बहार-विशेष : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक | पुढारी

बहार-विशेष : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

चीन आणि हाँगकाँग, व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. चीनमधील दहा शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लावला असून, सुमारे 10 कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. चीननिर्मित कोरोनाव्हॅक लस ही कोव्हिडच्या अनेक प्रकारांवर हवी तेवढी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा होताना दिसून येत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध, पाच राज्यांच्या निवडणुका, झुंड, काश्मीर फाईल्स चित्रपट यामुळे झालेले वादविवाद या सर्व गदारोळात दोन बातम्या मात्र दुर्लक्षित झाल्या. यातील पहिली म्हणजे – जगातील सर्वात चर्चित असलेले उद्योगपती बिल गेट्स यांचे एक विधान -‘लवकरच पुन्हा एकदा जगात महामारी येण्याची शक्यता, आणि ती कोव्हिड महामारीपेक्षा वेगळी असेल.’ आणि दुसरी बातमी म्हणजे – पुन्हा एकदा चीनमध्ये वाढणारा कोरोना रुग्णांचा वाढता आलेख. प्रस्तुत लेखात यातील दुसर्‍या बातमीवर आपण लक्ष केंद्रित करूया. चीनमध्ये अचानक कोव्हिड रुग्णांची संख्या का वाढू लागली? याचा जगावर आणि मुखत्वेकरून भारतावर काय परिणाम होईल आणि लसीकरणाचे काय? याकडे आपण लक्ष देऊया.

चीनमध्ये का वाढले कोव्हिडचे संक्रमण?

साधारणपणे डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोव्हिडच्या संक्रमणाची सुरुवात झाली होती. मात्र जगाला याची खबर लागेपर्यंत फेब्रुवारी 2020 उजाडले. याचे मुख्य कारण म्हणजे चीनमध्ये असणारी यंत्रणा, जी माहिती जाहीर करण्यात फारच खबरदारी घेते आणि फक्‍त ठरावीक लोकांपर्यंतच ही माहिती राहील याची काळजी घेते. भारत, अमेरिका किंवा छोट्या युरोपियन देशांत पहिल्या-दुसर्‍या लाटेत रोज लाखो रुग्ण सापडत असताना चीनमध्ये मात्र संपूर्ण दोन वर्षांत फक्‍त सव्वा लाखच रुग्णांची नोंद केली आहे; तर मृत्यू पाच हजारच्या आसपास दाखवले आहेत. त्यामुळे चीनमधील कोव्हिडची खात्रीलायक माहिती मिळवणे किती अवघड आहे, हे दिसून येते.

यावेळी मात्र मार्च महिन्यात पुन्हा चीनमध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढताना दिसून येते. साधारणपणे 15 मार्च रोजी तिथे 5,280 रुग्ण सापडले आणि ही संख्या रोज दुपटीने वाढताना दिसून येत आहे. यापैकी बहुसंख्य प्रकरणे चीनच्या ईशान्येकडील जिलिन प्रांतात आहेत. परंतु, दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दक्षिणेकडील टेक हब शेन्झेनसह देशभरातील इतर शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तेथील प्रत्येक निवासी समुदायाला कुलूपबंद करण्यात आले आहे. रहिवाशांना फक्‍त पीसीआर चाचणीसाठी जाण्याची परवानगी आहे. व्यवसाय बंद करण्याचे किंवा घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
फक्‍त चीनच नाही, तर चीन शेजारील हाँगकाँग, व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया इथेपण रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दक्षिण कोरियामध्ये 15 मार्च रोजी एका दिवसात 240 रुग्ण कोव्हिडमुळे दगावले आहेत आणि यामागे ओमायक्रॉन असल्याचे दिसून आले आहे. आश्‍चर्य म्हणजे दक्षिण कोरियामध्ये लसीकरणाला फारच कमी प्रतिसाद मिळाला होता. या उलट परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. चीन, कोरिया, हाँगकाँग किंवा व्हिएतमानमध्ये रुग्ण वाढीमागे स्टील्थ ओमायक्रॉन अर्थात ओमायक्रॉनच्या इ.-.2 हा व्हेरियंट असल्याचा दावा तेथील सरकारी यंत्रणांनी केला आहे. आज चीनमधील दहा शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लावला असून सुमारे 10 कोटींच्या आसपास लोकसंख्या घरात बसली आहे, असा अंदाज आहे.

या वाढणार्‍या रुग्णांमध्ये गंभीर आणि अतिगंभीर प्रकरणे आता अपरिहार्यपणे वाढत आहेत. तरीही या शहरांतील 30 टक्क्यांहून अधिक अतिदक्षता युनिट्स उपलब्ध आहेत. या देशांतील संपूर्ण विश्‍लेषण केलेल्या प्रकरणांपैकी 26.3 टक्के हे ओमायक्रॉन स्ट्रेनच्या इ-2 प्रकारातील आहेत. हा ओमायक्रॉनचा उपप्रकार अधिक संक्रमणीय असून, तो या देशांना पुन्हा महामारीच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो. सध्या एक ते दोन आठवड्यांच्या आत पुन्हा तिथे कोव्हिड शिखरावर जाण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. 14 मार्चपर्यंत मुख्य चीनमध्ये पुष्टी झालेल्या लक्षणांसह 120,504 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात स्थानिक आणि मुख्य भूमीच्या बाहेरून आलेले दोन्ही समाविष्ट आहेत.

