अर्थज्ञान : चांगल्या परताव्यासाठी मल्टी असेट फंड आहे फायदेशीर, जाणून घ्या त्याविषयी | पुढारी

अर्थज्ञान : चांगल्या परताव्यासाठी मल्टी असेट फंड आहे फायदेशीर, जाणून घ्या त्याविषयी

अनिल पाटील, प्रवर्तक, एस पी वेल्थ, कोल्हापूर

चांगला परतावा मिळण्यासाठी तुमची गुंतवणूक विविध मालमत्तेमध्ये असावी आणि तेजी-मंदीनुसार एका मालमत्तेमधून दुसर्‍या मालमत्तेमध्ये आपली गुंतवणूक गेली पाहिजे. याच पद्धतीने कार्य करणारी योजना म्हणजे मल्टी असेट अलोकेशन फंड होय.

आपल्या देशातील म्युच्युअल फंड क्षेत्राने मोठी झेप घेतली आहे. 2013 साली एकूण गुंतवणूक मालमत्ता 7.61 लाख कोटी होती, ती आज जुलै 23 अखेर 46.38 लाख कोटी झाली आहे. ही ग्रोथ मागच्या दहा वर्षांत सहा पटीहून अधिक आहे. अम्फी (AMFI) आणि सेबीच्या (SEBI) नियंत्रणाखाली म्युच्युअल फंड क्षेत्र फारच चांगले काम करीत आहे, असे म्हणता येईल. गुंतवणूकदारांना सर्वोत्तम परतावा देऊन 10 कोटींहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास या क्षेत्राने मिळविला आहे. गुंतवणूकदारांच्या गरजेप्रमाणे अनेक म्युच्युअल फंड योजना आणल्या जातात. त्यापैकी ‘मल्टी असेट फंड’ हा बँक एफडीला पर्याय असू शकतो.

गुंतवणुकीसाठी वेगवेगळे मालमत्तेचे पर्याय आपल्यासमोर उभे असतात; ते म्हणजे रोखे बाजार (Money Market), ऋण बाजार (Debt Market), समभाग बाजार (Equity Market) आणि धातू बाजार (Commodity Market). जगात कोठेही मुख्यतः हे चार मालमत्तांचे बाजार पाहावयास मिळतील. योजना भरपूर असल्या तरी कोणतीही योजना वरील बाजारापैकीच असणार. बाजार म्हणजे त्यामध्ये चढउतार आलेच. प्रत्येक मालमत्तेच्या बाजारामध्ये प्रत्येक वर्षी तेजी असेलच असे नाही. काही वर्षे तेजी असते, तर काही वर्षे मंदी आणि हा तेजी-मंदीचा खेळ सातत्याने चालूच असतो. मंदीच्या वेळी गुंतवणूक करणे, तेजीच्यावेळी विकणे ही क्रिया ज्यांना जमते त्यांना गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळून ते गुंतवणूकदार यशस्वी ठरतात. म्हणून चांगला परतावा मिळण्यासाठी तुमची गुंतवणूक विविध मालमत्तेमध्ये असावी आणि तेजी-मंदीनुसार एका मालमत्तेमधून दुसर्‍या मालमत्तेमध्ये आपली गुंतवणूक गेली पाहिजे. याच पद्धतीने कार्य करणारी योजना म्हणजे मल्टी असेट अलोकेशन फंड होय. चारही प्रकारच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणारी व्यवस्था या योजनेमध्ये उपलब्ध आहे.

दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी बँक एफडीचा मार्ग फायदेशीर ठरत नाही

पाच वर्षे किंवा त्याहून जास्त वर्षे मुदतठेवीमध्ये गुंतवणूक करीत असाल तर तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल. बँक एफडी सुरक्षित गुंतवणूक असते, पण तुम्ही जर थोडीशी जोखीम घेतली तर फार चांगला परतावा मिळवू शकतो. जेव्हा बँकेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्या गुंतवणुकीवर निव्वळ परतावा पाहणे गरजेचे असते. निव्वळ परतावा म्हणजे, निव्वळ परतावा = एकूण व्याज – (आयकर + महागाई) NET Return = Total Interest – (Income Tax + Inflation).

