Investment planning : गुंतवणूक नेमकी कशी करावी? जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

Investment planning : गुंतवणूक नेमकी कशी करावी? जाणून घ्‍या सविस्‍तर

अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

आपल्या कुटुंबाची भविष्यातील गरज पाहून गुंतवणूक निर्णय घेतले पाहिजेत. कुटुंबात येणारे उत्पन्न, होणारा खर्च आणि आज आपण कोणत्या जीवन स्तरावर आहात आणि भविष्यात कोठे असणार याचा जीवनाचा आर्थिक आराखडा तयार केला पाहिजे आणि मगच गुंतवणूक केली पाहिजे. ( Investment planning )योजना पाहून गुंतवणूक करण्यापेक्षा आपली गरज आणि कालावधी पाहून गुंतवणूक केली पाहिजे. नेमकी हीच बाब आपल्या जीवनातील पैशाच्या व्यवस्थापनेच्या बाबतीत घडत असते. ते कसे पाहूया!

1) कित्येक लोक बचत खात्यात वर्षानुवर्षे पैसे ठेवतात. जिथे महागाई वाढते तेथे 7 ते 8 टक्क्यांनी बचत खात्यातील पैसा वाढतो. 2 ते 3 टक्के म्हणजेच 4 ते 5 टक्के नुकसान होते. याला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडातील शॉर्ट टर्म डेब्ट फंडातील योजनेत पैसे ठेवले, तर 5 ते 6 टक्के व्याज मिळेल. इथे ठेवलेले पैसे कधीही काढता येतात. ( Investment planning )

2) गुंतवणूक सुरक्षित हवी म्हणून दीर्घकाळासाठी पारंपरिक आयुर्विमा योजनेत 20 ते 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. जिथे 5 ते 6 टक्के परतावा मिळतो आणि महागाई वाढते 7 ते 8 टक्के. म्हणजे 2 ते 3 टक्के नुकसान होते. महागाई वास्तवमधील उत्पन्न खात असते आणि वस्तूंच्या किमती वाढत असतात. आज आपल्या कुटुंबाचा दरमहिन्याचा खर्च 25,000 होत असेल, तर 7 टक्के महागाईने वीस वर्षांनी आताच्या राहणीमानानुसार 1,00,160 रुपये मोजावे लागणार आहेत. आपली गुंतवणूक 5 टक्के दराने वाढत असेल, तर आजचे 25,000 वीस वर्षांत 67,537 रुपये होतात आणि दरमहा खर्चासाठी एक लाख गरज भासणार आणि मिळणार 67,537 म्हणजे 32,623 रुपयांचे नुकसान झालेले पाहावयास मिळते. ( Investment planning )

3) इक्विटी बाजारातील म्युच्युअल फंड योजना किंवा चांगल्या कंपनीचा शेअर्स घेतला, तर तो दोन-तीन वर्षांत वाढलाच नाही म्हणून पैसे काढून घेतले जातात. इक्विटी बाजार ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे, हे कित्येक गुंतवणूकदारांच्या लक्षातच येत नाही. मागील चाळीस वर्षांचा इतिहास पाहिल्यास सेन्सेक्सने 1979 मध्ये 100 अंकांवरून आज 65,000 वर पोहोचला आहे. 16 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे; मात्र इथे जोखीम आहे म्हणून या बाजारापासून कित्येक गुंतवणूकदार लांब राहिले आहेत.

4) भारतीय लोक स्थावर मालमत्तेवर प्रेम करतात. उठसूट सर्वच पैसा जमीनजुमला, शेती, प्लॉट, व्यापारी मिळकतीमध्ये गुंतवणूक करतात. इथे भली मोठी रक्कम गुंतवणूक करून तरलता नसते किंवा कॅश फ्लो मिळत नाही. भविष्यात कुटुंबातील मोठ्या गरजा आ वासून उभ्या राहतात. मोठ्या पैशासाठी इतरत्र हात पसरावे लागतात. रिटायर झालेले लोक 60 लाखांचा फ्लॅट घेतात आणि 15,000 रुपये दरमहा भाडे घेत बसतात. जिथे परतावा ROI – RETURN ON INVESTMENT 3 टक्के पडतो आणि हवी तेव्हा रक्कमही काढता येत नाही.

