सिंहायन आत्मचरित्र : गुजरातमध्ये हॉस्पिटल | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : गुजरातमध्ये हॉस्पिटल

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

वर्ष 2001…
‘It is not enough to be compasionate. you must act.’
‘केवळ सहानुभूती पुरेशी नाही, मदतच करायला हवी.’

दलाई लामांच्या या चिरंतन विचारांशी मी शंभर टक्के सहमत आहे. कारण याच विचारांचा मी आयुष्यभर पाठपुरावा करीत आलो आहे. माणसानं संकटग्रस्तांप्रती केवळ पोकळ सहानुभूती दाखवू नये, तर त्वरित कार्यरत होऊन मदतीचा हात पुढे करावा, या मताचा मी पहिल्यापासूनच आहे आणि या विचारांशी प्रामाणिक राहूनच मी भूकंपग्रस्तांसाठी असो वा पूरग्रस्तांसाठी असो, अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये सापडलेल्या दुर्दैवी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. त्यांचे अश्रू पुसत आलेलो आहे.

अर्थात मी कुणी मसिहा नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे आणि मसिहा बनण्याचा माझा कधीच प्रयत्न नव्हता आणि नाही. मी एक माणूसच आहे. माणसाप्रती भूतदया दाखवून, प्रसंगी मदतीचा हात पुढे करून एक चांगला माणूस बनण्याची माझी धडपड आहे. एकदा माणसाच्या जन्माला आल्यानंतर, माणसानं माणसासारखं वागून आपलं माणूसपण जपावं, हीच माझी माणुसकीची सरळ साधी परिभाषा आहे. त्या माणुसकीच्या भूमिकेतूनच मी दरवेळी संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जात असतो.

26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन. भाग्याचा आणि मांगल्याचा दिवस! म्हणून तो आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. परंतु, 2001 चा 26 जानेवारी हा दिवस गुजरातसाठी मात्र एक काळा दिवस ठरला. सार्‍या देशभर प्रजासत्ताकाचा उत्सव संपन्‍न होत असतानाच आणि दिल्‍लीतील इंडिया गेटवरची वैभवशाली मिरवणूक दूरदर्शनवर पाहण्यात सारा देश मश्गूल असतानाच, गुजरातवर नियतीनं घाला घातला. भूमाता कोपली! भूकंपाच्या तीव्र हादर्‍यानं सारा गुजरात हादरला.

सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.9 रिश्टर स्केल एवढी भीषण होती. या भूकंपानं सुमारे दोन मिनिटं धुमाकूळ घातला! हा देशातील सर्वात मोठा भूकंप होता. कच्छ आणि भुजजवळच केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपानं भूज जिल्हा तर संपूर्ण भुईसपाटच केला. कच्छची परिस्थितीही त्याहून वेगळी मुळीच नव्हती. सुमारे सातशे किलोमीटरच्या परिघामध्ये एकूण 21 जिल्ह्यांना या भूकंपाचा धक्‍का बसला होता.

या विनाशकारी भूकंपानं सुमारे 17000 लोकांचे बळी घेतले, तर सुमारे पावणेदोन लाख लोक जखमी झाले. एकट्या कच्छ जिल्ह्यातील बळींची संख्याच सुमारे 12 हजारांवर होती. या भूकंपानं दीड लाख लोकांना बेघर केलं. त्यांची घरकुलं हिरावून घेतली. होत्याचं नव्हतं करून टाकलं.

अनेक शहरं आणि गावं जमीनदोस्त झाली. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. अपार जीवितहानी झाली. एका अर्थानं ही राष्ट्रीय आपत्तीच होती. अशा वेळी आपल्या पूर्वपरंपरेला धरूनच ‘पुढारी’नं गुजरातमधील भूकंपग्रस्तांच्या हाकेला ‘ओ’ दिली. मी स्वतःचे लाखो रुपये तर मदतनिधीत टाकलेच; पण कर्मचार्‍यांच्या एका दिवसाच्या पगाराची रक्‍कमही जमा केली. त्याचबरोबर भूकंपग्रस्तांसाठी मदत पाठवण्यासाठी ‘पुढारी’तून जनतेला आवाहन केलं. प्रथमतः मी स्वतःच आणि ‘पुढारी’च्या कर्मचार्‍यांनी मदतनिधी दिला म्हटल्यावर, जनतेकडूनही मदतीचा ओघच सुरू झाला.

