अर्थज्ञान : मालमत्ता भाड्याच्या बदल्यात कर्ज ? | पुढारी

अर्थज्ञान : मालमत्ता भाड्याच्या बदल्यात कर्ज ?

बँकेत विविध प्रकारची कर्जे असतात आणि अनेकांना सर्व प्रकारच्या कर्जांची माहिती देखील असते. मात्र बँकेकडून आणखी एक विशेष प्रकारचे कर्ज दिले जाते आणि ते म्हणजे भाड्याच्या बदल्यात मिळणारे कर्ज. हे कर्ज घरमालकाला भाड्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचे आकलन करून दिले जाते.

बँकेकडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या कर्ज योजना राबविल्या जातात. यात पर्सनल लोन, व्हेईकल लोन, होम लोन, बिझनेस लोन, कन्झ्युमर ड्यूरेबल लोन यांसारख्या असंख्य योजनांचा समावेश असतो. आपण कर्जाच्या निकषात आणि पात्रतेत फीट बसत असाल, तर बँकेकडून कर्ज मिळवणे अवघड नाही. यात सर्वात म्हणजे ग्राहकाची कर्जफेडीची क्षमता किती आहे, या आधारावर कर्ज मंजूर केले जाते. संबंधित व्यक्ती किती हप्ता भरू शकतो, त्याच्यावरील आर्थिक जबाबदारी, उत्पन्नाची स्थिती या गोष्टीची पडताळणी केली जाते. अर्थात या अटी नोकरदार मंडळी सहजपणे पूर्ण करतात आणि कर्जाचे हप्ते सहजपणे भरू शकतात. मात्र काही मंडळींना दोन-तीन स्रोतांतून उत्पन्न सुरू असते; परंतु त्यांना ते बँकेसमोर मांडता येत नाही किंवा पुरावे नसतात. एखाद्या कर्जाची फेड आपण सहजपणे करू शकतो, हे कागदपत्रावर मांडू शकत नाहीत. अशा स्थितीमुळे कर्ज मंजूर होत नाही. शेवटी त्यांच्यासाठी कर्ज • मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे आणि तो म्हणजे भाड्याने दिलेल्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न. या उत्पन्नाचे आकलन करून बँक संबंधितास कर्जपुरवठा करू शकतात.

कसे मिळते कर्ज ? 

एखाद्याला पैशाची निकड लागली आणि त्याच्याकडे कर्जफेडीबाबत हमी देणारे कोणतीही कागदपत्र नसतील, तर त्याला भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बदल्यात कर्जासाठी अर्ज करता येतो. अशा प्रकरणात काही बँकांनी योजना आणल्या आहेत. अर्थात, अशा प्रकरणात अर्जदाराला कर्जाबाबतचे निश्चित केलेले निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. एखादा व्यक्ती भाड्यापोटी मिळणाऱ्या
उत्पन्नाच्या जोरावर कर्जाची मागणी करत असेल तर त्याला भाडेकराराची प्रत आणि भाड्याच्या पावत्या बँकेकडे जमा कराव्या लागतील. भाडेकराराचा कालावधी आणि कर्जफेडीचा कालावधी समान • असेल तर बँकेकडून सहजपणे कर्जप्रकरण मंजूर होऊ शकते.

कर्जप्रक्रिया  

भाड्याच्या बदल्यात कर्ज मिळवणाऱ्या व्यक्तीला बँक साधारणपणे मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या निम्मे किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज मंजूर करते. याशिवाय कर्जाची रक्कम ही भाडेकराराच्या कालावधीदरम्यान ग्राहक फेडू शकतो की नाही, हे देखील बँकेकडून तपासले जाते. त्या जोडीला बँकेकडून अर्जदाराच्या उत्पन्नाचे विश्लेषणदेखील होते. भाडेकरू सोडून गेला तर हप्ता भरण्यात अडचण तर येणार नाही ना, याचाही विचार केला जातो.

व्यावसायिक मालमत्तेवर कर्ज मिळणे सोयीचे 

आपली व्यावसायिक मालमत्ता असेल तर आणि या मालमत्तेचा वापर भाडेकरू व्यावसायिक कारणांसाठी करत असेल, तर अशा प्रकरणात बँका प्राधान्याने कर्ज देतात.

भाडेकरूदेखील होईल पार्टी 

भाड्याने दिलेल्या मालमत्तेवर कर्ज घेत असाल, तर भाडेकरूला कर्जप्रकरणाशी संबंधित काही औपचारिकता पूर्ण करावी लागेल. मालमत्तेचे भाडे हे थेट घरमालकाला न देता बँकेकडे जमा करण्याचे भाडेकरूचे पत्र बँकेला द्यावे लागते. म्हणजेच त्या मालमत्तेचे भाडे मालकाकडे न जाता थेट बँकेतच जमा होईल.

किती मिळू शकते कर्ज ?

अशा कर्ज प्रकरणात मोठी मालमत्ता किंवा मोठे भाडेकरू किंवा व्यावसायिक मालमत्ता यास प्राधान्य दिले जाते. मालकाने मॉल, बँक, हॉस्पिटल यास भाड्याने जागा दिली असेल तर बँकेकडून अशी • प्रकरणे तत्काळ मंजूर केली जातात. साधारणपणे मोठी मालमत्ता किंवा मोठ्या भाडेकरूकडून मिळणाच्या मालमत्तेवर २५ लाख रुपयांपासून २०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळवता येऊ शकते. या प्रकारचे कर्ज हे पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचे असतात. अर्थात, लहान मोठ्या दुकानदारांना जसे की मेडिकल, किराणा आदींना जागा दिली असेल तर कर्ज मिळते. परंतु हे कर्ज वैयक्तिक कर्जाच्या श्रेणीत असते आणि व्याजदर देखील अधिक असतो.

अन्य महत्त्वाच्या गोष्टी 

बँकेकडून कर्ज देताना कर्जदाराचे वयदेखील पाहिले जाते. उदा. कर्जासाठी अर्ज देताना व्यक्तीचे वय २८ ते ३० वर्षांच्या आसपास असेल तर त्याच्याकडे कर्जफेडीसाठी पुरेसा कालावधी असल्याचे बँकेकडून गृहीत धरले जाते. याशिवाय घरभाड्याशिवाय कर्जदाराचे आणखी काय काय उत्पन्न स्रोत आहेत, त्याचीही माहिती बँकेकडून मिळवली जाते. जेणेकरून कर्जफेडीसाठी अडचण येणार नाही.

कोणत्या कागदपत्रांची गरज?

मालमत्तेच्या भाड्याच्या बदल्यात कर्ज मिळवण्यासाठी अर्जदारास केवायसी जमा करावी लागते. त्याचबरोबर दोन फोटो, भाड्याची पावती, भाडेकराराच्या प्रती जमा कराव्या लागतील. गेल्या तीन वर्षांतील फॉर्म- १६ देखील बँकेकडे जमा करावा लागेल.

– विधिषा देशपांडे   

Back to top button