लक्ष्मीची डिजिटल वाटचाल | पुढारी

लक्ष्मीची डिजिटल वाटचाल

संपत्ती मूल्य आकारमान जेवढे महत्त्वाचे तेवढेच संपत्ती मूल्यवाढीचा वेगही महत्त्वाचा असतो. गेल्या 5 वर्षांच्या काळात कंपनीच्या शेअर्स किमतीत सर्वाधिक वेगवान असणार्‍या 100 कंपन्यांतील 10 कंपन्यांनी वार्षिक संचयी वृद्धीदर (CGR) 93% ते 56% दिला. यात अदानी ट्रान्समिशन व अदानी एंटरप्राईज येतात. या सर्वात वेगवान 10 कंपन्यांचा वृद्धीदर (CGR) 77% होता, तर सेन्सेक्स 14% ने वाढला. बाजारवाढीच्या 5 पट अधिक वेगाने या कंपन्यांनी संपत्ती वाढवली.

शेअर्समधील गुंतवणूक (Shares investment) अभ्यासपूर्वक, शिस्तबद्ध व दीर्घकालीन असल्यास संपत्ती वृद्धीचा तो महामार्ग ठरतो, हे नुकत्याच मोतीलाल ओसवाल यांच्या वार्षिक ‘वेल्थ समिट’मधून स्पष्ट झाले. लक्ष्मीची वाटचाल भविष्यकाळात कोणत्या दिशेने असेल हे जरी अतिशय महत्त्वाचे असले तरी ती दिशा नेमकेपणाने शोधण्याचे तंत्र महत्त्वाचे ठरते. यासाठी पूर्वइतिहास व कामगिरी याचा आधार घेत जागतिक पातळीवर होणारे बदल मार्गदर्शक ठरतात.

उत्तम कामगिरी तपासण्यासाठी त्यांनी सेन्सेक्सप्रमाणे वेल्थ इंडेक्स तयार केला आहे. त्यांच्या अभ्यासातून प्राप्त झालेले निष्कर्ष वापरून सर्वसामान्य गुंतवणूकदारदेखील आपली गुंतवणूक रचना ठरवू शकतो.

कोणत्याही कंपनीच्या यशाचे पहिले सूत्र हे त्या कंपनीने भागधारकांनी दिलेल्या भांडवलाची किंमत किंवा बाजारमूल्य किती प्रमाणात वाढवले यामध्ये असते. थोडक्यात, आजची व 5 वर्षांपूर्वीची बाजारमूल्याच्या फरकाची तुलना करणे अपेक्षित असते. सातत्याने दीर्घकाळात भांडवली बाजारमूल्य वाढवणार्‍या आकाराने महाकाय ‘गजांत लक्ष्मी’ शोधण्यास सर्व कंपन्यांची बाजारमूल्यानुसार उतरती क्रमवारी लावल्यास पहिल्या 100 कंपन्यांतून फक्त 10 कंपन्या अभ्यासल्यास आपणास ज्या कंपन्या गेल्या 5 वर्षांत कशा प्रकारे वाढल्या हे स्पष्ट होते. सर्वाधिक संपत्ती निर्माण करणार्‍या या 100 कंपन्यांनी गेल्या 5 वर्षांत 71 लाख कोटी इतकी संपत्ती निर्माण केली व ही वाढ गेल्या 5 वर्षांत 2016 ते 21 या काळात झाली.

विशेष म्हणजे यातील पुन्हा 100 मधील 10 कंपन्यांनी 56% संपत्ती मूल्य वाढवले व त्यातही फक्त रिलायन्स इंडस्ट्री (14%) व टिसीएस (10%) असा 24% वाटा दोनच कंपन्यांनी दिला. ज्यांच्या हाती आपण भांडवल सोपवले, त्यांनी भूतकाळात कशी कामगिरी केली याचा पडताळा यासाठी महत्त्वाचा ठरतो. या महाकाय कंपन्यांत एचडीएफसी (दोन्ही), हिंदुस्थान लिव्हर, इन्फोसिस, बजाज फिन, कोटक बँक यांचा समावेश आहे.