‘पुढारी’च्या भूकंपग्रस्त साहाय्यता निधीला सर्व क्षेत्रांतून फार मोठं योगदान मिळालं. जनतेनं भरभरून प्रतिसाद दिला. बघता बघता थोडाथोडका नव्हे, तर तब्बल एक कोटी रुपयांचा निधी जमा झाला. या मदतनिधीमधून कच्छ विभागातील बच्छाव तालुक्यातील भूकंपग्रस्त गावात एखादं कायमस्वरूपी भरीव काम उभं करण्याचा माझा मनोदय होता. निधी जमा करतानाच मी ही कल्पना जाहीर केली होती. तिचं जनतेतूनही स्वागत झालं होतं.

27 सप्टेंबर 2001 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे एक कोटी रुपयांचा हा निधी मी सादर केला. केशवराव भोसले नाट्यगृहात हा निधी प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी पतंगराव कदम होते. कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावरूनच या मदतीबद्दलची लोकांच्या मनातील कळकळीची भावना दिसून येत होती.

यावेळी बोलताना विलासरावांनी ‘पुढारी’विषयी गौरवोद‍्गार काढले. ते म्हणाले, “वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा आदर्श कसा घालता येतो, याचं ‘पुढारी’ हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी पुढाकार घेऊन ‘पुढारी’नं हा आदर्श पाळलेला आहे.”

टाळ्यांच्या कडकडाटातच ‘पुढारी’नं जनतेचा विश्‍वास संपादन केल्याचा पुनरुच्चार करून गुणगौरव करताना ते म्हणाले, “आपत्तीच्या काळात कोण पैसा जमा करतं, यालाही फार महत्त्व असतं. अनेक ठिकाणी निधी गोळा झाल्यावर त्याचं पुढं काय झालं, अशा चर्चा होत असतात; पण ‘पुढारी’ मात्र लोकांकडून जमा केलेला निधी सत्कारणीच लावतो, याचा अनुभव असल्यानंच लोकांनी तुमच्याकडे पैसे सोपवले. तुम्ही संपादन केलेल्या विश्‍वासाचंच हे निदर्शक आहे.”

‘पुढारी’च्या विश्‍वासार्हतेबाबत प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या पोचपावतीपेक्षा आणखी कुठलं प्रमाणपत्र असू शकतं? ‘पुढारी’ची ही विश्‍वासार्हता केवळ सांगोवांगीची किंवा स्वतःच स्वतःची टिमकी वाजवून घेण्याइतकी बेगडी मुळीच नाही. सततच्या प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे केलेल्या समाजकार्यामुळे जनता जनार्दनाच्या अंतःकरणात ‘पुढारी’बद्दलचा विश्‍वास एखाद्या वज्रलेपासारखा कोरला गेलेला आहे. विलासरावांनी नेमकं तेच पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

“कोणत्याही राष्ट्रीय कार्यात बाळासाहेब नेहमीच अग्रेसर असतात,” या शब्दांत त्यांनी आपल्या मित्राचा गौरव करताना पुढे आवर्जून सांगितलं की, “प्रशासनातील चुकीच्या कामावर आसूड ओढण्याचं काम ‘पुढारी’ करीत आहे. बाळासाहेब आमचे मित्र; पण म्हणून त्यांनी आम्हालाही सोडू नये. आपल्या मैत्रीहून ‘पुढारी’ची परंपरा मोलाची आहे. आम्ही चुकलो, तर मार्ग दाखवण्याचा अधिकार तुमचा आहे!” असं आपल्या स्वभावाला अनुसरून प्रांजळ आणि दिलखुलास वक्‍तव्य त्यांनी केलं, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटानं लोकांनी पसंतीची पावती दिली.

“रंजल्या-गांजलेल्यांचे आशीर्वाद ‘पुढारी’च्या पाठीशी आहेत,” असंही विलासरावांनी आवर्जून सांगितलं. तसेच भूकंपनिधी स्वीकारण्यासाठी आपण पहिल्यांदाच मुंबईबाहेर आल्याचा उल्‍लेखही त्यांनी आवर्जून केला. त्या दिवशी आपल्या मित्राविषयी, त्याच्या कर्तबगारीविषयी आणि ‘पुढारी’विषयी किती बोलू; असंच जणू त्यांना झालं होतं!

