड नमुना असणारी ही प्रतिकृती, मुंबईच्या सुमारे दीडशे कलाकारांनी अहोरात्र मेहनत घेऊन उभी केली होती. मंदिरावरील नाजूक कलाकुसर, नक्षीकाम, कोरीव खांब, उंच उंच सोनेरी गोपुरं, विविध शुभचिन्हं आणि त्यावर विराजमान झालेल्या मूर्ती यातून अभिजात कलाविष्काराचं दर्शन तर होत होतंच; पण पाहणार्‍याला आपण तिरुपतीत तर नाही ना, असा क्षणभर भ्रम पडावा, इतकी हुबेहूब ही प्रतिकृती साकार झाली होती.

सुप्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या कन्येचा विवाह पॅरिसमध्ये झाला. या विवाहप्रसंगी जयपूर पॅलेसची प्रतिकृती ज्यांनी उभी केली होती, त्या ‘झीरो अवर्स’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेनं ही तिरुपती मंदिराची प्रतिकृती उभी केली होती आणि ती उभारण्यासाठी हिंदी-मराठी चित्रपटांतून भव्य सेट उभे करणार्‍या अनुभवी जातिवंत कलाकारांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं होतं.

मंदिरासमोर 120 फूट लांब आणि 50 फूट रुंद असा भव्य मंच उभा करण्यात आला होता, तर मंदिराची उंची 55 फूट होती. सुंदर सुंदर फुलांनी केलेली मंदिराची सजावट अनुरूप प्रकाश योजनेमुळे अधिकच खुलून दिसत होती. मंगलकार्यासाठी मंदिराशेजारीच भव्य असा विधिमंडप उभारण्यात आला होता आणि त्या ठिकाणी धार्मिक संस्कार करून शुचिर्भूत केलेली एक यज्ञवेदी निर्माण करण्यात आलेली होती. विवाहाचे सर्व धार्मिक विधी या पवित्र जागीच पार पडणार होते. तिरुपती मंदिराची शिखरं मुळातच सुवर्णरंगानं रंगवलेली होती. त्यावर असंख्य दिव्यांतून प्रकाशाची उधळण होताच तो सोनेरी वर्ख झळाळून उठला आणि त्यांच्या असंख्य प्रभावळींनी मंदिराला जणू सुवर्णफुलांचा अभिषेकच झाला. शिखराभोवती कोरलेल्या असंख्य शिल्पाकृती प्रकाशाचे कवडसे पडताच सजीवच झाल्यासारख्या भासू लागल्या. हा सर्व नजारा हजारो नजरांचं पारणं फेडीत होता. या मंदिराचा एवढा बोलबाला झाला की, विवाह सोहळा पार पडल्यानंतरही पुढे आठवडाभर हे मंदिर पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. तो एक अविस्मरणीय अनुभवच होता, यात शंका नाही.

विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेला 50 हजारांचा जनसागर.

निमंत्रितांचं हार्दिक स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावर विविध क्षेत्रांतील मान्यवर उभे होते. जणू हा विवाह सोहळा त्यांच्या घरचाच होता, अशा आपुलकीच्या नि आत्मीयतेच्या भावनेनं राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच सहकार, सांस्कृतिक, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रांतील नामवंतांचा त्यामध्ये समावेश होता. या समस्त नामवंतांसह आणि कार्यकर्त्यांसह शंभरावर पैलवानही स्वागताला सज्ज होते. सर्वांच्या डोक्यावर डौलानं डोलणारे कोल्हापुरी लहरी फेटे खास कोल्हापुरी आगत-स्वागताची खुमारी वाढवीत होते.