आज राष्ट्रीयीकृत बँकेचे मुदत बंद ठेवीचे (Fixed Deposit) सरासरी व्याजदर 7% आहे. बँकेकडून मिळालेल्या व्याजावर तुम्हाला आयकर भरावा लागतो. तुम्ही कोणत्या करपात्र उत्पन्न गटात आहात तितका आयकर भरावा लागेल. मिळालेल्या व्याजातून आयकर वजा करून निव्वळ परतावा किती मिळतो, हे पाहावे लागेल.

एक उदाहरण घेऊ. एक लाख रुपये बँकेत ठेवले तर एक वर्षानंतर 7% व्याजाप्रमाणे 7000/- रुपये व्याज मिळेल आणि जर तुम्ही 20% च्या टॅक्स स्लॅबमध्ये असेल, तर 7000/- मधून ( Tax+ Edu ces) 1470/-रु. इतका आयकर भरावा लागेल. म्हणजेच 7000 -1470 = 5530 रुपये इतके निव्वळ व्याजाचे उत्पन्न मिळाले. याचा अर्थ, निव्वळ परतावा 5.53% इतकाच मिळाला. तसेच जर आपले उत्पन्न उच्च करपात्र गटात (Higher Tax Slab) असेल, तर बँकेकडून मिळालेल्या व्याजातून तुम्हाला 33% आयकर भरावा लागल्याने तुम्हाला निव्वळ परतावा 4.69% मिळतो.

आपल्याकडे महागाई 4-6% असते आणि जर ही महागाई आपल्या निव्वळ परत्यावातून वजा केल्यास, आपल्याला फारच कमी परतावा मिळतो. म्हणून वाढत्या महागाई विचार केला तर बँकेत ठेव ठेवल्याने मालमत्ता वाढत नाही, तर उणे होत चालली आहे आणि दीर्घकाळासाठी तर हे फारच नुकसानकारक आहे.

बँक एफडी ही डेब्ट मार्केटमधील सुरक्षित गुंतवणूक आहे. परंतु दीर्घकाळासाठी बँकेत एफडी ठेवणे हे उचित नाही, हे वरील उदाहरणावरून लक्षात येईल. जर तुमच्याकडे तीन वर्षे अवधी असेल तर मल्टी असेट म्हणजे अनेक प्रकारच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक खूप फायदेशीर ठरू शकेल. आपल्या गुंतवणुकीला तीन ते पाच वर्षे कालावधी असेल, तर बँक एफडीपेक्षा चांगला परतावा मिळण्यासाठी मल्टी असेट अलोकेशन फंड फायदेशीर ठरणार आहे.

मल्टी असेट फंडामध्ये का गुंतवणूक करावी?

मागील दहा कॅलेंडर वर्षांतील चार प्रकारच्या मालमत्तेने तेजी-मंदीनुसार खालील परतावा दिलेला आहे. (माहिती स्रोत निर्देशांक निफ्टी 500 TRI आणि Mcx Short Debt Duration वरून घेतला आहे.)

मागील दहा वर्षांचा (कॅलेंडर वर्ष) आढावा घेतल्यास रोखे ऋण बाजार, समभाग बाजार आणि धातू बाजारातील दर नेहमी बदलले दिसतात. प्रत्येक मालमत्तेच्या बाजारात तेजी-मंदी आणि अस्थिरता दिसते. तेजी-मंदी आणि अस्थिरता या गोष्टींमध्येच जोखीम दडलेली असते. जिथे जोखीम असते तिथे उच्चतम परतावा मिळतो.

बाजारातील जोखीमनुसार, गुंतवणुकीचे प्रमाण कमी-अधिक करण्याचे योग्य व्यवस्थापन फंड मॅनेजरकडून केले जाते. या योजनेत आलेल्या निधीचे फंड मनेजर पुढीलप्रमाणे – इक्विटी बाजार 35% ते 80% पर्यंत, डेब्ट मार्केट 10% ते 50%, कमोडीटी मार्केट (सोने) 10% ते 50% पर्यंत गुंतवणूक करू शकतात. कमोडीटी किंवा डेब्ट बाजारातील गुंतवणूक इक्विटीपेक्षा कमी जोखीम क्षमतेची असते. मल्टी असेट अलोकेशन फंड गुंतवणूक विविध मालमत्तेमध्ये असलेने एक मध्यम प्रमाणाची जोखीम असते. ज्या ज्या वेळी मार्केट कोसळते त्या वेळी मल्टी असेट अलोकेशन फार कमी प्रमाणात खाली जातात.