या देशांतील लसीकरण आणि कोव्हिड

चीनमध्ये कोरिया, हाँगकाँगच्या तुलनेत सर्वात जास्त लसीकरण झाले आहे. तेथे लस न घेणार्‍या लोकांचे प्रमाण खूपच कमी आहे. चीनमध्ये 200 कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस दिले असून, ही लस चीनमध्येच निर्मिती केलेली आहे. चीनच्या 99 टक्के प्रौढ (18 वर्षांवरील) लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. याउलट कोरियामध्ये हेच प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. या देशांमध्ये पुन्हा सक्‍तीचे लसीकरण सुरू झाले असून, चीनमध्ये बूस्टर डोस देण्याचे नियोजन सुरू झाले आहे. चीननिर्मित कोरोनाव्हॅक लस ही कोव्हिडच्या अनेक प्रकारांवर हवी तेवढी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो आता खरा होताना दिसून येत आहे. हीच लस ओमायक्रॉनवरतीही कमी परिणामकारक असेल, असे सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे तिथे पुन्हा बूस्टर डोसची गरज लागणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू होणार्‍या लोकांमध्ये वृद्ध लोकांचे प्रमाण अधिक आहे आणि जवळपास या सर्व लोकांनी लस घेतलेली नाही.

जगावर आणि भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

जगातील इतर देश आणि भारत यांचा विचार केला, तर सध्यातरी याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाही. युरोप अमेरिका, भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देश इथे कोव्हिडच्या दोन ते तीन मोठ्या लाटा येऊन गेल्या आहेत. या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. ओमायक्रॉनच्या लाटेनंतर आफ्रिकन देशांमध्येसुद्धा लसीकरणाचा वेग वाढला आहे. युरोप-अमेरिकेमध्ये लसीचे तीन डोस बहुतांश लोकसंख्येला मिळाले आहेत. लसीबरोबर कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्गपण होऊन गेला आहे. त्यामुळे प्रतिकारशक्‍तीचे दुहेरी कवच लोकांना मिळाले आहे. त्यामुळे भारत आणि इतर युरोपियन देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, याची अजिबात शक्यता नाही.

जरी या देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढली तरी मृत्यूदर मात्र कमीच राहील. त्यामुळे लोकांनी आणि सरकारी यंत्रणेने लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. आरोग्य क्षेत्र सोडून अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर चीनमधील काही भागात लावलेल्या लॉकडाऊनमुळे बर्‍याच वस्तूंचा पुरवठा थांबण्याची शक्यता दिसून येत आहे. यामध्ये मुखत्वे करून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश असेल. त्याचबरोबर मोबाईलचेही अनेक छोटे छोटे पार्ट महाग होण्याची शक्यता दिसून येत आहे. सुमारे एक तृतीयांश जागतिक उत्पादनाचे घर असलेल्या चीनमधील उपायांमुळे टोयोटा आणि फोक्सवॅगन कार आणि अ‍ॅप्पल, तसेच सर्किट बोर्ड आणि संगणक केबल्ससारख्या घटकांच्या उत्पादनात व्यत्यय येत आहे. लॉकडाऊनमुळे चीनच्या दक्षिणेकडील इलेक्ट्रॉनिक्स कारखान्यांचे आणि मध्य चीनमधील विविध प्रकारच्या औद्योगिक कंपन्यांचे कामही स्थगित करण्यात आले आहे. शांघायजवळील शहरांनी महामार्गावरील निर्गमन बंद केले आहे किंवा प्रत्येक ड्रायव्हरने नकारात्मक पीसीआर चाचणी रिपोर्ट दाखवण्याची मागणी केली आहे. अनेक कारखान्यांमध्ये महत्त्वाचा कच्चा माल पुरवणार्‍या ट्रकच्या मैलोन् मैल लांब रांगा लागल्या आहेत.

मात्र, दुसरी दिलासादायक गोष्टसुद्धा दिसून येईल, ती म्हणजे क्रूड तेलाच्या किमती. चीनमधील लॉकडाऊनमुळे तेथील तेलाची मागणी कमी झाल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती मागील दोन आठवड्यांतील सर्वात कमी किमतीवर आहेत. परंतु, याचा फायदा भारताला कितपत होईल हे आपल्या सरकारी धोरणावर अवलंबून असेल. तसेच या किमती कमी वेळासाठीच खाली राहतील आणि पुन्हा उसळी घेतील, अशी शक्यता आहे.

चीन आणि आसपासच्या देशातील कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या प्रवासावरही निर्बंध आणू शकते. सध्या भारतामधून या देशात फारच कमी आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक होत असली, तरी युरोपियन देशांमध्ये इथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू आहे. एप्रिल 2020 मध्ये इटली देशात कोरोनाची लाट येण्यामागे चीनमधून आलेले प्रवासी कारणीभूत होते, तशाच प्रकरची स्थिती होऊ शकते. पण आताच्या आणि त्यावेळच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक आहे. मात्र, जर युरोपियन देशांमध्ये पुन्हा प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले, तर त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर होईल. याचबरोबर तेल आणि इतर वस्तूंची ने-आण करणार्‍या जहाजांचीही वाहतूक मंदावली आहे. चीनमधील निर्बंधामुळे जगातील अनेक बंदरांवर जहाजांची ने-आण 12 तास विलंबाने होताना दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार केला, तर चीनमधील सध्या वाढत असलेल्या कोव्हिड रुग्णसंख्येमुळे इतर देशांतील आरोग्य यंत्रणेपेक्षा त्या देशांतील अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

डॉ. नानासाहेब थोरात,
ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन

Back to top button