स्वेच्छेनं यजमानपद स्वीकारलेली ही सर्व मंडळी म्हणजे ‘पुढारी’चं सुमारे सात तपांचं संचित होतं, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
बुधवारची सायंकाळ. लग्‍नमुहूर्ताचा अधला दिवस. ती सायंकाळ मोहरली होती. कारण थोड्याच वेळात ती हळदीनं रंगणार होती. मग पारंपरिक पद्धतीच्या पेहरावात वधू आणि वराचं मंचावर आगमन झालं आणि अत्यंत मंगलमय वातावरणात हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

वार्‍याच्या मंद लहरी आसमंतात लहरत होत्या. लक्ष लक्ष दिव्यांनी सारा परिसर तेजोमय झाला होता. उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या कंठातून उमटणारे सुरेल स्वर वातावरणात दरवळत होते आणि बुधवारची सायंकाळ मंत्रमुग्ध झाली होती. खास हळदी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या या संगीत रजनीचा प्रारंभ मंगलस्तवनानं झाला. सुरेश वाडकर, उषा मंगेशकर आणि सहकार्‍यांनी सादर केलेल्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध न होतील, तरच नवल!

हळद रंगली, पिवळी झाली. हळदीनं जणू गुरुवारच्या विवाह सोहळ्याची दाही दिशा द्वाहीच फिरवली!

गुरुवार, दि. 17 नोव्हेंबरचा दिवस उजाडला. सूर्यदेव मंगल किरणांची उधळण करीतच गगनमंडपी विराजमान झाले. आम्हा जाधव कुटुंबीयांच्या जीवनातील मधुघट घेऊनच जणू आजचा दिवस अवतीर्ण झाला होता. हा मंगल सोहळा पाहण्यासाठी आईसाहेबांचं मन अगदी आतूर झालं होतं. त्यांना आम्ही अ‍ॅम्ब्युलन्सनं मागील बाजूनं व्यासपीठाच्या समीप आणलं आणि त्यांच्या खास खुर्चीवर त्यांची बसण्याची व्यवस्था केली. आपल्या नातवाच्या विवाहाचा सोहळा त्यांनी डोळे भरून पाहिला. नातवाचा शाही थाटातील विवाह सोहळा पाहणं, हा त्यांच्यासाठी आनंदाचं विधानच होतं. आईसाहेबांनी हा सोहळा पाहिल्यानं मीही कृतार्थ झालो.

वर चि. योगेश यांचं आप्‍तस्वकीयांसह ठीक चार वाजता निवासस्थानातून प्रस्थान झालं. देवदर्शन करून वरपक्षाचं विवाहस्थळी पावणेपाच वाजता आगमन झालं. बघता बघता मंगलघटिका समीप येऊ लागली. वैदिक पद्धतीनं धार्मिक विधी सुरू झाले. दुपारी 4 ते 6 या वेळेत राजराजेश्‍वरी काशी आणि तिरुपती या मंदिरातील 75 वैदिक पुरोहितांनी भूमी शुद्धीकरण केलं. तिरुपती देवस्थानचे मुख्य पुजारी श्री. शेषाद्री यांच्या नेतृत्वाखाली हा विधी संपन्‍न झाला. सायंकाळचे ठीक सहा वाजले आणि वेगवेगळ्या प्रवेशद्वारांतून वधू-वरांचं मंचावर आगमन झालं. प्रकाशझोतात न्हाऊन निघतच त्यांनी विवाहवेदीकडे प्रवेश केला. सारा मंच तेजाळून उठला.