संपत्तीमूल्य आकारमान जेवढे महत्त्वाचे तेवढेच संपत्ती मूल्यवाढीचा वेगही महत्त्वाचा असतो. गेल्या 5 वर्षांच्या काळात कंपनीच्या शेअर्स किमतीत सर्वाधिक वेगवान असणार्‍या 100 कंपन्यांतील 10 कंपन्यांनी वार्षिक संचयी वृद्धी दर (CGR) 93% ते 56% दिला. यात अदानी ट्रान्समिशन व अदानी एंटरप्राईज येतात. या सर्वात वेगवान 10 कंपन्यांचा वृद्धी दर (CGR) 77% होता, तर सेन्सेक्स 14% ने वाढला. बाजारवाढीच्या 5 पट अधिक वेगाने या कंपन्यांनी संपत्ती वाढवली. आकारमान वाढ, वाढीचा वेग यांच्याइतकेच संपत्ती मूल्यवाढीत असणारे सातत्य (Consistency) महत्त्वाची ठरते.

याचाच अर्थ, केवळ 2 वर्षांत संपत्तीमूल्य वाढले व 3 वर्षं चढउतार झाले तर मूल्यवृद्धी सातत्य नाही असेच म्हणावे लागते. सातत्यपूर्ण वृद्धी देणार्‍या कंपन्यांत अदानी, अल्कलाईल, अमाईन्स, आरती, हतीवेल यांचा सामवेश होतो. अशा कंपन्यांनी 33 ते 83% असा वृद्धीदर (CGR) दिला. कंपनीच्या कार्याचे एकत्रित मूल्यमापन करण्यासाठी आकारमान, वाढीत सातत्य व वाढीचा वेग हे तीनही घटक एकत्रित केल्यास आपणास वेल्थ इंडेक्स मिळतो. दीर्घकालीन गुंतवणूक या आधारे करीत त्यामध्ये प्रतिवर्ष फेरबदल केल्यास चांगला, स्थिर व सातत्यपूर्ण परतावा मिळू शकतो.

मूल्यसंक्रमण दिशा : भांडवलरहित भांडवशाही!

औद्योगिक क्षेत्रात तंत्रबदलांचा व विशेषतः गेल्या दशकात डिजिटल तंत्राचा फार मोठा बदल होत असून, संपूर्ण मूलगामी बदल घडत आहेत. सध्याच्या यंत्रसामग्री, इमारती अशा मूर्त गुंतवणूक असणार्‍या कंपन्या त्यांचे ताळेबंद व कार्यपद्धती यावरचे कार्यमूल्यांकन कालबाह्य ठरत असून मानवी कौशल्यावरच आधारित असणार्‍या डिजिटल कंपन्या भविष्यकाळात वेगाने मूल्यवृद्धी करू शकतात. हे मूल्यसंक्रमण म्हणजे भांडवलरहित भांडवलशाहीकडे होणारे संक्रमण लक्षात न घेतल्यास संपत्ती वाढीची संधी चुकणार हे निश्चित.

भविष्यकाळात व्यवसायाचे स्वरूप, त्याचे प्रारूप आणि डिजिटल तंत्रवापर यावरच ठरणार आहे. ही दिशा अमेरिकेतील बलाढ्य कंपन्यांच्या मूल्य संक्रमणातून स्पष्टपणे दिसत असून कोका कोला, एक्सान ऑइल या कंपन्या मागे पडत अल्फाबेट, अ‍ॅमेझॉन पुढे येत आहेत. डाटा म्हणजे नवे तेल आहे (Data is New Oil) हे जे ओळखतात, त्यांना बाजारपेठ परतावा देताना, मूल्यांकन करताना कसा विचार करते हेही मोठे लक्षणीय आहे. डिजिटल कंपन्यांचे आगामी

दशक त्यांच्या मूलभूत वैशिष्ट्यात असून ज्ञानाच्या अमूर्त भांडवलावर कार्य करतात. विशेषतः आपला व्यवसाय विस्तारण्यात व जागतिक स्तर गाठण्यात पारंपरिक स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत खूपच पुढे आहेत. याचे कारण त्या अमर्याद पुरवठा करू शकतात. उदा. नेहमीचे पुस्तक छपाई, वितरण याचा खर्च 400 रु. वरून 300 होईल. पण डिजिटल पुस्तक खर्च एकदाच 400 केला तर नंतर तो शून्यच राहतो. हव्या तेवढ्या प्रती कितीही कमी किमतीत विकता येतात.