डी.एस.पी. म्युच्युअल फंडाच्या अभ्यासानुसार निफ्टीने 1997 ते 2003 व 2008 ते 2013 या काळात काहीच परतावा दिला नाही. पण वरीलप्रमाणे अलोकेशन केल्यानंतर मागील 2000 सालापासून 2023 पर्यंत अलोकेशन फंडाने 12% परतावा दिला आहे. कमी जोखीम घेऊन उत्तम परतावा मिळविण्यासाठी या योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे.

कर आकारणी

कोटक आणि डी. एस. पी. म्युच्युअल फंडांनी या प्रकारातील मल्टी असेट अलोकेशन फंडातील न्यू फंड ऑफर (NFO) सुरू केली आहे. NFO काळात गुंतवणूक केली की, 10/- रु. प्रती युनिट मिळणार आहेत. कोटकची योजना इक्विटी आधारित आहे. तर डीएसपीची योजना फंडांनी डेब्ट आधारित आहे. इक्विटी आधारित असलेल्या योजनेसाठी इक्विटी कराची आकारणी केली जाईल.

अर्थात, एक वर्षात मिळालेल्या नफ्यावर 15% (STCG) शोर्ट कॅपिटल गेन द्यावा लागेल आणि एक वर्षानंतर मिळणार्‍या फायद्यावर एक लाख वजा करून, राहिलेल्या झालेल्या नफ्यावर तुम्हाला 10% ( LTCG) लाँग टर्म कॅपिटल टॅक्स द्यावा लागेल. डेब्ट फंड आधारित असलेल्या योजनेसाठी इंडेक्सेशन बेनिफिट मिळणार आहे. एक वर्षाच्या आत गुंतवणूक काढून घेतली, तर मिळालेल्या नफ्यातून तुमच्या आयकर स्लबनुसार कर द्यावा लागणार आहे आणि तीन वर्षांनंतर रक्कम काढली असता, इथे इंडेक्सेशन बेनिफिट मिळणार आहे. याचा अर्थ, या योजनेत एक लाख गुंतवणूक केली आहे.

तीन वर्षांनंतर 9% परतावा गृहीत धरून मिळून 30605 इतका फायदा मिळेल, तर तीन वर्षांनंतर तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिटनुसार वाढलेली महागाई वजा करावी लागेल. 6% महागाई गृहीत धरली तर तीन वर्षांचे 6%* 3 =18% वजा करून राहिलेल्या रकमेवर 20% कॅपिटल गेन टक्स द्यावा लागेल. 30605 -18000 = 12605 नेट कॅपिटल गेनवर *20% 2521 रु. कॅपिटल गेन द्यावा लागेल. याचा अर्थ, निव्वळ परतावा 30605/- (LTCG) कॅपिटल गेनवर फक्त 2521/- टॅक्स द्यावा लागला. जिथे बँकेत ठेवले असते तर 30605 रकमेवर 21%, आयकर स्लबनुसार 6427/- आणि उच्च आयकर गटात असलेल्या लोकांना 33% म्हणजे 10099/- इतका आयकर द्यावा लागला असता.

चांगला परतावा आणि कमी कर आकारणी या दोन्ही गोष्टींचा फायदा अशा योजनेत मिळणार आहे. मागील परतावा भविष्यात मिळेल, याची खात्री नसते. इथे केलेली गुंतवणूक बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची माहिती काळजीपूर्वक वाचावी.

आपल्या कुटुंबात येणार्‍या पैशाचे योग्य आणि प्रभावी व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. दरमहा आलेल्या उत्पन्नातून महत्त्वाच्या गरजेवर पैसा खर्च करावा. काटकसर करून पैसा वाचवावा आणि आपल्या पैशाला कामाला लावावे. तरच आपला पैसा वाढेल, फुलेल, आपल्यासाठी काम करेल आणि आपले जीवन समृद्ध होईल.

Back to top button