5) चक्रवाढ व्याजाच्या नियमामुळे व्याजावर व्याज चढल्यामुळे जितका काळ मोठा तितकी मोठी संपत्ती तयार होते, हे लक्षात घेतले पाहिजे. पैसा वाढविण्यासाठी वेळ आणि वेग महत्त्वाचा असतो. कित्येक जण पोस्टात रिकरिंग खाते उघडतात आणि दर पाच वर्षांनी रक्कम काढून घेतात. त्या ऐवजी म्युच्युअल फंडात सिप केले, तर वीस वर्षांत खूप मोठी रक्कम तयार होते. उदा. पोस्टात 7 टक्के परतावा मिळतो आणि म्युच्युअल फंडात दीर्घकाळात 12 ते 15 टक्के परतावा मिळतो. या फरकामुळे खूप मोठी संधी निघून जाते. नुकसान सोसावे लागते. ( Investment planning )

आर्थिक नियोजनामध्ये विविध मालमत्तेमधील गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. गुंतवणूक का करायला हवी, या प्रश्नाचे उत्तर प्रथम शोधायला हवे. त्यासाठी आर्थिक नियोजन हवे म्हणजे तुमच्या घरात किती पैसा येतो, किती शिल्लक राहतो आणि भविष्यातील मोठ्या खर्चासाठी कधी आणि किती पैसा हवा याचा आराखडा केला की अल्प, मध्यम आणि दीर्घकाळात किती पैसा लागेल, याचे उत्तर येईल. कालावधीनुसार आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार गुंतवणूक केली पाहिजे.

1)रोख शिल्लक – अचानकपणे उद्भवणार्‍या खर्चासाठी लागणारा पैसा रोखे बाजार MONEY – MARKET मधील योजनेत गुंतवणूक करावा. ही गुंतवणूक सुरक्षित असते. कधीही काढता येते आणि बचत खात्यापेक्षा चांगला परतावा मिळतो.

2) आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील अल्पकालीन गरजेसाठी दोन ते तीन वर्षांत लागणारी गुंतवणूक ऋण बाजार येथे DEBT Market शॉर्टटर्म डेब्ट फंड, लाँग टर्म इन्कम फंड अशा योजनेत केली पाहिजे.

3) शेअर बाजार Equity Market जोखीमयुक्त गुंतवणूक असते. या बाजारात गुंतवणूक करताना दीर्घकाळासाठी केली पाहिजे. तीन ते सहा वर्षांसाठी मध्यम मुदतीसाठी लागणारी गुंतवणूक बॅलन्स फंड इक्विटी आणि डेब्ट मार्केट या ठिकाणी करावी.

4) सहा ते दहा वर्षांहून अधिक काळासाठी दीर्घकालीन गुंतवणूक लार्ज कॅप फंड मल्टिकॅप किंवा फ्लेक्झी कॅप फंडामध्ये करावी.

5) दहा वर्षांहून अधिक काळासाठी लागणारी गुंतवणूक मिड कॅप स्माल कॅप किंवा विविध कंपन्यांचे शेअर्समध्ये केली पाहिजे, जिथे 15 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल आणि आपला पैसा चांगल्या प्रकारे वाढून मिळेल. वरील उदाहरणनुसार 25,000 आज गुंतवणूक केली आणि 20 वर्षांत 15 टक्के परताव्याने 47,5322 रुपये होतात. त्यासाठी मार्केटमधील जोखीम स्वीकारावी लागेल. जोखीम समजावून घेणे आणि अभ्यासपूर्वक गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

6) धातू बाजार COMODITY MARKET – सोने, चांदी किंवा इतर धातूंमध्ये एकूण पोर्टफोलिओ च्या 10 टक्के ते 15 टक्के गुंतवणूक केली पाहिजे. ‘मध्यम जोखीम, मध्यम परतावा’ असे समीकरण या बाजारात आढळते . गरज पाहून कोणत्या गोष्टीसाठी कोठे गुंतवणूक करावी याबाबत योग्य सल्ला देणार्‍या सल्लागाराचा अभाव दिसतो आणि आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यासाठी आर्थिक साक्षरतेचे धडे घेतले पाहिजेत. सुज्ञपणाने निर्णय घेतला पाहिजे.

Back to top button