मात्र अशा कंपन्या जसे प्रचंड नफा कमवू शकतात तसेच त्यांचे मूल्य शून्यावरपण येते. जर एखादी संकल्पना, सॉफ्टवेअर चालले नाहीतर त्याचे मूल्य शून्यच होते. नव्या कंपन्यांचे मूल्यांकन करताना नेहमीची मूल्यांकन पद्धत न वापरता डीसीएफ म्हणजे डिस्काऊंटेड कॅश फ्लो, समकक्ष मूल्य, धाडस गुंतवणूकदारांनी केलेले मूल्यांकन यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

डिजिटल कंपन्यांनी अल्पावधीत बाजारात मूल्यांकनाचे नवे अध्याय सुरू केले असून ते धक्कादायक, आश्चर्यकारक वाटतात. लिपस्टीक कंपनी नायकाचे मूल्य रिलायन्स इंडस्ट्रीबरोबर घेणे, तोट्यात असणार्‍या झोमॅटो, पेटीएम चढ्या दराने बाजाराने घेणे हे सर्व मूल्य संक्रमणाचे नवे अध्याय दर्शवते. ज्या कंपन्यांचे सरासरी वय 16 आहे, अशा या तरुण कंपन्या 100 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या कंपन्यांना मागे टाकत आहेत.

विशेष म्हणजे 2021 मध्ये नोंदणीकृत झालेल्या झोमॅटो, नायका व पेटीएमच्या बाजारमूल्याने 1 लाख कोटीचा टप्पा पार केला आहे. अशा कंपन्यांच्या पारंपरिक मूल्यांकन पद्धतीने त्यांचा तोटा हा फसवा किंवा संभ्रम करणारा असून त्यांचे भविष्यातील नफा शक्यता विचारात घेऊन बाजार किंमत ठरवतो. पण येथे महत्त्वाची बाब म्हणजे अशा कंपन्यांच्या यशाबाबत फारच उत्साह व अतिअपेक्षा त्यांना नंतर वेगाने खातीदेखील आणत असल्याने गुंतवणूक सावधानता महत्त्वाची ठरते.

नवे ज्ञानेश्वर

डिजिटल कंपन्याचे यश मानवी कौशल्य ‘ज्ञान’ यावर अवलंबून असल्याने स्टीव्ह जॉन, इलान मस्क, नारायण मूर्ती अशा नव-ज्ञानेश्वरावर येणारे दशक असल्याने त्यासाठी आवश्यक पोषक व्यवसाय वातावरण हे महत्त्वाचे ठरते. भारतात मोबाईल, इंटरनेटचा विस्तार, वापर व त्याची वापर किंमत या जमेच्या बाजू असून वित्तीय क्षेत्रातील जनधन, युपीआय आणि तोट्यातील कंपन्यांना सूचीबद्ध होण्यास सेबीने दिलेली परवानगी हे सर्व भारत नवी ज्ञानेश्वरी आकारत असल्याचे स्पष्ट जाणवते. युनिकॉर्न किंवा 7000 कोटीपेक्षा आकाराने मोठे असणारे नवउद्योग स्टार्टअप यांनी शतक गाठले असून, ही ज्ञान कौशल्य आधारित संपत्ती निर्माण प्रक्रिया उज्ज्वल, संपन्न भविष्यकाळ ठरवेल. ही लक्ष्मीची नवी वाटचाल ओळखणे महत्त्वाचे ठरते!

प्रा. डॉ. विजय ककडे

Back to top button