बालाजी मंदिरातील गोजिर्‍या सुंदर मूर्तीसमोर वधू-वर उभे राहिले. मंत्रघोषांच्या अखंड आवर्तनांत वधू-वर विवाहासाठी सिद्ध झाले. वातावरण विलक्षण मांगल्यानं आणि पावित्र्यानं सुगंधित झालं होतं. सार्‍या मैदानावर लक्ष लक्ष दिव्यांची दीपावली साजरी होत होती. या शुभमंगल क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी निमंत्रितांनी खच्चून गर्दी केली होती. सर्वांच्याच उत्सुक नजरा केवळ वधू-वरांवरच खिळल्या होत्या. सर्वांनाच त्या शुभघटिकेची प्रतीक्षा लागलेली होती. घड्याळाचा काटा सहा वाजून चार मिनिटांवर गेला आणि – दिल्‍ली येथील प्रसिद्ध डिझायनर रोहित बाल यांनी खास तयार केलेल्या पोशाखात, वर चि. योगेश यांची हसतमुख राजस मूर्ती आणि भरजरी वस्त्रांनी सजलेली वधू चि. सौ. कां. स्मितादेवी. दोघेही अंतरपाटाच्या दोन्ही बाजूंना उत्सुकपणे उभे. त्यांच्या समीपच घरची वडीलधारी मंडळी. अशा या भारावलेल्या वातावरणातच ठीक सहा वाजून चार मिनिटांनी वेदशास्त्रसंपन्‍न ब्रह्मवृंद मंत्रगान करू लागला. खास काशी आणि तिरुपतीहून आलेल्या ब्रह्मवृंदाचा उच्च स्वरातील मधुर मंत्रघोष उपस्थितांची कर्णेंद्रिये तृप्‍त करीत होता. परंपरागत मंगलाष्टकांचा पहिला अंतरा संपला. अक्षतारोपण झालं आणि पाठोपाठ सुरू झाली विशेष मंगलाष्टका. चित्रपटकवी जगदीश खेबूडकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या भावमधुर, आशयगर्भ मंगलाष्टकांचे सुरेल शब्द ध्वनित होऊ लागले. सार्‍या लग्‍नमंडपावरच या काव्याक्षतांचं गारुड पसरलं. ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ या प्रख्यात वाद्यवृंदानं सादर केलेल्या या मंगलाष्टकांनी सारे सभाजन मंत्रमुग्ध होऊन गेले होते. केवळ अप्रतिम! केवळ अद्वितीय! आणि केवळ अभूतपूर्व! अशा या सोहळ्यात सारे जन डुंबून गेले होते.

मंगलाष्टकांच्या आठव्या अंतर्‍याचे सूर उमटले, लहरले! आणि हळुवारपणे वातावरणात विरून गेले. क्षणार्धातच तो क्षण प्रकट झाला. अंतरपाट दूर झाला आणि वधू-वरांनी एकमेकांना पुष्पमाला अर्पण केल्या. दोन जीवांचं नाजूक नातं जोडणार्‍या या पुष्पमाला, विख्यात पुष्परचनातज्ज्ञ अरुणाबेन पुरोहित यांनी खास थायी पद्धतीनं गुंफलेल्या होत्या. वधू-वरांनी एकमेकांना वरताच वातावरणात एकच जल्‍लोष झाला. पोलिस आणि आर्मी बँडच्या वाद्यांनी बहू गलबला केला. त्यानं सोहळ्याची उंची अधिकच उंचावर पोहोचली.

प्रचंड आतषबाजीनं परिसर दणाणून गेला. असंख्य, अगणित अग्‍निफुलं आभाळात झेपावली. विविधरंगी आणि विविधांगी फटाक्यांची अग्‍निफुलं आभाळात आरास निर्माण करू लागली. ते सौंदर्य नजरांनी टिपण्यासाठी सर्व उपस्थितांचे डोळे आकाशाला भिडले. एकाहून एक अशी असंख्य अग्‍निफुलं आकाशात लखलखून पाहणार्‍यांचे डोळे दीपवू लागली.

मंचावरून मी वरपिता म्हणून तसेच वरमाता म्हणून सौ. गीतादेवी; शिवाय वधूपिता प्रसादराव तथा पी. डी. पाटील आणि वधूमाता सौ. भाग्यश्रीदेवी, याशिवाय दोन्हीकडील मंडळी आणि ज्येष्ठ नेत्यांसह महनीय मान्यवरांनी वधू-वरांचं अभीष्टचिंतन केलं. वधूपिता आणि वधूमाता यांनी वैदिक मंत्रपठणाच्या गजरात विधिवत कन्यादान केलं. चि. सौ. कां. स्मिता प्रसादराव पाटील या आता सौ. स्मितादेवी योगेश जाधव झाल्या. जाधव घराण्याच्या स्नुषा झाल्या.

विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार्‍या अतिमहत्त्वाच्या व्यक्‍ती आणि इतर मान्यवर लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलिसप्रमुख सुखविंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस उपअधीक्षक, दहा पोलिस निरीक्षक, पंचवीस सहायक पोलिस निरीक्षक आणि नऊशे पोलिस कर्मचारी एवढा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.
हा मंगल सोहळा केवळ दोन मनांचा किंवा दोन जीवांचा नव्हता, तर एका थोर पत्रमहर्षींच्या नातवाचा आणि एका कर्तबगार संपादक पित्याच्या कर्तृत्वशाली, उच्चविद्याविभूषित पुत्राचाही होता तसेच एका शिक्षणमहर्षींच्या नातीचा आणि एका शिक्षणसम्राटाच्या विद्यासंपन्‍न कन्येचा हा मंगल विवाह होता. दोन कर्तृत्वसंपन्‍न महान कुळांच्या मनोमिलनाचा हा हृद्यसोहळा!

परमपवित्र करवीरक्षेत्री, विस्तीर्ण आणि विशाल अशा पोलिस क्रीडा मैदानावर मुख्यमंत्री विलासराव देशमुख, आंध्र प्रदेशचे राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, मध्य प्रदेशचे राज्यपाल बलराम जाखर, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, राज्याचे मुख्य सचिव आर. एम. प्रेमकुमार, सातार्‍याच्या राजमाता छत्रपती कल्पनाराजे, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सांगलीचे माजी संस्थानिक श्रीमंत विजयसिंह पटवर्धन यासारख्या असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सळसळत्या उत्साहात हा सोहळा संपन्‍न झाला. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वसंत डावखरे, मंत्री जयंत पाटील, मंत्री अजित पवार, मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, मंत्री हर्षवर्धन पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री गणेश नाईक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री विनय कोरे, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार निवेदिता माने, सकाळ वृत्तपत्र समूहाचे संचालक अभिजित पवार, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष केतन देसाई, दिल्‍लीचे मुख्य आयकर आयुक्‍त डॉ. एन. सी. तिवारी, माजी मंत्री एन. डी. पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यासारख्या विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवर व्यक्‍ती या शाही सोहळ्यास आवर्जून उपस्थित होत्या.

राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत, काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यासह अनेक उच्चपदस्थ मान्यवरांनी या विवाहास शुभसंदेश पाठवले होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे त्यावेळी इस्रायलच्या दौर्‍यावर होते; पण त्यांनी तिथूनच खास संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.

कार्यस्थळावर पन्‍नास हजारांवर आसनव्यवस्था होती. मात्र, प्रत्यक्षात लाखाहून अधिक लोकांनी या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. ती जाधव व पाटील घराण्यावरील प्रेमापोटी आणि त्यातूनही ‘पुढारी’बद्दलच्या आत्मीयतेमुळेच! मान्यवरांसह सर्वच निमंत्रितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत पंगती सुरू होत्या. अशा तर्‍हेनं अपूर्व शाही थाटात, झगमगत्या वातावरणात तसेच नेत्रदीपक आणि चित्तवेधक स्वरूपात हा विवाह समारंभ संपन्‍न झाला.

विवाह विधीबरोबरच सर्व धार्मिक विधींचीही सांगता झाली. त्यानंतर कुटुंबीय, पाहुणे आणि खाशांची पंगतही पार पडली. मध्यरात्रीनंतर शुभमुहूर्तावर चि. सौ. कां. स्मितादेवींनी उंबरठ्यावरचं माप ओलांडून गृहप्रवेश केला. त्यांच्यासाठी एक नवं चंदनी द्वार उघडलं गेलं. नव्या दाम्पत्यानं आईसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. त्या उभयतांच्या जीवनात संसाराचं पर्व सुरू झालं.

या शाही विवाहाची कोल्हापूरसह सर्वत्र दीर्घकाळ चर्चा होत राहिली. विवाहसोहळा ‘या सम हाच’ अशी पावती उपस्थितांकडून मिळाली. माझ्या द‍ृष्टीनं एक कर्तव्य पार पडलं. मी कृतार्थ झालो!

Back to top button