Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ४८६ अंकांनी वाढून बंद! Kotak ची दाणादाण, Axis Bankची आघाडी, मार्केटमध्ये काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ४८६ अंकांनी वाढून बंद! Kotak ची दाणादाण, Axis Bankची आघाडी, मार्केटमध्ये काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.२५) सलग पाचव्या सत्रांत तेजी कायम राहिली. बँकिंग शेअर्समधील खरेदीच्या जोरावर आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने जवळपास ७०० अंकांनी वाढून ७४,५७० च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने २२,६०० चा आकडा पार केला. त्यानंतर सेन्सेक्स ४८६ अंकांच्या वाढीसह ७४,३३९ वर स्थिरावला. निफ्टी १६७ अंकांनी वाढून २२,५७० वर बंद झाला. रियल्टी वगळता आज सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. विशेषतः पीएसयू बँक आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदीचा जोर अधिक राहिला. PSU बँक निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Closing Bell) दरम्यान, बीएसई मिडकॅप ०.७ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०.५ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

गुंतवणूकदारांना २.९७ लाख कोटींचा फायदा

बाजारातील तेजीमुळे २५ एप्रिल रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.९७ लाख कोटी रुपयांनी वाढून एकूण ४०४.३४ लाख कोटींवर पोहोचले. २४ एप्रिल रोजी ते ४०१.३७ लाख कोटी रुपये होते.

टॉप गेनर्स, टॉप लूजर्स कोण?

सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया, सन फार्मा, आयटीसी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक हे शेअर्स वाढले. तर कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले.

sensex closing

एनएसई निफ्टीवर अॅक्सिस बँक, एसबीआय, डॉ. रेड्डीज, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा हे शेअर्स हे टॉप गेनर्स राहिले. तर कोटक बँक, LTIMindtree, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय लाईफ आणि टायटन हे टॉप लूजर्स ठरले.

Nifty 50

बँकिंगमध्ये खरेदीचा जोर

आज विशेषतः बँकिंग शेअर्समध्ये खरेदीचा माहौल दिसून आला. बँकिंगमध्ये ॲक्सिस बँकेचा शेअर्स टॉपवर राहिला. हा शेअर्स एनएसईवर तब्बल ६ टक्क्यांनी वाढून १,१२८ रुपयांवर पोहोचला. त्याचसोबत एसबीआय, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक या शेअर्समधील तेजीमुळे बँक निफ्टीने ४८,६०० पर्यंत वाढ नोंदवली.

 कोटक बँकेचा शेअर्स १२ टक्क्यांनी घसरला

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) लादलेल्या निर्बंधानंतर कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स (Kotak Mahindra Bank Share Price) आज गडगडले. आजच्या ट्रेडिंग सत्रात कोटक महिंद्रा बँकेचा शेअर्स बीएसई सेन्सेक्सवर टॉप लूजर ठरला. हा शेअर्स सुमारे १२ टक्क्यांनी घसरून १,६२० रुपयांपर्यंत खाली आला. डेटा सुरक्षेची चिंता आणि आयटी पायाभूत सुविधांची कमतरता असल्याचा हवाला देत आरबीआयने बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) तात्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडणे आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यापासून प्रतिबंधित केले. दरम्यान, बँक त्यांच्या सध्याच्या ग्राहकांना सेवा देणे सुरू ठेवू शकते, जे क्रेडिट कार्डधारक आहेत. या कारवाईचा कोटक बँकेच्या शेअर्सवर परिणाम दिसून आला.

ॲक्सिस बँकेने कोटक बँकेला मागे टाकले

अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे ॲक्सिस बँकेचे शेअर्स गुरुवारी ५ टक्क्यांनी वाढून १,१२५ रुपयांवर पोहोचले. ॲक्सिस बँकेने मार्च तिमाहीत ७,१२९.६७ कोटींचा मजबूत नफा नोंदविला. यामुळे ॲक्सिस बँकेच्या शेअर्सनी (Axis Bank Share Price) तेजीत व्यवहार केला. दरम्यान, ॲक्सिस बँकेने कोटक महिंद्रा बँकेला मागे टाकले असून बाजार भांडवलानुसार ती चौथी सर्वात मोठी कर्जदार बनली आहे. कोटक बँकेचे बाजार भांडवल ३.३ लाख कोटी रुपयांवर घसरले. तर ॲक्सिस बँकेचे भांडवल ३.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. (Stock Market Closing Bell)

मॅगी- मेकर नेस्ले तेजीत

मॅगी- मेकर कंपनी नेस्ले इंडियाने गुरुवारी मार्च तिमाहीचे आर्थिक आकडे जाहीर करताना प्रति शेअर ८.५० रुपये लाभांश जाहीर केला. या पार्श्वभूमीवर एनएसईवर नेस्लेचा शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढून २,५७७ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर हा शेअर्स २,५६३ रुपयांवर स्थिरावला. (Nestle India Share Price)

LTIMindtree चे शेअर्स घसरले

IT सेवा कंपनी LTIMindtree चे शेअर्स २ टक्क्यांनी घसरून बीएसईवर ४,६०० रुपयांपर्यंत खाली आले. या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल शेअर बाजारात छाप पाडण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. (LTIMindtree Share Price)

हे ही वाचा :

 

Back to top button