“लोकांनी विश्‍वासानं आमच्या हाती निधी दिला. तो आम्ही विश्‍वासानं सांभाळला. या निधीचा फक्‍त स्वतंत्र आणि एखाद्या भरीव कामासाठीच वापर व्हावा, असा आमचा आग्रह आहे. निधी जमवला, तो प्रदान केला म्हणजे झालं, असं होत नाही. या निधीचा विनियोगही लोकांच्या इच्छेनुसारच व्हायला हवा. महाराष्ट्रानं बच्छाव तालुका दत्तक घेतला आहे. त्या तालुक्यासाठी हॉस्पिटल उभारण्यात यावं. निधीचा चिरंतन कार्यासाठीच वापर व्हावा, अशी लोकांची इच्छा आहे.” अशी भूमिका यावेळी मी मांडली.

माझ्या मागणीला प्रतिसाद देत विलासरावांनी एक कोटींच्या या निधीतून हॉस्पिटल उभारले जाईल, अशी घोषणा केली. भूकंपाचा सर्वाधिक तडाखा कच्छ विभागातील बच्छाव तालुक्याला बसला. त्यातही अधोई आणि वोंध या दोन गावांवर नियतीनं जणू वरवंटाच फिरवला. या दोन गावांत मिळून सातशेच्या वर बळी गेले. जवळजवळ सर्वच घरं आणि सार्वजनिक इमारती मातीमोल झाल्या. महाराष्ट्र शासनानं या दोन गावांचं पुनर्निर्माण करण्याचा वसा उचलला. अधोई गावात दोन हजार, तर वोंधमध्ये सुमारे आठशे शहात्तर घरांची पुनर्बांधणी करण्यात आली. अगदी ग्रामपंचायतीपासून शाळांपर्यंत सार्वजनिक इमारतींची उभारणी केली. पायाभूत सुविधा दिल्या.

विलासरावांनी शब्द दिल्याप्रमाणं ‘पुढारी’च्या मदतनिधीतून अधोईमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात आलं. आता या अधोई गावाचं नामकरण, ‘राजर्षी शाहूनगर’ करण्यात यावं, अशी माझी इच्छा होती. तसं मी विलासरावांना सुचवलं. त्यांनाही ती कल्पना आवडली आणि मग सर्व त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून अधोईचं नामकरण ‘राजर्षी शाहूनगर’ करण्यात आलं. राजर्षी शाहू म्हणजे रयतेचा राजा. त्यांच्याच सामाजिक कार्याचा वसा, वारसा आम्ही वागवीत आहोत. साहजिकच, अधोईचं ‘राजर्षी शाहूनगर’ झाल्यानं आम्हाला कृतकृत्य वाटलं.
अधोई-शाहूनगर इथं बांधलेल्या सुसज्ज हॉस्पिटलला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं, अशी माझी इच्छा होती. माझी ही कल्पनासुद्धा विलासरावांना पसंत पडली आणि त्या हॉस्पिटलला शिवरायांचं नाव देण्यात आलं. हे हॉस्पिटल अत्याधुनिक सुखसुविधांनी सुसज्ज असून त्यात ऑपरेशन थिएटर, प्रसूती विभाग, अतिदक्षता विभाग याबरोबरच पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, नेत्र विभाग, एक्स रे विभाग आणि डिस्पेन्सरीसह बाह्यरुग्ण विभागही अंतर्भूत आहे. आजपर्यंत हजारो रुग्णांना या हॉस्पिटलचा लाभ झालेला असून, यापुढेही होत राहील यात मुळीच शंका नाही.

16 जून 2003 या दिवशी या हॉस्पिटलचं उद्घाटन पार पडलं. उद्घाटक होते, तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे. तोपर्यंत महाराष्ट्रात खांदेपालट झाली होती. विलासराव केंद्रात गेले होते. तरीही विलासराव या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे होतं. तसेच छगन भुजबळ यांचीही उपस्थिती लाभली होती. मलाही प्रमुख पाहुणा म्हणून खास निमंत्रण होतं.

सुशीलकुमारांनी माझा आणि ‘पुढारी’चा मुक्‍तकंठानं गौरव केला. ते म्हणाले, “पीत पत्रकारितेच्या अंधार युगात ‘पुढारी’नं पत्रकारितेचा धर्म पाळून दीपस्तंभासारखं काम केलं आहे. सियाचीनसारख्या उत्तुंग रणभूमीवर जवानांसाठी उभारलेलं हॉस्पिटल आणि या कच्छच्या रणात सर्व सोयींनी युक्‍त असं उभारण्यात आलेलं हे हॉस्पिटल म्हणजे देशातील वृत्तपत्रांपुढे निर्माण केलेला आदर्शच आहे. भावी पिढ्यांनी सतत स्मरणात ठेवावं, असं हे ‘पुढारी’चं योगदान आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. एकीकडे गोठवणारी थंडी, तर दुसरीकडे रणरणता उन्हाळा या दोन्ही ठिकाणी ‘पुढारी’नं केलेलं कार्य विस्मयकारक आहे!”

माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकताना विलासराव देशमुख म्हणाले, “अधोईला प्रथम आलो तेव्हा इथं काही शिल्‍लक राहिलं नव्हतं. आता हे गाव पुन्हा उभं राहिलेले आहे. ‘पुढारी’नं या गावासाठी इथं हॉस्पिटल उभं केलं. हे त्यांचं पहिलंच कार्य नव्हे. यापूर्वीही सियाचीनला ‘पुढारी’नं जवानांसाठी हॉस्पिटलची उभारणी केली. बाळासाहेब माझे मित्र. त्यांना या कार्याबद्दल धन्यवाद दिले नाहीत, तर काहीतरी चुकल्यासारखं होईल. ‘पुढारी’नं उभं केलेलं हे हॉस्पिटल लोकांच्या सतत स्मरणात राहील. लोक त्यासाठी ‘पुढारी’कारांना धन्यवादच देत राहतील.”

वृत्तपत्रसृष्टीत कोणीही अशा प्रकारे हॉस्पिटल उभारणीचं कार्य केलं नसल्याचं, छगन भुजबळ यांनी आवर्जून सांगितलं. कच्छ भागात मुळातच कडाक्याचा उन्हाळा. तरीही रणरणत्या उन्हातही या कार्यक्रमासाठी आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांच्या प्रतिनिधींच्या बोलण्यातून ‘पुढारी’बद्दलची कृतज्ञता जाणवत होती. आम्हा पाहुण्यांचं पारंपरिक कच्छी पद्धतीनं स्वागत करताना हाच कृतज्ञभाव सर्वांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. कुठे कोल्हापूर आणि कुठे अधोई – राजर्षी शाहूनगर! पण तरीही ‘पुढारी’नं आपल्या कार्याचा झेंडा कच्छच्या रणातही फडकावला!

त्या आधीही ‘पुढारी’नं उभारलेल्या हॉस्पिटलच्या रूपानं सियाचीन रणभूमीवर ‘पुढारी’चा झेंडा फडकला होताच. आता कच्छमध्येही ‘पुढारी’नं आपल्या कार्याची मोहर उमटवली. पैकी, सियाचीन या उत्तुंग रणभूमीवरील तापमान असतं उणे 40 ते 50 अंश सेल्सिअस, तर कच्छ या वाळवंटी भागात उच्चतम तापमान असतं 40 ते 50 अंश सेल्सिअस! एक मायनस तर दुसरं प्लस! दोन टोकं! परंतु, या दोन्ही टोकांच्या तापमानातील भूमीवर ‘पुढारी’नं आपल्या कार्याची मोहर उमटवली!

अधोई येथे ‘पुढारी’नं हॉस्पिटल उभारलं, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी. 2013 मध्ये जून महिन्यात मी योगेशसमवेत मोदींची गांधीनगर येथे भेट घेतली. त्यावेळी ‘पुढारी’च्या कार्याची आपल्याला कल्पना आहे असं सांगत, अधोईत ‘पुढारी’नं उभ्या केलेल्या हॉस्पिटलची आपल्याला माहिती असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. म्हणजेच ‘पुढारी’नं केलेल्या कार्याची मोदींनी तेव्हाच दखल घेतली होती आणि त्याची आठवणही जपली होती, हे विशेष.

एखाद्या माणसाला त्याचं दुःख विसरायला लावून, हसताना पाहायचं असेल तर काय केलं पाहिजे, याबद्दल मदर तेरेसा म्हणतात,
‘Everytime you smile at someone, it is an action of love, a gift to that person a beautiful thing.’
अर्थात, भारतीय तत्त्वज्ञानही हेच सांगत असतं. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परिपूर्णतेची प्रचिती ज्ञानेश्‍वर माऊलींच्या या ओवीमधून येते,
‘कर्माधारें राहाटिजे। परी कर्मफळ न निरीक्षिजे।’

माणसानं आपलं कर्म करीत राहावं; पण फळाची अपेक्षा ठेवू नये. आधी श्रीकृष्ण वदिले; मग ज्ञानेश्‍वरे निरुपिले, असं हे चिरंतन तत्त्वज्ञान. माझी वाटचालही याप्रमाणेच होत राहिलेली आहे. गुजरातच्या भूकंपग्रस्तांसाठी बांधलेलं हॉस्पिटल हा या वाटचालीतील एक टप्पा होता, एवढंच!

Back to top button