आर्थिक नियोजनामध्ये वित्तीय शिस्त महत्त्वाची, पर्याय फंड एकत्रीकरणाचा | पुढारी

आर्थिक नियोजनामध्ये वित्तीय शिस्त महत्त्वाची, पर्याय फंड एकत्रीकरणाचा

मिथिला शौचे

आर्थिक नियोजनामध्ये वित्तीय शिस्तीला सर्वाधिक महत्त्व आहे. ही शिस्त केवळ उत्पन्न आणि खर्च यांच्यामधील ताळमेळ राखून बचत करण्यामध्येच असता कामा नये तर आपण विविध पर्यायांमध्ये करत असलेल्या गुंतवणुकीचा पसाराही सुव्यवस्थित असणे गरजेचे आहे. ही शिस्त आपल्याला फायदेशीर ठरणारी असते. तसेच प्रसंगानुरूप वेळीच निर्णय घेण्यास, बदल करण्यासही त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीचे सर्व तपशील सहजगत्या, एका क्षणात समोर यावेत अशा प्रकारे त्यांचे व्यवस्थापन केले पाहिजे. उदाहरणार्थ, अनेक बँकांमध्ये आपली बचत खाती किंवा अन्य खाती असतील तर त्यापैकी वापरात नसलेली खाती बंद करणे आणि घराजवळच्या बँकेमध्ये सर्वांची खाती उघडणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.

अलीकडील काळात म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या वाढत आहे. यामध्ये वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या वेळी गुंतवणूक केली जाते. पण त्यांची एकाच वेळी देखरेख करणे कालांतराने जिकिरीचे होऊन बसते. यावर उपाय म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी केलेली ही गुंतवणूक एकाच फोलिओखाली आणू शकतो. त्यामुळे त्यांचे विवरण आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी सुलभ होतात.यासाठी एकाच फंडहाऊसमध्ये विविध म्युच्युअल फंड फोलिओ उघडता येतात.

एकाच फंडहाऊसमध्ये विविध म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला कन्सॉलिडेशन फॉर्म भरावा लागतो. हा अर्ज म्युच्युअल फंडांच्या संकेतस्थळांवरून डाऊनलोड करता येतो. या अर्जावर सर्व युनिटधारकांची स्वाक्षरी असणे गरजेचे असते. या स्वाक्षर्‍या झाल्यानंतर तो फॉर्म फंडहाऊसकडे जमा करावा लागतो. त्याचबरोबर ज्या म्युच्युअल फंडांचे एकत्रीकरण करावयाचे आहे त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यातील कोणत्या फंडातील गुंतवणूक पुढे सुरू ठेवायची आहे आणि कोणत्या फंडातील गुंतवणूक बंद करायची आहे, त्याचा तपशील नोंदवणे गरजेचे आहे. सर्व गुंतवणूक एकाच फोलिओखाली आणण्यासाठी सर्व युनिट धारकांची नावे, होल्डिंगची पद्धत (एकल किंवा संयुक्त) इत्यादींची माहिती द्यावी लागेल. यामध्ये होल्डिंग पॅटर्न वेगवेगळ्या फोलिओमध्ये सारखा असणे गरजेचे आहे. यामुळे आपला गुंतवणुकीचा फाफट पसारा कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा : 

 

Back to top button